प्रिय भारतीयांनो,

या सूक्ष्मजीवांचा तुम्हाला नमस्कार!

माझी व साऱ्या जगाची नावानिशी ओळख होऊन आता १३६ वर्षे उलटली. जगभर माझे नाव झाले. जगाच्या सर्व भागांत मला नाही बस्तान बसवता आले, पण तुमचा देश, द. आफ्रिका, चीन, इंडोनेशिया वगैरे काही देशांत मी चांगलीच सत्ता करतोय. त्यातही तुमचा देश नंबर एका. इतके मोठे साम्राज्य माझे कोठेही नाही. त्यामुळेच माझी सगळय़ांनी भीती घेतलीय. सारे जण माझ्याविरुद्ध कामाला जुंपलेत. नवनवीन योजना करत आहेत. ‘टीबी हरेगा, देश जितेगा’ अशा मोहिमाही ऐकल्यात मी. पण मी तुम्हा साऱ्यांना पुरून उरलो आहे. माझे बंडखोर बंधुजन तर तुमच्या हात धुऊन पाठी लागलेत. तुम्ही त्यांना एमडीआर, एक्सडीआर अशी नावे ठेवल्याचे ऐकलेय मी. मी तुम्हाला आज जे लिहितोय ते एका वेगळय़ाच उद्देशाने लिहितोय. नीट समजून घेतलंत तर तुमचाच फायदा होईल.

मी हवेतून पसरतो हे तुम्हाला माहीत आहेच. खेळती हवा, सूर्यप्रकाश मला नाही आवडत. ते मला टिकू देत नाहीत. मी एकदा व्यक्तीच्या शरीरात शिरलो की माझे सर्वात आवडीचे ठिकाण असते अर्थातच फुप्फुस. तिथे मी रमतो, कॉलनी तयार करतो. मग तू मला ‘पल्मोनरी टीबी’ फुप्फुसाचा क्षयरोग असे नाव देतोस व खोकत बसतोस. खंगू लागतोस. मग माझा मालक जेव्हा थुंकतो, शिंकतो, बोलतो तेव्हा त्याच्या थुंकीतून हवेत पसरतो व जवळच्या इतर व्यक्तींच्या श्वासातून परकाया प्रवेश करतो. तसे मला फुप्फुसाखेरीज इतरही अवयव वर्ज्य नाहीत. अलीकडे माझ्या अनेक सहकाऱ्यांना इतर अवयवांत कॉलनी करताना पाहतो मी. यांना तू ‘एक्स्ट्रॉ पल्मोनरी टीबी’ म्हणतोस.

मी ३० टक्के भारतीयांच्या आणि कदाचित ६०-७० टक्के मुंबईकरांच्या शरीरात वास्तव्य करून आहे. का, एकदम घाबरलात का? नाही. सगळय़ांमध्ये मी सक्रिय नाही. असे नाही तर एकदम ‘४० कोटी जनता क्षयरोगबाधित’ अशी ब्रेकिंग न्यूज नसती का झाली. पण तसे नाही. ३०-३२ लाख लोकांमध्येच मी लक्षणे दाखवतोय. दरवर्षी अ‍ॅक्टिव्ह होतोय. आता विचारा असे का? माझे कोणी आवडते, कोणी नावडते, असे आहेत का? नाही, नाही. तसे नव्हे. पण काय आहे की काही जण फार उत्तम जीवनशैली पाळतात. व्यवस्थित पोषक जेवतात, व्यायाम करतात, धूम्रपान वगैरेपासून दूर राहतात. अशा लोकांमध्ये मला फारसा वाव मिळत नाही. त्यांची संरक्षण यंत्रणा मजबूत असते. काय आहे ना, पांढऱ्या पेशी वगैरे मला फार विरोध करतात. मग राहतो मी बापडा भूमिगत, निद्रिस्त होऊन. पण इतर अनेकांची संरक्षण यंत्रणा (रोगप्रतिकारक्षमता) खिळखिळी असते. मग मी त्यांच्यावर जोरदार आक्रमण करतो. त्यांना बेजार करतो. मग ते कधी हा डॉक्टर, कधी तो डॉक्टर, कधी केमिस्टकडे जाऊन काहीतरी गोळय़ाऔषधं घे, असं भरकटत राहातात. कधी कधी २-२ महिने लावतात माझा निश्चित शोध लावायला व माझ्याविरुद्ध योग्य औषधे घ्यायला. माझे चांगलेच फावते व मी तोपर्यंतचा काळ फुल एन्जॉय करत त्यांच्याकडून अनेक इतरांच्या शरीरात संक्रमण करतो.

काय म्हणालात? की ज्यांच्या शरीरात मी भूमिगत राहतो तो तसाच कायम राहतो का? नाही राव, मी अशी हार मानणारा नव्हेच. या व्यक्तींची समजा जीवनशैली बिघडली, राहणीमान खालावले किंवा त्यांना मधुमेह झाला किंवा माझ्या इतर काही जीवाणू-विषाणू मित्रांनी ग्रासले की त्याची संरक्षक व्यवस्था, रक्तपेशींची फौज कमजोर होते. मी टपूनच बसलेला असतो. हो अगदी संधिसाधू माणसांसारखा. लगेच मी माझी प्रजा तिथे बनवायला लागतो व ती व्यक्ती आजारी होते. तुम्हा सर्वानी जर तुमची, मित्रांनो, मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही जर तुमचा आहारविहार चांगला ठेवलात, वजन योग्य ठेवलंत, व्यसने केली नाहीत तर तुम्हाला मी त्रास देण्याची शक्यता बरीच कमी होते. हे तुम्ही गांभीर्याने घ्या ना. तुमच्या देशात जसे माझे प्रस्थ आहे तसेच ‘कुपोषण’ म्हणतात ना त्याचेही मोठे राज्य आहे. मी आणि कुपोषण उत्तम मित्र आहोत. कुपोषणामुळे मला मदत होते व मी एकदा लागण करून अ‍ॅक्टिव्ह झालो तर कुपोषण अधिक गंभीर करतो त्या व्यक्तीमधले. आता तुम्ही मला विचाराल, हे मी सारे का सांगतोय? आपण तर एकमेकांचे शत्रू आहोत. तुम्ही तर माझ्याविरुद्ध मोठी युद्धमोहीम काढलीय. पण तरीही मी तुम्हाला हे पत्र लिहितोय आणि चार शहाणपणाचे सल्ले देतोय. कारण का माहितीय? अरे, माझी अधिसत्ता उपभोगून, विजयाचा उन्माद करून झालाय. इतके यश मी संपादन करेन असे मला १८८२ ला रॉबर्ट सरांनी प्रथम ओळखले तेव्हा कधीच वाटले नव्हते. पण आता तुमच्या देशात माझ्यामुळे होत असलेले लाखो मृत्यू बघवत नाहीत मला. तरुण माणसे, महिला, बालके, किती किती जीवघेणे मृत्यू. नको वाटतो मला आता हा इतका संहार. तुम्ही तुमच्या चुकांनी मला इतके प्रबळ केलेत, इतकी सत्ता गाजवू दिलीत. आता तुम्ही माझ्याविरुद्ध औषधे किंवा मला किंवा माझ्या बंडखोर जातभाईंना ओळखण्यासाठी बरेच प्रयत्न करताय, पण प्रतिबंधात्मक उपायांवर पण लक्ष केंद्रित करा. निदान पुढच्या पिढय़ांना तरी मजबूत करा.

मला अक्षय्य, अमर्त्य नाही राहायचंय.

क्षयरोग हरेल, देश जिंकेल हे खरं करण्यासाठी तुम्ही सारेच जागरूक व्हा. जबाबदारीने वागा.

माझ्या सदिच्छा!

तुमचा,

मायक्रोबॅक्टेरिअम

टय़ुबरक्युलॉसिस (क्षयरोग  जिवाणू)