अमेरिकेच्या ‘नासा’ (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रिेशन) या अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर खारे पाणी असल्याचा दावा गेल्या आठवडय़ात केला. त्यामुळे मंगळावर पाणी असल्याच्या आणि तेथे सजीवसृष्टी तग धरू शकेल या सिद्धातांला पुष्टी मिळाली. त्याचबरोबर भविष्यात तेथे मानवी वसाहती स्थापन करण्याच्या साहसी विचारांनादेखील चालना मिळाली.

मंगळाच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी डोंगरउतारासारखी आणि उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरांची भूरूपे आहेत. त्यांच्या उतारावर पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झाल्यासारखे भासणारे गडद रंगाचे, लांब चर आहेत. त्याला संशोधक ‘रिकरिंग स्लोप लायनी’ असे म्हणत. ते मंगळावरील उष्ण हवामानाच्या हंगामात दिसतात आणि थंड ऋतू सुरू झाला की दिसेनासे होतात. ते पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झाले असावेत असा अंदाज होता. नासाच्या ‘मार्स रिकोनसन्स ऑर्बिटर’ यानावरील ‘हायराइझ’ (हाय रिझोल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपरिमेंट) या उपकरणाद्वारे त्याचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील अ‍ॅटलांटा येथील जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील लुजेंद्र ओझा आणि अन्य संशोधकांनी स्पेक्ट्रोग्राफी हे तंत्रज्ञान वापरून या ‘रिकरिंग स्लोप लायनी’चा अभ्यास केला. ‘हॅले क्रेटर’ येथील भूपृष्ठावरून परावर्तित झालेल्या अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांच्या अभ्यासातून तेथे पाणीमिश्रित क्षार (हायड्रेटेड सॉल्ट्स) – क्लोरेट आणि परक्लोरेट या क्षारांचे मिश्रण असल्याचे संकेत मिळाले. त्याचप्रमाणे मंगळावरील ‘पालिकीर’ आणि ‘होरोविट्झ क्रेटर’, तसेच ‘कॉप्रेटिस चश्मा’ नावाची दरी येथेही हे क्षार आढळले. त्यावरून मंगळावर खारे पाणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तथापि, हा अप्रत्यक्ष पुरावा आहे.

मंगळ संशोधनाची पाश्र्वभूमी

आपल्या सभोवताली पसरलेल्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपल्यासारखेच जीवन अन्य कोठे आहे का, याची मानवाला मोठी जिज्ञासा आहे. पृथ्वीवर मानवाचे जीवन मोठय़ा प्रमाणात पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात पृथ्वीबाहेर अवकाशात अन्य कोठे मानवी वसाहती करण्याची वेळ आलीच तर तेथे पाणी असणे ही त्याची पूर्वअट ठरणार आहे. म्हणूनच अन्य ग्रहांवरील पाण्याच्या शोधाला मोठे महत्त्व आहे.

सुरुवातीला मंगळ एक शुष्क (कोरडा) आणि जीवसृष्टी नसलेला ग्रह समजला जायचा. मात्र गेल्या दोन दशकांतील संशोधनाने तेथे पाणी असण्याच्या शक्यतेला आधार दिला.ओडिसी या यानाने २००२ मध्ये मंगळाच्या ध्रुवीय भागांत मोठय़ा प्रमाणावर हायड्रोजन असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यावरून हा हायड्रोजन पाण्यातील असला पाहिजे असा कयास बांधण्यात आला. त्यानंतर २००८ साली ‘फिनिक्स’ मोहिमेत त्याचा अधिक अभ्यास करण्या आला. त्यातून या हायड्रोजनचा स्रोत पाणी हाच असल्याचे निष्पन्न झाले.

हुरळण्याचे कारण नाही!

डॉ. अमिताभ घोष हे मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ नासाच्या मंगळ संशोधन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मंगळावरून पृथ्वीवर आणलेल्या पहिल्या खडकाच्या नमुन्याचा सर्वप्रथम अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी हे नवे संशोधन निश्चितच आशादायी असल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्या मते लगेच मंगळावर नद्यानाले असल्याचे समजून हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळाचे वातारण नष्ट झाले. आता ते बरेच विरळ आहे. त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील वातारणाचा दाब पृथ्वीवरील वातावरणाच्या दाबाच्या साधारण एक दशांश इतका कमी आहे. तसेच मंगळावरील तापमान बरेच कमी आहे. या दोन्ही गोष्टींमुळे मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात फार काळ स्थिर राहू शकत नाही. मात्र त्यामुळे या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही. आज ना उद्या मानव मंगळावर वसाहती करण्याचे प्रयत्न करणार हे नक्की. तेथे जर पाणी नसेल तर संपूर्ण प्रवासात लागेल तेवढे पाणी पृथ्वीवरून नेणे कठीण आहे. त्याशिवाय मंगळावर जर पाणी असेल तर ते मानवाच्या तेथून पृथ्वीवर परतीच्या प्रवासातही मोठी भूमिका बजावू शकते. या मंगळावरील पाण्याचे पृथक्करण करून त्यातून मिळवलेला ऑक्सिजन यानाचे इंधन म्हणून वापरता येऊ शकतो.

मंगळाची हाक

सौरमालेत सूर्यापासूनच्या नजीकतेचा विचार केल्यास बुध, शुक्रानंतर पृथ्वी आणि त्यानंतर मंगळाचा क्रमांक लागतो. हे चारही ग्रह ठोस घनरूपी आहेत, तर त्यापुढील ग्रह वायुरूपी आहेत. बुध आणि शुक्र सूर्याला तुलनेने अधिक जवळ असल्याने तेथील परिस्थिती मानवी वस्तीला अनुकूल नाही. मंगळावरील परिस्थिती त्या मानाने बरी असू शकते आणि तो पृथ्वीच्या जवळ (२०० दशलक्ष मैल) आहे. त्यामुळे वैज्ञानिक समुदायाला मंगळ नेहमीच खुणावतो.

मंगळावर स्वारी : मंगळाच्या संशोधनासाठी आजपर्यंत मरिनर, व्हायकिंग, मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेयर, पाथफाइंडर, ओडिसी, फिनिक्स, स्पिरिट, ऑपॉच्र्युनिटी, मार्स रेकोनेसन्स ऑर्बिटर, क्युरिऑसिटी या मोहिमा आखण्यात आल्या होत्या. मंगळावरील पाण्याचा शोध यावर त्यातील बहुतांश मोहिमांचा भर होता.

आपली ‘मॉम’!

भारताच्या ‘इस्रो’ या अवकाश संशोधन संस्थेने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळाच्या दिशेने यान प्रक्षेपित केले. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) किंवा मंगळयान असे या मोहिमेचे नाव आहे. या यानाने २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी प्रवेश केला. सध्या ते मंगळाच्या प्रदक्षिणा करत असून त्याची उपयुक्त निरीक्षणे करत आहे. अतिशय कमी वेळात भारताच्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम उपलब्ध ‘पीएसएलव्ही’च्या (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक) साह्य़ाने यशस्वी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला.  भारताने हे केवळ चीनबरोबरील अंतराळ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी केले आणि यानाची संशोधन क्षमता फारच मर्यादित असल्याची टीका केली जाते.
-सचिन दिवाण