|| डॉ. संजय मंगला गोपाळ

बहुआयामी लेखक रत्नाकर मतकरी कलेच्या माध्यमातून दलित-पीडित-वंचित समाजासाठी आयुष्यभर सक्रिय राहिले आणि जन चळवळींच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वैचारिकता, कलाभिव्यक्ती आणि बांधिलकी यांचा समन्वय साधणारा ‘वंचितांचा रंगमंच’ हा अभिनव उपक्रम त्यांच्या कल्पनेतूनच आकारास आला. या उपक्रमाचा आढावा, रत्नाकर मतकरी यांच्या १८ मे रोजी येणाऱ्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने…

 

श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरींना या जगाच्या रंगमंचावरून आकस्मिक एग्झिट घेऊन एक वर्ष झाले. ते केवळ कथा, नाटके लिहून थांबणारे नव्हते; तर साहित्यिकाने सामाजिक भूमिका घेतलीच पाहिजे या वैचारिकतेने कलांच्या माध्यमांतून ते दलित-पीडित-वंचित समाजासाठी आयुष्यभर सक्रिय राहिले. जन चळवळींच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. ‘लोककथा’७८’सारखे दलितांवर व स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराबद्दल नाटक लिहून, नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासी-शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात मेधा पाटकर यांनी उभारलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन तिथल्या परिस्थितीवरची अत्यंत बोलकी चित्रे काढून आणि समता आंदोलनाच्या परित्यक्ता मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन, नंतर त्यावर टेलिफिल्मही काढून त्यांनी आपल्या सामाजिक संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. या त्यांच्या सामाजिक जागृतीचा पुढचा प्रवास म्हणजे त्यांच्यातल्या अवलियाला वयाची पंचाहत्तरी उलटल्यावर पडलेले, वंचितांचा रंगमंच हे अनोखे स्वप्न!

गरीब-शोषितांचे आयुष्य इतरांनी बाहेरून अनुभवून किंवा पाहून त्यावर खूप कलाकृती निर्माण झाल्या. त्याऐवजी वंचितांनी, पीडितांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या प्रतिभेने, स्वत:च निर्माण करावी कलाकृती व मांडावी समाजासमोर, अशी ही संकल्पना होती. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘वंचितांची रंगभूमी ही पारंपरिक रंगभूमीपेक्षा, तिथल्या प्रायोगिकतेपेक्षाही अगदी वेगळी आहे. ती अधिक थेट आहे. अधिक उत्स्फूर्त आहे. शहरी रंगभूमीच्या अलंकरणापासून मुक्त अशी उघडीवाघडी आहे. लोकरंगभूमीला जवळ, पण तिच्याइतकी आत्मसमाधानी नाही. ती रंजल्या-गांजलेल्यांची, तरीही आपल्या कष्टांमधूनच बळ घेऊन उभी राहणारी आहे. इथले कलाकार स्वत:च्या खास लोकवस्ती शैलीतली नवी रंगभूमी उद्या निर्माण करतील! तिला स्वत:चे प्रश्न मांडणारा स्वत:चा आवाज असेल! एक मोठा युवा वर्ग या वंचितांच्या रंगमंचावर पाय रोवून उभा राहिला आहे, असे स्वप्न मी कायमच पाहात असतो.’

त्यांच्या या स्वप्नाला २०१४ साली आकार मिळाला आणि आज सहा वर्षांनंतर वंचितांचा रंगमंच अर्थात ‘नाट्यजल्लोष’ समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षितिजावर पाय रोवून ठाम उभा आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिद्दीने दहावी पास होणाऱ्या मुलांचा सन्मान करणाऱ्या आणि गेली २९ वर्षे यशस्वीपणे चालत असलेल्या उपक्रमामुळे ठाण्यातील विविध लोकवस्तींत काम चालू आहे. समता विचार प्रसारक संस्थेचे ठाण्यातले हे काम गेली अनेक वर्षे लोकवस्त्यांमध्ये पसरलेय, हे मतकरींना ठाऊक असल्याने, ‘वंचितांचा रंगमंच’ची अभिनव कल्पना राबवण्यासाठी त्यांनी समता विचार प्रसारक संस्थेला निवडले.

मग ठाण्यातल्या वस्ती-वस्तीत उभे राहिले नाट्य अभिव्यक्तीचे वादळ. नाटक माध्यम केवळ मध्यमवर्गाचे न राहता तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ही तळमळ घेऊन मतकरी स्वत: संस्थेच्या वस्तीपातळीवरील सामान्य कार्यकत्र्यांसमवेत वस्तीत फिरू लागले. पुस्तकांतून आणि नाटकांतून माहीत असलेले रत्नाकर मतकरी वंचितांच्या रंगमंचाने कार्यकत्र्यांच्या हक्काचे ‘मतकरी सर’ झाले. एवढे मोठे दिग्गज, नावाजलेले साहित्यिक सर्वांबरोबर अगदी सहज मित्रासारखे असायचे. सर्वांबरोबर चहा, वडापाव, साधे जेवण जे काही असेल ते आनंदाने खायचे.

भाषणे, व्याख्याने, शिबिरे, अभ्यासवर्ग अशा सरधोपट उपक्रमांचा अनुभव असलेले संस्थेचे कार्यकर्ते आधी या प्रकाराबाबत साशंकच होते. पण मतकरी सरांचा हात पकडून याबद्दल वस्तीतील मुली-मुलांशी बोलायला सुरुवात केली आणि चित्रच पालटले! अजूनपर्यंत नाटक बघितले नाही, नाट्यगृहात कधी पाय ठेवला नाही अशा मुली-मुलांनी ही कल्पना डोक्यावर घेतली. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाट सापडली. ठाण्यातील अनेक नाट्यकर्मींचे मार्गदर्शन मिळाले. आणि  पहिल्याच वर्षी २१ वस्त्यांतून  ३०० मुलांच्या नाटिका सादर झाल्या. या नाटिकांमधून मुलांच्या भावविश्वातील विचारांचे, त्यांच्या भोवतालच्या अडचणींचे दर्शन घडले तसेच त्यांच्या सामाजिक जाणिवेचीही कल्पना आली.

त्यानंतर प्रत्येक वर्षी चढत्या क्रमाने हा नाट्यजल्लोष रंगतच गेला. त्यात युवा नाट्यजल्लोष, महिला नाट्यजल्लोष यांची जोड देत वंचितांचा रंगमंच जोरात दौडत होता. नाट्यजल्लोषाबरोबरच मुलांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या कलेच्या आणि वैचारिक कार्यशाळाही संस्थेमार्फत चालू होत्या. त्यामधून मुली-मुलांच्या आकलनशक्तीला, प्रतिभेला आणि आकांक्षांना अवकाश मिळाले. त्यांना अनेक मान्यवरांचे, विचारवंतांचे विचार ऐकायला मिळाले. त्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवेलाही धार आली आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग त्यांना खुला झाला.

२०१४ आणि २०१५ या सुरुवातीच्या दोन वर्षांत मतकरींनी जाणीवपूर्वक विषयाचे कोणतेही बंधन ठेवले नव्हते. मुलांना जे जाणवतेय, जे म्हणायचेय ते त्यांना मुक्तपणे करू द्यात, अशी त्यांची भूमिका होती. नाट्यक्षेत्रातील हौशी कलाकार, जाणते कार्यकर्ते, ठाण्यातील ‘टॅग’ या संस्थेचे अनेक सहयोगी वस्तीत जाऊन मुलांचे हे प्रयास जवळून पाहात होते. त्यांना लागेल ती मदत करीत होते. मतकरींची या साहाय्यकांना आणि कार्यकत्र्यांना स्पष्ट सूचना असे : साहाय्यकांनी मुलांना नाट्यकलेसंदर्भात, स्टेजचा प्रभावी वापर करण्यासंदर्भातच मदत करायची. त्यांचा विषय, मांडणी, भाषा, अभिव्यक्ती यांत ढवळाढवळ करायची नाही! १५ ते २० मिनिटांच्या या नाटिका बसवताना मुलांची निर्मितीक्षमता आणि सभोवतालच्या प्रश्नांची त्यांना असणारी जाणीव याचे फार मनोज्ञ दर्शन सर्वांना झाले. लिखित संहितेचा आग्रह नाही. नेपथ्य-वेशभूषा-प्रकाशयोजना आदींचा बडेजाव नाही. उपलब्ध मर्यादित  ‘प्रॉपर्टी’च्या वापरातून परिणामकारक उभारणी, हा प्रायोगिक नाटकाचा फॉर्म मुलांनी आपापत:च स्वीकारला.

२०१६ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या वर्षाच्या निमित्ताने मुलांनी संविधान या विषयाला धरून नाटिका बसवल्या. संविधानाच्या जाणकारांचे अभ्यासवर्ग भरवून संविधानाची व्यवस्थित ओळख करून घेतल्यावर, संविधानातील लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता, राखीव जागा, मानवी हक्क, मार्गदर्शक तत्त्वे अशी १२ मूल्ये निवडण्यात आली. चिठ्ठ्या टाकून एकेका वस्तीला त्यातील एकेक विषय देण्यात आला. मुलांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आणि संविधानातील मूल्य यांची जोडणी करत एकसे एक परिणामकारक नाटिका उभ्या केल्या. यानंतर मुलांनी २०१७ साली निवडले ‘समस्यांचे समाधान’ हे कल्पनासूत्र. शैक्षणिक विषमता, बेरोजगारी, अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे समाजाचे शोषण, भ्रष्टाचार, सफाई कामगारांच्या नरकयातना, तलाव व मैदानाचे संवर्धन, स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक शोषण, समलैंगिक व्यक्तींच्या व्यथा यांसारख्या समाजाला भेडसावणाऱ्या अनेक विषयांवर वस्तीतील मुलांनी प्रगल्भतेने नाटके सादर केली. गेल्या वर्षी नाट्यजल्लोषमध्ये ‘मनाचे आरोग्य’ या विषयावर आधारित नाटके सादर करण्यात आली. त्यासाठी ठाण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या संस्थेने आधी या विषयांवर आधारित कार्यशाळा घेऊन वस्तीतील मुलांचे प्रबोधन केले आणि नंतर त्यातील वेगवेगळ्या समस्यांवर आधारित नाटके बसवण्यासाठी सक्रिय मार्गदर्शन केले.

नाटक व चित्रपटविश्वातील अनेक मान्यवरांनी वेळोवेळी कार्यक्रमांना हजर राहून मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि काहींना आपल्या चित्रपटातून, नाटकांतून संधीही दिली. आकाशवाणीने या सर्व उपक्रमांची दखल घेऊन या मुलांची आणि कार्यकत्र्यांची नाटके आणि मुलाखत प्रक्षेपित केली. आज सहा वर्षांनी वंचितांचा रंगमंच छान स्थिरावला आहे. बहरतो आहे. वंचित मुली-मुलांना नव्या संधी उपलब्ध करून देतो आहे. त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते आहे. त्यांची सामाजिक जाण वाढते आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची जोड मिळते आहे.

प्रत्येक वर्षी नाट्यजल्लोषच्या सर्व कार्यक्रमांना आणि रंगीत तालमींनासुद्धा आवर्जून हजर राहून मतकरी मुलांना प्रोत्साहित करत असत. त्यांच्या उपस्थितीने आणि कौतुकाने मुलांमध्ये चेतना निर्माण होत असे. या उपक्रमावर त्यांचे बारीक लक्ष असे. वेळोवेळी अनेक सूचना आणि नव्या नव्या कल्पना देऊन ते वंचितांचा रंगमंच अधिकाधिक चित्तवेधक आणि वंचित मुलांना अधिकाधिक संधी देणारा व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असत. त्यांचे असणे हे मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी होते. अशा परिस्थितीत त्यांच्या आकस्मिक जाण्याने वंचितांच्या रंगमंचावर आभाळ कोसळले. त्यात करोनाचा कठीण काळ. एकमेकांना भेटणे, धीर देणेही शक्य नाही. परंतु अशा वेळी एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर एखादी श्रद्धांजली सभा, एखादा गौरव ग्रंथ, एखादी व्याख्यानमाला अशा सरधोपट कार्यक्रमात न अडकता, सर्वांच्या विचारमंथनातून ‘आपल्या मतकरी सरांना’ मानवंदना देण्यासाठी वंचितांच्या रंगमंचावरील कलाकारांच्या अदाकारीतून वर्षभर दरमहा ‘मतकरी स्मृतीमाला’ चालवावी, ही कल्पना सुचली. वंचितांच्या रंगमंचासाठी मतकरी सरांबरोबरीने कार्यरत असलेल्या प्रतिभाताई मतकरी यांनीही पाठिंबा दिला. एकीकडे मुलांच्या सामाजिक जाणिवा विकसित व्हाव्या, तर दुसरीकडे रत्नाकर मतकरींच्या विविधांगी कलांना सलाम करता यावा, अशा रीतीने या मालिकेचा आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक महिन्यात एकेका कलेला धरून, विविध सामाजिक सांस्कृतिक मुद्द्यांवर, वंचित मुलांना सामावून घेऊन वर्षभर कार्यक्रम करायचे, विषयाशी सुसंगत अशी मतकरींची एखादी कलाकृतीही सादर करायची, असे ठरले.

मतकरी अतिशय उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांच्या चित्रकलेला धरून झालेल्या पहिल्या कार्यक्रमासाठी भविष्यकाळातील वस्ती, तंत्रज्ञान आणि पर्यावरण असे विषय देण्यात आले. टाळेबंदीच्या काळात मर्यादित साधने आणि बिकट आर्थिक परिस्थितीतही विविध लोकवस्तीतील ७२ मुली-मुलांनी सहभाग घेतला. मुलांच्या कल्पनाशक्तीचा आणि त्यांच्या प्रभावी चित्रविष्काराचा प्रत्यय त्यांच्या चित्रांतून आला. दुसरा कार्यक्रम अभिवाचनावर होता. मुलांनी त्यांना आवडेल त्या पुस्तकातून एका उताऱ्याचे अभिवाचन करायचे होते. यालाही मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी मतकरींनी शेवटच्या काळात लिहिलेल्या ‘गांधी : अंतिम पर्व’ या नाटकाचे अभिवाचन योगेश खांडेकर आणि चमूने सादर केले. हे अभिवाचन मतकरी स्वत: करत असत. पुढचा कार्यक्रम ऑनलाइन शिक्षणावर आधारित होता. या वेळी मुले, पालक व शिक्षकांशी ऑनलाइन शिक्षणाबद्दलच्या अनुभवावर चर्चात्मक कार्यक्रम घेण्यात आला. शेवट सुप्रसिद्ध नाट्यकलाकार विक्रम गायकवाड यांनी मतकरींच्या ‘तुम्हीच वाक्य दिलं होतं’ या शिक्षणावरील कथेच्या वाचनाने केला. ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या कार्यक्रमात ‘लोकवस्तीची अभिव्यक्ती’ या विषयावर वंचितांच्या रंगमंचावरील कलाकार करोनाकाळातील अनुभवापासून तंत्रज्ञानाची अपरिहार्यता, महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा ते ‘मी एक समलैंगिक’ यांसारख्या अनेक विषयांवर अत्यंत प्रभावीपणे अभिव्यक्त झाले. नोव्हेंबरमध्ये मतकरी स्मृतीमालेतील पाचवा कार्यक्रम रत्नाकर मतकरी यांच्या ८२व्या जयंतीचे औचित्य साधत जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व वंचितांच्या रंगमंचाने राज्यव्यापी कलाविष्काराने सादर केला. डिसेंबरमध्ये सहाव्या कार्यक्रमात ईद-दीपावली-नाताळ अशा सर्व धर्मीय सणांच्या निमित्ताने सलोखा या विषयावर कार्यक्रम झाला. जानेवारीतील मतकरी स्मृतीमालेचा कार्यक्रम महात्मा गांधी स्मृती दिन आणि दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन याला धरून ‘आंदोलक गांधी समजून घेताना’ या विषयावर झाला. मुलांनी या विषयांना धरून नाटिका सादर केल्या. फेब्रुवारी माहिन्यात योगेश खांडेकर आणि सुयश पुरोहित या नाट्यअभिनेत्यांच्या सहकार्याने मुलांसाठी अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली होती. विविध वस्तीतील ५०हून अधिक मुले यात सहभागी झाली. मार्च महिना देशात चालू असलेले शेतकरी आंदोलन व गांधीजींनी केलेला १९३०च्या मार्च महिन्यातला मिठाच्या सत्याग्रहाच्या आठवणीत अनेक जनआंदोलनांनी सुरू केलेल्या मिट्टी सत्याग्रहाने गाजला. त्याचेच प्रतिबिंब मतकरी स्मृतीमालेत पडले व वंचितांच्या रंगमंचावरील कलाकारांनी हा कार्यक्रम ‘आपली जमीन, आपली माती व आपले जीवन’ या विषयावरील प्रत्ययकारी नृत्य, नाटिका, कविता अशा सादरीकरणाने गाजवला.

वर्षभर उत्साहाने चालवलेल्या मतकरी स्मृती मालेचा समारोप १७ एप्रिल रोजी करण्यात आला. या वेळी वर्षभरात सादर झालेल्या विविध कला आणि सामाजिक विषयावर आधारित कार्यक्रमांमधून निवडक सादरीकरण कोलाजच्या स्वरूपात दाखवण्यात आले. एकंदरीत संपूर्ण स्मृतीमालेत वर्षभर विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी रत्नाकर मतकरी यांनी संकल्पिलेल्या आणि समता विचार प्रसारक संस्थेने ठाण्यात रंगरूपाला आणलेल्या वंचितांच्या रंगमंचाच्या द्रष्टेपणाची दखल घेतली. पैशाने वंचित असलेली मुले सर्जनशीलतेमध्ये अजिबात वंचित नाहीत हे मतकरींच्या वंचितांच्या रंगमंचाने सर्वांना दाखवून दिले.

(लेखक समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत.)

sansahil@gmail.com