राज्याच्या इतिहासाच्या पानांमध्ये कोरली गेलेली काही वेगळी राजकीय क्षणचित्रे आणि त्यामागची कहाणी.. ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांच्या अल्बममधून.. खास महाराष्ट्र दिनानिमित्ताने.. 

अ. र. अंतुले  – एकीकडे सिमेंट घोटाळा प्रकरण गाजत असताना मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांची इंदिरा गांधी यांच्यासमवेत बराच वेळ चर्चा सुरू होती. तेव्हाच्या राजकारणाला अर्थ देणारे हे छायाचित्र.

01

शालिनीताई पाटील काही वर्षांपूर्वी पहिली महिला मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली, की शालिनीताई पाटील यांचे नाव पुढे येई. एका बँकेच्या कार्यक्रमातील त्यांचे हे छायाचित्र. डोक्यावरून पदर आणि कपाळावरील मोठे कुंकू ही त्यांची चिरपरिचित ओळख ठसविणारे.

02

मनोहर जोशी राजकारणातील ही गोडी आताशा कमीच पाहायला मिळते. शिवसेना नेते मनोहर जोशी यांना एका प्रसंगी पेढा भरविताना शंकरराव चव्हाण.

03

वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मुलाखतीच्या निमित्ताने त्यांची छायाचित्रे काढण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. वसंतदादांना मधुमेह असल्याने ठरावीक वेळाने ‘इन्शुलिन’चे इंजेक्शन घ्यावे लागत असे. मुलाखत चांगलीच रंगली होती. त्यात दादांची इंजेक्शन घ्यायची वेळ झाली. त्यांना विचारले, फोटो काढू का? ते म्हणाले, काढ बाबा. काढला!

04

शंकरराव चव्हाण शिस्तप्रिय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या वाढदिवशी काही तरी वेगळे छायाचित्र हवे म्हणून सकाळी अगदी लवकर ‘वर्षां’वर पोहोचलो. शुभेच्छुकांची गर्दी होण्यास तोवर अजून वेळ होता. आत शंकररावांच्या पत्नी कुसुमताई वाढदिवसाच्या निमित्ताने शंकररावांचे औक्षण करत होत्या. त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण मागे उभे होते. राजकारणाच्या धकाधकीतला हा कौटुंबिक क्षण नेमका कॅमेराबद्ध करता आला.

05

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बुद्धिवादी नेते. एखाद्या देवळात वा धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत, असे चित्र सहसा पाहायला मिळत नाही. त्या पाश्र्वभूमीवरचे हे वेगळेच चित्र. सिद्धिविनायक मंदिरात पूजा-अभिषेक करताना शरदराव आणि प्रतिभाताई.

06

पृथ्वीराज चव्हाण ‘१० जनपथ’शी उत्तम संबंध असलेल्या निवडक नेत्यांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या एका कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्यासमवेत.

07

डॉ. श्रीकांत जिचकार आणि सुशीलकुमार शिंदे सुशीलकुमार शिंदे अर्थमंत्री आणि डॉ. श्रीकांत जिचकार हे अर्थराज्यमंत्री असताना राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्या दोघांचे घेतलेले एकत्रित छायाचित्र. तसे नेहमीच्या पठडीतील; परंतु त्यातील दोघांच्याही चेहऱ्यावरचा ताजेपणा आज खास पाहण्यासारखा.

08

नारायण राणे नारायण राणे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पोलिसांची मानवंदना स्वीकारताना. छायाचित्र तसेही खूपच बोलके आहे!

09

अजित पवार राज्य मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री म्हणून समावेश झाला, त्या वेळी शपथ घेण्यास जात असताना अजित पवार यांचे राजभवनावर टिपलेले हे छायाचित्र. अजितदादांबद्दलचे कौतुक खाली बसलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकताना दिसतेय..

10