कावळा काळ्या व राखाडी रंगाचा एक पक्षी; एरवी कावळ्या कावळ्या पाणी दे, चिमणी-चिमणी वारा दे, एक घास काऊचा, एक चिऊचा असे संदर्भ घेऊन आपल्या आयुष्यात पहिल्यापासून येतो ते अगदी पिंडाला कावळा शिवेपर्यंत सोबत करतो. अर्थात, पिंडाला कावळा शिवण्याचा तो विधी ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. अजून एका कारणासाठी कावळा आपल्या लहानपणात डोकावतो तो इसापनीतीमधील एका गोष्टीमुळे. उन्हाळ्याचे दिवस असतात. जंगलात पाण्याचा थेंबही नसतो, तेवढय़ात तहानलेल्या कावळेदादांना एका झोपडीजवळ एक रांजण दिसते. त्यात पाणी असते, पण ते खोल असते; मग ते पिणे तर अवघड होते. मग पाण्याला चोचीपर्यंत आणायचे कसे हा कूटप्रश्न तो एकएक छोटा दगड रांजणात टाकून शेवटी ते पाणी वर आणत सोडवतो. खरंतरं त्याला आर्किमिडीज भेटण्याचा प्रश्नच नाही पण निसर्गानेच त्याला जीवनसंघर्षांच्या लढाईतील या गहन कूटप्रश्नाचे उत्तर शिकवलेले असते. खरोखर प्राण्यांना, पक्ष्यांना बुद्धी असते का ? तर असते, असेच आता अनेक संशोधनातून दिसून येत आहे.

संशोधन काय म्हणते?
कावळा हा पक्षी मूळ ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील बेटांवरचा. आपल्याकडेही कावळे दिसतात. वैज्ञानिकांच्या नव्या संशोधनानुसार रंगाने फारशा आकर्षक नसलेल्या या पक्षाकडे सात वर्षे मुलाच्या बुद्धिमत्तेइतकी बुद्धी असते, एखादे कोडे तो अक्कलहुशारीने सोडवू शकतो. इसापनीतीतील कथा आपण वाचली आहे पण खरेच तसे घडते का, याबाबत कधी कुणी विचार केला नव्हता. पण ऑकलंड विद्यापीठातील सारा जेलबर्ट या जैववैज्ञानिक महिलेने कावळ्याच्या आकलनशक्तीची परीक्षा घेतली. त्यांनी आकलनाची उत्क्रांती कशी होत गेली असावी या उद्देशाने हा अभ्यास केला. त्यात त्यांनी न्यू कॅलेडॉनियन (कोरव्हस मॉनेडय़ुलॉइडस) या प्रजातीच्या सहा कावळ्यांना न्यू कॅलेडोनिया बेटावरून पकडून आणले. ही प्रजात निवडण्याचे कारण म्हणजे ती अतिशय हुशार आहे. तारेच्या कुंपणातील तारा वाकवून अन्न मिळवणे, पाने कुरतडून कीटकांना खणून काढण्यासाठी वापरणे असल्या नाना युक्तया ते करीत असतात.

कावळ्याच्या गोष्टीचा नवा अध्याय
इसापनीतीतल्या गोष्टीसारख्या परिस्थितीत कावळे  कसे वागतील याचा अंदाज घेण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले. त्यासाठी त्यांना दगड उचलण्याचे प्रशिक्षण जेलबर्ट व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले. बुचाला मांसाचे तुकडे लावून ते पारदर्शक नलिकेत ठेवले असता ते खूप खोल होते. त्यांना दुसऱ्या एका प्रयोगात वाळूने निम्मी भरलेली नळी व पाण्याने निम्मी भरलेली काचेची नळी दिली असता त्यांनी पाण्यात वाळू किंवा खडे टाकण्याचे ७६ टक्के प्रयत्न केले. त्यांना पाण्यात टाकण्यासाठी रबर जे पाण्यात बुडते व पॉलिथिन जे तरंगते असे दोन पर्याय दिले असता त्यांनी बरोबर रबराचे तुकडे पाण्यात टाकण्याचा प्रयत्न ९० टक्के वेळा केला. काही बाबतीत त्यांची समज कमी पडली हेही सांगावे लागेल, कारण एक रूंद व एक अरूंद अशा नळीत त्यांनी खडे टाकण्यासाठी रूंद नळीचा वापर केला. त्यात त्यांना सातवेळा खडे टाकावे लागले तर अरूंद नळीत केवळ दोन खडे पुरेसे ठरले. एखादी वस्तू त्याच्या आकारमानाइतके पाणी विस्थापित करते, हा आर्किमिडीजचा नियम ५-७ वर्षांच्या मुलाला माहीत असतो तसाच तो नियम म्हणून नव्हे पण एक शहाणपणाची युक्ती म्हणून कावळ्यांनाही माहीत असतो. काय कृती केली की, काय घडते हे मानवी आकलनाचे सूत्र त्यांनाही लागू पडते. नंतर एक अवघड प्रयोग करण्यात आला. तीन नळ्या घेऊन एकीत मांसाचा तुकडा ठेवण्यात आला, दुसरी नळी टेबलाखाली ठेवून पहिलीला जोडण्यात आली. एक नळी कशालाच जोडलेली नव्हती. आता यात दुसऱ्या नळीत खडे टाकून पाण्याची पातळी वाढवणे शहाणपणाचे होते कारण ज्यात मांसाचा तुकडा होता ती नळी अरूंद होती, त्यात दगड टाकणे अवघड होते. मुले हा तीन नळ्यांचा संच घेऊन वयाच्या आठव्या वर्षी कोडे सोडवतात. कावळ्यांचे हे अपयश असले तरी ती त्यांची बुद्धिमत्ताही दाखवते कारण दुसऱ्या नळीत खडे टाकून पहिल्या नळीतील पाणी पातळी वाढवणे हा असंबद्ध असलेला प्रयोग यशस्वी करण्याइतके ते बुद्धिमान नाहीत पण कामचलाऊ बुद्धी मात्र ते दाखवू शकतात व एखादी समस्या सोडवू शकतात.

आम्ही लवचीक प्रश्न सोडवण्यातील आकलनाची उत्क्रांती कशी होत गेली हे उलगडण्याचा प्रयत्न करीत आहोत, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जगातील काही गटांमध्ये ही आकलनक्षमता नक्कीच आहे हे दिसून आले. आकलन यंत्रणांच्या उत्क्रांतीच्या या अभ्यासातून माणसाची आकलन क्षमता कशी विकसित झाली असावी हे शोधून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जीवशास्त्रज्ञ सारा जेलबर्ट

थोडे काकज्ञान
कावळ्याच्या ४५ प्रजाती आहेत.  ट्रेपिज, कॉर्बिज, नटक्रॅकर, बुशपाइज, व पिका पिका ही त्यातील काही उदाहरणे आहेत.

कावळे मिलनानंतर अनेक वर्षे काहीवेळा मृत्यूपर्यंतही एकत्र राहतात.

कावळे निर्भीड असतात. काहीवेळा त्यांनी गोल्डन इगलचाही पाठलाग केल्याची उदाहरणे आहेत
सामान्य कावळे  सात वर्षे जगतात. जंगली कावळे १४ वर्षेही जगतात.

रॅव्हेन या कावळ्याच्या प्रजातीला मानवी भाषा प्राथमिक पातळीवर शिकवता येते.

कावळे भावनाशील असतात व ते भूक आणि आक्रमणाला जोरदार प्रतिक्रिया देतात. सुख दु:ख सहज दाखवतात.

काही कावळ्यांना ऑपेरा संगीत शिकवता येते. ते सुरेल गाऊ शकतात.

कावळ्यांची स्मरणशक्ती जास्त असते. अन्न कुठे ठेवले आहे हे ते लक्षात ठेवतात. काही पोपट वगळता कावळ्याचा मेंदू सर्वात मोठा असतो. त्यांचे मेंदू व शरीर यांचे गुणोत्तर चिंपाझी या हुशार माकडाइतके असते.
मॅगपीज, चॉज, नटक्रॅकर या कावळ्याच्या आधुनिक प्रजाती आहेत.

कावळ्यांचे मूळ मध्य आशियात सापडते. युरोपात २०-२५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या कावळ्यांचे जीवाश्म सापडले आहेत. दक्षिण अमेरिका, ध्रुवीय प्रदेश व काही बेटे वगळता कावळे सगळीकडे आढळतात.