अनिल बलुनी

लोकांनी जबाबदारी घेऊन केवळ अस्वच्छतेचाच नव्हे, तर सामाजिक अरिष्टांचाही बंदोबस्त करावा, अशी प्रेरणा देणारी एक चळवळ भारताच्या पंतप्रधानांनी गेल्याच आठवडय़ात सुरू केली. तिची पूर्वपीठिका सांगणारा तसेच त्यातून काय लाभ होतील हेही सांगणारा भारतीय जनता पक्षाच्या माध्यम-विभागाच्या प्रमुखांनी लिहिलेला लेख..

महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, नेतृत्वाने लोकांबरोबर जावे. त्याचा अर्थ असा की, लोकांनाही आपल्याबरोबर ध्येयाकडे न्यावे.

या महात्मा गांधींच्या वारशावर दावा करणारे भारतातील राजकीय वर्तुळांमध्ये अनेक जण आहेत आणि त्यांच्या शब्दांना तसेच आदर्शाना वेळोवेळी श्रद्धांजली वाहिली जात असते; पण बापूंच्या विचारमौक्तिकांबद्दलची सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पोकळ श्रद्धांजली वाहून पुन्हा आपली वाट धरणे. या शब्दांचे आचरण हा कठीण भाग आहे, किंबहुना फार थोडय़ा जणांनाच त्यात रस असल्याचे दिसते.

मात्र, जर असा एक नेता असेल, की ज्याने या शब्दांना हृदयात बाळगले आणि हे शब्द प्रत्यक्षात आणले, तर तो नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. विद्यार्थिदशेपासून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दिवसांपासूनच मोदी हे संघटक आणि लोकांचे नेते म्हणून ओळखले जातात. हीच वैशिष्टय़े त्यांच्या राजकीय जीवनातही सहज प्रवाहित झाली. लोकांशी जोडून घेणे आणि लोकांच्या सामाजिक जाणिवेला व्यापक हेतूची प्रेरणा देणे हे मोदी यांना नैसर्गिकपणेच जमते.

बऱ्याच राजकीय पक्षांनी यंदाच्या निवडणूक प्रचारकाळात एक नकारात्मक सूर लावला होता; परंतु ‘मैं भी चौकीदार’ असे म्हणून आणि लोकांनाही तसे म्हणण्याची प्रेरणा देऊन, मोदी यांनी एकहाती, एकटय़ाने एक सामाजिक चळवळच उभारली आहे. ही चळवळ राजकीय संदेश देण्यासाठी नसून देशाच्या विकासाची जबाबदारी घेण्यासाठी लोकांना कृतीप्रवण करणारे ते सकारात्मक आवाहन आहे. लाखो लोक मोदींसह ‘मैं भी चौकीदार’ म्हणाले आहेत.

मोदी यांच्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमावरील ‘टाइमलाइन’वर वेळोवेळी नव्या नोंदी वाचता येत असतात आणि कदाचित ‘ते’ ट्वीटदेखील नेहमीसारखेच ठरलेही असते; परंतु ते ट्वीट असे होते – ‘तुमचा चौकीदार ठामपणे उभा आहे आणि राष्ट्राची सेवा करीत आहे; पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, घाण, सामाजिक अरिष्टे यांच्याशी लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी झटून काम करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणत आहे, # मैं भी चौकीदार’.

हे निव्वळ एखादे ट्वीट नव्हते. हे एक समावेशक आवाहन होते. यापूर्वी ‘सब का साथ सब का विकास’ हा नारा होता आणि त्याच नाऱ्याने २०१४ मध्ये राष्ट्रातील मने जिंकली होती, तितकेच समावेशक हेही आवाहन होते.

यातून असे दिसून आले की, गेल्या पाच वर्षांमध्ये जो काही विकास झाला असेल त्याच्या श्रेयावर मोदी स्वत:चा दावा सांगत नाहीत. त्याऐवजी हे श्रेय मोदी यांनी अशा प्रत्येक भारतीयाच्या दाराशी पोहोचवले जो किंवा जी आपापल्या परीने राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देत आहे.

जर पंतप्रधान म्हणून मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध विधानकार्यात्मक आणि व्यवस्थात्मक लढाई लढली असेल, तर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होण्याविरोधात समाजमत तयार करण्यासाठी झटणारा प्रत्येक भारतीयदेखील हीच लढाई लढला आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या प्रत्येक भारतीयाला, स्वच्छतेचे महत्कार्य मनापासून स्वीकारणाऱ्या प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला, सामाजिक अधोगतीविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक भारतीयाला यातून एक सन्मान दिला गेला, तोही खुद्द अशा पंतप्रधानांकडून, की ज्यांनी स्वत:च भ्रष्टाचार, घाण-कचरा आणि सामाजिक अरिष्टे या जुनाट मुद्दय़ांशी एक ऐतिहासिक लढाई पुकारलेली आहे.

लाल किल्ल्याच्या सदरेवरून मोदी यांचे जे ऐतिहासिक पहिले भाषण झाले, त्या पहिल्याच भाषणापासून मोदी यांनी स्वच्छतेसाठी बापूंनी धरलेल्या आग्रहाचा आदर्श लोकांपुढे वारंवार मांडलेला आहे. स्वच्छता ही भारतातील प्रत्येकाची सवय असली पाहिजे, ही बापूंची इच्छा असल्याचाही उल्लेख मोदी यांनी केला होता. हे शब्द पोकळ नव्हते, हेच पुढे मोदी यांनी स्वत:च्या हातात ज्या प्रकारे झाडू घेतला, त्यावरून स्पष्ट झाले.

या पाच वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रांत प्रचंड मोठी झेप घेतली आहे. लाखो खेडी हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेली आहेत आणि कोटय़वधी घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. तरीदेखील, काँग्रेससारखे काही पक्ष ‘स्वच्छ भारत’सारख्या चांगल्या पुढाकाराचा उपहासच करीत होते. सतत निराशावादीच भूमिका घेणाऱ्या काही ठरावीक राजकीय पक्षांकडे पाहून आता लोकांनाही स्पष्ट दिसू लागलेले आहे, की अस्थिर, अविकसित आणि अशक्त राष्ट्र हेच काँग्रेससारख्या पक्षांचे ध्येय आहे. त्यामुळेच ‘फोडा आणि राज्य करा’ अशी नीती अवलंबून त्यांचे राजकारण यशस्वी होते.

लोकांनी अशा नकारात्मक प्रचाराला यश मिळू दिलेले नाही. उलट, त्यांनी स्वच्छतेचे महत्कार्य हे आपलेच मानले आणि त्यामुळे ती एक लोकचळवळ झाली. आपल्या परिसराची स्वच्छता ही आपलीच जबाबदारी असल्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला झालेली आहे आणि म्हणूनच लोक स्वच्छतेचे चौकीदार ही भूमिका अभिमानाने निभावू लागलेले आहेत.

‘मैं भी चौकीदार’मुळे भारतीयांमध्ये हीच आपलेपणाची आणि अभिमानाची भावना जागृत झालेली आहे. लोक ज्या प्रकारे या चळवळीला प्रतिसाद देत आहेत, ते पाहून हे स्पष्ट होते की, भारताला एक समर्थ, समृद्ध आणि समावेशक राष्ट्र बनविण्याच्या मार्गात उभे राहणाऱ्या अडथळ्यांना उखडून फेकण्याची लोकांची तयारी आहे.

मोदी सरकारचे अनेक निर्णय हे आजवर बिनबोभाट चालणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची भूमिका बजावणारे आहेतच, पण प्रत्येक भारतीय प्रत्येक पातळीवरील भ्रष्टाचाराला विरोध करत असल्यामुळे एक आर्थिक महासत्ता म्हणून भारताचा उदय होणार हे सुस्पष्ट आहे. हे फक्त कायदे करून साध्य होणारे नाही, तर त्यासाठी प्रत्येक भारतीयाला सावधपणे उभे करणारी ‘मैं भी चौकीदार’सारखी सामाजिक चळवळ हे साध्य करू शकते.

जर प्रत्येक भारतीयाने चौकीदाराची भूमिका निभावणे सुरू ठेवून आपापल्या परिसरातील स्वच्छता सुनिश्चित करवून घेतली, तर राष्ट्राला आरोग्याच्या आणि रोगमुक्तीसाठी स्वच्छतेच्या पातळीवर प्रचंड मोठा लाभ होईल. यामुळे गरीब लोक आजारपणांवरील खर्चापासून मुक्त होतील. आरोग्यखर्चापासून मुक्तीमुळे याचीही खात्री देता येईल की, सरकारला आपली संसाधने पुढल्या काळात गरिबांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी अधिक मार्ग तयार करण्याकडे वळविता येतील.

चौकीदार म्हणून नागरिकच सामाजिक अरिष्टांबद्दल सावध असू लागले, तर सामाजिक तणाव विरून जातील आणि विघटनाची भावनाही न उरता शांतता आणि एकात्मता नांदेल.  त्यामुळेच, ‘मैं भी चौकीदार’ ही राजकीय चळवळ अजिबात नाही. काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या नकारात्मक प्रचाराला तो प्रतिसाद तर नाहीच नाही.

खरे तर, ते नक्की यापेक्षा निराळेच आहे. सामाजिक जाणीव सशक्त करणारी ती एक चळवळ आहे. अस्पृश्यता आणि घाण संपविण्यासाठी बापूंनी जसे ठाम आवाहन केले आणि लोकांना स्वयंसेवेची प्रेरणा मिळाली. विनोबा भावे यांनी जसे ‘भूदान’ चळवळ उभारून सामान्य लोकांना स्वेच्छेने एकंदर ४४ लाख एकर जमिनीचे दान करण्यास प्रवृत्त केले, तशी ही लोकांना व्यापक हेतूला पाठिंबा देण्यास प्रवृत्त करणारी एक चळवळ आहे.

‘मैं भी चौकीदार’ ही चळवळ आहे त्या भारतीय नागरिकांची, जे केवळ नागरिक नसून भारताला अधिकाधिक चांगला बनविण्यासाठीचे स्वयंसेवकही आहेत. या चळवळीचा मोठा परिणाम २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतरही बराच काळ जाणवत राहील. लोक भारताला नवनव्या उंचीवर घेऊन जातील. त्यांनीच तसे करण्याचे ठरविलेले आहे आणि हे काम ते पारही पाडतील.

लेखक भाजपच्या माध्यम-विभागाचे राष्ट्रीय प्रमुख तसेच भाजपचे प्रवक्ते आहेत.