|| दयानंद लिपारे

मराठा कार्डाच्या वादळात निधर्मी राजकीय विचारधारा पालापाचोळ्यासारखी उडून गेली. शेती – शेतमालासाठी झुंजणारा नेता की मराठा समाज या द्वंद्वात सापडलेला शेतकरी अखेरच्या टप्प्यात ‘मातीपेक्षा जाती’ला महत्त्व देताना दिसून आला.

पश्चिम महाराष्ट्राचेच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक कोल्हापूर जिल्ह्य़ात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून तिसऱ्यांदा दंड थोपटले होते. शेतकरी चळवळीत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान मिळवलेले शेट्टी यांना आव्हान देणार तरी कोण असा प्रश्न होता. उमेदवार निवडण्यावरून मतदारसंघावर दावा असलेल्या शिवसेना तसेच भाजपकडून वेगवेगळी नावे गेले वर्षभर पुढे येत राहिली. शेट्टी यांचे जुने सहकारी लढतीसाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांच्यापासून शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यापर्यंत अनेक नावे वर आली आणि आपसूक खाली सरकली. कोणत्याही नावावर एकमत होत नसताना युतीत चिंता होती. अशा वेळी अचानक लॉटरी लागल्याप्रमाणे एक नाव पुढे आले; ते धैर्यशील माने यांचे.

माने घराण्याला कोल्हापूरच्या राजकारणात वेगळे स्थान आहे. बाळासाहेब माने यांनी काँग्रेसकडून सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम जिल्ह्य़ात नोंदवलेला. त्यांच्या पश्चात, त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी सलग पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली. त्यात दोनदा त्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर विजयी झाल्या. या वेळच्या निवडणुकीत त्यांनी शेट्टी यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, पक्षनेते शरद पवार हे तर एकेकाळचे कट्टर विरोधक राजू शेट्टी यांच्या गळ्यात गळे घालत राहिले. उमेदवारीची डाळ शिजणार नाही हे ओळखून पुत्र धैर्यशीलसह निवेदिता माने यांनी ‘मातोश्री’ गाठले. उद्धव ठाकरे यांनी दोघांच्याही हाती शिवबंधन बांधले. युती झाली नाही तर काय करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केल्यावर धैर्यशील यांनी ‘तरीही लढण्यास तयार आहे,’ असे उत्तर दिले. याच बाणेदारपणावर खूश होत ठाकरे यांनी उमेदवारीची माळ धैर्यशील यांच्या गळ्यात घातली. बेरजेच्या राजकारणाचा पाया रचला गेला. माने गटाची ताकद, शिवसैनिकांचा दांडगा उत्साह आणि मोदींविरोधात टोकदार विधाने करणाऱ्या उमेदवाराला पराभूत करण्याचा केलेला निर्धार असे नवे समीकरण आकाराला आले. कसलीही कसर न ठेवता प्रचाराचा धुरळा उडवून दिला. त्याला राजू शेट्टी वा महाआघाडीतील जयंत पाटील यांच्यापासून भलेभले नेतेही आव्हान देऊ शकले नाहीत.

अशक्त प्रतिकार

शेट्टी हे साखरसम्राटांच्या गळ्यात गळे घालत असल्याच्या मुद्दय़ावरून होणारा टीकेचा भडिमार रोखण्यात सारे निस्तेज ठरले. सदाभाऊ  खोत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना तर हातकणंगलेतच मुक्काम करण्याचे आदेश होते. त्यांनी शेट्टी यांच्यावर साखरसम्राटांशी संग केल्यावरून समाचार घेण्याचा सपाटा लावला. शेट्टी यांच्याविषयी सहानुभूती बाळगून असणारा शेतकरी बावचळला. महायुतीच्या प्रचाराच्या जाळ्यात अलगद सापडला. केलेल्या कामाचे ‘मार्केटिंग’ करण्यात शेट्टी कमी पडले. परिणामी वस्त्रोद्योगासाठी काहीच केले नाही या मुद्दय़ावरून ते इचलकरंजीसारख्या मोठय़ा शहरात टीकेचे धनी बनले. जोडीला वारणा पाणी योजनेचे राजकारण इतके प्रवाही ठरले की त्यात शेट्टी तरू शकले नाहीत.

पहिल्या मोदी लाटेत दुसऱ्यांदा खासदार झालेल्या शेट्टी यांना मोदी यांना डिवचण्याच्या नादात दुसऱ्या मोदी लाटेत ‘संसद ते शिवार’ असा उलटा प्रवास करावा लागला. शेट्टी पराभूत झाले असले तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेती – शेतकरी यांच्यासाठी कसोटीचा काळ असताना शेट्टींसारखा लढाऊ  लोकप्रतिनिधी संसदेत असणार नाही. रस्त्यावरची लढाई करण्याची मूळची चळवळी प्रवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. पराभवानंतर शेट्टी यांनी याचेच तर संकेत दिले आहेत. शेट्टी यांची नवी लढाई, त्यातील प्राधान्यक्रम आणि रणनीती कशी असणार हे महत्त्वाचे बनले आहे.

मातीपेक्षा जातीला महत्त्व

खरे तर, कागदावर शेट्टी यांची बाजू निश्चितपणे भक्कम होती. शेट्टी यांची स्वत:ची ताकद, प्रचारात झोकून देणारे असंख्य कार्यकर्ते, जोडीला उभय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची कुमक यामुळे शेट्टी यांची निवड ही केवळ औपचारिकता आहे, असे प्रारंभीचे वातावरण होते. दिवस सरत गेले तसे चित्र बदलत गेले. महायुतीच्या बदलत जाणाऱ्या रणनीतीला भेदून आपला प्रभाव टिकून राहील अशी व्यवस्था करण्यात महाआघाडी दारुण अपयशी ठरली. धैर्यशील माने यांना ‘बच्चू’ समजण्याची चूक झाली. ‘जैन धर्मीय राजू शेट्टी आणि मराठा माने’ असा रंग दिला गेला. तो बदलणे किंवा त्याला बगल देणारा प्रभावी मुद्दा पुढे आणणे महाआघाडीच्या कोणालाच शक्य झाले नाही. मराठा कार्डाच्या वादळात निधर्मी राजकीय विचारधारा पालापाचोळ्यासारखी उडून गेली. शेती – शेतमालासाठी झुंजणारा नेता की मराठा समाज या द्वंद्वात सापडलेला शेतकरी अखेरच्या टप्प्यात ‘मातीपेक्षा जाती’ला महत्त्व देताना दिसून आला.