|| प्रताप भानु मेहता

नरेंद्र मोदी हे दोन शब्दच या निवडणुकीचे अस्सल विश्लेषण आहे. सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांनाच दिले पाहिजे. ते जिंकले कारण आपल्याला हवा असलेला हाच तो माणूस अशी भारतीयांची खात्री पटली. अनेक नेते जिंकतात कारण लोकांना पर्याय नसतो. मोदी जिंकले कारण त्यांनी पर्यायाचा विचारच लोकांना करू  दिला नाही!

लोकशाहीच्या आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा लोकप्रिय शक्तीचे विध्वंसक वारे उलट दिशेला वाहू लागतात. एका माणसाचे देवत्व आणि व्यक्तित्व अधोरेखित होते. जेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, चिंतेचा उपाय एक आणि एकच माणूस असतो तेव्हा लोकशाही साधेपणाची इच्छा प्रदर्शित करते. या निवडणुकीचे एकमेव प्रामाणिक विश्लेषण दोन शब्दांत होते: नरेंद्र मोदी! बाकी सर्व काही व्यर्थ आहे. आपणच भारताचे भाग्य घडवू शकतो, याची खात्री मोदींनी मतदारांना पटवून दिली आणि मतदारांनी आपलं भाग्य मोदींच्या हाती आनंदाने सोपवले होते. या स्तंभलेखकांसह ज्यांना संभाव्य परिणामाविषयी शंका होती, त्यांनी मतदारांचा कौल नम्रपणे स्वीकारला पाहिजे.

आमचे सर्व प्रकारचे सर्वसाधारण राजकीय विश्लेषण आणि आकडेवारीचे मायाजाल यांची टक्कर नरेंद्र मोदी यांच्याशी होते, तेव्हा आमच्या हाती शून्य येते. याचे कारण मोदी हे आधुनिक इतिहासातील अन्य राजकारण्यांपेक्षा तीन गोष्टींच्या बाबतीत सरस आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट अशी, ते राजकीय कल्पनेचा सर्वात शुद्ध असा अर्क आहेत. त्यांच्या दृष्टीने राजकीय वास्तव कोणी देत नाही तर ते निर्माण केले जाते. मोदी ते निर्माण करीत असताना इतर नेते मात्र हातांच्या बोटांवर सामाजिक गणिते जुळवत बसतात. मोदी थेट आपली संपूर्ण ओळख निर्माण करण्याचे कार्य करतात. त्यासाठी ते आपली सर्व ऊर्जा वापरतात. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी लोकशाहीतील एका धोकादायक संकल्पनेचे सामथ्र्य पूर्णत: ओळखले आहे. संकल्पना गैर असेल पण ती राबवण्यामागील हेतू उदात्त असेल तर लोक ती स्वीकारतात. .आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले अस्तित्व सर्वत्र दाखवणे. त्यासाठी त्यांनी एक मार्ग निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या सर्वाच्या कल्पना, परिकल्पना, आशा आणि भीतीच्या वसाहती निर्माण केल्या. तेथे आपण त्यांना विरोध करणे ही गोष्टही त्यांनी त्यांच्या अखत्यारीत ठेवली. म्हणजे भावनिक गुलामी अशीच ही परिस्थिती. लोकशाही राजकारणात आज अशी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या अस्तित्वाचा विचार करताना तिच्याविषयी विचार करण्यास भाग पाडते. जाहीर कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी त्यांनी स्वत:ला सर्वाचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणून पेश केले. अनेक नेते जिंकतात कारण लोकांना पर्याय नसतो. मोदी जिंकले कारण त्यांनी पर्यायाचा विचारच लोकांना करू दिला नाही!

जिंकण्यासाठी विरोधी पक्षांनी कोणत्याही मार्गाने प्रयत्न केले नाहीत, या दाव्याचा प्रतिवाद करणे कठीण आहे. सध्याच्या युगात सभ्यता ही दुर्मीळ गोष्ट आहे आणि काँग्रेसला त्या बाबतीत मानले पाहिजे. तसेच लोकशाहीतील विविध संस्था, प्रसारमाध्यमे आणि पैसा यांना नियंत्रित करण्याच्या भाजपच्या निवडणूकशक्तीवर आरोप करणेही सोपे आहे. त्यातील काही खरे आहेत, परंतु भाजपच्या विजयाचे श्रेय त्यांना देणे म्हणजे आजचे राजकीय वास्तव नाकारण्यासारखे आहे.

गंभीर राष्ट्रीय संकटाच्या वेळी एकत्र न येण्याची विरोधकांची वृत्ती सर्वावर कडी करणारी आणि त्यांच्या क्षुद्रपणाबरोबरच दूरदृष्टीच्या अभावाचा पुरावा ठरली. काँग्रेस घराणेशाहीत मग्न आणि भ्रष्ट असल्याचे प्रहार मोदी करीत असल्याचे माहीत असूनही काँग्रेसने आपल्या नेतृत्वाचा चेहरा बदलला नाही. समाजवादी पक्षापासून बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसपर्यंत सर्व पक्ष हे भ्रष्ट घराणेशाहीचे उद्योग आहेत, ते देशाला आणखी मागे खेचत आहेत, असे प्रहार मोदी प्रचारात कठोरपणे करीत होते.

मोदी या विजयास पात्र आहेत. परंतु हा क्षण भारतीय लोकशाहीसाठी भीतिदायक आहे. कसे ते स्पष्ट केले पाहिजे. आधुनिक भारताच्या इतिहासात हे शक्तीचे प्रचंड केंद्रीकरण आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळातही काँग्रेसमध्ये असे घडले नव्हते. संसदीय पक्षात, पक्ष संघटनेत, नागरी संस्थांमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक संस्थेवर वर्चस्व.. अशी निर्विवाद शक्ती कोणत्याही नेत्याने संपादन केली नव्हती. देशाचे भविष्य आता मोदींच्या हाती आहे.भारताने राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिद्धांतांना तिलांजली दिली आहे. त्या अर्थाने मोदींचा हा विजय महत्त्वाचा आहे. या विजयाकडे संस्थात्मक आणि सौंदर्यात्मक दृष्टीने पाहिले तर तो शुद्ध आणि सोपा असा ‘निवडणुकीय सीझरवाद’ आहे. हा असा वाद आहे जेथे प्रत्येक संस्था म्हणजे व्यापारी संस्थेपासून धार्मिक संस्थेपर्यंत सर्व एका व्यक्तीभोवती फिरतात. सैद्धांतिक परिभाषेत सांगायचे तर हा बहुसंख्याकवादाचा विजय आहे. तो अल्पसंख्याक समुदायांना उपेक्षित ठेवू इच्छितो आणि हिंदुत्वाच्या सांस्कृतिक आधिपत्याचा पुरस्कार करतो.

सामाजिकदृष्टय़ा पाहिले तर जाती-पातींची शक्ती आणि प्रादेशिक राजकारणाच्या भ्रमात असणाऱ्यांसाठीही हा आणखी एक धक्का आहे. जातीपातींच्या भिंती, ओळखी, अस्मिता भंगल्या आहेत आणि हिंदुत्वाच्या मोठय़ा प्रकल्पात विसर्जित होण्याच्या तयारीत आहेत. विषारी पुरुषप्रधानतेवर निष्ठा हा भाजपच्या विचारसरणीचे एक वैशिष्टय़ असतानाही मोदींनी कदाचित पक्षातील नवीन आणि सर्जनशील मार्गानी लिंगभेदावर आधारित राजकारण उलथवून टाकले आहे. हिंदुत्वाचा मोठा प्रकल्प राबवण्यातील अडथळे जे सामाजिक रचनेतून निर्माण झाल्याचे आपण मानत होतो, ते आता नाहीत. हा विजय अवास्तव राजकारणाचा आहे.

मोदी सरकारचे अनेक बाबतीत यश आहे. त्यांच्या काही योजनांनी तर पूर्वीपेक्षा अधिक लोकांच्या जीवनास स्पर्श केला आहे, असा अर्थ निश्चितपणे काढता येतो. परंतु आपण स्पष्ट करू या : मोदी आर्थिक यश मिळाल्यामुळे जिंकले नाहीत; आर्थिक आघाडीवर अपयशी ठरूनही ते जिंकले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वास्तव दर चार ते साडेचार टक्केच राहिला. ही निवडणूक जवळजवळ पूर्णत: आशेवर विसंबली आणि गंभीर आर्थिक विश्लेषणापासून पूर्णपणे वंचित राहिली हे चांगले लक्षण नाही. निष्पक्षपणे सांगायचे तर विरोधी पक्षांकडे कोणत्याही लक्षवेधक संकल्पनाही नव्हत्या.

आपण फक्त एका व्यक्तीला जास्त अधिकार दिले असू तर तो चमत्कार करेल, अशी आपली भावना. राष्ट्रवाद आमच्यासाठी एक आश्रयस्थान बनला. कारण त्यात भाग घेतल्यामुळे धर्मनिरपेक्ष भारताच्या भविष्यासाठी काहीही केले जात नसले तरी तो पर्यायाने आपल्याला उंचावतो. शेवटी, भय आणि द्वेष यांच्या राजकारणाचाही विजय आहे. मोदींनी २०१४मध्ये आशा दाखवली होती. पण त्या वेळी कदाचित ते सोपे होते. पण या वेळचा प्रचार नकारात्मक होता. त्यात खोटेपणा होता आणि तिरस्कारही होता. हे सहज खेचून बाहेर काढता येईल असे विष नाही.

मोदींच्या राजकीय यशापासून या सर्व गोष्टींना वेगळे काढता येणार नाही. अस्सल राजकीय घटना म्हणून त्यांनी आणखी एक वैभवशाली विजय लिहिला आहे. त्यांचा भोवंडून टाकणारा प्रभाव समजून घेतला तर त्यांच्या राजकीय यशाची महत्ता लक्षात येते. ही कोणत्या प्रकारची किमया आहे, जेथे एक नेता फक्त आपण इतरांपेक्षा उत्तम आहोत, अशी भावनाच लोकांमध्ये निर्माण करत नाही, तर तो आपली सखोल अशी ओळख निर्माण करतो..

त्यांचे राजकीय यश अधिक विश्वासार्ह ठरते कारण ते आर्थिक यशाच्या किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या सुरक्षित पायावर मिळवलेले नाही. त्यांनी लोकांना राष्ट्रवाद दिला. काहीही असो, या विजयाचे श्रेय मोदींनाच. ते जिंकले कारण भारताने त्यांना ओळखले. आता भारत कसा असेल हे आपण येत्या पाच वर्षांत पारखूच.

(लेखक अशोका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तिगत आहेत.)

अनुवाद : सिद्धार्थ ताराबाई