|| सतीश कामत

मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील अन्य कोणतेही पद आपल्यासाठी कमी प्रतिष्ठेचे, अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधूनच राणे वागत राहिले. स्वत:सह मुलांचेही राजकीय बस्तान बसवण्याच्या दबावामुळे त्यांची राजकीय वाटचाल आणखी अडचणीची झाली.

स्वत:ला ‘कोकणचे भाग्यविधाता’ म्हणवणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव नीलेश राणे यांच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राणेंच्या राजकीय प्रभावाला उतरती कळा लागली असेच म्हणावे लागेल. तसे पाहिले तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील नीलेश यांच्या पराभवापासूनच राणेंच्या राजकीय ताकदीच्या मर्यादा प्रकर्षांने जाणवू लागल्या होत्या. पण तो मोदी लाटेचा परिणाम, म्हणून सोडून दिला तरी त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरात झालेली विधानसभा निवडणूक आणि पुन्हा वांद्रे येथील पोटनिवडणुकीत खुद्द नारायण राणे यांचे लागोपाठ दोन पराभव झाले. दीर्घ काळ सत्तेच्या उबेत राहण्याची सवय असलेले राणे या पडझडीमुळे स्वत:सह मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे पर्याय शोधू लागले. देशात आणि राज्यात भाजपप्रणीत आघाडीची सत्ता असल्यामुळे त्यांची पावले आपोआप तिकडे वळली. पण त्यांना पक्षामध्ये घेण्यास सुरुवातीपासून विरोध असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही त्यांना दीर्घ काळ नुसतेच झुलवत ठेवत अखेर स्वतंत्र पक्ष काढण्यास भाग पाडले आणि राणेंना फक्त राज्यसभेच्या खासदारपदावर समाधान मानावे लागले. म्हणजेच राणे यांना राज्याच्या राजकारणापासून भाजप नेतृत्वाने पद्धतशीरपणे दूर केले. त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे पहिले उमेदवार म्हणून नीलेश यांची घोषणा झाली. राणे कुटुंबाच्या दृष्टीने ही केवळ प्रतिष्ठेची नव्हे, तर राजकीय अस्तित्वाची लढाई होती. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी चांगली हवाही निर्माण केली. पण या लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच आमदार असलेल्या शिवसेनेने कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या बळावर नीलेश यांचा दणदणीत पराभव करत राणे कुटुंबाच्या आशा संपुष्टात आणल्या.

पक्षसंघटनेचा अभाव आणि मतदारांना अपरिचित निवडणूक चिन्ह, हे नीलेश यांच्या विजयातील दोन प्रमुख अडथळे होते. त्यातच आक्रमक प्रचाराच्या नादात त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांची जाहीरपणे केलेली असभ्य भाषेतील निंदानालस्तीही भोवली. त्यामुळेच ‘दादा (नारायण राणे) असते तर वेगळा विचार केला असता. पण हे नकोत,’ असं म्हणणारे थोरल्या राणेंचे सहानुभूतीदार कणकवलीतही भेटले. अपयशाचा खड्डा आणखी खोल करण्यात या बाबींनी हातभार लावला.

तसे पाहिले तर राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक अनेक महत्त्वाची गुणवैशिष्टय़े राणे यांच्याजवळ आहेत. पण मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील अन्य कोणतेही पद आपल्यासाठी कमी प्रतिष्ठेचे, अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधूनच ते वागत राहिले. त्यामुळे त्यांनी अनेक शत्रू निर्माण केले आणि गेल्या काही वर्षांत स्वत:सह मुलांचेही राजकीय बस्तान बसवण्याच्या दबावामुळे त्यांची राजकीय वाटचाल आणखी अडचणीची झाली. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामध्ये धाकटे चिरंजीव नितेश यांनी कणकवली मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत केलेली कामे लक्षात घेता, ते महाराष्ट्र स्वाभिमानकडून उभे राहिले तरी अडचण येऊ नये, असे चित्र आहे. पण कुडाळ मतदारसंघात गेल्या निवडणुकीत खुद्द राणे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या वेळी तेथून नीलेश यांना उमेदवारी देऊन त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा अखेरचा प्रयत्न करायचा, की पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अन्य कोणाला संधी द्यायची, हा सध्या राणे यांच्यापुढील सर्वात महत्त्वाचा पेच असणार आहे. त्याचबरोबर, लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयामुळे भाजपला सत्तास्थर्यासाठी कुणाचीच गरज उरलेली नाही, हे लक्षात घेता या पक्षाचे नेतृत्व भविष्यात त्यांना कितपत महत्त्व देईल, याचीही शंका आहे