|| विनायक करमरकर

पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर या चार जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, तर दोन एनडीएला. शिरूरची जागा राष्ट्रवादीने शिवसेनेकडून खेचून आणली ही राष्ट्रवादीची या निवडणुकीतली एकमेव जमेची बाजू.

पुण्याचा ‘वाडा’ भाजपकडेच

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा एकतर्फी लढतीत तब्बल तीन लाख २४ हजार ६२८ मतांनी पराभव करत विक्रमी मताधिक्याची नोंद केली. शहरातील सर्व आमदार भाजपचे आहेत आणि महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. या जमेच्या बाजूंबरोबरच बापट यांचा दांडगा लोकसंपर्क, सक्रिय कार्यकर्ता ही त्यांची प्रतिमा, त्यांची स्वत:ची सक्षम यंत्रणा आणि शहरातील मजबूत पक्षसंघटन यामुळे बापट यांनी पुण्यात सहज विजय संपादन केला. अपेक्षेप्रमाणे बापट यांना सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले.

पवार घराण्यातील पहिला पराभव

राज्यभर ज्या लढतीची चर्चा होती अशा मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दोन लाख १५ हजार मतांनी पराभव करत मावळवर पुन्हा शिवसेनेचा ठसा उमटवला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता आणि प्रचाराची सूत्रेही स्वत:कडे ठेवली होती. तसेच राष्ट्रवादीची पूर्ण ताकद येथे लावण्यात आली होती. तरीही बारणे यांनी दणदणीत विजय मिळवल्यामुळे अजित पवार यांनाच हा धक्का ठरला. पवार घराण्यातील पहिलाच पराभव हेही या निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरले.

बारामती राष्ट्रवादीकडेच

बारामती मतदारसंघातील विजयासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न केल्यानंतरही सुप्रिया सुळे विजयी तर झाल्याच, शिवाय त्यांच्या मताधिक्यातही भरीव वाढ झाली. सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा एक लाख ५५ हजार मतांनी पराभव करत लक्षणीय यश मिळवले. हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे. गेल्या निवडणुकीत सुळे यांना रासपचे महादेव जानकर यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे या वेळी येथे विजय मिळवायचाच असा चंग भाजपने बांधला होता. मात्र सुळे यांनी भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत.

नवख्या उमेदवाराचा चमत्कार

शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करत पदार्पणातच चमकदार कामगिरी करून दाखवली. आढळराव या मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार झाले होते. मात्र मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले. तसेच मतदारसंघात निर्माण झालेली नाराजीही त्यांना भोवली. अभिनेता म्हणून आणि टीव्ही मालिकेमुळे आधीच मिळालेली लोकप्रियता डॉ. कोल्हे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. ही लोकप्रियता आणि राष्ट्रवादीचा नियोजनबद्ध प्रचार यामुळे डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांचा ५८ हजार मतांनी पराभव करत शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळवून दिला.