|| योगेन्द्र यादव

जनादेश जेवढा नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे, तेवढाच विरोधकांच्या निष्क्रियतेच्या विरोधातही आहे निव्वळ जातीय समीकरणाचे गणित मांडून किंवा केवळ आघाडय़ा केल्याने निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही.  विरोधी पक्षांजवळ या सामान्य मतदारासाठी भव्य असा संदेश नव्हता, मोठे स्वप्न नव्हते. राजकारण आता व्यक्तिमत्त्वांची लढाई ठरली असून, अशा स्थितीत मतदार विश्वासार्ह चेहऱ्याच्या शोधात असतात, हे जगभर दिसू लागले आहे..

एका असामान्य निवडणुकीचा असामान्य निकाल आमच्यासमोर आहे. हा निकाल असामान्य केवळ यासाठी नाही की, भाजपच्या विजयाच्या फरकाने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. ते केवळ यासाठीही नाही, की पहिल्यांदाच एखादे काँग्रेसेतर सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने निवडून आले आहे. पण ते यासाठीही की, या निवडणुकीचे निकाल आमच्या लोकशाहीचे दूरगामी भविष्य निश्चित करणार आहेत.

एक गोष्ट निश्चित आहे- या निवडणुकीत भाजपपेक्षाही जास्त नरेंद्र मोदी यांना स्पष्ट जनादेश मिळाला आहे. नक्कीच या निवडणुकीत बरेच चढउतार आले, नक्कीच निवडणूक आयोग पंचांच्या भूमिकेतून खेळाडूच्या भूमिकेत गेला, पण भाजपच्या विजयासाठी अशा कुठल्या बहाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. सत्य हे आहे की, मोदी यासाठी जिंकलेत, की देशाच्या जनतेची त्यांना आणखी एक संधी देण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण या जनादेशातून मिळालेल्या धडय़ाकडे दुर्लक्ष करायला नको आणि त्याच्या धोक्यांकडेही नको.

पहिला धडा विरोधी पक्षांसाठी आहे. प्रश्न असा आहे, की जनता मोदीजींना दुसऱ्यांदा संधी का देऊ इच्छित होती? विजयाच्या अंतरामुळे असा भ्रम होऊ शकतो की, ही मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर स्वीकृतीची मोहर आहे. पण हे खरे नाही. २०१४ आणि २०१९ चा विजय एकसारखा वाटू शकतो, पण त्यांच्या स्वरूपात बराच फरक आहे. २०१४ मध्ये जनतेच्या मनात एकीकडे काँग्रेसच्या भ्रष्ट आणि अकर्मण्य सरकारबाबत संताप होता, तर दुसरीकडे भाजप व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आशा होती. या वेळी मोदी सरकारपासून अपेक्षाभंग सुरू झाला होता, शंका होती आणि भीतीही होती. मात्र जेव्हा मतदार विरोधी पक्षाकडे पाहत होता, तेव्हा त्यांच्याकडून त्याला कुठलीही आशा दिसत नव्हती. त्यामुळे मोदींबाबतचा असंतोष दबला आणि विरोधी पक्षांबाबतचा अविश्वास वरचढ ठरला. हा जनादेश जेवढा मोदीजींच्या बाजूने आहे, तेवढाच विरोधकांच्या निष्क्रियतेच्या विरोधातही आहे.

दुसरा धडा हा, की निवडणूक जिंकण्याचे जुने डावपेच आता निष्फळ झाले आहेत. केवळ मोदीविरोधाचे राजकारण जनतेला मान्य नाही. यामुळे नरेंद्र मोदींऐवजी मोदीविरोधकांचे जास्त नुकसान होते. उत्तर प्रदेशचे निकाल हे या गोष्टीचे जिवंत उदाहरण आहे की, निव्वळ जातीय समीकरणाचे गणित मांडून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही. केवळ दलित, मुस्लीम व यादव यांच्या समीकरणाबाबत बोलून या जातींची मतेही मिळत नाहीत. पक्षांच्या आघाडय़ा उपयुक्त आहेत, कदाचित आवश्यकही आहेत; पण केवळ आघाडी करणे पुरेसे नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि सेक्युलर जनता दल यांची आघाडी कागदावर मजबूत होती; महाराष्ट्रातील आघाडी ठोस होती, बिहार व झारखंडमधील आघाडय़ाही फार मोठय़ा होत्या; पण हे सारे तोंडावर आपटले.

तिसरा धडा हा आहे की, जनादेशाची निर्मिती करण्यासाठी जनतेला देशाशी जोडणे आवश्यक आहे. मोदीजींनी देशाच्या सामान्य नागरिकासोबत संवाद जोडला. नक्कीच त्या संवादात खोटय़ाचे प्रमाण मोठे होते; नक्कीच त्या संवादात सकारात्मकतेहून अधिक नकारात्मक गोष्टी होत्या. या वेळी त्यांच्या संवादात आशेहून अधिक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होता, फूट पाडा आणि राज्य करा ही रणनीतीही होती. नक्कीच देशातील बहुतांश मीडिया मोदींसमोर झुकला होता. पण या सर्वाच्या आधारे मोदीजींनी सामान्य मतदाराला ही जाणीव करून दिली की, तो स्वत:च्या फायद्या-तोटय़ासाठी नाही, तर देशासाठी मत देत आहे. विरोधी पक्षांजवळ या सामान्य मतदारासाठी ना असा कुठला मोठा संदेश होता, ना कुठले मोठे स्वप्न होते आणि ना कुठली आशा होती!

चौथा मोठा धडा हा की, जनता या आशेचा एक सगुण चेहरा पाहू इच्छिते. त्यांना एक असा नेता हवा आहे, ज्याच्यावर ते विश्वास ठेवू शकतील. जर जनतेने नरेंद्र मोदींना अशा चेहऱ्याच्या रूपात स्वीकारले असेल, तर यासाठी नाही की त्यांची प्रत्येक गोष्ट जनतेला चांगली वाटली. खरे तर हे आहे, की मोदींबाबत अपेक्षाभंगाची सुरुवात झाली होती. पण त्यांचा पर्याय म्हणून कुठलाही विश्वासार्ह चेहरा नव्हता. मोदींबद्दल निराश असलेली जनता राहुल गांधींकडे पाहात असे, तेव्हा घाबरून पुन्हा मोदींचे गुण शोधू लागे. मोदींमध्ये तो खरेपणा नाही, तर किमान एक मजबुती पाहत होती. विरोधी पक्षांजवळ ना संदेश होता, ना संदेशवाहक. तुमची इच्छा असो वा नसो, जगभरातील लोकशाही आता सरळसरळ व्यक्तिमत्त्वांची लढाई होऊ लागली आहे आणि प्रत्येक देश एका विश्वासार्ह चेहऱ्याच्या शोधात आहे.

या जनादेशाच्या धडय़ासोबतच, त्याचा धोकाही समजून घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा जनादेश अहंकार उत्पन्न करतो. हिंदू-मुस्लीम द्वेष निर्माण करून जिंकलेली निवडणूक भयही उत्पन्न करते. पुढील पाच वर्षे देशाच्या स्वधर्माच्या दोन मोठय़ा स्तंभांना, म्हणजे लोकशाही आणि विविधता यांना धोका आहे. प्रश्न असा आहे, की, या धोक्यांचा सामना कोण करेल? प्रस्थापित विरोधी पक्ष याचा सामना करण्यात पूर्णपणे निष्क्रिय शाबीत झाला आहे. देशाच्या प्रमुख राष्ट्रीय विरोधी पक्षाच्या रूपात काँग्रेस तर या कामासाठी अप्रासंगिकच नव्हे, या कामात अडथळा सिद्ध झाला आहे. अशा वेळी देशाच्या स्वधर्माच्या रक्षणासाठी एका नव्या पर्यायाची गरज आहे. अशा पर्यायाचा मार्ग सोपा असणार नाही. त्याला सत्ता, भांडवल व मीडिया या तिघांशीही लढावे लागेल. पण देशाच्या स्वधर्माच्या रक्षणात गुंतलेल्या शिपायांसोबत या देशाची माती आहे, देशाचे संविधान आहे आणि राष्ट्रपिता गांधीजींचा वारसा आहे.

लेखक राजकीय विश्लेषक व ‘स्वराज अभियान’चे संस्थापक आहेत.