27 November 2020

News Flash

दुसऱ्या मोदी लाटेचे परिणाम

बहुरंगी स्पर्धेत तिरंगी स्पर्धा हा नवीन प्रकार लोकसभा निवडणुकीमधून पुढे आला.

प्रकाश पवार – prpawar90@gmail.com

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन राजकीय प्रवाह घडविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला. त्याचे प्रतिबिंब निकालातही दिसून आले..

देशभराप्रमाणे महाराष्ट्रातही मोदी लाट होती. भाजप-शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली. त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षीय स्पर्धेत महत्त्वाचे बदल झाले. दोन्ही काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये व जागांमध्ये लक्षणीय घट झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप-शिवसेना विरोध अशी नवीन दिशा स्वीकारली; मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भाषणांचा प्रभाव पडला नाही. दोन्ही काँग्रेसपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हा मुख्य स्पर्धक आहे हे भाजप-शिवसेनेने निश्चित केले होते; परंतु तरीही धरसोड झाली. उदाहरणार्थ, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे, तेथे नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली; तर बारामतीमधील प्रचारसभा रद्द केली. त्यामुळे खरे तर दोन्ही काँग्रेसपैकी काँग्रेसच स्पर्धक समजली गेली. याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.

राजकीय पक्षांमधील मुख्य दोन आघाडय़ांची ताकद होती. परंतु तिसरी ताकद वंचित बहुजन आघाडी म्हणून संघटित झाली. त्यामुळे राज्याचे एकूण राजकारण बहुपदरी असूनही ते तिरंगी होते. बहुरंगी स्पर्धेत तिरंगी स्पर्धा हा नवीन प्रकार लोकसभा निवडणुकीमधून पुढे आला. पश्चिम महाराष्ट्रात भाजपने दोन्ही काँग्रेसला खिंडार पाडले. त्यामुळे भाजप हा पक्ष जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात (सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे व अहमदनगर) ‘मराठा जातीचा पक्ष’ म्हणून विकास पावला आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मतांचा अत्यंत प्रभावी ठरणारा वाटा मिळवला. तसेच या लोकसभा निवडणुकीत विखे, मोहिते, पाटील अशी राजकीय घराणी आपल्या वळचणीला आणली. भाजप आणि मराठा यांचे पितृसत्ताक संबंध नव्याने उदयास आले. स्वतंत्रपणे राजकारण करण्याची मराठय़ांची कुवत जवळपास संपुष्टात आली.

काँग्रेसची पडझड

महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड खूपच खोलवर झाली. ती महाराष्ट्रात नव्याने आधार मिळवू शकत नाही. विखे (अहमदनगर), निंबाळकर (माढा, उस्मानाबाद), मोहिते (माढा), मंडलिक (कोल्हापूर) अशी राजकीय घराणी भाजप-शिवसेना पक्षासाठी लढत होती. ही घराणी राजकीय होती. त्यांची सुरुवात शेकाप, समाजवाद अशा डावीकडून झाली होती. मग ही घराणी काँग्रेसच्या मध्यममार्गी विचारांकडे आली आणि सरतेशेवटी ही घराणी भाजप-शिवसेनेकडे गेली. या घराण्यांतील पूर्वजांनी आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात हातभार लावला होता. आता ‘नवमहाराष्ट्र’ घडविण्याचे काम या घराण्यांच्या वारसदारांनी सुरू केले. ही या निवडणुकीतील भाजपची सर्वात मोठी कामगिरी आहे. एक प्रकारे काँग्रेस पक्षच काँग्रेसविरोधी लढत होता. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसला भाजपविरोधी लढण्यासाठी चांगले नेतृत्व देता आले नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसनेच काँग्रेसला दगाफटका केला. जुनी काँग्रेस संघटना नव्याने बांधली गेली नाही. तसेच गेल्या २०-२५ वर्षांतील तरुण वर्गाच्या इच्छा-आकांक्षा काँग्रेसला ओळखता आल्या नाहीत. बेरोजगार तरुणवर्गाला त्याच्या भविष्याचे स्वप्न दाखविण्यात काँग्रेसला अपयश आले. काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाची तुलना नरेंद्र मोदींशी सतत केली गेली. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व खुजे दिसू लागले.

भाजपच्या यशाचे खरे कारण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागांत दिसून येते. या विभागांत शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत प्रचंड असंतोष होता. परंतु केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. त्यामुळे ग्रामीण भागातील असंतोष दूर करण्यात भाजपला यश आले. तसेच सुशिक्षित बेरोजगार वर्ग सरकारवर नाराज होता; परंतु या वर्गाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मोठे स्वप्न दाखवू शकले नाहीत. त्यांनी उमेदवार चांगला देऊन केवळ स्पर्धा निर्माण केली (नांदेड, परभणी, माढा, मावळ). परंतु या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना असे वाटलेच नाही, की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला स्वप्न दाखवीत आहेत व त्या स्वप्नाच्या दिशेने घेऊन जात आहेत. या विभागांमध्ये (उदा. पुणे) माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झालेला होता. ज्ञान-तंत्रज्ञानाची साखळी विणली गेली होती. १९९१ ते २०१४ पर्यंत ही साखळी टिकून राहिली; परंतु यानंतर तिची पुनर्बाधणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला करता आली नाही. एका वेगळ्या पद्धतीने भाजपने याची पुनर्बाधणी केलेली दिसून येते. याचा परिणाम म्हणजे, मावळमध्ये शरद पवारांच्या धोरणाचा पराभव जसा सुस्पष्टपणे दिसतो, तसाच आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंचासुद्धा दिसतो.

मराठा घराण्यांचे राजकीय स्थित्यंतर

भाजपला मराठा घराण्यांचा नवा आधार मिळाला : निंबाळकर (माढा), मंडलिक (कोल्हापूर), विखे-पाटील (अहमदनगर), मोहिते-पाटील (अकलूज). गरीब मराठय़ांबरोबरच ‘खानदानी’ मराठा घराणी आणि राजकारणातील धुरंधर मराठा यांनी भाजप पक्ष स्वीकारला. त्यांनी भाजपसाठी प्रयत्न केले. त्यामुळे भाजप-शिवसेनेकडे निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी प्राथमिक मते होती ती मिळालीच; त्याबरोबर या घराण्यांची मते वाढल्यामुळे परिणाम असा झाला की, या विभागात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाढतील असे वाटत होते ते चित्र भ्रामक ठरले. एकूणच मराठा घराण्यांचे राजकीय स्थित्यंतर ही एक मोठी घटना आहे.

भाजप-शिवसेनेने जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध मराठा अशा लढती घडविल्या. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा उमेदवार दिला, त्या त्या ठिकाणी यांनीही मराठा उमेदवारच दिला. उदा. सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, बारामती. तसेच त्यांनी कुणबी विरुद्ध कुणबी अशीही निवडणूक घडवून आणली (यवतमाळ, वाशिम). याचा परिणाम मराठा-कुणबी हा जो एक मोठा समूह होता, तो समूह काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजप-शिवसेनेकडे सरकला. यामुळे भाजप-शिवसेनेला फार मोठे यश मिळाले. मराठा राजकीय घराण्यांबरोबर मराठा-कुणबी समाज भाजप-शिवसेनेकडे वळला.

बहुजनांमधील ओबीसी समूह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात गेला. नांदेडमध्ये धनगर समाजाचे मतदान वंचित बहुजन आघाडीला गेल्याने काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा पराभव झाला. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार प्रभावी ठरला. येथे एका बाजूला कुणबी मतदान, दुसऱ्या बाजूला मराठा मतदान, तर तिसऱ्या बाजूला िहदुत्वाचे मतदान अशी त्रिकोणी स्पर्धा झाली. सर्वच मतदारसंघांमध्ये ओबीसी समूह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात गेले. जवळपास सात मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही काँग्रेसना पराभूत करण्यासाठी साहाय्य झाले. आज महाराष्ट्रात भाजपचे मतदार प्रत्येक जाती, वर्ग, गट, प्रदेशात दिसत आहेत. तशी स्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत दिसत नाही. त्यामुळे त्यांना भाजप-शिवसेनेला आव्हान देता आले नाही.

या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिमाम होणार आहे. जशी उत्तर प्रदेशच्या राजकारणातून काँग्रेस हद्दपार झाली, तशी महाराष्ट्राच्या राजकारणातून काँग्रेस हद्दपार होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एका अर्थाने उत्तर प्रदेशातील चौधरी चरण सिंगांच्या पक्षासारखा एकदम छोटा व काही मतदारसंघांपुरता (सातारा, रायगड, शिरूर, बारामती) मर्यादित झालेला दिसतो. पश्चिम महाराष्ट्रात भाजपने दमदार शिरकाव केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण हे भाजपचे झालेले दिसतात. शिवसेना हा पक्षही विस्तारला. या लाटेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्रिकोणी स्पर्धा होईल. ही त्रिकोणी स्पर्धा भाजप, शिवसेना व वंचित आघाडी यांच्यात होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येईल. याचा ढोबळ अर्थ महाराष्ट्र हा भाजपचा झालेला दिसतो!

नवीन ताकद 

नवीन एक प्रवाह म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. यांचे चार परिणाम निवडणूक निकालात दिसतात :

एक- हा प्रयोग दोन्ही काँग्रेसप्रमाणे भाजप-शिवसेना यांच्यावरही दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे. म्हणजे या प्रयोगाने केवळ दोन्ही काँग्रेसचे नुकसान केले असे नाही, तर यांच्याबरोबर भाजप-शिवसेनेकडील ओबीसी-दलित मते वळवण्यातही यश मिळवले. कारण वंचित बहुजन आघाडीच्या धनगर समाजातील सात उमेदवारांनी बऱ्यापैकी मते खेचलेली दिसतात. धनगर समाज दोन्ही काँग्रेसच्या विरोधात गेला होता. तो भाजपकडे वळला होता. तोच आता वंचित बहुजन आघाडीकडे वळलेला दिसतो.

दोन- दलित मतांचे जातनिहाय विभाजन या आधी होत होते. या निवडणुकीत दलितांमधील विविध जातींच्या मतांमध्ये ऐक्य-एकोपा दिसला. ती मते वंचित बहुजन आघाडीकडे सरकली. विशेषत: नवबौद्ध-मातंग-चर्मकार या जातगटांत वंचित म्हणून एकोपा दिसत होता. एकंदरीत ‘बहुजन’पेक्षा ‘वंचित बहुजन’ ही अस्मिता स्वीकारली गेली.

तीन- काँग्रेस व दलित-ओबीसी यांचे संबंध पितृसत्ताक स्वरूपाचे होते. त्यामध्ये अनुग्रहाचे राजकारण केले जात होते. या निवडणूक निकालात एक सूत्र दिसते, ते म्हणजे पितृसत्ताक व अनुग्रहाच्या राजकारणावर जोरदार हल्ला केला गेला. यामुळे ‘वंचित बहुजन’ अशी एक ताकद दिसून आली.

चार- भाजपला मुस्लीम समाजाचा विरोध होता. तसेच मुस्लीम व दलित यांच्यातही फार एकोपा नव्हता. या निवडणुकीत प्रथमच मुस्लीम समाजाने दलित राजकारणाशी जुळवून घेतले.

परंतु राज्यात ५१.६ टक्के मते भाजप-शिवसेना युतीला मिळाली आहेत. जागांबरोबर ही मते वर्चस्वाचे लक्षण सूचित करतात. राज्यातील सत्तास्पर्धेत भाजप हा महाराष्ट्रातील केवळ वरचढ नव्हे, तर वर्चस्वशाली ठरला आहे.

लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 4:50 am

Web Title: lok sabha elections results 2019 second modi wave effect
Next Stories
1 नव्या समीकरणांचा क्षण
2 मोदीविजयाचे धडे.. आणि धोके
3 प्रिय योगेन्द्र, हा तुझा प्रतिवाद..
Just Now!
X