आमच्या देशास काय हवें आहे?

‘‘जे करावयाचा तुमचा संकल्प असेल ते तुम्ही बेलाशक बोलून दाखवा आणि जे बोलून दाखवावयाची तुमची तयारी नाही ते करावयास जाऊ नका,’’ असा सल्ला लोकमान्य टिळकांनी देऊन ठेवला आहे. तो कोणास रोकडा वाटेल, पण नाकारण्याजोगा नाही. खरे तर टिळकांचे हे सारे असेच रोखठोक. मग ते राजकारण असो वा लेखन. बहुस्पर्शी प्रतिभेचे देणे लाभेलेल्या टिळकांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता; आणि आपल्याला जे ठाऊक ते लोकांच्या बुद्धीला आवाहन करत त्यांना पटवून द्यायचे हा त्यांचा बाणा होता. त्यामुळेच ‘गीतारहस्य’, ‘ओरायन’ लिहिणारे टिळक ‘केसरी’तून मराठीजनांस शहाणीव देत राहिले. त्यात राजकीय घडामोडींबद्दल ते व्यक्त झाले, तसेच शेतीमातीची स्थितीही त्यांनी साक्षीभावाने सांगितली अन् तत्कालीन आर्थिक धोरणांचा ताळेबंद मांडत शिक्षणापासून उद्योगधंद्यांच्या वृद्धीबाबत भविष्यवेधी सूचनाही केल्या. ‘आमच्या देशास काय हवें आहे?’ हे सांगण्याचे द्रष्टेपण त्यांच्याकडे होते.

‘‘अलीकडच्या तीरावर जो नुसता संकल्प करतो, त्याला यश मिळावयाचे नाही,’’, तसेच- ‘‘मनुष्यमात्रावर अधिकार चालविण्याची वस्त्रे ज्यास मिळतात, त्याने बोलण्याचा जितका प्रसंग टाळवेल तितका टाळावा,’’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिवाय ‘‘देशातील धनोत्पादक धंदे कमी झाल्यावर सावकार मेला काय आणि शेतकरी मेला काय, राष्ट्रीय दृष्टीने दोन्हीही गोष्टी अनिष्टच आहेत,’’ हे सुनावलेदेखील आहे. टिळकांचे हे खडे तात्त्विक बोल शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे खरे; पण त्यांची प्रस्तुतता आजही टिकून आहे. टिळकांच्या स्मृतीशताब्दीचे निमित्त साधत, त्यांच्या या विचारांच्या प्रकाशात यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा मागोवा आजच्या अंकात..!

‘शेतकऱ्यांची निकृष्ट अवस्था म्हणजे राष्ट्राचीच निकृष्टावस्था होय’

इंग्रज राजवटीच्या शेतकीविषयक धोरणांबाबत त्यांना लोकमान्य टिळकांनी नेहमीच खडे बोल सुनावले. ‘‘शेतकऱ्यांची निकृष्ट अवस्था म्हणजे आमच्यासारख्यांस साऱ्या राष्ट्राचीच निकृष्टावस्था होय,’’ हे त्यांनी निक्षून सांगितलेच; आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारास त्यांनी सवाल केला : ‘‘शेतकरी लोकांस खरोखरच बंड करावे लागेल काय?’’ शेतकऱ्यांची विपन्नावस्था पाहून ‘‘अंगावर काटा उभा राहतो’’ अशी सहसंवेदना व्यक्त करणाऱ्या टिळकांचे शेतीप्रश्नांबद्दलचे चिंतन आजही मननीय आहे..

शेतकऱ्यांचा खरा बचाव ज्यास करणे असेल, त्याने त्यांच्याकरिता शेतकीखेरीज दुसरे धंदे देशात निर्माण होतील अशी तजवीज केली पाहिजे. किंवा शेतीतच अशा सुधारणा करावयास पाहिजेत की, जेणेकरून जमिनीचे उत्पन्न वाढून त्याने, इतर धंदे बुडाल्यामुळे उदरनिर्वाहार्थ जमिनीवर ज्या लोकांचा जास्त भार आला त्याची सोय होईल.

(‘लो. टिळकांचे केसरीतील लेख’ भाग-२, पृ. २४१)

असे झाले पाहिजे; पण कराल का?

हा प्रश्न लोकमान्यांनी १६ ऑक्टोबर १८९४ रोजी त्याच शीर्षकाच्या ‘केसरी’तील अग्रलेखात विचारला होता. अर्थसंकल्पाबाबतही जनसामान्यांच्या मनात हाच प्रश्न असतो. ‘‘पुढील सालाचा अंदाज, संपणाऱ्या चालू सालाचा फिरून तपासलेला अंदाज आणि मागील सालाचा झालेला नक्की हिशेब म्हणजे दरवर्षी ही एक प्रकारची जमाखर्चाच्या श्राद्धांतील त्रयीच म्हटले तरी चालेल!’’ असे टिळकांनी एके ठिकाणी म्हटले आहे; यंदाच्या अर्थसंकल्पातील हे त्रराशिक काय सांगते आहे?

कोणत्याही राष्ट्राच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करावयाचा असता त्या राष्ट्रांतील लोकांचा चरितार्थ कशावर अवलंबून आहे व प्रत्येक मनुष्य स्वत:करिता म्हणून जितके द्रव्य उत्पन्न करण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी खटपट करितो त्यांपैकी त्यास किती मोठय़ा भागाचा उपभोग घ्यावयास सापडतो हे पाहणे जरूर आहे.

(‘लो. टिळकांचे केसरीतील लेख’, भाग-३, ३६०)

खरे विद्यापीठ कोणते?

हे लोकमान्य टिळकांनी सांगितलेच; पण ‘‘लिहिणे-वाचणेच नव्हे, तर नागरिकत्वाचे हक्क व जबाबदारी कळण्याचे शिक्षण मिळेल तेच राष्ट्र खरे,’’ हेसुद्धा एका अग्रलेखात पटवून दिले होते. विद्यापीठांनी काय करायला हवे आणि त्यांना ते करता यावे यासाठी सरकारने काय खबरदारी घ्यायला हवी, हे सांगताना स्त्रीशिक्षणाचा विचारही त्यांनी केला होता..

‘‘देशातील तरुण पिढी देशाचे राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक वैभव राखण्यास किंवा वाढविण्यास समर्थ होईल अशा प्रकारे त्यांस शिक्षण देणे हे देशातील विद्याखात्याचे कर्तव्य आहे.’’

(केसरी अग्रलेख, १९०६ अंक ४७)

नुसती अडतेगिरी नको, उद्योगधंदे काढा!

हा सल्ला टिळकांनी त्यांच्या ३ ऑक्टोबर१९१६ च्या ‘केसरी’तील अग्रलेखात दिला होता. स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या टिळकांनी ‘औद्योगिक पारतंत्र्य’ म्हणजे काय, हेही समजावून सांगितले होते. राष्ट्राने उद्यमशील राहण्याबद्दलची त्यांची मते आजही विचारार्ह आहेत..

मानवी राज्यांच्याही शिरावर मेघराजाच्या लहरी स्वभावावरच ज्यांचे भाग्य अवलंबून असते, ते लोक नेहमी सुखीच नांदतील असा नियम नाही. तथापि या त्यांच्या लहरी स्वभावाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय म्हणजे लोकांस आपल्या प्रयत्नानेच ज्यांत सिद्धी मिळविता येईल अशा तऱ्हेच्या कलांची व उद्योगधंद्यांची अभिवृद्धी करणे.

(केसरी अग्रलेख, ११ नोव्हेंबर १९०२)

हक्क द्या, मनुष्यबळ मिळेल!

देशाची भरभराट व्हायची तर मनुष्यबळ कुशल हवे. त्यासाठी ‘हक्क द्या, मनुष्यबळ मिळेल!’ असे टिळकांचे म्हणणे होते. ‘‘सरकार म्हणजे प्रेजेच्या कल्याणासाठी अस्तित्वात आलेली संस्था; अशा दृष्टीने पाहू गेल्यास प्रजेच्या सांपत्तिक स्थितीच्या मुळाशी सर्वतोपरी सरकारचे धोरण असते,’’ याची जाणीवही त्यांनी एका अग्रलेखातून करून दिली होती..

देशाच्या भरभराटीचा व सुस्थितीचा पाया म्हटला

म्हणजे देशात संपत्तीच्या उत्पत्तीच्या व वृद्धीच्या

साधनांची समृद्धी हा होय.

(केसरी, १९०३ अंक १९)