News Flash

कळेच ना असं का होतं?

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नाना पाटेकर यांच्याशी संवाद साधला.

छाया : दीपक जोशी

अशोक नायगावकरांच्या मिष्किल काव्य टिप्पण्या आणि प्रतीक्षा लोणकर यांच्या ‘एक तरी काम कर.. स्वत:वर प्रेम कर’ या कवितेनंतर टाळ्यांच्या कडकडाटातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर रंगमंचावर दाखल झाले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नानांनी त्यांच्या विवेचनातून त्यांचे तरल काव्यमन उघड केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नाना पाटेकर यांच्याशी संवाद साधला.

‘सगळ्या गर्दीतही आपण कुठेतरी एकटेच असतो. ते एकटेपण नकळत कागदावर उमटत जाते. नाटक करतो, पण ते शब्द दुसऱ्याचे असतात. सद्य: परिस्थितीवर आपण भाष्य करत असतो, परिस्थिती अनुभवत असतो. त्यातून डोक्यात होणाऱ्या कल्लोळाचा निचरा होणे आवश्यक असते. साठलेले रिते होते आणि कविता उमटत जाते. आपल्या भवतालानुसार कविता बदलत जाते. रंगमंच हे आम्हा कलाकारांचे राज्य असते. व्यक्त होण्यासाठी आम्ही इथे येतो. प्रेक्षागृहातील अंधारात आम्ही आमचे सुख शोधत असतो. प्रेक्षक दिसत नाहीत, पण त्यांचे असणे हे आमच्या अस्तित्वाचे खरे कारण आहे..’ अशा विवेचनानंतर नानांच्या धीरगंभीर आवाजात शब्द उमटू लागले..

‘खूप त्रास देतात आठवणी

म्हणून ठेवल्या पावसात

म्हटलं जातील वाहून..

गावाला समुद्र किनारी सापडल्या

या आठवणींची विल्हेवाट

लावता नाही येत

वावटळ होऊन सगळं

अस्ताव्यस्त करतात

कायद्याने बंदी घालायली

हवी यांच्यावर

दोन हजारांच्या नोटेसारखी

चलनातून बाद, मग

किंमत शून्य

आठवणींनासुद्धा..

पण होत नाही ना तसं

सगळं गमावून उरलेलं हे संचित..

आठवणी

भेडसावतात

काही आठवणींना शिंगं आहेत, काहींना सुळे आहेत

काही खारकुंडीसारख्या चोंबडय़ा..

आल्या आल्या गेल्या गेल्या

काही बैदुलात लपलेल्या नक्षीसारख्या

ओल्या-सुक्या, आंबट-गोड..

सरसकट ठेवल्या सगळ्या पावसात

आणि उंबऱ्यावर बसून पाहात होतो

वाटलं.. सरल्या,

पण पुढल्या वळणावर पुन्हा हजर

विसरायचं म्हणून पुन्हा तेच

कितीवेळा आठवायचं?

रोज एक गोळी जेवल्यावर, असं सांगून

मोठी बाटली दिली आहे डॉक्टर मित्राने,

डोक शांत होण्यासाठी..

ती गोळी घ्यायला लागल्यापासून

फरक पडलाय बऱ्यापैकी

आता आठवणी अलगद येतात..

हलक्या पावलानं

आदळ आपट कमी झाल्येय..

प्रश्न पडतो.. माझ्याच आहेत का..

परक्या वाटतात..

मी लांबूनच सावत्र नजरेनं

पाहतो त्यांच्याकडे

डॉक्टर मित्राला सांगितलं तर म्हणाला, छान..

गुण येतोय, परक्याच वाटल्या पाहिजेत.

आपल्यांचा त्रास होतो, परक्यांचा नाही

हळूहळू होशील बरा..

अरे.. मी काय आजारी आहे का गाढवा

काय आजार आहे मला?

तुला तू आजारी वाटत नाहीस, हाच आजार आहे तुला

मी या डॉक्टर मित्रावर फुली मारली आहे.

कॉपी करून पास झाला असणार..

आठवणींबरोबर यालासुद्धा ठेवले पाहिजे पावसात..

चिरगुट झालं पाण्यात की-

पाण्यावरनं आठवलं..

गावात मी आणि आई समुद्राकडे पाहात पकटीवर बसलो होतो.

मी पाच-सहा वर्षांचा असेन.. दुसरीत..

संध्याकाळ..

घरी जाणाऱ्या पक्ष्यांनी आभाळाला लांबलचक शिवण घातली होती.

रसरसलेला सूर्य.. घरी निघालेला.. समुद्राला टेकणारच होता..

तेवढय़ात आई म्हणाली..

आता बघ चर्र्र होईल..

सूर्य पाण्याला झिमटला, पण चर्र्र झालं नाही..

आईने विचारल ऐकलंस?

मी नाही म्हणून मान हलवली..

मी ऐकलं.. लाटांच्या भांडणात तुझं हुकलं..

उद्या पुन्हा ऐक..

नंतर खूपवेळा त्या चर्र्रसाठी समुद्राकाठी बसलो..

पण.. नाहीच

आईला ऐकू आलेलं मला का नाही ऐकू आलं?

आई गेली तेव्हा चर्र्र झालं..

मला वाटलं सूर्य बुडला..

मी बाहेर धावलो.. सूर्य माथ्यावर होता.

त्या दिवशीचा चर्र कानात गोठलाय..

त्या आवाजासाठी सूर्य बुडावा लागत नाही..

हल्ली समुद्राचा काठ इथेच राहायला आलाय.. माझ्यापाशी

मला हे सगळं विसरायचंय..

फुली खोडून मी डॉक्टर मित्राला फोन केला..

सूर्य रोज का उगवतोय?

थांबवण्यासाठी काही करता येईल का?

म्हणाला.. बघतो बोलून

लवकर.. मी म्हणालो..

बरं..

फोन ठेवता ठेवता म्हणाला,

सकाळीपण एक गोळी सुरू कर..

आता मी पुन्हा त्याच्यावर

फुली मारली आहे..’

 

नि:शब्द झालेल्या सभागृहात भरून राहिलेले गहिरेपण आणखीच गडद करत नानांचे शब्द पुन्हा घुमू लागले..

‘कळेच ना असं का होतं?

खूप लोक यायचे इथं माझ्याकडे

बघता बघता निघून जायचे..

मी पाहात राहायचो..

कधीही यायचे- सकाळ, दुपार, रात्री.. वेळी अवेळी

आणि निघून जायचे

मी का जागत बसायचो यांच्यासाठी?

कुणीतरी थांबेल..

कुणीच नाही.

जेवढा वेळ असायचे, तेही अनोळखी असल्यासारखे..

एकदिवस चुकून मी आरशात पाहिलं..

आणि हसत स्वत:ला म्हणालो,

अरे, तू स्टेशन आहेस.. घर नाही.

इथं कसं कोण थांबेल तुझ्यासाठी?

माझी चूक सुधारली आहे..

आता सगळ्यांच्या जाण्याची मी वाट पाहतो..’

‘आपल्याला वाटतं ते लिहायचं.. कविता हा काही कुणाचा मक्ता नाही. कविता ही याच्यासाठी, गद्य हे त्याच्यासाठी असं नसतं काही.. मनातील घुसमट व्यक्त होत जाते ओळींतून. दिग्गजांचे शब्द वाचत असताना, अनुभूती घेत असताना आतून काही स्फुरत जातं. अनेकांचे शब्द डोक्यात कोरलेले असतात. तात्यासाहेब आणि ती मंडळी इतकी मोठी होती. त्यांनी केलेली शब्दांची सजावट ही भिडणारी असते. आरती प्रभूंची कविता तशीच होती.’

काहीशा गूढतेतून सुरू झालेल्या नानांबरोबरील शब्दमैफलीचा शेवट मात्र ‘रुमानी’ झाला. भावनांच्या कल्लोळांत उत्तमोत्तम रचनांचा पाऊस कोसळला. श्रोत्यांच्या आग्रहास्तव जावेद अख्तरांनी लिहिलेल्या ‘कैसे बताऊ तुम्हे.. तुम कौन हो..’ या कवितेने झाला. न पुसता येणाऱ्या आठवणींच्या ठेवीसह कवितांबरोबरील ही संध्याकाळ रात्रीकडे कलली.

वर्तमानपत्रांना तेव्हा बोलता येत होतं!

‘भेटलो होतो पहिल्यांदा, प्रेमात पडलो होतो

तेव्हा आपण, स्वतंत्र होतो..

 

स्वातंत्र्य होतं तेव्हा एकमेकांना

दिलेल्या फुलांना चाललेल्या रस्त्यांना

इमारतींना, पाहिलेल्या शहरांना गावांना

 

वर्तमानपत्रांना तेव्हा बोलता येत होतं

बुजुर्गाचा मान होता अग्रलेखांना

जाहिराती होत नसत बातम्यांच्या

वाहिन्या सहज बदलता येत रेडिओच्या

एकसारख्याच वाटत भाषा सगळ्या

वेगळ्या ऐकू येत तरीही..

 

टीव्हीवर वास्तव दिसायचं

बातम्या बातम्याच होत्या

चर्चा चर्चेसारख्याच व्हायच्या

मतांचा आदर असायचा एकमेकांच्या

मांडणीत विस्तार दिसायचा

सूर गंभीर, आरडाओरडा नसायचा..’

अशा गतकाळातील सुखकारक आठवणींचा चैतन्यदायी साठा सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी श्रोत्यांपुढे रिता केला. त्यांच्या आगमनाकडे नजर रोखून बसलेल्या श्रोत्यांनी कवितेच्या रूपात का होईना, समोर आलेल्या या सुखकारक आठवणींना अगदी अलगद पदरात घेतले.

कविता श्रोत्यांना अस्वस्थ करते, अंर्तमुखही करते. तिच्याशी संवाद केलाच पाहिजे, असा लडीवाळ हट्ट ती मांडत असते. तेव्हा त्या कवितेला अव्हेरून पुढे जाता येत नाही. सौमित्र यांच्या कविता याच पठडीतल्या आहेत. त्या ऐकताना अस्वस्थ करतात, त्यांच्या खुणा मनावर उमटतात. त्यांच्या ‘पुस्तकं’ या कवितेनेही असाच काहीसा अनुभव दिला..

‘मी गेल्यावर

तुला वाटेल की आपल्या बाबांनी

वाचलियेत ही सारी पुस्तकं

पण नाही

र्अधही वाचता आलेलं नाही

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं

 

माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागे

ही अक्षर ओळख सोडून फक्त

 

जिच्यामागे धावत

मी पोहचलो आहे इथवर

तुला सांगण्या समजवण्यासाठी की

मलाही सोडता येणार नाहीये मागे

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी

 

ही काही पुस्तकं आहेत फक्त

जी तुला दाखवतील वाट,

चालवतील थांबवतील, कधी पळवतील,

नि:स्तब्ध करतील, बोलतं करतील,

कधी टाकतील संभ्रमात, सोडवतील गुंते,

वाढवतील पायाखालचा चिखल,

त्यात बुडवतील, तुडवतील, सडवतील

तुझ्याशी काहीही करतील पुस्तकं..’

असं सांगून कवी म्हणतो,

‘मी आधीच होऊन गेलेलो असेन

एखादी कथा, एखादी कादंबरी,

एखादी कविता, एखाद्या पुस्तकातली

 

माझी अनावर आठवण आली

की या प्रचंड ढिगाऱ्यातलं

‘ते’ एखादं पुस्तक शोध..’

 

मुलाला पुस्तकांचे धन सोपवणारा बाप सौमित्र यांनी या कवितेत अतिशय ताकदीने साकारला.

‘आपले प्रेम शारीरिक होऊन वैचारिक होत राजकीय कधी झाले कळलेच नाही..’

ही एक अनवट आणि आताच्या काळाची कविता सौमित्र यांनी सादर केली. आणि तिच्याच दुसऱ्या भागात ते म्हणाले..

‘सगळयात उंच पुतळ्यावर आता आभाळ कोसळेल की काय अशी परिस्थिती आहे..’

सौमित्र यांच्या कवितांचे शब्द थेट मनाचा ठाव घेणारे तर होतेच; पण त्यांच्या सादरीकरणाचे कौशल्य त्यापेक्षाही अधिक प्रभावी होते. हा प्रभाव समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होता. कारण सौमित्रची कविता आता श्रोत्यांची झाली होती!

हे काय चाललंय युगानेयुगे शाकाहारी..?

‘गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत

क्रुरपणे त्वचा सोलली जातेय

दुधी भोपळ्याची

सपास्सप सुरी चालवत

कांद्याची कापाकापी चाललीय

डोळ्यांची आग-आग होतेय..

शहाळ्या-नारळावर कोयत्याने

दरोडा घातलाय

हे भाजलं जातंय वांगं, निथळतंय

त्वचेतून पाणी

तडतडतेय मोहरी..

हा अखेरचा फडफडाट

कढीपत्त्याच्या पंखाचा उकळत्या तेलात

आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या

अंगावर, डोळ्यांत..

धारेवर किसली जातायत गाजरं

पिळवणूक चाललीय आंब्याची

सर्वहारा बनलीय कोय..

वरवंटय़ाखाली चिरडतेय मीठमिरची

बत्ता घातला जातोय

वेलदोडय़ाच्या डोक्यात

फडक्याने गळा आवळून मुसक्या

बांधून दह्य़ाला फासावर चढवलंय

चक्का बनण्यासाठी

हे भरडले जातायत गहू

लाहीलाही होतीय मक्याची ज्वारीची

भर बाजारात सुरा खुपसला

जातोय कलिंगडाच्या पोटात

पोलीस नुस्तेच बघतायत..

संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं

उतरवली जातायत दिवसाढवळ्या

मक्याच्या कणसाला दिलंय

विस्तवाच्या तोंडी

आणि वर मीठ तिखट लिंबू

चोळलं जातंय जखमांवर

हे काय चाललंय

युगानेयुगे शाकाहारी..’

 

अशा आपल्या खास ठेवणीतल्या कविता घेऊन कवी अशोक नायगावकर मंचावर आले आणि टाळ्यांचा जणू पाऊसच पडला. कवितेने मनोरंजन करायला हरकत नाही; पण कवीचा आतला स्वर सच्चाच हवा, असे त्यांनी आल्याआल्याच सांगितले. ‘‘कवी खड्डय़ात का पडतो, तर त्याचे लक्ष भविष्यावर असते. परंतु त्याच वेळी त्याचे नेमके वर्तमानातील खड्डय़ांकडे दुर्लक्ष होते.. मला एकदा पोलिसांनी पकडले, माझ्या पिशवीत काय आहे म्हणून त्यांनी विचारले. मी म्हटले, कविता आहे. इतके ऐकताच त्यांनी मला सोडून दिले. इतकी कवीची दहशत आहे, तुम्हाला म्हणून सांगतो..’ अशी नायगावकरी किस्सेबाजी करत त्यांनी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलेच; पण ‘अभिमान’ ही कविता सादर करताना नायगावकरांनी सध्याच्या वैचारिक विसंगतीवर नेमके बोट ठेवले,

‘कालनिर्णय घेऊन साळगावकर

कसे पुढे पुढे चाललेत दरवर्षी

आणि सगळे काळाच्या,

शतकाच्या मागे मागे मागे

अधूनमधून मला अभिमानही वाटतो

आणि सतत लाज वाटते

अभिमान वाटल्याची..’

पुढे त्यांची ‘मुळाक्षरे’सारखी कविता नात्यांचे उसावलेपण सांगत होती. आणि नायगावकर कवितेच्या सोनेरी काळाच्या अनेक आठवणींना उजाळा देत होते. मात्र, त्या आठवांचा जागर मांडताना त्यांनी आजची कविता आणि मराठी भाषा आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतेय, याकडेही लक्ष वेधले. कवितेचा वारसा जपायचा असेल तर पुढच्या पिढीला कवितेशी जीव लावायला शिकवावे लागेल, हेही आग्रहीपणे सांगितले.

रोज एक नेम कर, स्वत:वर प्रेम कर!

‘अ भिजात’ काव्यमैफील अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या काव्यवाचनाने आणखी उंचीवर गेली. ‘कविता लेखनाशी थेट संबंध नसला, तरी नदीचा खळखळाटात, चिमण्यांच्या किलबिलाटात कविता असतेच; ती आपल्याला साद घालत असते, तिला प्रतिसाद देता आला पाहिजे,’ असे म्हणत कवयित्री नसतानाही कविता आपल्या आयुष्याचा भाग कशी झाली, हे प्रतीक्षा लोणकर यांनी सांगितले. नारायण सुर्वे यांची ‘तुमचंच नाव लिवा..’ ही कविता त्यांनी उत्कटपणे सादर केली. यावेळी ‘तूच तुझी वैरी..’ ही साधी रचना वाटणारी, पण मोठा आशय असणारी कविताही त्यांनी वाचून दाखवली,

 

‘स्त्री-पुरुष समानता

विचार मले पटते

खरं सांगतो बाईच

बाईच्या जिवावर उठते

 

माणसानं म्हणतात

मागं ठेवल्या बाया

पण एका हातानं सांगा

वाजतात का टाया..’

अशी सुरुवात होणाऱ्या या कवितेचा शेवट असा झाला,

‘माणूस म्हणून स्त्री-पुरुष सारखेच माना

प्रगतीच्या प्रवाहात दोघायलेही आणा

 

भेदभावाची दरी मग

आपोआप मिटते

खरं सांगतो बाईच

बाईच्या जिवावर उठते’

तेव्हा मात्र मी आव्हान स्वीकारले..

‘गाभ्रीचा पाऊस’ हा सोनाली कुलकर्णी यांचा चित्रपट अनेकांना आठवत असेल. या चित्रपटाचे चित्रीकरण विदर्भातील अमरावतीच्या जळू गावात झालेले. चंदेरी जगातील अनेक जण पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्यांची करुण कहानी अनुभवत होते. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी यांना शेतकरी आत्महत्यांची धग किती दाहक आहे, याची जाणीव झाली. मुंबईच्या वाहतुकीवर जितक्या सहजतेने लोक बोलतात, तितक्या सहजतेने या प्रश्नाची चर्चा होताना दिसत नाही. इतके हे जीव स्वस्त झालेत का, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत राहिला. ती अस्वस्थता व्यक्त करणारी कविताच त्यांनी सादर केली,

‘आज न बोलता तिरडीवर पडलेला तिचा नवरा

काल तर तिच्या शेजारीच झोपला होता..’

अशा विदारक शब्दांत शेतकरी व्यथांची आँखोदेखी त्यांनी मांडली. तर..

‘बाकी सगळं मी करतच होते..

पाण्यावरून चालत यायला सांगितले मला

टुकार पाणी डोळ्यांत जळायला लागले

तेव्हा मात्र मी आव्हान स्वीकारले

आणि अशक्य वाटणारी

प्रत्येकच गोष्ट मी मिळवूनच दाखवली..’

या त्यांच्या कवितेने श्रोत्यांना स्त्री-वास्तवाची नव्याने जाणीव करून दिली.

पण,

‘काय शोधतात तुमच्या नजरा?

किती सहज घरंगळतात इकडून तिकडे..

नकळत साचत जाणारी ही घाण मी फेकली बाहेर

त्यानंतर कधी डोहाळेच लागले नाहीत मला..’

अशा शब्दांनी त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

* संपूर्ण कार्यक्रमाचे वृत्तांकन आणि संकलन : शफी पठाण  

* छाया : दीपक जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:45 am

Web Title: loksatta abhijat poetry festival girish kuber interacted with nana patekar abn 97
Next Stories
1 क्रौर्याची प्रयोगशाळा?
2 जीवघेण्या शांततेतला प्रश्न..
3 राजकारणापलीकडचे ‘नागरिकत्व’
Just Now!
X