– अभय टिळक

आईच्या कडेवर बसलेल्या लहान बाळाकडे आपण नीट बघतो का? बहुतेक वेळा नाहीच. गेलेच लक्ष एखादे वेळेस, तर आपण टिपतो त्याच्या बाळलीला. बाळाची चळवळ, हातवारे, हसणे, लाजणे, आनंदाने उसळणे.. या सगळ्याच बाबी आपले ध्यान वेधून घेतात. परंतु बारकाईने न्याहाळले तर आणखी एक बाब आपल्याला जाणवते; ती म्हणजे त्या निरागस जीवाच्या नजरेतून ओसंडणारे कुतूहल. खरोखर, किती अचंब्याने, कौतुकाने, जिज्ञासेने लहान मूल जगाकडे बघत असते नाही! क्षणोक्षणी जणू त्याला कशाचा ना कशाचा तरी साक्षात्कारच होत असतो म्हणा ना! भय, शंका, संशय अशा भावभावनांचा लवलेशही नसतो त्या नजरेत. भवतालातील निर्जीव गोष्टींशीही ते त्याच्या भाषेत संवाद साधण्याच्या खटपटीत असते. हाताला लागलेली वस्तू निर्जीव आहे, ती आपल्याशी खेळू-बोलू शकणार नाही, याचेही भान त्याला नसते. कारण ‘जड’ आणि ‘चेतन’ हे द्वैतच त्याच्या ठायी औषधालाही नसते. जणू त्याच्या बाळनजरेला सर्वत्र आविष्कार घडत राहतो तो चैतन्याचा, अभेदाचा. निष्पाप, निरागस बाळाच्या मुखावर विलसणारा आनंद प्रतिक्षणी उमलत राहतो तो त्याच्या अभेददृष्टीमधूनच. जसजसे वय वाढत जाते तसतशी प्रथम ओहोटी लागते ती आपल्यातील त्या अभेददृष्टीलाच. अंत:करणाला द्वैतभावनेचा प्रथम स्पर्श होतो तोच क्षण असतो आपले बाळपण गमावण्याचा. त्या टप्प्यावर ‘खेळणे’ संपते आणि सुरू होतो ‘खेळ’! घावडाव, व्यूहरचना, स्पर्धा, आकांक्षा, ईर्षां. या बाबी तर या खेळाचे अविभाज्य अंगच. स्पर्धा आली की प्रतिस्पर्धीही आलाच. आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा वरचढ तर ठरणार नाही ना, ही विवंचना मग आपल्याला घेरून राहते. त्या चिंतेने मन व्यापले की मुखावरचे हसू मावळतेच. एक प्रकारचा राठपणा तिथे नांदू लागतो. जगण्याचा खेळ जितका संघर्षपूर्ण तितके ते राठपण कडवे बनत जाते. त्यालाच आपण गोंडस नाव देतो- ‘अनुभव’! अनुभवाच्या पोतडीची जी लांबीरुंदी असते तिचाही कैफ चढतो आपल्याला. अशा व्यस्त जगण्यात निखळ आनंदाचे क्षण विरळच बनतात. अवचितच एखादे लहान बाळ मस्त मजेत बागडताना दिसले, की कर्तबगारीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आपल्यातील मूल एकदम जागे होते. ‘असे स्वच्छंद हसणे आपण विसरूनच गेलो होतो की..’, ही भावना बेडकीसारखी उडी मारून मनाच्या काठावर येऊन बसते. ‘खूप झाला तो कर्तृत्वाचा षोक, आता हरपलेला तो आनंद पुन्हा शोधू या..’ असे म्हणत आपण लौकिकातून अंग काढून घ्यायला लागतो आणि मग परिवारातले लोक म्हणतात, ‘आता हे लागले परमार्थाला..!’ आहे की नाही गंमत! ‘परमार्थ’ या संकल्पनेचे आपले आकलन नेमके आहे तरी काय? इथे आपल्या मदतीला धावून येतात तुकोबा. ‘जगण्याच्या प्रत्येक क्षणी आपल्यातील निरागस मूल जिवंत ठेवणे हाच परमार्थ’ इतकी सोपी आणि रोकडी व्याख्या तुकोबांनी ‘खेळतो कौतुके’ अशा नेमक्या शब्दांत मांडलेली आहे. असे निरागस खेळणे ज्यांना साधले त्यांनाच आपण म्हणतो ‘संत’. त्यांच्यासारखे खेळणे आपल्यालाही जमावे याचसाठी हात धरायचा तो संतांचाच. इथून पुढे आपण करणार आहोत नेमके तेच.

agtilak@gmail.com