ज्या जगात आपण जगत असतो त्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली, याबद्दल वैज्ञानिकांनी आजवर नानाविध प्रमेये मांडलेली आहेत. त्याच धर्तीवर, या जगाचे स्वरूप नेमके आहे तरी कसे, याबद्दल देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी उदंड ऊहापोह केलेला दिसतो. जगाच्या स्वरूपासंदर्भात ज्ञानदेवांच्या परंपरेने मांडलेली भूमिका अद्वयाची आहे. ज्ञानदेवांच्या प्रतिपादनानुसार, उभे जग म्हणजे एकाच तत्त्वाचा आविष्कार होय. विश्वाचे आदिकारण आणि अधिष्ठान असणाऱ्या त्या मूलद्रव्याचे अथवा तत्त्वाचे नाव ‘शिव’! संपूर्ण जग हे एका शिवाचेच प्रगटन होय, हा या तत्त्वविचाराचा गाभा. हे शिवतत्त्व स्वयंप्रज्ञ आणि स्वायत्त आहे. स्व-तंत्र आहे. परंतु इथे एक गंमत आहे. हे जे ‘शिव’ तत्त्व आहे ते एकटे नाही. ज्ञानदेवांची परंपरा आहे नाथसंप्रदायाची. नाथसंप्रदायाचे अधिष्ठान म्हणजे भगवान शिव. या संप्रदायाचे तत्त्वज्ञान ज्या सूत्रांद्वारे शब्दमंडित झालेले आहे त्या सूत्रांना म्हणतात ‘शिवसूत्रे’! शिवाचे स्वरूपवर्णन करणारे एक सूत्र त्या शिवसूत्रांमध्ये आहे. विश्वाचे आदिकारण असणारा तो परमशिव एकटा नसून तो शक्तिसहित आहे, असे त्या सूत्राचे कथन. शक्तीचे साहचर्य नसलेल्या शिवाची कल्पनादेखील ही तत्त्वपरंपरा करू शकत नाही. शिवाला शक्तीचा आणि शक्तीला शिवाचा आधार हा असतोच आणि लागतोच. या दोन तत्त्वांचे अस्तित्व परस्परोपजीवी अशा प्रकारचे आहे. शिवाचे आणि शक्तीचे परस्परांशी असणारे नाते अद्वयाचे आहे. म्हणजे ‘शिव’ आणि ‘शक्ती’ ही तत्त्वे दिसतात अथवा भासतात दोन. परंतु त्यांत मुळीसुद्धा फरक नाही. तफावत नाही. ही दोन तत्त्वे परस्परांपेक्षा निराळी दिसतात-भासतात म्हणून त्यांना दोन वेगवेगळी अभिधाने आहेत. परंतु बघायला गेल्यास त्यांचे अस्तित्व मात्र पृथक दिसत नाही. किंबहुना, शिव आणि शक्ती ही अनादी काळापासून एकत्रच नांदत आल्याचे सगळ्यांनी अनुभवले आहे, असा दाखला ज्ञानदेव त्यांच्या ‘अमृतानुभव’ या प्रबंधग्रंथामध्ये ‘‘ये अनादि एकपणे नांदती दोघे’’ अशा शब्दांमध्ये देतात. हे युगुल एकत्र नांदत असल्यानेच जगरूपी बाळ जन्माला येऊ शकले अथवा आले, असेही ज्ञानदेव सांगतात. शिव आणि शक्ती यांना एकमेकांपासून दूर केले तर एकाकीपणे त्यांच्या हातून गवताची साधी काडीदेखील निर्माण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन ज्ञानदेव, ‘‘जिहीं येकयेकावीण। न कीजे तृणाचेहि निर्माण’’ अशा नि:संदिग्ध शब्दांत करतात. या दोघांचे स्वरूप नेमके आहे तरी कसे, याबद्दल काही छातीठोकपणे सांगता येत नाही, असा कबुलीजबाबही ज्ञानदेवच ‘अमृतानुभवा’मध्ये देऊन टाकतात. शिव आणि शक्ती ही दोन तत्त्वे दिसतात वेगळी, परंतु आहेत मात्र एकरस आणि एकात्म. एकरूप असल्यामुळे ही दोघे वेगवेगळी नाहीत असे म्हणावे, तर भासतात-दिसतात तर वेगळी. मग यांच्या स्वरूपाचे वर्णन करावे तरी कसे, असा प्रश्न ज्ञानदेवांनाही पडलेला आहे. आपली ही अडचण, ज्ञानदेव मग- ‘‘जे एकचि नव्हे एकसरे। दोघां दोनीपण नाहीं पुरे। काई नेणों साकारें। स्वरूपे जिये।।’’ अशा शब्दांत स्पष्टपणे मांडून टाकतात. शक्तिमान शिव आणि शिवसहित शक्ती यांचे स्वरूपवर्णन यथार्थपणे कसे करावे, याचा काही पत्ता लागत नाही असे खुद्द ज्ञानदेवच जिथे म्हणतात तिथे आपला पाड कोठवर लागावा? शिव आणि शक्ती हे अद्वय आहे. एकाच तत्त्वाची अवस्थाभेदाने दिसणारी ही दोन आविष्करणे होत. या उभय रूपांचे आकलन म्हणजेच सम्यक् दर्शन!

– अभय टिळक
agtilak@gmail.com