आरोग्य क्षेत्र माणसांच्या आयुष्याशी निगडित असल्याने या क्षेत्रात काम करणे आव्हानात्मक आहे. सध्या आरोग्य क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक असे दोन प्रमुख भाग दिसतात. दोन्ही क्षेत्रे आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी बजावत आहेत. देशाची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारी आणि खासगी या दोन्ही रुग्णालयांची जबाबदारीही मोठी आहे. सर्वसामान्यांना वेळेत व प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांना जोडणारा पूल तयार करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मात्र सध्या या व्यवस्था दोन विभिन्न टोकांना उभ्या आहेत. या दोन्ही व्यवस्थांमध्ये तफावत असल्याकारणाने एकत्रितपणे काम करण्यास अडचणी जाणवतात. खासगी आणि सरकारी रुग्णालयांमधील तफावतीमागेही बरीच कारणे आहेत. एक तर केईएम, शीव यांसारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा चांगल्या नसतानाही मोफत उपचार मिळत असल्याने रुग्णांचा ओढा जास्त आहे. तर खासगी रुग्णालयात चांगल्या सोयीसुविधा असल्याने काही ठरावीक गटातील व्यक्तीच या रुग्णालयांकडे वळतात. सरकारी रुग्णालयात रुग्णांचा ओढा जास्त असल्याने दररोज विविध प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्याची संधी येथे काम करणाऱ्या डॉक्टरांना मिळत असते. त्यातून डॉक्टरांचा अनुभव आणि गुणवत्ता वाढते. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात कौशल्यपूर्ण डॉक्टरांची संख्या जास्त असते.

आरोग्य सेवा बदलत चालली आहे, असे म्हणताना रुग्णांची बदललेली मानसिकताही समजून घ्यावी लागेल. २० वर्षांपूर्वीच्या आणि सध्याच्या रुग्णाच्या मानसिकतेत खूप बदल झाला आहे. आजचा रुग्ण आधुनिक आहे. त्याच्या हातात समाजमाध्यमांचे साधन आहे. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आधी समाजमाध्यमांवर तपासून घेण्याची सवय आजच्या तरुण पिढीला आहे. समाजमाध्यमांवर तर त्याला लिखित-दृक्श्राव्य स्वरूपातील सविस्तर माहिती मिळत असते. डॉक्टरांनीही आपल्याशी संवाद साधावा अशी रुग्णांची अपेक्षा असते. दोन ते तीन दशकांपूर्वीचे रुग्ण डॉक्टरांना देव मानून त्यांच्यावर आपल्या आरोग्याची जबाबदारी सोपवीत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेसारख्या देशातही डॉक्टर आणि रुग्णांमधील संवादाला महत्त्व दिले जाते. रुग्णांचे समुपदेशन करणे हा डॉक्टरांच्या कामाचा भाग समजला जातो. उपचाराबरोबरच डॉक्टर-रुग्णाच्या संवादाकडेही रुग्णालय व्यवस्थापकांचे लक्ष असते. भारतात मात्र डॉक्टर-रुग्णामधील संवाद हरवत चालला आहे. आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधावा यासाठी आम्ही कायम आग्रही असतो. रुग्णांसाठी आणि डॉक्टर-रुग्ण नात्यासाठी हे आवश्यक आहे.

भारतीय नागरिकांमध्ये कौशल्य आहे. आरोग्य, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण व्यक्ती आहेत. मात्र वेळेवर आणि प्रभावी सुविधा पोहोचविण्यात भारतीय कमी पडत असल्याचे दिसून येते. रस्त्यावर एखादा अपघात झाल्यानंतर नेमके काय करावे, सरकारी मदत कशी मिळवावी याबाबतच्या सामान्यज्ञानाची भारतीयांमध्ये कमतरता दिसून येते. भारतातील सर्वसामान्य नागरिकालाही सरकारने दिलेल्या सोयीसुविधांचा वापर कसा करावा याचे ज्ञान नसते, ही खरी परिस्थिती आहे. रुग्णांची ही परिस्थिती असताना दुसरीकडे डॉक्टर-रुग्ण संवाद कमी होण्यामागे वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे. सध्या ‘कट प्रॅक्टिस’चा मुद्दा मोठय़ा प्रमाणात चर्चिला जात आहे. नवीन पिढीतील डॉक्टर केवळ नफा मिळविण्यासाठी आरोग्य क्षेत्रात येत आहेत. ‘आरोग्या’सारख्या क्षेत्रात रुजू होणारे डॉक्टर केवळ नफ्याच्या लालसेने रुग्णांच्या आयुष्याचे निर्णय घेत असतील, तर आरोग्य क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी ‘सेवा’ देण्याच्या इच्छेने तरुण पिढी डॉक्टर, परिचारिका आरोग्य क्षेत्रात येत होते. मात्र सध्याचे डॉक्टर हे अधिकाधिक नफेखोर होत चालले आहेत.

महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता. महाराष्ट्रात डॉक्टर व परिचारिकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दर वर्षी दक्षिण भारतातून हजारो परिचारिका राज्यातील इतर रुग्णालयांमध्ये रुजू होतात. मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयांमधीलही अधिकांश परिचारिका या दक्षिण भारतातील आहेत. आता तेथेही मोठमोठी रुग्णालये उभी राहत असल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयांसाठी परिचारिका शोधणे आव्हानात्मक ठरत आहे. यासाठी सरकारने परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येत आहे. मात्र तंत्रज्ञानाचा भडिमार होत असला तरी आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी माणसांची आवश्यकता असते आणि त्याला दुसरा पर्याय नाही. तंत्रज्ञान केव्हाच माणसांची जागा घेऊ  शकत नाही. नवीन तंत्रज्ञान येत असले तरी कौशल्यपूर्ण माणसे तयार करणे हाच या समस्येवर तोडगा आहे.   अनेकदा खासगी रुग्णालयाच्या व्यावसायिकीकरणावर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र बदलत्या काळानुसार आरोग्य क्षेत्रातही मोठे बदल झाले आहे. आरोग्य क्षेत्र हे व्यावसायिक होऊ  लागले आहे हे स्वीकारणे आवश्यक आहे. समाजाची सेवा करण्यासाठी कोणी व्यवसाय किंवा रुग्णालय उभे करीत नाही. नफा मिळविण्यासाठीच व्यवसाय उभा केला जातो. व्यवसाय टिकवायचा असेल तर पैसे कमविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आजची खासगी आरोग्य व्यवस्था या मुद्दय़ांवर उभी आहे.

– डॉ. नील सिक्वेरा, उपाध्यक्ष , कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय, मुंबई</strong>