वातावरणातला सर्वात प्रदूषित घटक कार्बन डायऑक्साईड असला तरी तो प्रदूषित घटक म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या जगात जी ग्लोबल वॉर्मिगची समस्या आहे ती म्हणजे तेच नाही का? समुद्र प्रदूषित करण्यासारखा दुसरा कुठलाही घातक बेजबाबदारपणा नाही. समुद्रातील जीवाश्म आणि इतर जीव त्यामुळे कमी होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दाट जंगल आणि मोकळ्या भूखंडाची आवश्यकता आहे. परंतु आपण तेच नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत.    – ई. रवींद्रन, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

*****

मुंबईतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ४०० पीपीएमच्या आसपास असते. जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड समुद्रात शोषला जातो, तेव्हा पाण्यातील पीएच कमी होते. काबरेनेट आयन्स कार्बन डायऑक्साईडमुळे तयार होतात. याचा फायदा जीवाश्मांना त्यांच्यावरील कवच निर्माण करण्यासाठी होतो. परंतु जेव्हा समुद्राच्या पाण्याचे पीएच कमी होते तेव्हा हे कवच निर्माण होण्यात अडथळा येतो. त्यामुळे त्यांच्या अन्न प्रक्रियेत गोंधळ होतो. प्रजननही बिघडते. मासळीचा दुष्काळ निर्माण होतो. २० टक्के प्रोटिनचा स्रोत हे मासे आहेत.    – बी. एन. पाटील, संचालक, पर्यावरण विभाग

*****

१० मायक्रॉनवरील धूलिकण नाकाद्वारे बाहेर फेकले जातात. मात्र त्याहून लहान कण हे शरीरात जाऊन त्रास देतात. संवेदनशील श्वसननलिका आकुंचन पावते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. चालताना दम लागतो. हे कण फक्त श्वसनावर परिणाम करतात असे नाही. तर ते शरीराच्या कोणत्याही भागात जाऊन आजारांना निमंत्रण देऊ शकतात. प्रदूषणाच्या प्रत्येक बाबीवर संशोधन होणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय स्वास्थ्य फुप्फुस संस्थेची स्थापना केली पाहिजे.    – डॉ. अमिता आठवले, श्वसनविकारतज्ज्ञ, केईएम रुग्णालय

*****

माध्यमांचा विचार करताना ढोबळमानाने मुद्रित माध्यमे, दृक् श्राव्य माध्यमे आणि समाज माध्यमे अशा तीन प्रकारांचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीला एकूणच मुद्रित माध्यमातून पर्यावरणासंबंधी विविध प्रकारे लेखन केले जाते, दृक्श्राव्य माध्यमांवर पर्यावरणासंदर्भात वृत्तांकन करताना सखोल माहितीपेक्षा सवंगपणा जास्त आढळतो. तर समाज माध्यमांना या विषयासंदर्भात अजून जाग यायची आहे.   – रविराज गंधे, माध्यमतज्ज्ञ.

*****

माध्यमांवर जेव्हा प्रदूषणामुळे निर्माण झालेले धोके, वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या घटनांबाबत सूचक इशारे दिले जातात तेव्हा त्याचा परिणाम तर होणार नाही ना हे वर्तमानात तपासून घेत त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्याऐवजी सेलपासून मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात हे गंभीर आहे. लोकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर न सोपवता स्वत: सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.      – संजय भुस्कुटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

शब्दांकन – उमाकांत देशपांडे, निशांत सरवणकर, प्रसाद रावकर, सुशांत मोरे, नमिता धुरी, शैलजा तिवले, अक्षय मांडवकर, रसिका मुळ्ये, जयेश शिरसाट, किन्नरी जाधव, दिशा खातू