तंत्राग्नीया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले मत.

प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्यूगो म्हणतो की ‘जिची वेळ आली आहे, अशा कुठल्याही कल्पनेला थांबवण्याचे सामथ्र्य पृथ्वीवरील कोणत्याही शक्तीमध्ये नाही.’ स्टार्टअप्स, उद्योग हे नवकल्पनांवर आधारलेले असतात. जर नावीन्यपूर्ण कल्पनेला कष्टाची जोड दिली तर ह्यूगोचे विधान हे स्टार्टअप्स ना वस्तुनिष्ठपणे लागू पडताना आढळते. नवउद्यमी हे एक आव्हान आहे, तशीच ती संधीही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणि वाईट प्रसंग येतच असतात. पण चांगल्या समयाची प्रतीक्षा करून त्या संधीचे दोन्ही हातांनी स्वागत करून सोने करण्याची धमक अंगी असणाराच उद्योजक यशस्वी होतो. आजच्या घडीस भारतात २० हजारांहून अधिक ‘स्टार्टअप्स’ आहेत आणि त्यात चार ते पाच लाख रोजगार आहेत. सध्याचे स्टार्टअप्स हे तंत्रज्ञानावर आधारित सेवा घेऊन येतात. मुख्यत: या सेवा इंटरनेटवर आधारित असतात. त्यात अजून ‘ई-कॉमर्स’चा ट्रेण्ड’ हा अधिक दिसून येतो. २१व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या वाहणाऱ्या वाऱ्यावर स्टार्टअप कंपन्या झोकांडय़ा खात आपली वाटचाल सुरू ठेवताना दिसतात. त्यामुळे अमेरिकेत जे काही वर्षांपूर्वी घडले ते आता भारतात घडतेय असे म्हणून आपण सोयीस्कररीत्या मोकळे होतोदेखील; पण खरेच स्टार्टअपसाठी अजून आपण पूर्णपणे तयार आहोत का? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्टार्टअप कंपन्या अयशस्वी होण्याचे प्रमाण भारतामध्ये नेहमीच मोठे राहिले आहे. एका नवउद्योजकाला त्याच्या स्टार्टअपसाठी परवानग्या, कर्जपुरवठा मिळवायला जर फार अडचणी येत असतील तर एकंदरीत उत्साहावरच पाणी फिरू शकते. त्यासाठी भारत सरकार स्टार्टअप इंडियासारख्या योजना राबवताना दिसते. यामुळे आपल्याकडे उद्योजकता रुजण्यात, ती फोफावण्यात ज्या अडचणी येतात त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आढळते. आता उद्योजगता रुजवण्यापेक्षा ती टिकवायची कशी यावर जास्त भर देणे गरजेचे आहे. आज दहापकी आठ किंवा नऊ स्टार्टअप कंपन्या या अयशस्वी होताना दिसतात. बंगळूरु हे शहर देशातील एक महत्त्वाचे स्टार्टअप हब म्हणून नावारूपास आले आहे. तर त्यात कोरमंगल हे शहर स्टार्टअप उद्योजकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ झाले आहे. अर्थातच स्टार्टअप्स तंत्राग्नी मिळण्यातदेखील बंगळूरुच आघाडीवर आहे यात नवल नाही. ज्या वेळी कल्पनांना वाव कमी होता आणि उद्योजगता या विश्वामध्ये येण्यासच परिस्थिती अनुकूल नव्हती-अशा स्थितीमध्ये रावळगाव, जाई काजळ, नेत्रांजन इत्यादी उदयास आले. या उद्योगांना पहिलेपणाचा बराच फायदा मिळविला. आपापसातील मर्यादित स्पर्धा व ८०-९० च्या दशकातील मोनोपोली यामुळे या उद्योगांना तग धरणे कठीण नव्हते. मात्र १९९० नंतर आíथक उदारीकरण व त्यानंतर घोंगावत आलेल्या माहिती-तंत्रज्ञानाच्या वाऱ्याने या उद्योगांना भुईसपाट केले. आपण ज्या वेळी उद्योगांचा २१व्या शतकाचा विचार करतो त्या वेळी या शतकाने आणलेल्या व्यापक स्पध्रेचा आणि कल्पकतेचा विचार करणेदेखील तितकेच गरजेच आहे. भारतातील अनेक उद्योग बंद पडले. त्यात रावळगाव, जाई काजळ, अफगाण स्नो यासारखी लोकप्रिय उत्पादनेदेखील होती. आतादेखील अनेक स्टार्टअप्स हे बंद पडताना दिसतात, काही दिवसांकरिता लोकप्रियता मिळवितात व त्यानंतर बंद पडतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उद्योग-विश्वातील ‘बदलत राहा’ या एका महत्त्वाच्या मंत्राचा विसर या लोकप्रिय उद्योगांना व स्टार्टअप्सना पडलेला दिसतो. उद्योजक त्यांना आवडलेल्या एखाद्या अभिनव कल्पनेवर निर्धाराने काम करीत राहतात आणि आशा करतात की ते त्या कल्पनेची किंवा उत्पादनाची गरज ग्राहकांना केव्हा तरी पटवून देऊ शकतील. दुर्दैवाने हे गणित जमत नाही आणि त्यांनी ओतलेला पसा संपुष्टात येतो. अनेक कंपन्या व स्टार्टअप्स या ‘बदल घडवा’ हा उद्देश समोर ठेवून आपल्या कामाचा श्रीगणेशा करताना दिसतात. पहिलेपणाचा फायदा मिळविण्याकरिता बदल घडवणे हे उद्योगांना उपयोगी ठरते पण बदल घडवण्यासोबतच हे उद्योग किंवा स्टार्टअप्स ‘बदलत राहा’ हा मंत्र मात्र विसरतात. रावळगाव, जाई काजळ, अफगाण स्नो, नेत्रांजन इत्यादी उद्योग बंद होण्यामागे आणि आत्तादेखील बरेच स्टार्टअप्स बंद होण्यामध्येदेखील उद्योगांना बदलत राहण्यामध्ये आलेले अपयश दिसून येते. उद्योग बंद पडल्यावर सुरू झालेली उद्योगांच्या अंत्यविधीची प्रथादेखील बदलाचा भाग म्हणून स्वीकारली पाहिजे. यातून पुढे येणाऱ्या नवउद्योगांना कोणत्या चुका टाळाव्यात हे कळेल आणि योग्य मार्गदर्शनदेखील मिळू शकेल आणि स्टार्टअप्सना औदासीन्यातून बाहेर पाडण्यासही मदत करू शकेल. कल्पनेमध्ये सरसता आणण्यासोबतच ज्या वेळी स्टार्टअप्स व विविध उद्योग बदलत्या काळानुसार, बदलत्या ग्राहकानुसार, तंत्रज्ञानानुसार स्वत:मध्येदेखील बदल करीत जातील, त्या वेळी ते या शतकामध्ये टिकाव धरू शकतील. त्यासाठी अपयशावर मात करण्यासाठी उद्योगांचा मृत्यू हा इतर उद्योगांसाठी काही तरी बलिदान म्हणून उपयोगी ठरू शकला तरच उद्योगांच्या अंत्ययात्रेची ही प्रथा खऱ्या अर्थाने अनुकरणीय ठरू शकेल.

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)