15 December 2017

News Flash

बाजारउसळीने आनंदउकळ्या नकोत..

सरकारला मिळालेलं बहुमत आणि आर्थिक सुधारणांचा मोदी यांचा कल लक्षात घेऊन शेअर बाजार उंचावत

सत्यजित पुष्पा एकनाथ | Updated: August 5, 2017 1:07 AM

लांडगे आणि कोल्हेया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

देशात सरकार कोणाचंही असलं आणि ते कितीही स्थिर असलं, तरी शेअर बाजारातील तेजी-मंदी आता सरकारच्या फारशी हातात राहिलेली नाही, हे गेल्या काही वर्षांतील घडामोडींवरून लक्षात यायला हरकत नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आलं, त्या वेळी शेअर बाजारानं या सरकारचं धूमधडाक्यात स्वागत केलं होतं. सरकारला मिळालेलं बहुमत आणि आर्थिक सुधारणांचा मोदी यांचा कल लक्षात घेऊन शेअर बाजार उंचावत होता. त्यानंतर काही काळे सोमवार शेअर बाजारानं अनुभवले. जागतिक घटना, घडामोडींचा बरा-वाईट परिणाम अनुभवला. जगात कुठंही टाचणी पडली, तरी तिचे पडसाद शेअर बाजारात उमटत गेले. ग्रीसचं आर्थिक संकट, युरोपमधील मंदी, रशियाचा मंदगती विकास, अमेरिकेनं एका दशकात घेतलेला व्याजदरवाढीचा निर्णय, चीनमधील मंदी आणि तेथील चलनाचं झालेलं अवमूल्यन, जागतिक बाजारात गेल्या वर्षभरात सातत्यानं घसरणाऱ्या तेलाच्या किमती या सर्व घडामोडींचा प्रतिकूल परिणाम भारताच्या शेअर बाजारावर होत गेला. बाजाराची तात्पुरती झेप आणि त्यानंतर पुन:पुन्हा कोसळणं हे गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार अनुभवायला मिळालं. बाजाराचे खरे तर स्वत:चे असे कोणतेही स्वरूप नसते वा त्याला त्याची अशी स्वत:ची दिशाही नसते. कोणीसे म्हटले आहे त्याप्रमाणे The market is the sum of the total wisdom… and the ignorance… of all of those, who deal in it. बाजाराचे उसळी घेणे वा कोसळणे याला बाजाराचे दैनंदिन व्यवहारांत भाग घेणारे लक्षावधी मानवी मेंदूच कारणीभूत असतात. प्रा. डॅनियल हॉवर्ड यांनी या संदर्भात टोळ्या वा झुंडींची मनोवृत्ती- ‘kherd mentality असा काहीसा उग्र शब्दप्रयोग केला आहे, पण अशी सामूहिक मनोवृत्तीच त्यांच्या मते बाजाराचे स्वरूप ठरविते. शेअर बाजाराचे पाण्यासारखे चंचल स्वरूप आणि त्यातील सतत हेलकावे खाणारे समभागांचे भाव, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक अनाकलनीय विश्व आहे. सर्वसामान्यपणाने बाजार मूलत: ‘मागणी-पुरवठा’ या तत्त्वावर आधारित असतो हे खरे असले तरी मग मुळात मागणी वा पुरवठय़ाच्या प्रमाणात सारखे बदल का होतात, हा प्रश्न उरतोच आणि या प्रश्नाची अनेक उत्तरे असली तरी गुंतवणूकदारांची मानसिकता हे या घडामोडींमागील एक प्रबळ कारण आहे हे निश्चित. अनेकदा आकडेवारीनुसार खूप चांगले निकाल देऊनसुद्धा बाजारात कंपनीच्या समभागाने गटांगळ्या खाणे आणि कधीकधी विक्री वा नफ्याचे सुमार आकडे जाहीर करूनही एखाद्याने बाजारात भाव खाऊन जाणे, यामागचे तर्कशास्त्र हेच असते. या प्रकारचे मला आठवणारे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कारगिल युद्ध. सन १९९९ मध्ये जेव्हा आपली मने या युद्धाने झाकोळली होती, नेमक्या त्याच मे ते जुलैमधील कालावधीमध्ये शेअर बाजाराने जवळजवळ ३० टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदविली.

तेजी आणि मंदी प्रथम बाजारात की आधी आपल्या मनात, हा आधी अंडे की कोंबडी,अर्थात सामान्य स्थितीत, अशा जमलेल्या गर्दीपैकी प्रत्येकाच्या परिस्थितीच्या आकलनाची, धोका पत्करण्याची पातळी आणि एकुणातच निर्णयक्षमता वेगवेगळी असल्याने हे दिशा वा पक्षबदल एकाच वेळी होत नाहीत. बाजारात तेजी-मंदीच्या लंबकाला गती देणारे असे अक्षरश: अब्जावधी मेंदू एकाच वेळी भाग घेत असल्याने, अत्यंत अल्पकाळातही त्याच्या अशा स्वतंत्रपणे केलेल्या विचारांचा परिपाक म्हणून मागणी/पुरवठा हे समीकरण सातत्याने बदलत राहते, ज्याचे प्रतिबिंब भावपातळीत पडलेले दिसते. बाजाराची दशा आणि दिशा ही प्रामुख्याने आर्थिक आणि त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व इतर अशाच घटकांवर वा घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते हे नक्कीच बरोबर, पण शेवटी या सर्व घटकांचे विश्लेषण करून ते सकारात्मक आहेत की नाहीत हे ठरविणारी, न्यायाधीशांच्या भूमिकेत असणारी, दुसरीतिसरी कोणीही नसून, आपल्यासारखी लक्षावधी मानवी मनेच असतात, हे आपण येथे विचारात घेतले पाहिजे. बहुतेकदा हा सारा अपेक्षांचा खेळ असतो. म्हणजेच पाहा, एखाद्या विद्यार्थ्यांस दहावीला ८८ टक्के गुण मिळाले, हा झाला त्याचा वास्तविक निकाल, पण पुढे तो चांगला की वाईट हे त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांवर अवलंबून आहे. आता जर त्या विद्यार्थ्यांकडून गुणवत्ता यादी समकक्ष गुणांची अपेक्षा असेल, तर या निकालाने तो निराश होईल. याउलट एखादा सर्वसामान्य विद्यार्थी अशा निकालाने कमालीचा खूश होईल. त्यामुळे भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर आणखी प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

(सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई)

First Published on August 5, 2017 1:07 am

Web Title: loksatta blog benchers loksatta campus katta