‘सडके पौरुष’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले मत.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. शरीराचा एखादा भाग सडायला सुरुवात झाली आणि त्यावर उपचार न करता दुर्लक्ष केले तर मृत्यू अटळ ठरतो. कांद्याच्या चाळीतील एखादा कांदा सडला तरी संपूर्ण चाळच खराब होण्याचा धोका उद्भवतो. समाजही याला अपवाद कसा ठरेल? समाजातील विकृतीमुळे सडलेला भाग तातडीने नष्ट करणे वा त्यावर उपचार करणे इष्ट अन्यथा संपूर्ण समाजाची मृत्यूकडे वाटचाल होणे अपरिहार्य आहे. समाजातील विकृतीचे किळसवाणे रूप पाहता आपणही अशाच समाजात राहतोय का? असा प्रश्न आता छळू लागला आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: यत्रेतास्तु न पूज्यन्ते, सर्वास्तत्राफला: क्रिया’ अर्थात ज्याठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि जेथे त्यांच्यावर अत्याचार होतो तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही, असं मानणारी आमची संस्कृती. आम्ही तसे भलतेच संस्कृतीप्रिय! बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी खाऊ घालण्यात आमचा हात कोण धरू शकेल? घोर कलियुग आहे म्हणूनच स्त्रियांवर अत्याचार घडताहेत असे आमच्या संस्कृतीपूजकांचे म्हणणे! काय म्हणावे त्यांच्या संशोधनाला? इथे महाभारतकाळापासूनच स्त्रीच्या अब्रूला हात घालणारे जन्माला आलेत! आता झपाटय़ाने वाढलेले त्यांचेच वंशज परंपराप्रिय समाजाची परंपरा वाहताय. जिथे स्वत:च्याच घरात तिच्यावर अत्याचार घडत असतील तिथे तिच्या सन्मानाच्या आणि सुरक्षिततेच्या गप्पा व्यर्थच! काही काळ वगळता प्राचीन, मध्ययुगीन आणि आता आधुनिक(?) भारतातही बाईची होरपळ सुरूच आहे. विधवांवर होणारे अत्याचार, सती चाल, पडदा पद्धत, देवदासी, हुंडा, क्रूर हल्ले, बलात्कार अशा अगणित प्रकारे तिचे शोषण चालूच आहे. स्त्रियांना मालमत्ता समजण्याच्या गरसमजात समाज आजही वावरतोय. आपण काय पेरतोय, याचे भान नष्ट होत चाललेय म्हणूनच कितीही कायदे करूनही भवरीदेवी ते निर्भयाकांड नृशंसपणे घडत आहेत. कोपर्डी घटनेची दाहकता हेच किंचाळून सांगतेय. माध्यमांचा भलताच सुळसुळाट झालाय. आम्ही भलतेच समाजमाध्यमस्नेही झालोय! इतके की सेकंदा सेकंदाला आम्ही काय करतोय, हे जगाला सांगणे इतिकर्तव्य झालेय. खरेच आपण ‘सोशल’ झालोय की संकुचित? अशा घटना घडल्या की, सर्व समाजमाध्यमांतून निषेधाच्या ‘पोस्ट’ फिरणार, निषेधाची पेपरबाजी होणार, मेणबत्त्या हाती घेऊन आम्ही किती संवेदनशील आहोत हे दाखवणार; पण परत अशी घटना घडणार नाही याची कोणती दक्षता घेतो आपण? हे सगळे प्रकार करणाऱ्यांपैकी किती जण मनापासून स्त्रियांचा व्यक्ती म्हणून आदर करतात? आपल्या घरातील महिलेला सन्मानाचे स्थान देतात? तिचे निर्णय, तिचे छंद तिला पूर्ण करता येतात का? असे असंख्य प्रश्न आहेत. देखावा करणे सोपे आहे, मात्र डोके फिरले की, शिव्यांची लाखोली आपण कोणत्या शब्दांत वाहतो, याचेही एकदा चिंतन करावेच. महिलांना आता सर्व क्षेत्रे खुली झालीय. त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्यपूर्ण वावर या क्षेत्रात दिसून येतो आहे; मात्र त्यांची कसरत कमी झाली का? स्त्री म्हणजे नाजूक, विनयशील, सहनशील इ. या विशेषणांच्या ओझ्याखाली तिची अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमताच काढून घेतली जाते. एकीकडे स्त्रियांनी लक्ष्मणरेषेच्या आतच राहावे अन्यथा वाईट परिणाम होतील,’ असे खुलेआम सांगणारे पंडित तर दुसरीकडे ‘आम्ही मुलीला, सुनेला हवे ते करण्याचे ‘स्वातंत्र्य’ दिले, तिला हवे तसे फिरण्याची, कपडे घालण्याची मुभा आहे. तिला आम्ही शिक्षणाची, नोकरीची ‘संधी’ दिली, अशी बढाई’. या मान्यवरांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. ‘तिला स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण?’ जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रच असते. स्वातंत्र्य आणि संधी दिल्याचा आभास असतानाच तिची तारेवरची कसरत सुरू आहे. ‘सुपरवुमन’ बनण्याच्या नादात तीही हे सर्व करते आहे. टीव्हीच्या पडद्यावर मेकअप, भरजरी साडय़ांमध्ये वावरणारी, कारस्थान शिजवणारी वा सोशिकपणा दाखवणारी, दोन मिनिटांचा पदार्थ बनविण्यापासून ते पुरुषांच्या दाढीच्या साहित्याच्या जाहिरातीतही बाई! याला काय म्हणावे? स्वातंत्र्य आणि समानता यांच्या नावाखाली कुणाचे उखळ पांढरे होतेय? अन्याय होतोय याचीच जाणीव जिथे नाही तिथे काय करायचे? आमचे कपडे बदलले, तंत्रज्ञान बदलले; पण स्त्रियांबद्दलची पारंपरिक मानसिकता बदलली का? शालेय वयापासूनच लैंगिक शिक्षण, समुपदेशन, शारीरिक, मानसिक गरजा यावर चर्चा होणे गरजेचे आहे. संकृतीवाद्यांना हे सर्व निषिद्ध. त्यांच्यासाठी योनिशुचिता हे स्त्रीच्या पावित्र्याचे परिमाण! निसर्गनियमाचा भाग असलेल्या कारणासाठीही संचारस्वातंत्र्य गोठवले जाते. राज्यघटनेत सर्वाना समान मूलभूत हक्क दिलेले असताना महिलांचा मंदिरप्रवेश हा प्रसिद्धीचा, राजकारणाचा प्रश्न बनतो. हेच आमचे पुरोगामित्व का? सबलीकरण, सक्षमीकरण हे शब्दखेळ कित्येक पंचवार्षकिपासून चालूच आहेत; पण महिला अत्याचाराच्या घटनांची तीव्रता कमी झाली का? मुलींचा जन्मदर घटलाय. एकीकडे स्त्री-पुरुष समानता धोरण तर दुसरीकडे महिला आरक्षण विधेयक ताटकळत ठेवलेय. राजकारणात जिथे महिलांना आरक्षण दिलेय तिथेही पुरुषांचीच लुडबुड! ‘सरपंचपती’ हे नवीनच पद ग्रामीण राजकारणात निर्माण झालेय. नतिकतेचा बुरखा पांघरलेल्या समाजात काय घडतेय? चमत्कारी बाबा, बापू जेलची हवा खातात. पोट भरण्यासाठी इथे शरीराचा बाजार मांडावा लागतो. कुठल्या तरी पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून कुणाला पणाला लावले जातेय? मग सरकार कुठल्याही पक्षाचे असो. अचानक केलेल्या चळवळीतून उगवलेले पुढारी, समाजकार्य करणारे आदींची वर्णी एखाद्या पदावर लागून जाते. आम्ही ज्यांना आमचे प्रतिनिधी म्हणून निवडतो ते काय करतात? जनतेचे प्रश्न सोडवणे दूरच; पण अधिवेशन काळात गदारोळ, झोपा, एकमेकांवरील चिखलफेक आणि मोबाइलवरील अतिमहत्त्वाच्या(!) चेतनामय चित्रफिती पाहण्यात यांचा वेळ जातोय आणि जनतेचा कष्टाचा पसा! आपले काळे उद्योग झाकण्यासाठी आजही म. गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या नावाने जातीचे राजकारण, असभ्य शक्तिप्रदर्शन करण्यात आम्ही धन्यता मानतो. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण निर्माण केलेले ‘आदर्श’ हे भलतेच उच्च दर्जाचे! इतरांच्या पुण्याईवर वाढणारी बांडगुळे कायदा हाताशी धरून आपला स्वार्थ पूर्ण करतात आणि हिरो ठरतात. समस्यांचा वाढता गुंता आणि उत्तरदायित्वाचा अभाव यातून बाहेर पडण्यासाठी किती काळ नव्या ‘हिरो’ची वाट पाहणार? की ‘अत्त दीप भव’ची वाट चोखळणार?

(केटीएचएम महाविद्यालय, नाशिक)