विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेत विद्यार्थ्यांना ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर मत मांडण्याची संधी देण्यात आली होती. यात मत मांडलेल्या विद्यार्थ्यांपैकी निखिल कुलकर्णी या प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले विचार.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी पक्षांकडून ज्या पद्धतीचे वर्तन सुरू आहे तो विसंगती अलंकाराचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणावे लागेल. एका बाजूला सत्तेत सहभागी व्हायचे, सत्तेचे विविध लाभ मिळवायचे; पण वरकरणी मात्र विरोधी पक्षाची भूमिका घ्यायची, असे वागणे शिवसेनेकडून घडताना दिसते. शिवसेनेच्या या वागणुकीचा ऊहापोह करायचे ठरले तर थोडे मागे जाऊन भाजप-शिवसेना मत्री संबंधापासून याची सुरुवात करावी लागेल. साधारणत: २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या समान धाग्याने हे दोन्ही पक्ष युतीत बांधले गेले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे या युतीचे शिल्पकार. केंद्रात भाजप मोठा भाऊ आणि राज्यात शिवसेना अशा वाटपावर या धुरिणांनी आपआपली कार्यक्षेत्रे आखून घेतली आणि गेली पावशतक भर ती राबवलीदेखील. कालांतराने हे दोन्ही नेते काळाच्या पडद्याआड गेले, शिवसेना-भाजपमध्ये कुशल मध्यस्थी करणारे गोपीनाथ मुंडेही निवर्तले आणि त्यानंतर मात्र दोन्ही पक्षांमधले वाद चव्हाटय़ावर यायला लागले आणि त्याच पर्यवसान युती तुटण्यात झाले.
निमित्त होते ते २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रचारात भाजप आणि मोदी-शहा जोडीवर कठोर टीका केली. निवडणुकीच्या निकालानंतर ६३ जागा मिळाल्या आणि काहीशा उशिरानेच ते भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. विधानसभेवर सेनेचा भगवा फडकवण्याचे स्वप्न भाजपच्या शत-प्रतिशत पुढे भंगले आणि याची सल सेनेने सत्तेत सामील होऊनसुद्धा सातत्याने बाळगली. यासाठी मुखपत्रातून ते सरकारवर टीका करत राहिले तर कधी मोदींची उणीदुणी काढून त्यांनी समाधान मानले, तर कधी फडणवीसांना ‘मार्मिक’ टोले मारण्यात त्यांनी आनंद घेतला. मात्र कोल्हापुरात या सर्व प्रकाराचा कळस उद्धव ठाकरे यांनी केला. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी त्यांनी वक्तृत्वाचा दांडपट्टा असा काही फिरवला की त्यात ते स्वत:च जायबंदी झाले. सध्याच्या म्हणजे भाजप-शिवसेनेच्या संयुक्त सरकारचे काम असमाधानकारक असून जर त्यामुळे लोकांना मागील सरकारच्या कामाची आठवण येत असेल तर सरकार नालायक आहे असे थेट विधान त्यांनी केले. एका अर्थी हे विधान तथ्यहीन आहे, असे म्हणता येत नाही. ज्या आघाडी सरकारच्या नाकत्रेपणाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी भाजप-शिवसेनेला सत्तेच्या सिंहासनावर बसवले त्या पक्षांनी अधिक जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे. विधायक कामे करून लोकांनी टाकलेला विश्वास रास्त आहे हे सिद्ध करायला हवे. या पातळीवर उद्धव यांच्या कानपिचक्या योग्यच ठरतात. परंतु प्रश्न जेव्हा उद्धव आणि शिवसेनेच्या राजकीय स्थानाचा येतो तेव्हा मात्र यातील विसंगती अधिक स्पष्ट होत जाते.
विद्यमान सरकारमध्ये शिवसेनेकडे दळणवळण, उद्योग आणि रोजगार, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती आहेत. त्यांच्या टेकूच्या साहाय्याने सरकारचे कामकाज चालले आहे. अशा वेळी त्या सरकारला नालायक म्हणताना सत्तेची ही अंगे नालायक ठरत नाहीत काय? सरसकटपणे सर्वाना नालायक ठरवताना उद्धव यांनी स्वत:च्याच नेत्यांना देखील कुचकामी आणि अकार्यक्षम ठरविले नाही काय? दुसऱ्या बाजूला या विधानाची राजकीय बाजू समजावून घ्यायला हवी.
युती-आघाडय़ांच्या राजकारणात मित्रपक्षाला महत्त्वाचे स्थान द्यावे लागते हा भारतातीलच नव्हे जगातील सर्वमान्य संकेत. स्वत:च्या ताकदीवर बहुमत मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींना मात्र याची तितकी आवश्यकता वाटत नाही आणि भाजपच्या अध्यक्षांना देशभर ‘शत-प्रतिशत भाजप’ असावे, अशी महत्त्वाकांक्षा आहे. यात दुखावले जाणारे राजकीय पक्ष वेळ पडेल तशी स्वत:ची शक्तीपरीक्षा करत असतात. कधी कधी दबाव गट निर्माण करून राजकीय लाभ आणि महत्त्वाची पदे आपल्या पारडय़ात पाडतात. उद्धव यांचे सरकारला नालायक ठरवण्याचे विधान हे अशाच पद्धतीचे आहे काय? म्हणूनही त्याची चाचपणी करावी लागेल.
गोमांसबंदी, असहिष्णुता, भारतमाता की जयवर ज्या प्रकारे केंद्रातील भाजपवर टीका केली जात आहे अशा वेळी त्यांचा नसíगक मित्र म्हणवणारा पक्ष जेव्हा दुगाण्या झाडायला लागतो तेव्हा नाइलाजास्तव का होईना त्याला महत्त्व द्यावे लागते. उद्धव यांना नेमके हेच साधायचे आहे.
एकीकडे दुष्काळ, दुसऱ्या बाजूला सुशासनाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप आणि हे कमी म्हणून की काय मित्रपक्षाची कठोर टीका या तिहेरी पेचात भाजपला सापडवून त्याचा राजकीय लाभ शिवसेना उठवताना दिसते. विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही दरडींवर एकाच वेळी पाय ठेवून ते राजकीय धोरण पुढे हाकताना दिसतात; मात्र अशा वेळी सरकारला सरसकट नालायक ठरवताना आपणही त्याचा भाग आहोत आणि आपल्या वक्तव्याने पक्षाच्या नेत्यांचा तेजोभंग होऊ शकतो हे भानही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी ठेवायला हवे होते.
रानडे पत्रकारिता आणि संज्ञापन संस्था, पुणे