अम्मा गेल्या, अम्मा चालल्याया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले मत.

कोणत्याही राज्याच्या राजकारणात एखादा प्रादेशिक पक्ष जन्म घेतो तो तेथील जनतेच्या मनात प्रादेशिक अस्मितेची बीजे रोवूनच. अशा पक्षांचा ‘प्रथम’ चेहरा त्याच व्यक्ती बनतात ज्यांना लोकमान्यता असते. ही लोकमान्यता त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या लोककलेतून प्राप्त होते. मग ते व्यंगचित्रातून शिवसेना वाढविणारे बाळासाहेब ठाकरे असोत वा चित्रपटसृष्टीतून जनमनावर गारूड करणारे अण्णा द्रमुकचे संस्थापक रामचंद्रन आणि नंतरच्या जयललिता. तामिळनाडूमधील राजकारण हे १९६७ला काँग्रेसची पाळेमुळे नष्ट झाल्यापासून चित्रपटसृष्टीभोवतीच बव्हंशी फिरलेले आहे. चित्रपटातल्या कथानकाप्रमाणे नट जेव्हा सर्व संकटांचा स्वबळावर सामना करून जनतेला खलनायकाच्या तावडीतून मुक्त करतो. तोच नायक खऱ्याखुऱ्या राजकारणात उतरून वास्तविक आव्हानांनाही यशस्वीपणे पेलू शकतो ही दूधखुळी अपेक्षा करणे हे ‘सुशिक्षित’ तामिळ जनतेच्या राजकीय मागासलेपणाचे द्योतक ठरते. जनतेचा चित्रपटसृष्टीतील याच अतिरिक्त भावनाप्रधानतेमुळे १९८९ मधील तथाकथित द्रमुकच्या ‘द्रौपदी वस्त्रहरण’ प्रकरणामुळे सहानुभूतीची लाट जयललितांच्या पाठीशी येते आणि तामिळनाडूच्या राजकारणात या अभिनेत्रीचा ‘आदिपराशक्ती’ म्हणून उदय होतो. परंतु अशा प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाची दुसरी फळी अनेकवेळा कमकुवतच असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वाभिमानी लोक पक्षाच्या व्यक्तिकेंद्रित निष्ठेमुळे स्वत:ला त्यांच्या दावणीला बांधून घेत नसतात. मग त्या दुसऱ्या फळीत कोण असतात? एकतर पनीरसेल्वम सारखे निष्ठावान ‘चेले’ नाहीतर शशिकला नटराजन सारखे ‘रासपुतीन’ जे पक्षप्रमुखाचा चेहरा वापरून पडद्यामागे आपल्या पोळ्या भाजून घेत असतात. ज्याला संपूर्ण निष्ठा वाहिलेली असते, त्या पक्षाच्या सर्वेसर्वाचा चेहरा जेव्हा गळून पडतो तेव्हा त्या ताकदवान पदावर बसण्यासाठी सुरू होते ते भयंकर राजकारण. तामिळनाडूत नुकत्याच झालेल्या सत्तासंघर्षांच्या घडामोडी इतक्या वेगाने पुढे सरकत होत्या की, सुपरस्टार रजनीकांतलाही त्याच्या चित्रपटात एवढय़ा वेगाचे राजकारण जमले नसते. जयललिता म्हणजेच अम्मांच्या निधनाने जी राजकीय धूळ तामिळनाडूच्या हवेत उडाली, ती स्थिरावण्यास तूर्तास तरी काही काळ लागेल. याचे कारण म्हणजे या वर्षी येणाऱ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका. जयललितांचे निधन, करुणानिधींची वृद्धापकाळामुळे राजकारणातील निष्क्रियता, स्टॅलिनचे प्रभावहीन नेतृत्व यामुळे काँग्रेस आणि भाजप यांसारख्या राष्ट्रीय पक्षांना तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्यास अवकाश निर्माण झाला आहे. त्यात तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम हे भाजपला अनुकूल होते. जयललितांचे कान आणि डोळा राहिलेली चिन्नम्मा म्हणजेच शशिकला यांनी जेव्हा अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच त्यांची पुढील पावले लक्षात आली आणि झालेसुद्धा तसेच. शशिकलांनी पनीरसेल्वमकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागवून स्वत:चे नाव विधायक दलाच्या नेतेपदी पुढे केले. तामिळनाडूच्या राजकारणातील ही शेवटची व्यक्ती दूर सारण्यासाठी भाजपचे पडद्यामागील राजकारण सुरू झाले. त्यामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता आणि शशिकलांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी निर्दोष म्हणून मुक्त केले असता त्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात अचानक एवढी गती कुठून मिळाली? एवढी की  महाधिवक्त्याने आठवडय़ाभराची मुदत नक्की केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी निकाल ‘लावला’ गेला. दुसरीकडे शशिकलांचा शपथविधी प्रभारी राज्यपाल विद्यासागरराव यांच्या अनुपस्थितीमुळे संपन्न नाही झाला. राज्यपालांचे मुंबईतून चेन्नईला न जाणे हा विचार करण्यास लावणारा प्रश्न आहे. या नाटय़मय घडामोडींमध्ये शशिकलांचा शपथविधी सोहळा रद्द झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवण्यापूर्वी; यादरम्यानच्या काळात राजीनामा दिलेले पनीरसेल्वम यांनी शशिकलांनी आपल्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडले असे आरोप करून बंडाचे हत्यार उपसले. हे सूतोवाच करण्यापूर्वी त्यांनी जयललितांच्या समाधीस्थळापुढे जवळपास ४० मिनिटे ध्यान केले. पुढे ते सांगतात की त्या काळात त्यांनी जयललितांच्या आत्म्याशी संवाद साधला आणि अम्मांनी त्यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचा आदेश दिला (तामिळनाडूत भावनेला असलेले महत्त्व इथे अधोरेखित होते.). शिवाय ते शशिकलांवर असा पण आरोप करतात की, त्यांनी आमदारांची बठक आपल्याला कोणतीही सूचना न देता बोलावली. त्याचा पुरावा हा पनीरसेल्वम यांच्या राजीनामापत्रात सापडतो. त्यामध्ये पनीरसेल्वम यांनी केलेल्या सहीची वेळ ही दुपारची १:४१ अशी होती म्हणजेच आमदारांच्या बठकीपूर्वीची. पनीरसेल्वमच्या या बंडानंतर सरचिटणीसपदी असलेल्या शशिकलांनी त्यांना पक्षाच्या कोषाध्यक्षपदावरून हटवले आणि परिणामत: अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडली. पक्षाचे आमदार आणि खासदार हे शशिकलांच्या बाजूने तर सामान्य कार्यकत्रे आणि स्थानिक नेते पनीरसेल्वम यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. पळवापळवीचा खेळ टाळण्यासाठी शशिकलांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना अज्ञात अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप पनीरसेल्वम करतात. होत असलेल्या घटनांचा पुरेपूर फायदा उठवीत भाजपने अचूकवेळी डाव टाकला आणि शशिकला २१ वर्षांपूर्वीच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पुन्हा दोषी ठरल्या. पुढील १० वष्रे निवडणुकींवरील बंदी आणि शिल्लक राहिलेले ४ वष्रे कारावास हे शिक्षेचं स्वरूप. मात्र जाता जाता त्यांनी पक्षावरील आपली पकड पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करून मजबूत केली. शशिकलांनी त्यांचे दोन पुतणे ज्यांची जयललितांनी पक्षातून हकालपट्टी केली होती त्यांना परत बोलावून त्यापकी एकाला यापुढे महत्त्वाचे होणारे उपसरचिटणीसपद देऊ केले. ज्याप्रमाणे अम्मांचे ‘चेले’ पनीरसेल्वम अगदी त्याचप्रमाणे चिन्नम्माचे ‘चेले’ पलानीस्वामी हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांच्याकडून प्रभावी कारभाराची आशा करणे म्हणजे लंगडय़ाकडे पाय मागण्यासारखे झाले. व्यक्ती पक्षासाठी का पक्ष व्यक्तीसाठी (तेसुद्धा अननुभवी) याचा विचार करण्याची सद्बुद्धी अण्णाद्रमुकच्या आमदारांना लाभो. शहाजहाननंतर दारा शुकोह (चांगला) आणि औरंगझेब (वाईट) मध्ये सम्राटपदासाठी झालेला सत्तासंघर्ष हे उदाहरण म्हणून देता येईल; परंतु काळानुसार व्यवस्थेत बदल होऊन लोकशाही आली. आता चांगलं कोण आणि वाईट कोण हे जनताच ठरवते आणि सत्तास्थानी बसवतेसुद्धा. पण त्यासाठी लागते ती भावना आणि बुद्धी यांना तराजूच्या दोन्ही पारडय़ात समान पेलण्याची विवेकता!!!

(शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालय, डोंबिवली)