‘गहिरी हवा’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

buldhana, Tractor Crushes Kotwal , Trying to Stop Illegal Sand Transportation, sangrampur taluka, illegal sand Transportation, marathi news,
बुलढाणा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

२०१६च्या पूर्वसंध्येला संपूर्ण जग जेव्हा नववर्षांच्या स्वागतासाठी आतुर झालेले होते आणि ती घटका काही तासांवरच येऊन ठेपलेली होती, त्याच वेळेस सर्वशक्तिमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे एका जगद्व्याप्त दूरचित्रवाहिनीने प्रकाशित केलेल्या एका कार्यक्रमात अलास्का या अमेरिकेच्या उत्तर टोकाला असलेल्या जागतिक वारसास्थळावर वेळात वेळ काढून जातीने हजर होते. या कार्यक्रमात ते अलास्का या बर्फाच्छादित प्रदेशातील गेल्या काही वर्षांत वितळलेल्या आणि झपाटय़ाने वितळत चाललेल्या हिमनगांची आणि पर्यायाने वाढत्या जागतिक तापमानाची माहिती जनतेला देत होते आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने त्या घटनेचे गांभीर्य समजावून सांगत होते. पंतप्रधान मोदींचे जवानांसोबत दिवाळी साजरी करणे असो किंवा ओबामांचे तेथे जाणे, या प्रसंगातून जो संदेश जनमानसात जातो तो महत्त्वाचा असतो. ‘भविष्याचा उचित वेध घेऊन येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टी आपल्या नागरिकांच्या अस्तित्वावर आणि गरजांवर टाच आणू शकतात, याचा मागोवा घेऊन त्यावर त्वरित उपाय शोधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात जागतिक महासत्तेचा हात कोणीही धरू शकत नाही.’ एके काळी तेलाच्या बाबतीत बऱ्याच अंशी परावलंबी असलेली अमेरिका आज पूर्णपणे स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण अमेरिकनांचा हाच स्थायिभाव आहे; पण आपल्यासाठी चिंतेची बाब ही आहे की, खालावलेल्या पर्यावरणाची झळ ही आता अमेरिकनांपुरती मर्यादित असणार नाही. ती समस्त जागतिक समुदायासमोर उभी ठाकली आहे. आताही सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांचा प्रदूषणाचा इतिहास असलेली अमेरिका आणि इतर युरोपीय राष्ट्रे, इतकेच काय ‘जगाची उत्पादनाची राजधानी’ असलेला आणि आपल्यापेक्षा कित्येक पटीने अधिक औद्योगिक उत्पादन घेणारा चीन हा आशियाई देश या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ताकदीने मदानात उतरले आहेत; पण खेदाची बाब ही आहे की, या सर्व पाश्र्वभूमीवर आपल्या आघाडीवर मात्र प्रचंड बेफिकीर वृत्ती आणि निर्ढावलेपणा पाहावयास मिळतो. याचा पहिला तडाखा आपल्याला राजधानी दिल्लीने दिला आहे. मागील काही वर्षांपासून दिल्लीतील हवा ही श्वसनासाठी अतिशय घातक अवस्थेत पोहोचली आहे. आजघडीला बेसुमार वाहनांबरोबरच दिवाळीतील फटाक्यांच्या अतिरिक्त धुराने आणि दिल्लीच्या शेजारील राज्यांच्या शेतातील टाकाऊ जळणाने प्रदूषणात अधिकच भर घातली आहे. त्यामुळे हवेचा दर्जा इतका खालावलेला आहे की, दिल्लीतील १८०० शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे. अशी अवस्था यापूर्वी कधीही ओढावलेली नाही. २०१५ मधील ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार जगभरातील १६०० शहरांमधून दिल्लीच्या हवेतील घट २.५ चे प्रमाण हे सर्वाधिक होते. एका घनफुटात या सूक्ष्मकणांची संख्या ही १०० माइक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे अपेक्षित असते, मात्र दिल्लीत ही संख्या १५०-२०० च्या वर पोहोचली आहे. हे सूक्ष्मकण मानवी केसाच्या तुलनेत २५ ते १०० पट पातळ असतात जे श्वसनाद्वारे सहजरीत्या फुप्फुसात जाऊन त्यासंबंधित आजारांना तसेच दमा इ. गंभीर रोगांना आमंत्रण देऊ शकतात. आजघडीला दिल्लीत दरवर्षी सुमारे दहा हजार लोक प्रदूषणाने गंभीर आजारांची लागण होऊन मृत्युमुखी पडत आहेत. ही गोष्ट आपल्यासारख्या देशासाठी चिंताजनक आहे. पर्यावरणाच्या व्यापक परिघात मनुष्यप्राण्यासोबत हवा, पाणी, नद्या-नाले, पर्वत, महासागर, झाडेझुडपे, पशू-पक्षी, कीटक, जंगले इत्यादी सर्वाचा अंतर्भाव होतो. जसजसा मानव पर्यावरणातील या इतर घटकांवर अतिक्रमण करत चालला आहे तसतसा तो डाव त्याच्यावरच उलटत चालल्याचे पाहायला मिळत आहे. जैवविविधतेवर घाला घालण्याचे दृश्य परिणाम वाढत्या नसíगक आपत्तींनी तसेच बदलत्या ऋतुचक्राने, दिवसेंदिवस बकाल होत जाणाऱ्या शहरांनी, पराकोटीच्या अशुद्ध हवेच्या रूपाने जाणवत आहेतच. मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सर्जति करून हवेला दूषित करण्यात उद्योगधंद्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यापाठोपाठ वाहनांचा क्रमांक लागतो. त्यामुळे यापुढील काळात उद्योग अधिक पर्यावरणपूरक करून कमीत कमी प्रदूषण कसे होईल यावर भर देणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी उद्योगधंद्यांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा शक्य असेल तेवढा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. ऊर्जेच्या पर्यायी स्रोत उपलब्धतेवर आपल्याला मर्यादा असल्याने जीवाश्म इंधनाच्या वापराला पूर्णत: अशक्य आहे. आजही ग्रामीण भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही अन्न शिजवण्यासाठी जळणाला लाकूडफाटा वापरते. ती त्यांची अपरिहार्यता आहे. त्यातून हवेच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात भर पडते. त्या अनुषंगाने मोदी सरकारची ‘गिव्ह इट अप’ ही योजना कौतुकास्पद आहे. एकदमच संपूर्ण ग्रामीण लोकसंख्येला लाकूडफाटा वापरण्यापासून परावृत्त करणे शक्य नसले तरी त्या दृष्टीने पावले टाकली गेली पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘मी एकटय़ाने केल्याने कितीसा फरक पडणार आहे?’ या खास भारतीय दृष्टिकोनाला तिलांजली दिली गेली पाहिजे. सरकारनेही वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दूरगामी उपाययोजना करण्यासाठी आणि दिल्लीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने सरकारच्या नावाने बोटे मोडून स्वत:ची जबाबदारी झिडकारून चालणार नाही. प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काही साध्या सोप्या गोष्टींचे पालन करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हातभार लावू शकतो. त्यासाठी शक्य असेल तेवढा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणे, विकसित देशांप्रमाणे पदपथ संस्कृती विकसित करून जाणीवपूर्वक त्याचा वापर करणे, शक्य तेवढा वाहनांचा वापर कमी करणे, सीएनजी वाहनांना प्राधान्य देणे, वृक्षारोपणावर भर देणे इ. गोष्टी प्रत्येक जण करू शकतो. दिल्लीपाठोपाठ देशातील इतर महानगरेही त्याच दिशेने वेगाने घोडदौड करीत आहेत. तेव्हा संपूर्ण देशात पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती झाली पाहिजे. सुयोग्य ध्येयधोरणे आखून त्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. अन्यथा दिल्ली ही ‘प्रदूषणाची राजधानी’ होण्याचा धोका संभवतो, जे आपल्यासाठी निश्चितच भूषणावह नाही.

(जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग कॉलेज औरंगाबाद)