News Flash

भूतदयेच्या संस्कृतीशी फारकत का?

जनावरे फस्त करण्यापासून ते माणसांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

‘लिमिटेड’ माणुसकी या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की.. जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे! माणूस आणि माणुसकी यात फक्त ‘की’चा फरक आहे. पण ‘की’चा केवढा फरक आहे याचा विचार करायला हवा. ‘की’चा अर्थ म्हणजे प्रेम, जाणीव, केलेली कदर, आदर, नि:स्वार्थपणे केलेला मदतीचा हात. यालाच माणुसकी म्हणतात. समाजात माणूस आणि माणसांमधील माणुसकी यांच्यामधला दुवा साधण्यात ज्याला यश मिळाले तोच खरा माणुसकीवाला ही साधी व्याख्या माणुसकीची होय. तात्पर्य काय तर माणुसकी हाच खरा धर्म! परंतु पुण्यातील एक हृदयद्रावक घटना ती म्हणजे अतिशय निर्घृणपणे चार मुक्या श्वानांना जिवंत पेटवून देण्यात आले त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला आणि १६ श्वानांना विष देऊन तडफडून मारण्यात आले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना अगदी निषेधार्ह आहे. भारतीय संस्कृतीत अशी घटना आणि त्यात टिळकांच्या पुण्यात घडली म्हणजे ती सर्व पुणेकरांसाठी अगदी कलंक ठरावी. सावंतवाडी जिल्ह्यात दोन गवे विहिरीत पडले; एकाच मृत्यू झाला, दुसऱ्याला वाचवण्यात यश आले. काही दिवस बिबटय़ांचा नगर जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. जनावरे फस्त करण्यापासून ते माणसांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसरात गेल्या वर्षी अस्वलांच्या हल्ल्यांनी नागरिक हैराण झाले होते. त्या जखमा भरण्याआधी पुन्हा एकदा अस्वलांचा हैदोस तेथे जाणवू लागला आहे. आणि पुण्यातीलही संतापजनक घटना. गेल्या काही दिवसांतील प्राणिजगतातील संबंधित या घटना. श्वापद आणि माणूस यांच्यातील संबंधातील ताणेबाणे स्पष्ट करणाऱ्या. माणसांमध्येही क्रूरतेची भावना निर्माण तरी होते कशी? याला जबाबदार कोण? मानसिकदृष्टय़ा मनुष्य या भटक्या प्राण्यांविषयी जास्त आक्रमक होतो आहे. कारण त्याला त्याविषयी कशाची भीती वाटत नाही. फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर झालेला एक विचित्र अपघातात बसखाली सापडलेल्या दोघांना वाचविण्यासाठी पुणेकरांनी सामूहिक प्रयत्न करत बस उचलून धरली.. ज्या पुणेकरांनी त्या दोघांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचविले ते या मुक्या प्राण्यांसाठी एकत्र येतील का? का मुक्या प्राण्यांना वेगळा न्याय आणि बोलक्या प्राण्यांसाठी (मानव) वेगळा न्याय असा मानसिकदृष्टय़ा दुजाभाव तयार केला आहे. माणूस हा एक विलक्षण प्राणी आहे. अशा घटनांबाबत एक मत मात्र सामान आढळते की दगडाचे हृदय असलेली व्यक्ती एक तर समाजविघातक व्यक्तिमत्त्वाची असेल किंवा माथेफिरू असेल. याचा अर्थ त्यांच्या वागण्यात नियम धुडकावून लावण्याचाच शिरस्ता (उदा. चोरी करणे, फसवणूक करणे इ.) दिसून येतो किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्वचं मूलभूत भावनांचा अभाव असलेले, सभोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्यात असमर्थ असलेले आणि संकटाची किंवा शिक्षेची तमा न बाळगणारे असते. अशा व्यक्तींना सहानुभूती कळत नसते. आणि एखाद्या गोष्टीला त्वरित, अविचाराने दिलेल्या प्रत्युत्तरासारखी त्यांची कृती असते. त्यामुळे एखाद्या मुक्या प्राण्याला जिवंत जाळण्यात कसलीच भावना या माणसांमध्ये नसते. ते फक्त त्या कृत्याचा आनंद घेत असतात. काही संशोधकांच्या मते लहानपणी झालेले दुर्लक्ष्य, शारीरिक व मानसिक अत्याचार किंवा एखादी गंभीर स्वरूपाची फसवणूक यामुळे अस्थिर मनोवृत्तीच्या व्यक्ती पुढे असे क्रूर कृत्य करण्यास धजावतात. माणूस हा मूलत: आक्रमक प्रवृत्तीचा आहे, पण भावनांवर ताबा ठेवण्याचीही आपल्यात क्षमता आहे. मनावर संयम मिळवण्याच्या अशा अनेक पद्धती आहेत. तर ही एक माणसाची मानसिक संकल्पना होती. त्यामधूनच अशा संतापजनक घटना घडत आहेत. एकीकडे गोरक्षक म्हणून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे गोरक्षक म्हणून गुन्हे करायचे. आणि ज्या गोमाता रस्त्याने विव्हळत आपले जीवन जगत असतात त्याकडे कोण्या गोरक्षकाचे लक्ष नसते. म्हणूनच की काय या भटक्या कुत्र्यांकडे कोणाचे लक्ष नसते आणि म्हणून त्याला मारण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे ही मानसिकता प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे दिसला कुत्रा की मार दगड. कारण विचारणारा कोण नाही ना का मारले म्हणून? ना कोणाचे लक्ष नसते असल्या क्षुल्लक गोष्टींकडे. या भटक्या श्वानांचा मानवी वस्तीतील वाढत वावर ही आजकाल चिंतेचा विषय बनला आहे. आणि त्यातून श्वान आणि मानव यांच्यामधील वाढणारा संघर्ष हा नव्या समस्या जन्माला घालतो आहे. खरे तर या श्वापदांना मानवी वस्तीपासून दूर राहता यावे आणि तिथे त्यांची निकोप वाढ व्हावी व जंगलातील जैवसाखळी अबाधित राहावी याकडे लक्ष दिले पाहिजे. या भटक्या श्वापदांच्या वावरासाठी ‘सेफ कॉरिडॉर’ निर्धोक राखणेही गरजेचे आहे. आणि या भटक्या श्वानांचा धुमाकूळ व संख्या याला आळा घालायचा असेल तर त्यांचे संततिनियमन करणे हाच मार्ग आहे. त्यांना पेट्रोल टाकून जाळणे व जेवणात विष कालवून देणे हे अतिशय घृणास्पद व संतापजनक आहे. गेल्या काही वर्षांत सरकारच्या प्रयत्नातून वन्यजीवांची आश्रयस्थाने वाढली आहेत. विशेषत: वाघ, बिबटे, हरणे, काळवीट, गवे, मोर अशा अनेकविध वन्यजीवांची संख्या नजरेत भरणे एवढी वाढली आहे. हे चित्र एका बाजूला समाधानाचे असले तरी अर्निबध नागरीकरणातून अनेक प्रश्न तयार होत आहेत. त्यांचा सामना करताना जंगली श्वानांच्या जगण्यावरच काही ठिकाणी अतिक्रमण होताना दिसत आहे. त्यातूनही संघर्षांच्या काही घटना समोर येत आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणणारी आणि त्यानुसार आचरण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. प्रश्न समोर आहेत म्हणून त्या संस्कृतीशीच फारकत घेण्याची गरज नाही.

(डी. वाय. पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय, आकुर्डी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 1:58 am

Web Title: loksatta blog benchers winner opinion loksatta campus katta 5
Next Stories
1 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘आले राजे, गेले राजे’
2 ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘लिमिटेड माणुसकी’
3 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘मी आणि माझे’
Just Now!
X