‘लेकुरे उदंड जाली’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु अवघ्या सहा वर्षांत आपण चीनला मागे टाकणार आहोत, याच गतीने लोकसंख्या वाढत राहिली तर २०२२ला भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र बनेल. सध्या अमेरिकेची सरासरी लोकसंख्या घनता प्रति चौरस किमी ३५ आहे. सध्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनची घनता प्रतिचौरस किमी १४६ आहे, तर भारताची लोकसंख्या घनता प्रति चौरस किमीला ४४१ आहे. एकीकडे अमाप लोकसंख्या वाढ सुरू असताना दुसरीकडे संसाधनांचा तुटवडा आहे. भारतातील ३५ टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली आहे. एकंदरीतच अशा सर्व परिस्थितीत सतत राष्ट्रवादाची(?) शिकवण देणाऱ्या रा. स्व. संघाच्या प्रमुखांना किंवा इतर सर्व रा. स्व. संघियांना जर खरंच राष्ट्राची उन्नती अभिप्रेत असेल तर त्यांनी विशिष्ट धर्मीयांना इतर धर्मीयांचा खोटे भय दाखवून चार चार अपत्य जन्माला घालण्याचे सल्ले देण्याऐवजी समग्र राष्ट्राची लोकसंख्या कशी नियंत्रणात आणता येईल यावर मंथन आवश्यक आहे. २००१ मध्ये मुस्लीम लोकसंख्या १३.४ टक्के होती, ती २०११ ला १४.२३ टक्के झाली. म्हणजेच ०.८ टक्क्यांनी वाढली. तर हिंदूंची लोकसंख्या २००१ ला ८०.५ टक्के होती, ती २०११ला ७९.८ टक्के झाली. म्हणजेच ०.७ टक्क्यांनी कमी झाली. तर ख्रिश्चन आणि जैन धर्मीयांच्या लोकसंख्येत कसलाही बदल झाला नसून ती अनुक्रमे २.३ आणि ०.४ टक्के एवढी आहे. तर शीख व बौद्धांच्या लोकसंख्येत अनुक्रमे ०.१८ आणि ०.१ टक्के इतकी घट झाली आहे. टक्केवारीनुसार मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ आणि हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. परंतु हिंदू व मुस्लीम दोघांच्याही लोकसंख्या वृद्धी दरात घट झाली आहे. २०११ला हिंदू व मुस्लीम यांचा वृद्धी दर अनुक्रमे १९.९२ टक्के व २९.५२ टक्के होता, तर २०११ मध्ये तो घटून अनुक्रमे १६.७ आणि २४.६ टक्के एवढा झाला. अर्थात २००१च्या तुलनेत २०११ला हिंदूंचा वृद्धी दर ३.१६ टक्क्यांनी तर मुस्लिमांचा ४.९२ टक्क्यांनी घटला. म्हणजेच हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या वृद्धी दरात घट झाली; परंतु राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्या गेलेल्या अनेक सर्वेक्षणानुसार ही बाब सिद्ध झाली आहे, की लोकसंख्यावाढीचा संबंध गरिबी आणि शिक्षणाशी आहे, त्यातल्या त्यात महिलांच्या शिक्षित असण्याशी जास्त आहे. ज्या ठिकाणी गरिबी आहे आणि शिक्षण, साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, तेथील लोकसंख्यावाढ अनियंत्रित आहे आणि जेथे गरिबीचे प्रमाण कमी आणि शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे तेथील लोकसंख्या नियंत्रणात आहे.

सच्चर आयोगाच्या अहवालानुसार भारतातील ३१ टक्के मुस्लीम दारिद्रय़रेषेच्या खाली आहेत. ‘पीईडब्ल्यू’ नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतातील मुस्लिमांची सरासरी दरडोई ३२.५ रुपये प्रतिदिन आहे तर हिंदूंचे ३७.५ रुपये प्रतिदिन आहे. भारतात सर्वाधिक सरसरी दरडोई उत्पन्न शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांचे आहे, ते अनुक्रमे ५५.५ रुपये प्रतिदिन व ५१.४ रुपये प्रतिदिन इतके आहे. सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या शीख आणि ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या नियंत्रित आहे, त्यांचा वृद्धी दर, प्रजनन दरही मुस्लीम व हिंदूंपेक्षा कमी आहे. २००१च्या जनगणनेनुसार मुस्लिमांचा साक्षरता दर ५९.१ तर मुस्लीम महिलांचा साक्षरता दर ५०.१ टक्के आहे. हिंदूंचा साक्षरता दर ६५.१ तर हिंदू महिलांचा ५३.२ टक्के इतका आहे. ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन यांचा साक्षरता दर अनुक्रमे ८०.३ टक्के,  ६९.४ टक्के, ७३ टक्के, ९४ टक्के आहे. ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन धर्मीय बांधवांची लोकसंख्या हिंदू व मुस्लीम बांधवांच्या तुलनेत नियंत्रित आहे. त्यांचा वृद्धी दर व प्रजनन दर हिंदू व मुस्लिमांच्या तुलनेत कमी आहे. आíथक व सामाजिकदृष्टय़ा विकसित समजल्या जाणाऱ्या आणि २०११च्या जनगणनेनुसार तब्बल ९४ टक्के साक्षरता दर असलेल्या केरळ राज्यात लोकसंख्या वृद्धी दर केवळ ४.९ टक्के आहे. तर आíथक व सामाजिकदृष्टय़ा मागास समजल्या जाणाऱ्या आणि २०११च्या जनगणनेनुसार ६९ टक्के साक्षरता दर असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात लोकसंख्या वृद्धी दर तब्बल २०.२३ टक्के आहे. केरळमध्ये मुस्लीम लोकसंख्या २६.५६ टक्के, हिंदू लोकसंख्या ५७ टक्के आहे. तर उत्तर प्रदेशात मुस्लीम लोकसंख्या १९ टक्के, हिंदू लोकसंख्या ७८.५ टक्के आहे. भारतातील या दोन राज्यांच्या उदहरणांवरून स्पष्ट होते की, लोकसंख्यावाढीचा धर्माशी संबंध नसून त्याचा थेट संबंध गरिबी आणि शिक्षणाशी आहे. मुस्लिमांमध्ये बहुपत्नीकत्वाला मान्यता आहे, ते चार चार लग्न करतात, म्हणून त्यांची लोकसंख्या वाढते. इत्यादी खोडसाळ प्रचार संघ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने केला जातो. परंतु यात दखल घेण्यासारखी बाब म्हणजे मुस्लीम समाजात एक हजार मुलांच्या  मागे ९३३ एवढे मुलींचे प्रमाण आहे. म्हणजे जर कोणी मुस्लीम व्यक्ती चार लग्न करत असेल तर नक्कीच इतर तीन मुलांना अविवाहित राहावे लागत असेल. तसेच ‘लव जिहाद’चा खोडसाळ प्रचार हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातो. परंतु फक्त २.१ टक्के आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांचे लग्न झाले आहे, म्हणून याचा संबंध लोकसंख्यावाढीशी लावणे म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. वरील सर्व गोष्टींवरून हे सिद्ध होते की रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचे विधान अत्यंत चुकीचे आणि तथ्यहीन आहे. संघाला बहुसंख्य हिंदूंच्या मनात मुस्लीमद्वेष भरून राजकारण करायचे आहे, यापासून हिंदू व मुस्लीम दोघांनीही सावध राहायला हवे.
मुकुल निकाळजे 

(जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद)