‘कासरा सुटला.’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

विश्वजित दत्तात्रय आंधळे

chart

असंस्कृत.! असंवेदनशील.!! असंसदीय.!!! आशियाई लोक रानटी पशू आहेत, हे उद्गार राज्यशास्त्राचे जनक, प्लेटोचा शिष्य आणि सिकंदरचा गुरू अ‍ॅरिस्टॉटलचे आहेत. या विधानाच्या स्मरणाचे कारण म्हणजे ‘जलिकट्ट’ या खेळाला.. बलांच्या छळाला.. संस्कृतिरक्षकांचे उन्मादी आंदोलन. तसे तर आंदोलन या देशात एक फॅशन झाली आहे आणि ‘राजकारण’ विनाभांडवली धंदा. कधीही.. कोणीही.. कोणत्याही विषयावर चार लोकं जमा करावीत.. त्यांच्या हातात झेंडे.. तोंडात घोषणा.. अन् मनात कधी धर्म, कधी जात, कधी आरक्षण, कधी प्रांत, तर कधी संस्कृती कोंबावी आणि फार मोठय़ा आंदोलनाची फुशारकी मिरवावी हे नित्याचेच. आंदोलन कशासाठी करावे आणि कसे करावे हा आता ज्याच्या-त्याच्या सोयीचा सवाल झाला आहे. नखे वाढणे ही माणसाच्या पशुत्वाची निशाणी आहे, असे प्रसिद्ध व्यंगकार हजारीप्रसाद द्विवेदी म्हणतात, जलिकट्ट प्रेमावरून हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. तसेच विद्यमान सरकारने झुकेन, पण मोडणार नाही हा इतिहास पुन्हा सिद्ध केला आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी १९० प्रवासी असलेले आयसी ८१४  इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करून दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अजहर, मुश्ताक अजहर, ओमर शहीद शेख यांची जम्मू-कश्मीरच्या तुरुंगातून सुटका करवून घेतली आणि भारतीय सरकारला झुकण्याची सवय लावली! विद्यमान सरकार गर्दीपुढे झुकले आणि बलाच्या छळाला.. जलिकट्ट खेळाला संस्कृतीच्या नावाखाली ‘मोकळीक’ दिली, हे या देशाच्या राजकारणाचे आणि जमावाचे दुर्दैव. भारतीय राजकारण कोणत्या दिशेने वाहत जात आहे, यावर विचार होणे गरजेचे आहे; अन्यथा चांगले विचार आणि चांगले खेळ बदलायला वेळ लागणार नाही. ‘लोकशाही शासनव्यवस्थेत राजकीय पक्ष अपरिहार्य असतात’ हे एडमंड बर्क यांचे हे उद्गार अगदी योग्य आहेत; पण प्रादेशिक पक्ष भारतीय लोकशाहीला लागलेला ‘भिरूड’ (कीड) आहे. प्रादेशिक पक्ष क्षुद्र राजकारणासाठी आपल्या सिद्धांतांचा, विचारांचा सहज बळी देतात. या देशाला बहुविध संस्कृती आहे, चांगल्या-वाईट गोष्टी त्यात आहेत; पण प्राणीही योग्य-अयोग्य उत्तम रीतीने ओळखतात. बलाने कधी दावे तोडले, तर मालकाच्याच घरी जातो; पण या मालकाला मात्र बलाचं मन कधी कळणार? प्रादेशिक पक्ष व्यक्तिपूजा, वैयक्तिक चमत्कार या सर्व बाबींना महत्त्व देते. त्या नेत्यांच्या शिव्यांमध्येही लोक आशीर्वाद शोधायला लागतात.. शिव्या.. अभद्र आणि कमरेखालच्या संवादावर टाळ्या.. प्रचंड प्रतिसाद ही आपली लोकशाही आणि देशाची जनता, अजून पशुता त्यांच्या मनातील मेलीच नाही. जलिकट्टवरील बंदी मागे घेण्यासाठी अध्यादेश काढणे म्हणजे चेन्नईच्या मरिना किनाऱ्यावरील गर्दीला शरण जाणे आणि स्वत:च्याच हाताने स्वत: नग्न होणे यासारखेच सरकारचे हे धोरण. अम्मा असत्या तर काय झाले असते कुणास ठाऊक; पण त्यांच्या पश्चात पक्षात ‘काळंबेरं’ सुरू आहे आणि म्हणूनच भावनेच्या मुद्दय़ांचे राजकारण करण्याची संधी ‘पुढारी’ कसे सोडतील. जलिकट्ट आंदोलनाला विरोध करण्याचे धाडस भल्याभल्यांनी केले नाही; छप्पन इंची छातीनेसुद्धा!! किती दुर्दैव!! एखाद्या देशात ‘बल’ही राजकारण करतात, हे जर अब्राहम िलकनला थोडाही संशय आला असता तर आज ‘लोकशाही म्हणजे.. बलांनी.. बलांसाठी.. बलांकडून चालवलेले राज्य’ अशी व्याख्या करून ठेवली असती.

 

प्रादेशिक पक्ष आपले पितळ उघडे पडू नये, लोकप्रियता घटू नये म्हणून भावनेच्या लाटेवर जनसामान्यांना आणि सुसंस्कृत नागरिकांनाही संस्कृतीचे गाजर दाखवून झुलवत ठेवतात. व्यवस्थापन व्हावे, पण विधायक बाबींचे, विघातक नव्हे! पण जलिकट्ट खेळात मात्र समाजभान आणि लोकशाहीचे ज्ञान नसणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन केले. गर्दीच्या उन्मादाचे व्यवस्थापन केले आणि अजून माणूस ‘बल’ (पशू) आहे हे पुन्हा सिद्ध केले. जनतेला लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहेच; पण आंदोलन कशासाठी आणि कोणत्या मार्गाने करावे यावरून त्या जनतेचे लोकशाही प्रौढत्व सिद्ध होते. ६७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करूनही फक्त जनतेलाच (गर्दीला) नव्हे तर या देशातील पुढाऱ्यांनादेखील लोकशाही आणि लोकशाहीचे मार्ग सापडू नयेत हे दुर्दैव. स्वत:ला प्रगत आणि बुद्धिमान समजणाऱ्या मनुष्याने एखाद्या क्रूर खेळाचे समर्थन रस्त्यावर येऊन करावे आणि स्वार्थी राजकारणापोटी अध्यादेश काढून त्या खेळाला पािठबा द्यावा या दोन्ही बाबी मनुष्य बुद्धिमान आहे, हा समज गरसमज आहे हेच सिद्ध करतील आणि बलाच्या या खेळाच्या आग्रहासाठी जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राचा हा मार्ग असंस्कृत! असंवेदनशील!! आणि असंसदीय!!! आहे.

(वैजनाथ महाविद्यालय, परळी)