राफेलवर संरक्षणमंत्र्यांचं उत्तर झालं. त्यावर राहुल यांचे आक्षेप झाले. त्यालाही सीतारामन यांनी उत्तर दिलं. राफेलवरील चर्चा संपली. लोकसभेत सदस्यसंख्या कमी होती, पण बहुतांश सदस्य सकाळी ११ वाजल्यापासून बसलेले होते. तांत्रिक आणि आर्थिक संदर्भ असलेला गुंतागुंतीचा विषय. त्यावर सरकारचं सखोल मुद्दय़ांसह स्पष्टीकरण. ही सगळी बोजड चर्चा ऐकून थकलेले सदस्य हळूहळू बाहेर पडू लागले होते. सीतारामन यांच्या उत्तरावेळी लालकृष्ण अडवाणी सभागृहात येऊन बसले होते. नेहमीप्रमाणं त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं. चर्चा संपताना त्यांना काही तरी बोलायचं होतं. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडं बघून हात वर केला आणि मलाही बोलू द्या अशी विनंती केली. आताशा अडवाणी सभागृहात फार वेळ कमी असतात. केंद्र सरकारच्या वतीने त्यांना बोलू दिलं जात नाही. लोकसभेचे सदस्य म्हणूनही ते बोलत नाहीत, पण राफेलच्या निमित्ताने त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. खरं तर ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी! अडवाणींनी हात वर केलेला भाजपच्या वरिष्ठ सदस्यांनी पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. भुवया उंचावल्या. अडवाणींच्या मागच्या बाकावर नेहमीच आविर्भावात वावरणारे मुख्य प्रतोद अनुराग ठाकूर होते. त्यांनी ‘नको नको’ असे हातवारे करायला सुरुवात केली. अडवाणींना बोलू दिलं जाऊ नये याची ते दक्षता घेत असावेत. अडवाणींच्या शेजारी विधिमंत्री रविशंकर प्रसाद बसलेले होते. तेही अडवाणींना आता बोलू नका असं समजावताना दिसत होते. राफेलवरील चर्चा संपल्यानं लोकसभा अध्यक्षही कामकाजातील पुढच्या विषयाकडं वळल्या. अखेर अडवाणींचं बोलणं राहून गेलं. मग, ना त्यांनी कोणाकडं बघितलं, ना ते कोणीशी बोलले. ते एकटेच बसून राहिले.

जेसीबी, जानवं, गांधी, गोडसे..

विषय कुठलाही असो, संसद सदस्य सभागृहात स्वतला हवं तेच बोलत असतात. बऱ्याचदा त्यांना स्वतच्या नेत्यांना खूश करायचं असतं. काँग्रेसच्या सदस्यांची ही ‘परंपरा’ सर्वपक्षीय झालेली आहे. चर्चा राफेलवर सुरू होती, पण तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या सदस्यानं तेलुगु देसमवर तोंडसुख घेतलं. त्यांचं निलंबन कोणत्याही परिस्थितीत मागं घेतलं जाऊ नये असा आग्रह हा खासदार करत होता. त्यानंतर त्यानं चंद्रशेखर राव यांचं नेतृत्व कसं योग्य आहे यावर भाष्य केलं. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय केलं जातंय हेही सांगितलं. उर्वरित दोन मिनिटांमध्ये त्यानं राफेलला हात घातला. राफेलसारख्या किचकट विषयावर काय बोलायचं हा प्रश्न होता. मग, त्यानं जेपीसीची  मागणी करून ‘युक्तिवाद’ संपवला. सपच्या खासदारानं फ्रान्सऐवजी रशियाचा उल्लेख केला. त्याला राफेल आणि मिग-२९ मधील फरक नंतर अवगत झाला असावा. नेताजी म्हणजे मुलायम सिंह यादव संरक्षणमंत्री असताना त्यांनी रशियाकडून लढाऊ विमानं कशी आणली याचं गुणगान झालं. ही सगळी माहिती देण्यात वेळ निघून गेला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी दुसऱ्या खासदाराचं नाव पुकारलं.

मग, सपाच्या खासदाराला लक्षात आलं की, आपण जेपीसीची मागणी केली नाही. हा खासदार पुन्हा उभा राहिला आणि अध्यक्षजी, जेपीसी.. जेपीसी!.. त्याची ही धांदल बघून सत्ताधारी बाकावरून हास्य उमटत होतं. एक खासदार ‘जेपीसी’ म्हणण्याऐवजी ‘जेसीबी’ म्हणत होता. एकानं राफेलमध्ये समाजवाद-भांडवलवाद आणला. एकानं गांधी आणि गोडसेही आणले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारानं आपण हिंदू आहोत. ब्राह्मणही आहोत. जानव्याचे संस्कार महत्त्वाचे असतात असं सांगितलं. एकानं सोनिया आणि इंदिरा गांधी यांच्या संबंधाचा विषयही उपस्थित केला. या सगळ्याचा राफेलशी काय संबंध होता हे मात्र कळू शकलं नाही..

अरे यार सुनो..

लोकसभेत राफेलवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन तडफेनं बोलत होत्या. दोन-अडीच तासांच्या आपल्या भाषणात त्यांना विरोधकांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढायचा होता. विरोधी सदस्यांचा एक एक प्रश्न त्यांनी नोंदवून ठेवलेला होता. भल्यामोठय़ा उत्तरात सीतारामन या केंद्र सरकारची बाजू मांडण्यापेक्षा स्वतचीच बाजू मांडू पाहात आहेत असं त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होतं. वास्तविक, पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्यावर खोटारडय़ा असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सीतारामन लोकसभेत उपस्थित होत्या. राहुल यांचा आरोप बहुधा त्यांच्या जिव्हारी लागला असावा. तेव्हा सीतारामन यांना सभागृहात बोलायला मिळालं नाही. आपल्यावर खोटेपणाचा आरोप होऊच कसा शकतो, हा राग त्यांच्या मनात खदखदत असावा. त्यात यावेळी राफेलवरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनीही सीतारामन यांचा अप्रत्यक्ष अपमानच केला. संरक्षणमंत्री सभागृहात असताना अर्थमंत्र्यांना बोलावं लागतंय, असं रॉय म्हणाले. रॉय बोलत होते तेव्हा सीतारामन जेटलींच्या शेजारी बसलेल्या होत्या. ही सगळी भडास त्यांनी अखेर बाहेर काढली. लोकसभेत शुक्रवारी राफेलवर सीतारामन यांनी दिलेलं उत्तर म्हणजे त्यांच्या या संदर्भातील रागाचा उद्रेक होता. सीतारामन ‘जेएनयू’च्या विद्यार्थी होत्या. इंग्लंडमध्ये त्यांनी कॉर्पोरेट कंपनीत काम केलं आहे. स्वतच्या बौद्धिक क्षमतेवर आणि हिमतीवर वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळं त्यांचा ‘अहं’देखील नेहमीच टोकदार असतो. त्यांना कुठल्याही गोष्टीचा रागही लगेच येतो. त्या चिडल्या की, यार सुनो.. असं बोलून समोरच्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात.

सभागृहात काँग्रेसचे सदस्य त्यांना विरोध करत असल्यामुळे सीतारामन यांना बोलता येत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या भाषणात यार.. हा शब्द इतक्या वेळा आला की, पत्रकारांनी मोजणंच सोडून दिलं. मुरलेल्या राजकारणाच्या चेहऱ्यावर राग कधी दिसत नाही. सीतारामन यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू कमी आणि आठय़ा जास्त दिसतात. मोदींकडून त्यांना अजून बरंच काही शिकायचं आहे.

मधल्या वेळेत..

या हिवाळी अधिवेशनात सभागृहांमध्ये कामकाज कमी आणि तहकुबी जास्त झाल्या. लोकसभेत नववर्षांची सुरुवातही तहकुबीनंच झाली. शून्य प्रहरात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळं दहा-पंधरा मिनिटांसाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्धा तास-तासभरासाठी सभागृहाचं काम थांबलं असेल तर सदस्य बाहेर निघून जातात. पण, दहा मिनिटांच्या ‘सुट्टी’त खासदार गप्पा मारत सभागृहात रेंगाळतात. त्या दिवशी भाजपचे सदस्य विरोधकांच्या बाकावर बसून हास्यविनोद करत होते. भाजपचे निशिकांत दुबे फारुक अब्दुल्लांच्या शेजारी बसून जोरजोरात हसत होते. त्या हास्यात आरोग्यमंत्री नड्डा, तृणमूलचे सौगता रॉय सामील झाले.. बुधवारी रविशंकर प्रसाद हे फारुक अब्दुल्लांपासून पप्पू यादव यांच्यापर्यंत सगळ्यांना नववर्षांच्या शुभेच्छा देत होते. अब्दुल्ला यांची शाल सुप्रिया सुळेंना आवडल्यानं त्या, त्या शालीचं कौतुक करत होत्या. अधूनमधून अनुराग ठाकूरही विरोधी बाकांवर बसून गप्पांमध्ये रंगलेले दिसतात. खासदार ‘मध्यंतरा’चा वेळ असा सत्कारणी लावतात! .. पण, राफेलच्या चर्चेवेळी दोन्हीकडील सदस्य हमरातुमरीवर आले होते. तृणमूलचे कल्याण बॅनर्जी आणि सौगता रॉय यांनी भाजपचे सदस्य गुंडगिरी करत असल्याचा आरोप करताच भाजपचा सदस्य त्यांच्या अंगावर धावून जात होता. त्याला कसंबसं आवरलं गेलं. अनुराग ठाकूर स्वतची जागा सोडून विरोधकांच्या शेजारच्या बाकावर बसून टोमणे मारत होते. भाजप खासदारांशी गप्पा मारून रॉय यांच्या भाषणाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते.. सभागृहात खासदारांचा असा विरोधाभास पाहायला मिळतो.

– दिल्लीवाला