अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सोनिया गांधी बराच वेळ संसदेत होत्या. राहुल गांधी काँग्रेसच्या बैठकांसाठी निघून गेले. दुपारी ते शरद पवार यांना भेटायला गेले. त्यामुळे ते लोकसभेत आले नाहीत. सत्ताधारी बाकांवरही उपस्थिती तुलनेत कमीच होती. सोनियांसाठी हा दिवस विशेषच म्हणावा लागेल. दोन ज्येष्ठ संसदपटूंनी त्यांना अचंबित केले. मुलायमसिंह यादव यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देऊन सभागृहात खळबळ उडवून दिली. मुलायमसिंह नेमके काय बोलताहेत? मोदींनी पंतप्रधान व्हावे असे त्यांना वाटतेय? हे ऐकून सोनियांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, अचंबा आणि अस्वस्थता असे सगळेच भाव एकवटलेले होते. मुलायमसिंह विनोद करत असावेत असे वाटले होते, पण ते मनापासून मोदींना शुभेच्छा देत होते.  मुलायम यांनी अनपेक्षितपणे विरोधकांची केलेली कोंडी बघून सत्ताधारी सदस्य मात्र कमालीचे सुखावले होते. मुलायमसिंह यांच्या आधी देवेगौडा बोलले. त्यांनी सोनियांचा उल्लेख केला. सोनिया पंतप्रधान बनता बनता राहिल्या. त्यांना पंतप्रधान होता आले नाही, असे देवेगौडा म्हणताच, त्यांच्या बाजूला बसलेल्या सोनिया दुसऱ्यांदा अचंबित झाल्या. त्या लगेच देवेगौडांना म्हणाल्या, पण मला व्हायचेच नव्हते!.. देवेगौडांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे बघत ते म्हणाले, तुम्हाला पंतप्रधान व्हायचे नव्हते असे नाही. त्यात अडचणी आल्या. देवेगौडांना म्हणायचे होते की, सोनियांना पंतप्रधान बनू दिले गेले नाही. नाही तर वाजपेयींनंतर सोनियाच पंतप्रधान झाल्या असत्या.. पण, देवेगौडांच्या वक्तव्यावर सोनियांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नेहमीप्रमाणे त्या शांत राहिल्या. पंतप्रधानपदाबाबत सोनियांनी कधीही जाहीरपणे मतप्रदर्शन केलेले नाही. लोकसभेतही त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.

 

नायडूंचा ‘इव्हेंट’

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नांना वेग आलेला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्याशी चर्चा करण्याचे काम प्रामुख्याने तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू करत आहेत. दिल्लीत ६, जनपथ हे शरद पवार यांचे निवासस्थान आघाडीच्या घडामोडींचे केंद्र बनून गेलेले आहे. नायडूंचीही सातत्याने दिल्लीवारी होत असते. गेल्या आठवडय़ात नायडूंनी आंध्र भवनात बारा तास उपोषण केले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यायला मोदी सरकार तयार नसल्याने नायडू आक्रमक झाले होते. दिल्लीत आंदोलन करून नायडूंनी थेट मोदींना आव्हान दिले. त्यातून त्यांनी आपण राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख नेता असल्याचा दावाही केला. भाजप वा काँग्रेसला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये पंतप्रधानपदाचे नायडू दावेदार असू शकतात. नायडूंच्या उपोषणाच्या दिवशी आंध्र भवनात वाहती गर्दी पाहायला मिळत होती. दिल्लीतील तेलुगू भाषक आंध्र भवनात हजेरी लावत होते. आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसमचे कार्यकर्ते होते. आंध्र भवनाबाहेर मोठमोठे फलक लावलेले होते. फेरीवाल्यांचा व्यवसायही बऱ्यापैकी होत होता. दिल्लीत थंडी असल्याने गर्दीतील काही उत्साही या फेरीवाल्यांकडून स्वेटर, जाकीट खरेदी करत होते. एकूण नायडूंच्या उपोषणाला ‘इव्हेंट’चे स्वरूप आलेले होते. कार्यकर्त्यांसाठी जेवणाची वेगळी सोय केलेली होती, पण आंध्र भवनमध्ये उत्तम जेवण मिळत असल्याने कार्यकर्ते तिथल्या कॅन्टीनमधील पदार्थाचाही आस्वाद घेत होते. दिल्लीतील काही जुने-जाणते सांगतात की, दिल्लीतील राज्यांच्या सदन आणि भवनांमधील कॅन्टीनचे कंत्राटदार अनेकदा बदलले, पण आंध्र भवनामध्ये कित्येक वर्षे एकच कंत्राटदार हे कॅन्टीन चालवतो. त्याने जेवणाचा दर्जा अजून टिकवून ठेवला आहे.. आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी नायडूंना दिल्ली विमानतळावर जायचे होते. दिल्लीतील रहदारी टाळण्यासाठी त्यांनी थेट मेट्रो पकडली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने मेट्रोतून प्रवास केल्यामुळे मेट्रो प्रशासन बेहद्द खूश झाले होते.

 

अखेरचा दिवस..

गेल्या आठवडय़ात बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. विद्यमान खासदार आता आपआपल्या मतदारसंघात परतले आहेत. त्यापैकी काही जणांना तिकीट मिळेल. काही निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जातील. काही पुन्हा लोकसभेत येतील. मे महिन्यात १७व्या लोकसभेत अनेक नवे चेहरेही पाहायला मिळतील. त्यामुळे १६व्या लोकसभेचा अखेरचा दिवस सगळ्यांना भावुक बनवणारा होता. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी निरोप घेताना अनंतकुमार यांची आठवण काढली. अनंतकुमार यांनी संसदीय कामकाजमंत्री म्हणून चोख कामगिरी बजावली होती. कर्करोगामुळं त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. अनेक सदस्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्षांनी एस. एस. अहलुवालिया यांचे आवर्जून कौतुक केले. संसदेला डिजिटल करण्यात त्यांचा वाटा खूप मोठा आहे. अहलुवालिया आजारी असल्याने ते सभागृहात उपस्थित नव्हते. खासदारांना सूचना करता याव्यात यासाठी अहलुवालियांनी ई-पोर्टल बनवलेले आहे. पोर्टलचा वापर खासदार करत असल्याने त्याचे श्रेय लोकसभा अध्यक्षांनी अहलुवालियांना दिले. संसदेचे ग्रंथालयही आता डिजिटल झालेले आहे. त्यामुळे खासदारांना माहिती मिळवणे अधिक सोपे झालेले आहे.. खरे तर अखेरच्या दिवशी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षांमध्येच हमरातुमरी झाली. तृणमूल काँग्रेसचे खासदार मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते. संध्याकाळी मोदींचे भाषण झाल्यावर सत्ताधारी सदस्य सभागृहात मोदींशी हस्तांदोलन करताना दिसले, मात्र विरोधी सदस्यांपैकी एकही जण त्यांना भेटायला गेला नाही. नंतर मोदी लोकसभा अध्यक्षांना भेटायला त्यांच्या कार्यालयात निघून गेले.

 

व्यंकय्यांचा त्रागा

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत राजकीय पक्षांचे सगळे कार्यक्रम रद्द झाले. विज्ञान भवनात आयोजित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मात्र त्यांना रद्द करणे शक्य झाले नसावे. या कार्यक्रमात त्यांनी संसदीय कामकाजाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकही दिवस राज्यसभेचे कामकाज दिवसभर झाले नाही.  सभागृहातही व्यंकय्या सातत्याने नाराजी व्यक्त करताना दिसले. सदस्यांना चर्चेचे महत्त्व कळत नाही, निव्वळ गोंधळ घातला जातो. सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण शत्रुत्व नव्हे. याचे भानही खासदारांना राहिलेले नाही, असा त्यांचा त्रागा होता. राज्यसभेत अर्थसंकल्प मंजूर करण्याचे बंधन नाही, पण संसदीय परंपरा म्हणून त्यावर चर्चा केली जाते. या वेळी ना अर्थसंकल्पावर चर्चा झाली ना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर!.. पुस्तक प्रकाशनाला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझादही येणार होते, पण काँग्रेसने सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याने ते आले नाहीत. व्यंकय्यांनी आझाद यांचा उल्लेख केला. राज्यसभेत वेळेचा अपव्यय होतो, असे आझाद म्हणतात, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून तशी कृती होत नाही.. व्यंकय्यांचा हा आक्षेप योग्य होता. पण लोकसभेतही गोंधळ होत असतो, तरीही राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेत कामकाज जास्त वेळ झाले. लोकसभा अध्यक्ष सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. राज्यसभेत मात्र पीठासीन अधिकाऱ्यांचा कल सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्याकडेच असल्याचे पाहायला मिळाले. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीदेखील या कार्यक्रमाला होते. संसद देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करते याचे भान लोकप्रतिनिधी विसरू लागलेले आहेत, या प्रणबदांच्या मताशी व्यंकय्यांनी सहमती दाखवली. पण भाजप विरोधी बाकांवर होता तेव्हाही अनेकदा संसदेच्या अधिवेशनावर पाणी फेरले गेले होतेच. त्या वेळी व्यंकय्या नायडू भाजपचे खासदार होते!