निमित्त होतं काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांच्या पुस्तक प्रकाशनाचं. सिबल यांचे मित्र पी. चिदंबरम कार्यक्रमाला होतेच, शिवाय मनमोहन सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, चंदन मित्रा अशी अनेक राजकीय मंडळीही होती. चर्चा सुरू होती गेल्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीची. यात सिबल आणि चिदंबरम या दोघा काँग्रेसींनी हिरिरीने भाग घेतला. काँग्रेसने मार का खाल्ला यावर त्यांची कारणमीमांसा सुरू होती. तेवढय़ात शरद यादव म्हणाले, तुम्ही काँग्रेसवाले हरणारच होता. पण थेट धोबीपछाड?.. ही कमालच झाली!.. शरद यादव हे मोदींसारखे छाती ताणून बोलत नाहीत. संसदेतही शरद यादव यांची भाषणं खुसखुशीत असतात. बारीक बारीक विनोद करत ते भाषणात रंगत आणतात. या कार्यक्रमातही त्यांच्या मिस्किलपणाची अशी झलक पाहायला मिळाली. पण मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी स्वत:च्याच पक्षावर केलेली टिप्पणी मात्र खूप काही सांगून गेली. भाजपला रामराम करून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले चंदन मित्रा यांचं म्हणणं होतं की, समजा विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकली तर प्रादेशिक पक्षातील नेत्याने पंतप्रधान व्हायला हवे. त्यावर येचुरी यांचं मित्रा यांना सांगणं होतं की, आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका! काँग्रेसच्या पाठिंब्यावर आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती तेव्हा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कडव्या काँग्रेसविरोधामुळे पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना देशाचा पंतप्रधान होण्याची संधी नाकारली गेली. ही कम्युनिस्टांची घोडचूकच होती. प्रकाश कारात यांचा कडवेपणा कायम असला तरी येचुरी मात्र समन्वयाची भूमिका घेत असतात. म्हणूनच येचुरींनी कम्युनिस्टांनी केलेल्या चुकीची कबुली दिली. याचा अर्थ आता विरोधी पक्ष आगामी लोकसभेत जिंकला तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते.

अहमदभाई लागले कामाला!

जुन्याजाणत्या अहमद पटेलांची ‘टीम राहुल’ला नितांत गरज दिसते.. काँग्रेसकडे सुरजेवालासारखे नव्या दमाचे नेते असले तरी, राजकारण करायला मुरलेल्याच व्यक्ती लागतात. ती क्षमता या तरुण नेत्यांकडे अजून तरी आलेली नाही. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी ‘आपुलकी’ने बोलणारं काँग्रेसकडे आहेच कोण? हे काम अहमदभाईंनी स्वत:च्या खांद्यावर घेतलेलं आहे. शिवाय, त्यांना काँग्रेससाठी निधीचीही जमवाजमव करायची आहे.. सोमवारी काँग्रेसने देशव्यापी बंदचा नारा दिला आहे. खरं तर काँग्रेसला आंदोलन करायची सवय नाही. त्यामुळं बंद यशस्वी कसा करायचा, हा प्रश्न काँग्रेससमोर उभा राहिला आहे. ही अडचण सोडवण्याची जबाबदारी आता अहमदभाईंवर येऊन पडलेली आहे. अहमदभाई कामाला लागले. अहमदभाईंनी अशोक गेहलोत यांना बरोबर घेतलं. दोघेही बुजुर्ग. या दोघांचा फोन अन्य पक्षांतले नेते उचलतात. त्यांना प्रतिसाद देतात. राहुल गांधींना जे जमत नाही ते अहमदभाई करून दाखवतात. अहमदभाई आणि अशोकभाईंनी आणखी एका बुजुर्गाचं घर गाठलं. ते गेले शरद यादव यांच्या घरी. तिथं बसून दोघा भाईंनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन लावला. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने बंद पुकारलेला आहे, आपापल्या राज्यातही भाजपविरोधात काँग्रेसच्या ‘बंद’ला पाठिंबा द्या.. दोघा भाईंचं कोण किती ऐकतो हे कळेलच. पण यानिमित्ताने अहमदभाई काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. गेल्या चार वर्षांत काँग्रेसकडे सत्ता नसल्याने आणि पक्षांतर्गत सत्तांतरामुळं अहमदभाईंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागलं होतं. पण अहमदभाईंना नाकारणं ‘टीम राहुल’ला परवडणारं नाही. जे सोनियांना जमलं नाही ते राहुल गांधींना कसं जमेल?

सचिव खूश..

एखाद्या खात्याचा कार्यक्रम असेल तर, त्या खात्याचा मंत्री आणि सचिव दोघेही उपस्थित असतात. मंत्री असला की सचिवाला काही कामच उरत नाही. मंत्र्यानं भाषण केलं की सचिवाचं भाषण कोण ऐकणार? प्रसारमाध्यमांतूनही मंत्र्यांचंच भाषण छापून येतं.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ठरवलं की आपल्या खात्याच्या सचिवाला आधी बोलू द्यायचं. त्याचं सगळं सांगून झालं की मग एखादा मुद्दा राहिला असेल तर तो आपण आपल्या भाषणात सांगायचा. निती आयोगानं परिवहन विषयावर दिल्लीत चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. तिथं गडकरींचं नाव उच्चारलं गेलं. उपस्थितांसमोर मंत्र्यांनी म्हणणं मांडावं असं गडकरींना सांगण्यात आलं. पण, गडकरींनी नकार दिला. ते म्हणाले, आधी सचिवांना बोलू द्या. मी शेवटी बोलतो.. सचिवांना आश्चर्यच वाटलं. ते त्यांनी भाषणात बोलूनही दाखवलं. सचिव म्हणाले, गडकरींना मी सांगितलं होतं की मंत्र्यांनी बोलून झाल्यावर सचिवांना सांगण्याजोगं काही उरतच नाही.. पण सचिवांच्या म्हणण्यावर गडकरींनी लगेचच कार्यवाही करून टाकली. गडकरी हे धडाडीचे मंत्री आहेत. ते कुठलंही काम रखडवत नाहीत. तातडीने निर्णय घेणे ही गडकरींची खासियत. गडकरींनी सचिवांच्या म्हणण्यावरही तातडीने निर्णय घेऊन टाकला. सचिवांचं भाषण पहिल्यांदा झालं. मग मंत्र्यांचं झालं. इतकं करूनही मंत्र्यांचंच भाषण छापून आलं हा भाग अलाहिदा!

उषापती ते उपराष्ट्रपती

विद्यमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना मोदींप्रमाणे शाब्दिक कोटय़ा करायची फार सवय आहे. कधी कधी अशा कोटय़ा त्यांना अडचणीत आणतात, पण नायडू फारसं मनावर घेत नाहीत. मोदी स्वत:वर खूश असतात तसे नायडूही खूश असतात. उपराष्ट्रपती होऊन एक वर्ष झालं म्हणून नायडूंनी पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजनही उपस्थित होत्या. खुद्द मोदींनी नायडूंच्या बोलण्याच्या स्टाइलचा विषय काढला. मोदी म्हणाले, नायडू ‘सुपरफास्ट ट्रेन’सारखे बोलतात. धडाधड.. तेही यमक जुळवून!.. मोदींनंतर नायडू बोलायला उभे राहिले आणि इथंही त्यांच्या शब्दांची अतिजलद रेल्वे सुरू झाली. इंग्रजीतून नायडूंनी भन्नाट कोटय़ा केल्या. त्यांच्या या शाब्दिक करामतींमुळं उपस्थितांचं मनोरंजनच होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नायडूंची छायाचित्रे दाखवण्यात आली. त्यांचा राजकीय प्रवास त्यातून पाहायला मिळाला. या छोटेखानी सादरीकरणाच्या इंग्रजी शीर्षकातही भन्नाट शाब्दिक कोटी होती. ‘उषापती ते उपराष्ट्रपती’.. इंग्रजीतील ‘यू’चा वापर उषामधील ‘उ’साठी आणि उप राष्ट्रपतीतील ‘उ’साठीही केला होता. नायडूंच्या पत्नीचं नाव उषा आहे.. असे हे कोटीबाज नायडू!

– दिल्लीवाला