22 January 2020

News Flash

सौगतदादा..

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय वयानं आणि अनुभवानं मोठे असल्यानं लोकसभाध्यक्षही त्यांना ‘सौगतदादा’ असं म्हणतात.

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय वयानं आणि अनुभवानं मोठे असल्यानं लोकसभाध्यक्षही त्यांना ‘सौगतदादा’ असं म्हणतात. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होत्या. थकीत कर्जावर सीतारामन बोलत होत्या, तर सौगतदादा मध्येच म्हणाले, ‘‘एनपीएचा आकडा सांगा.’’ दादांनी सीतारामन यांची पंचाईतच केली होती. लोकसभेत आकडा सांगणं म्हणजे आर्थिक अपयशाची कबुली देण्याजोगंच होतं. एकदा आकडा दिला की रघुराम राजन यांनी दिलेल्या कर्जबुडव्यांच्या यादीचाही मुद्दा चर्चेला आला असता. सीतारामन काही वेळ शांत उभ्या राहिल्या आणि सौगतदादांकडं दुर्लक्ष करून त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. सौगतदादा काही ना काही मुद्दा मांडतच होते. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला त्यांना खाली बसवत होते. हा सगळा खेळ तास-दीड तास सुरू होता. सौगतदादा चिडत नाहीत, ते नुसतेच स्मितहास्य करतात. कसा चिमटा काढला, असा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव असतो. सीतारामन यांचं उत्तर झाल्यावर एखाद्या मुद्दय़ावर स्पष्टीकरण मागण्यासाठी विरोधी सदस्यांना बोलू दिलं जातं. सौगतदादा उभे राहताच बिर्ला म्हणाले, ‘‘दादा, बसा खाली. तुम्हाला बोलायला मिळणार नाही. तुमचं बोलून झालंय..’’ अखेर सुदीप बंदोपाध्याय यांनी दादांचा मुद्दा पूर्ण केला. नव्या खासदारानं चांगले मुद्दे मांडले, की सौगतदादा त्या खासदाराकडं जाऊन कौतुक करतात. सौगतदादा मागच्या बाकावर बसून सदस्यांची भाषणं ऐकत होते. त्यांची नजर एकदम सनी देओलवर गेली. सनी देओलनं आपलं संसदीय आणि राजकीय ‘कर्तव्य’ पार पाडण्यासाठी- म्हणजेच ‘प्रतिनिधित्व’ करण्यासाठी माणूस नेमला आहे! असं असलं तरी लोकसभेत सनी देओलला स्वतलाच यावं लागतं. सनी देओलला पाहताच सौगतदादा स्वतहून त्याच्याकडं गेले. स्वतची ओळख करून दिली. सनीनं दाढी वाढवली होती. बहुधा सौगतदादा त्याबद्दल विचारत असावेत. सनीनं दाढीवर हात फिरवत स्वतला आकसून घेतलं. सौगतदादांनी तृणमूलच्या महिला खासदाराला हाक मारून बोलावलं. तिची सनीशी ओळख करून दिली. दोघांनीही सनीला घेरल्यामुळं लाजाळू सनी अगदीच बिचारा होऊन गेला होता.

मातृभाषेवर प्रेम

दक्षिणेतल्या खासदारांचं हिंदी फारसं चांगलं नसतं. तरीही कोणी अधूनमधून हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर त्यांचं इंग्रजीही खूप चांगलं असतं असं नाही. अनेक जण मोडक्यातोडक्या इंग्रजीत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतात. लोकसभाध्यक्षांना समजलं की नाही, याची खातरजमा करून घेत असतात. त्यामुळं तीच तीच वाक्यं वा शब्द पुन:पुन्हा म्हणतात. काही खासदार मात्र हिंदी-इंग्रजीच्या वाटय़ाला जातच नाहीत. ते त्यांच्या मातृभाषेत भाषण करतात. पुण्याचे खासदार गिरीश बापट लोकसभेत खणखणीत आवाजात मराठीत भाषण करतात. ‘आधार’संदर्भातील विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू होती. बापट म्हणाले, ‘‘मी मराठीतून बोलणार.’’ बापट जाहीर सभेत बोलावं तसं बोलत होते. काही काही शब्दांचे अर्थ सदस्यांना समजत होते. त्यावर भाजपचे खासदार बाकं वाजवून बापट यांना प्रतिसाद देत होते. सुनील तटकरे यांनी लोकसभेत दोनदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. जोपर्यंत हा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मराठीत बोलणार असं तटकरे यांनी ठरवलेलं आहे. शिवसेनेचे काही खासदार विनाकारण हिंदीत मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर शिवसेना उभी राहिली आहे, मग खासदारांनी हिंदीत बोलण्याचं कारण काय? हिंदी भाषेवर प्रभुत्व असेल तर गोष्ट वेगळी; पण तसंही नाही. मग मातृभाषा सोडायची कशाला? या आठवडय़ात राज्यसभेत खासदारांनी मातृभाषेचा आधार घेतलेला दिसला. कोणी कोंकणीत बोललं. कोणी संस्कृतचा प्रभाव दाखवला. कोणी बघेली भाषेचा वापर केला. सभागृहात सदस्य कोणत्या भाषेत बोलतात, यास फारसं महत्त्व नसतं. ते कोणता मुद्दा उपस्थित करतात, याकडं सदस्यांचं लक्ष असतं. विषय आणि मुद्दा महत्त्वाचा असेल, तर प्रादेशिक भाषांचं केलेलं हिंदी वा इंग्रजीतलं भाषांतर गांभीर्यानं ऐकलं जातं. कोणत्या भाषेत कसं बोलता, यापेक्षा काय बोलता हेच सभागृहांमध्ये सदस्याची गुणवत्ता सिद्ध करतं.

ताकद कशाला वाया घालवता?

अर्थसंकल्पावर निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलं तसं राज्यसभेतही प्रदीर्घ उत्तर दिलं. शुक्रवारी दीड तास सीतारामन बोलत होत्या. त्यामुळं वरिष्ठ सभागृहानं जेवणाची सुट्टी दुपारी अडीच वाजता घेतली. भाषण संपता संपता सीतारामन यांनी सदस्यांना धन्यवाद दिले. ‘‘दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ झालीय; पण तरीही तुम्ही माझं उत्तर ऐकून घेतलं,’’ असं सीतारामन म्हणाल्यादेखील! गुरुवारी राज्यसभेत दिवसभर अर्थसंकल्पावर चर्चा झालेली होती. पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केल्यामुळं सीतारामन यांना चिदंबरम यांच्या प्रत्येक मुद्दय़ावर स्पष्टीकरण द्यायचं होतं. त्यांच्या भाषणातील बराचसा वेळ चिदंबरम यांना प्रत्युत्तर देण्यात गेला. इतर सदस्यांचे मुद्देही त्यांनी विचारात घेतले असले, तरी लक्ष्य चिदंबरम हेच होते. त्यामुळं अधूनमधून विरोधी सदस्य सीतारामन यांच्या भाषणात अडथळे आणत होते; पण त्याकडं सीतारामन फारसं लक्ष देत नव्हत्या. अडथळे आणणाऱ्या एका सदस्याला अखेर सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, ‘‘कशाला मध्ये मध्ये बोलता. त्याचा उपयोग आहे का? दुपार झालीय, सदस्यांना भूक लागलेली आहे. तुम्ही तरी ताकद कशाला वाया घालवत आहात?’’ सीतारामन यांचं भाषण इतर सदस्यांनी कसंबसं ऐकून घेतलेलं होतं. व्यंकय्यांचं म्हणणं त्यांनाही पटत होतं. अनेक सदस्य सकाळी ११ वाजल्यापासून सभागृहात होते. चिदंबरम यांचे मुद्दे खोडून काढल्यावर अन्य सदस्यांनाही उत्तर देण्याची सीतारामन यांची तयारी होती. अर्थमंत्री या नात्यानं सीतारामन यांचं ते कर्तव्यच होतं. पण व्यंकय्यांनीच मधला मार्ग काढला. ‘‘अर्थमंत्री उत्तर देतील, पण तुम्हाला ते हवंय का?’’ असं व्यंकय्यांनी विचारलं. कोणीही ‘हो’ म्हणालं नाही. थकलेले सदस्य सीतारामन यांचं भाषण संपताच तातडीनं बाहेर निघून गेले!

मुलायम ओलावा

मुलायमसिंह यादव बऱ्याच दिवसांनी संसदेत दिसले. त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते सभागृहात गैरहजर होते. मध्यंतरी त्यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावं लागलेलं होतं. वयानुसार मुलायमसिंह थकलेले आहेत; पण ते लोकसभा निवडणुकीला उभं राहतात. जिंकूनही येतात. राजकारणात लोक निवृत्त होत नाहीत. मुलायमसिंहही निवृत्त झालेले नाहीत. त्यांच्याबद्दल अनेकांना आदर आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘आशीर्वाद’ दिल्यामुळं भाजपच्या मंडळींना त्यांच्याबद्दल फार जिव्हाळा आहे. गेल्या आठवडय़ात मुलायमसिंह सभागृहात आले होते. सभागृह सुरू होण्यास थोडासा अवधी होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांची आस्थेनं चौकशी केली. सुप्रिया सुळे यांनीही लवून नमस्कार केला. मागं बसलेल्या नुसरत जहाँ आणि मिमि चक्रवर्ती यांनीही मुलायम यांच्याकडून आशीर्वाद घेतले. मुलामय काही वेळ सभागृहात बसून निघून गेले. भाजपचे खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मुलायम यांचा खास उल्लेख केला. मस्त यांनी मुलायम यांना हात धरून सभागृहातून बाहेर जाण्यास मदत केली. मुलायम यांच्यामुळं सभागृहात ‘एकमेकां साह्य़ करू’ वातावरण निर्माण झालेलं होतं. अर्थसंकल्पीय-पावसाळी अधिवेशन सुरू झालं, तेव्हा मुलायम शपथविधीसाठी आलेले होते. अखिलेश यादवही सभागृहात होते. मुलायम सभागृहातून निघाले तेव्हा फारुक अब्दुल्ला स्वत: त्यांचा हात धरून त्यांना बाहेर घेऊन निघाले होते. हे पाहून अखिलेश पुढं आले. ते मुलायम यांना घेऊन गेले. अलीकडे मुलायम यांचा सभागृहातील चर्चामध्ये सहभाग कमी झालेला आहे. गेल्या लोकसभेच्या अखेरच्या अधिवेशनात ते बोलत राहिले. अखेर त्यांना थांबवावं लागलं होतं. अनेक जुने संदर्भ त्यांनी दिले होते. त्यांच्या तरुणपणातील राजकारणापासून आत्ताचं राजकारण खूपच दूर गेलं आहे. मुलायम यांना त्याची कल्पना आहे, म्हणूनच त्यांनी कदाचित मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्याचे आशीर्वाद दिले असावेत!

First Published on July 13, 2019 11:37 pm

Web Title: loksatta chandni chowkatun mpg 94 2
Next Stories
1 दिलाशानंतरची आव्हाने
2 लोकसंख्यावाढीचे आव्हान कुणापुढे?
3 विश्वाचे वृत्तरंग: राजवाडय़ातील कोंडमारा
Just Now!
X