18 January 2021

News Flash

सेवायज्ञ : रंजना करंदीकर

आदिवासींच्या जगण्याला संपन्नतेचं परिमाण देण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून सेवायज्ञ सुरू ठेवणाऱ्या रंजना आहेत आजच्या दुर्गा.

(संग्रहित छायाचित्र)

संपदा वागळे

कुपोषित मुलांचा वाढता प्रश्न सोडवण्यासाठी रंजना करंदीकर यांनी आपल्या पतीसह जाणीवपूर्वक कर्जत, जव्हार व नंदुरबारमधील आदिवासी पाडे पायी पालथे घातले. काम व्यापक प्रमाणात व्हावं यासाठी ‘शबरी सेवा समिती’ची स्थापना केली आणि आत्तापर्यंत तब्बल १८ हजार ५०० कुपोषित मुलांना मरणाच्या दाढेतून परत आणलं. स्त्रियांना रोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर के लं. पाण्याच्या २४ योजनांद्वारे ५०० एकर जमीन ओलिताखाली आणली. इतकंच नाही तर मुलांसाठी १२ बालवाडय़ा, २५ अभ्यासिका आणि ‘पुस्तकहंडी’ उपक्रमही सुरू केला. आदिवासींच्या जगण्याला संपन्नतेचं परिमाण देण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून सेवायज्ञ सुरू ठेवणाऱ्या रंजना आहेत आजच्या दुर्गा.

२००५ मधील गोष्ट. कर्जत तालुक्यातील कळंब गावी ‘शबरी सेवा समिती’तर्फे कुपोषित मुलांच्या तपासणीसाठी एक वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. परिसरातून सुमारे चाळीस तीव्र कुपोषित मुलं आली होती. त्यातील एक होती दोन वर्षांची भारती आवाटे. केवळ श्वास सुरू आहे म्हणून जिवंत म्हणायचं अशी. आई-वडील नसलेल्या या मुलीला तिची आजी घेऊन आली होती. डॉक्टरांनी तिला त्वरित जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. त्या क्षणापासून हा अश्राप जीव वाचवण्यासाठी ‘शबरी’च्या रंजना करंदीकर यांची धडपड सुरू झाली. मुंबईच्या जे.जे.मधील त्यांच्या रोजच्या फेऱ्या, भारतीच्या आजीच्या तंबाखूच्या मशेरीपासून कपडय़ांपर्यंतची व्यवस्था, अशा ४५ दिवसांच्या लढाईनंतर मरणपंथाला लागलेलं ते बालक स्वत:हून बसू लागलं.. हसत हसत घरी गेलं.

अशा एक-दोन नव्हे तर कर्जत, जव्हार व नंदुरबारमधील तब्बल १८ हजार ५०० कुपोषित मुलांना ‘शबरी सेवा समिती’नं मरणाच्या दाढेतून परत आणलंय. याच हेतूने २००३ मध्ये रंजना व प्रमोद करंदीकर या दाम्पत्याने ‘शबरी सेवा समिती’ची स्थापना केली. आज हे काम आदिवासी महिला व मुलींना आत्मनिर्भर करणं, त्यांचं आरोग्य सांभाळणं, मुलांना साक्षर बनवणं, गरीब आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणं अशा अनेक मार्गानी बहरत चाललंय. रंजना यांचा हा सेवायज्ञ गेल्या ४०/४२ वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला वनवासी कल्याणाश्रमाचं काम करत असताना आयुष्याचा जोडीदार मिळाला. ‘संपूर्ण जीवन लोककल्याणासाठीच’ या विचारधारेवर त्यांचं सहजीवन बहरलं. लग्नानंतर वनवासी कल्याणाश्रमाच्या वैजनाथ (ता. कर्जत) येथील मुलामुलींच्या वसतिगृहात म्हणजे एका कुडय़ाच्या झोपडीवजा घरात त्यांचा ‘सार्वजनिक संसार’ सुरू झाला. रंजना यांनी सांगितलेली त्या काळातील  एक आठवण, १९८४ चा जून महिना होता तो! त्या आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला घेऊन केंद्रावर परतल्या होत्या. दोनच दिवसांत मावळ तालुक्यातील डोंगरात राहणारा एक आदिवासी सहा वर्षांच्या हंसाला प्रवेशासाठी घेऊन आला. त्या मुलीचा उजवा हात अपघाताने चुलीत पडल्याने भाजून निष्प्राण झाला होता. वसतिगृहातील एकूण ३५ मुलामुलींमध्ये १५ मुली होत्या त्याही साधारण त्याच वयाच्या. कोणाचीही मदत मिळणे शक्य नव्हतं तरी त्या बापलेकीची दीनवाणी अवस्था पाहून रंजना यांनी ते आव्हान स्वीकारलं. डॉक्टरांकडे पाठवून तिच्यावर दोन मोठय़ा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी दाता शोधणं, तिची सर्वतोपरी काळजी घेणं, सकाळी उठवून तिची अंघोळ, वेणी-फणी करणं सगळं आलंच. या धडपडीला यश आलं. हंसाच्या हातात ताकद आली. पुढे हंसा दहावी झाली, शिवण शिकली. गेली अनेक वर्ष स्वावलंबी जीवन जगत आहे.

‘शबरी’ची स्थापना केल्यावर रंजना यांनी पती प्रमोदसह कुपोषित मुलांना हुडकून काढण्यासाठी आधी कर्जत मग धडगाव, जव्हार येथील डोंगर पायी पिंजून काढले. यातील बाळांसाठी नाचणीचं सत्त्व, डाळ-तांदूळ भरडा आणि ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शेंगदाणा, कणिक, राजगिरा यांचे लाडू (महिन्याला १२००) रंजना घरी स्वत: बनवत असत. नंतर त्यांनी या कामासाठी आदिवासी बायकांना तयार केलं, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळू लागला. आदिवासी महिला व मुली यांचं प्रबोधन करून त्यांना आत्मभान देण्यात रंजना यांचा मोठा वाटा आहे. महिला सक्षमीकरण योजनेत आजवर ५०० महिलांनी शिवणकला आत्मसात केलीय, त्यातील ३७५ जणींनी आपला व्यवसाय सुरूकेलाय. या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील गीता पाडवी या आदिवासी स्त्रीनं नवऱ्याला जीप घेण्यासाठी स्वत:च्या कमाईतले ३० हजार रुपये दिले. विशेष म्हणजे हे रंजना यांना तिच्या नवऱ्यानंच अभिमानानं सांगितलं.

धडगाव, अक्कलकुवा व शिरपूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना बंधारा व विहिरी बांधण्यासाठी मदत देऊन, पाण्याच्या २४ योजनांद्वारे संस्थेने ५०० एकर जमीन ओलिताखाली आणलीय. ‘शबरी’च्या कामाची सुरुवात झाली तेव्हा रंजना यांना ५/६ बायका टेकडीखालच्या विहिरीतून हंडे भरून वर तेलंगवाडी गावाकडे जाताना दिसल्या. एप्रिल-मेच्या रणरणत्या उन्हात हे जीवघेणं काम करण्यातून म्हाताऱ्या तसेच गरोदर बायकांचीही सुटका नव्हती. रंजना म्हणाल्या, ‘‘ते दृश्य पाहिल्यावर त्या गावात पिण्यासाठी एक पेलाभर पाणी मागतानाही अपराधी वाटायचं. त्यावर पाणीशोधक आणून बोअरवेलची जागा निश्चित केली गेली. त्याला भरपूर पाणी लागलं. हातपंप बसला. या गोष्टीला आता १५ वर्ष झाली. तरीही ‘शबरी’चं नाव घेताना आजही या बायकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.’’

आदिवासी मुलांपर्यंत सूर्यनमस्कार हा सर्वागसुंदर व्यायामप्रकार पोहोचावा म्हणून रंजना यांनी धडगावच्या डोंगरातील शाळाशाळांमध्ये प्रात्यक्षिके दाखवली. आता संस्थेतर्फे तालुका पातळीवर सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घेतल्या जातात. मुलं एका दमात २०० सूर्यनमस्कार घालतात. त्याबरोबर ‘पुस्तकहंडी’ उपक्रमातून मुलांना वाचनाची गोडी लावण्यात ‘शबरी’ला यश मिळालंय. आजमितीला संस्थेच्या १२ बालवाडय़ा व २५ अभ्यासिका सुरू आहेत. त्यासाठी दहावी/बारावी झालेल्या आदिवासी मुलींना सक्षम करण्यात आलंय.

डोंगरवस्तीत प्राणपणाने काम करणारे दहा-बारा आदिवासी कार्यकर्ते हे रंजना यांनी कमावलेलं अमूल्य धन. आपल्या या मावळ्यांच्या साथीनं डोंगरवस्तीतील रंजल्यागांजल्यांना आधार देणाऱ्या या दुर्गेच्या सेवायज्ञाचं चांगलं फलित इथल्या लोकांना मिळत राहो हीच सदिच्छा.

संपर्क :   रंजना करंदीकर

उल्हास, कोतवाल नगर,कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, पिन : ४१० २०१

ईमेल –  ranjana.mumbai@gmail.com

दूरध्वनी – ९४२३८ ९१५३२

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.

यश कार्स

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅड फर्टिलाइजर्स लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:00 am

Web Title: loksatta dugra sevayagya ranjana karandikar abn 97
टॅग Navratra
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींना आर्थिक बळ
2 भारत – श्री
3 भानु अथय्यांचा चित्रप्रवास
Just Now!
X