05 December 2020

News Flash

पाशवी जगातली तेजोमय किनार

सुरुवातीला भयाण अवस्थेत प्रवेश केलेली प्रत्येक स्त्री सुचेता माऊलीच्या प्रेमामुळे स्थिरावली

डॉ. सुचेता धामणे.

आरती कदम – arati.kadam@expressindia.com

जग क्रूर आहे, बाईच्या बाबतीत तर जास्तच. बहुतांशी आपल्याच कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या मनोरुग्ण स्त्रिया, रस्त्यावर भटकू लागल्यावर तर उपभोगल्या जातातच. अशा ३०० जणींचं घर असलेली नगर येथील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’.. यंदाच्या पहिल्या दुर्गा आहेत, या स्त्रियांची माय झालेल्या डॉ. सुचेता धामणे.

अशीच एक सकाळ. नगरमध्ये राहाणाऱ्या डॉ. सुचेतांना नेहमीप्रमाणेच एक फोनकॉल आला, ‘पंढरपूरमध्ये एक बाई फिरतेय, नग्नावस्थेत. पोटुशीही आहे. येऊन घेऊन जा.’ सुचेता आपल्या पतीसह, राजेंद्र धामणे यांच्यासह निघाल्या. तिला शोधून काढलं, दयाच दाटून आली तिच्याविषयी. काळाचंही भान हरवलेली, होऊ घातलेली माऊली होती ती. अवस्था फारच भयानक. अंगावर कपडेही नाहीत, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे जवळही जावत नव्हतं. उपाशीच असावी. पण पोट मात्र चांगलच वर आलेलं. सुचेतांनी तिला जवळ घेतलं. आधी एका ठिकाणी नेऊन अंघोळ घातली, आणलेले कपडे घातले आणि थेट आणलं ते ‘माऊली’मध्ये! आज ती बाई भानावर आलेली आहे. स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव आहे, पांडुरंग राजेंद्र धामणे.

असे २० पांडुरंग, श्रद्धा, पूजा, साई, गौतम, पूजा, मेरी, प्रज्ञा ‘माऊली’मध्ये आहेत. बलात्कारित मनोरुग्ण स्त्रियांची ही मुलं आज ‘माऊली’मध्ये आपल्या मातांसह सुखाने नांदत आहेत, शिक्षण घेत आयुष्याला आकार देत आहेत. आणि यामागे आहेत ते सुचेता आणि राजेंद्र धामणे या पतीपत्नींचे कष्ट आणि आपल्या हातून सतत चांगलं घडत राहावं ही मनोइच्छा!

अहमदनगर- शिर्डी महामार्गावरील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था आज निराधार मनोरुग्ण स्त्रियांचं घर झालं असलं तरी त्याची सुरुवात झाली ती शरीरावर काटा आणणाऱ्या घटनेने. चौदा वर्ष झाली असतील. सुचेता कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. आणि राजेंद्र यांचा होमियोपथीचा दवाखाना. दोघंही बी.एच.एम.एस.(बॅचलर ऑफ होमियोपॅथी मेडिसीन अ‍ॅंड सर्जरी) दोघांचा प्रेमविवाह. आनंदात संसार चाललेला. एके दिवशी स्कुटरवरून जात असताना एक वेडी बाई रस्त्यावर स्वत:चीच विष्ठा खाताना दिसली. ही घटना या दोघांचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेली. खायला न मिळणाऱ्या या बाईची ती अवस्था त्यांच्यातल्या माणुसकीला पार हादरवून गेली. सुचेतांनी निर्धार केला कोणताही मनोरुग्ण उपाशी राहाता कामा नये. दुसऱ्या दिवसापासून सकाळी उठून सुचेता यांनी डबे तयार करायला सुरुवात केली. एकवेळच्या जेवणाचा डबा. मग दोघंही नवरा-बायको स्कुटरवरून निघत आणि रस्त्यावर जे जे मनोरुग्ण दिसत त्यांना खाऊ घालत. दोन वर्ष त्यांचा हा ‘अन्नपूर्णा उपक्रम’ सुरू राहिला. हळूहळू डब्यांची संख्या पन्नासच्यावर गेली. पण नंतर लक्षात आलं की असं नुसते डबे देऊन चालणार नाही. कारण निराधार मनोरुग्ण स्त्रियांचा या पाशवी जगात निभाव लागणं कठीण आहे. पुरुषी वासना ना ती बाई मनोरुग्ण आहे हे बघत, ना तिच्या अंगावरच्या दुर्गंधीचा, अस्वच्छतेचा त्यांना त्रास होत. त्यांच्यासाठी असते ती फक्त एक उपभोग्य बाई! या मनोरुग्ण स्त्रियांना कायमस्वरूपी घर देणं हाच त्यावर उपाय होता.. त्यातूनच साकारली, ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था.

आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या सत्कृत्याचा अभिमान वाटून शिक्षक असलेल्या राजेंद्र यांच्या बाबांनी त्यांची ६ गुंठे जागा या कामासाठी दिली. आणि त्या जागेवर पहिलं घर बांधलं गेलं. हळूहळू त्यांच्या या कामाची चर्चा होऊ लागली. टीकाकार जसे आजूबाजूला होते तसे दानशूरही. पुण्याचे शरद बापट काका पाठीशी उभे राहिले. त्यांच्या ओळखीने वाय.एस. साने यांनी पहिल्यांदा ६ लाख रुपये दिले आणि मग या ६ गुंठय़ावरच इमारत बांधणं सुरू झालं आणि एकेक मनोरुग्ण स्त्री येऊ लागली.. कुणी आणून सोडलेली, कुणाला जाऊन आणलेलं.

या सगळ्या कामांत सुचेता यांची खरी कसोटी लागली. सुरुवातीच्या काळात त्यांचा मुलगाही लहानच होता. त्याला सांभाळणं, कॉलेजमध्ये जाणं आणि या स्त्रियांची देखभाल, कठीण होतं सारं. एक तर या सगळ्या मनोरुग्ण. कसलंही भान नसलेल्या. अनेकदा लघवी, संडासही जागेवरच. इतकंच नाही तर मासिक पाळी सुरू झालेलीही कळायची नाही. ना तिला ना इतरांना. सुचेतांना ही सारी साफसफाई स्वत: करायला लागायची. शिवाय तिला न्हाऊ घालायचं, सॅनेटरी पॅड लावायचं. अनेकींना तर भरवायलाही लागायचं. कधी कुणाचा मानसिक तोल जाईल कळायचं नाही. त्यातच अनेक जणी एड्सची लागण झालेल्या. त्यांच्यावर वेगळे, वेळच्या वेळी औषधोपचार करायला लागायचे. पण सुचेतांना चटका तेव्हा लागायचा जेव्हा हे सगळं करूनही अनेक जणी जगायच्या नाहीतच. या माऊलीने १५० स्त्रियांचे मृत्यू पाहिलेत.

‘माऊली’ने आयुष्य जवळून पाहिलंय. गेल्या १२ वर्षांत एक एक करत सुमारे ३०० मनोरुग्ण स्त्रियांचं ते घर झालं. आज १४६ स्त्रिया आणि त्यांची २० मुलं इथे आहेत. सुरुवातीला भयाण अवस्थेत प्रवेश केलेली प्रत्येक स्त्री सुचेता माऊलीच्या प्रेमामुळे स्थिरावली, शांतावली. आज अनेक जणी बऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यांच्या रिकाम्या हातांना काम देणं आवश्यक होतं, कारण बहुतेक स्किझोफ्रेनियाच्या शिकार असल्याने डोकं रिकामं ठेवून चालणार नव्हतं. सध्या सुचेतांच्या देखरेखीखाली ‘माऊली’त रेशमी धाग्यांच्या सुबक बांगडय़ा बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. त्याला मागणीही खूप आहे, याशिवाय उदबत्ती तयार केल्या जात आहेत. अधिक गाई आणून दूधप्रकल्प उभारायचा विचार आहे. शिवाय भाजीपालाही पिकवला जातोय.

खरं तर सुचेता यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती तशी साधारणच आहे, पण म्हणून त्या आपल्या ध्येयापासून कधी विचलित नाही झाल्या. त्यांच्या कामाविषयी जसजसं समजत गेलं तसं तशी आर्थिक मदत मिळत गेली. हळूहळू गॅस आला, कुकर आला, वस्तू वाढत गेल्या. नगर येथील ख्यातनाम रंगकर्मी बलभीम आणि मेघमाला पाठारे यांनी ‘माऊली’ला भेट दिली तेव्हा गरज लक्षात घेऊन काही कोटी रुपयांची जागा दान केली.

या  कामाची दखल घेऊन हाँगकाँग येथील ‘रोटरी इंटरनॅशनल’च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जागतिक पातळीवरील ‘द वन इंटरनॅशनल मॅनिटेरिअन’ पुरस्कार २०१६ मध्ये डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना देण्यात आला. त्यातून मिळालेल्या १ लाख अमेरिकन डॉलर व इतर मदतीवर १ कोटीच्या निधीने ‘माऊली’च्या मनगाव या मोठय़ा प्रकल्पाची सुरुवात झाली. हा ६०० खाटांचा प्रकल्प असून सहाशे स्त्रियांना व साठ मुलांना कायमस्वरूपाचे हक्काचे घर मिळणार आहे. हे सारे पैसे या प्रकल्पाला लागलेत. शिवाय मधून मधून कोणी पैसे देतं तर कुणी गव्हाचं, तांदळाचं पोतं आणून टाकतं. अर्थात इथल्या स्त्रियांच्या औषधोपचारांवरच दरमहा ५ लाख रुपये खर्च होत आहेत. सुचेता म्हणतात, ‘‘अनेकदा असं होतं, हातातले पैसे संपत आले आहेत. कुठून आणायचे, असा विचार मनात येतो आणि कोणी तरी पैसे पाठवतोच. अजूनतरी काम अडून राहिलंय असं झालेलं नाही.’’

हे काम थांबायला नकोच आहे, कारण फक्त नगर वा महाराष्ट्रातल्याच नाही तर गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, बंगालमधल्या एकाकी मनोरुग्ण स्त्रिया इथे आणून सोडल्या जाऊ लागल्या आहेत. हे काम न संपणारं आहे.

सुचेता यांच्या संस्कारात वाढलेला त्यांचा मुलगा किरण, जो आज ‘माऊली’तल्या मुलांचा भैय्या आहे, तोही याच कामाला पुढे नेण्याच्या उद्देशाने एमबीबीएस करतो आहे. या कामासाठी पुढची पिढी तयार होते आहे. पण स्त्रिया मनोरुग्ण होऊ नये म्हणून समाजातली पुढची पिढी काय करणार आहे, आपल्यातलं पशुत्व काहींनी जरी सोडलं तरी अनेक जणींना असं वाऱ्यावर फेकून दिलं जाणार नाही, पण तसं होत नाही ही समाजाची शोकांतिका आहे, पण म्हणूनच अशा स्वार्थी, पाशवी काळ्याकुट्ट जगाला सुचेतांसारखी तेजोमय किनार लाभते आणि ती मनोरुग्ण स्त्रियांची माऊली होते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:24 am

Web Title: loksatta durga 2018 dr sucheta dhamane mauli seva pratishthan
Next Stories
1 सेवाव्रतींच्या कार्याला दाद
2 मदतीचा आश्वासक ओघ
3 कर्करोगाशी लढय़ावर नोबेलची मोहर
Just Now!
X