08 August 2020

News Flash

घरकुल ‘मुलांचे’

आपल्या मतिमंद मुलांचं दु:ख बाजूला ठेवून इतर मुलांना ‘घरकुल’ देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, नंदिनी बर्वे.

(संग्रहित छायाचित्र)

नंदिनी बर्वे

अमेय पालक संघटनेने पुढाकार घेत मतिमंद मुलांसाठी सुरू केलेल्या संस्थेच्या सुरुवातीच्या दोन खोल्यांचं रूपांतर आता हवेशीर ‘घरकुल’ या टुमदार वास्तूत झालं असून २० ते ६० वयोगटातील ३० मतिमंद मुले यात आनंदात आहेत. मात्र ‘घरकुल’चा हा प्रवास बर्वे बाईंची पावलोपावली परीक्षा पाहणारा होता. मोठय़ा मुलाच्या प्रगतीकडे लक्ष, वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा, शाळेतील नोकरी आणि ‘घरकुल’ हे सांभाळताना त्यांच्या मागे अनेक दुखणी लागली. पण त्यातूनही बाहेर येत त्यांनी ठाण्यातील सरस्वती हायस्कूलच्या असंख्य मुलांना घडवले. आपल्या मतिमंद मुलांचं दु:ख बाजूला ठेवून इतर मुलांना ‘घरकुल’ देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, नंदिनी बर्वे.

विशेष मुलांच्या पालकांसाठीचे एक गोंडस वाक्य म्हणजे, ‘अशा मुलांचा सांभाळ करणे सहज शक्य नाही, म्हणून यासाठी देवाने तुमची निवड केलीय.’ हे वाक्य ऐकायला, लिहायला कितीही छान वाटलं तरी जेव्हा असे मूल आपल्या पदरी येते तेव्हा तो धक्का पचवणं अत्यंत अवघड. यातून सावरून आपल्यासारख्या अनेक पालकांना ‘घरकुल’ या वसतिगृहाच्या माध्यमातून दिलासा देणाऱ्या नंदिनी बर्वे यांचे काम म्हणूनच लाख मोलाचे ठरते. बर्वे पतीपत्नींच्या अविरत कष्टांच्या पायावर आज २० ते ६० वयोगटातील ३० मतिमंद मुले या घरकुलात आनंदाने बागडत आहेत. घरकुलाप्रमाणे ठाण्यातील मराठी माध्यमाचे सरस्वती हायस्कूल हेदेखील बाईंचे एक कर्मक्षेत्र. इथल्या ३० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आता या शाळेच्या नूतनीकरणासाठी निधी उभा करणे हे त्यांचे सध्याचे व्रत.

कुशाग्र बुद्धीच्या पहिल्या मुलानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलाचं, कौस्तुभचं मतिमंदत्व घट्ट मनाने स्वीकारून बाईंनी त्याला डोंबिवलीच्या ‘अस्तित्व’ या विशेष मुलांच्या नावाजलेल्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. या शाळेचे विश्वस्त मेजर ग.कृ. काळे पालकांशी नेहमी संवाद साधत. ते म्हणत, ‘‘तुमच्या मुलाचं वय कायम ४ ते ५ वर्षच राहणार आहे, पण तुमचं वय मात्र वाढत जाणार. १८ वर्षांनंतर त्यांची शाळाही बंद होणार. अशा परिस्थितीत तुमच्यानंतर त्यांचं काय.. हा विचार आत्ताच करायला हवा..’ या विचाराचं बीज त्या शाळेच्या ३०/३५ पालकांच्या मनात पेरलं गेलं. परंतु वेगळं काही करायला पैसे कोणाकडेही नव्हते. तरीही सर्वानी निश्चयपूर्वक बँकेत एक ‘रिकिरग डिपॉझिट’ खातं काढलं. १९८७-८८ चा तो काळ. तेव्हा बाईंचा पगार तीन आकडी. जवळजवळ तो सगळाच या कामासाठी बँकेत जाऊ  लागला. १९९१ मध्ये पैसे हाती आले. त्यात प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे भर घालून डोंबिवलीच्या अलीकडे काटई नाक्याजवळ ‘खोणी’ गावात सव्वा एकर जमीन घेण्यात आली. पण त्याच वेळी मेजर काळे यांचे निधन झाल्याने सर्वाना धक्का बसला. अशा वेळी बर्वे सर व बाईंनी पुढाकार घेऊन ‘अमेय पालक संघटना’ या नावाने सर्वाची मोट बांधून बांधकाम सुरू केलं. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या २ खोल्यांच्या वास्तूत १९ फेब्रुवारी १९९९ रोजी कौस्तुभ बर्वे आणि प्रकाश शेणोलीकर हे दोन विद्यार्थी राहायला आले.

त्यावेळच्या त्या दोन खोल्यांचं रूपांतर आता हवेशीर सुसज्ज अशा टुमदार वास्तूत झालं आहे. ‘घरकुल’मध्ये शिरतानाच मनात भरते ती इथली स्वच्छता, निगुतीने राखलेली बाग आणि मनात घर करतात ते सर्वत्र वावरणारे निर्मळ जीव. ‘घरकुल’चा हा प्रवास बाईंची पावलोपावली परीक्षा पाहणारा होता. मोठय़ा मुलाच्या प्रगतीकडे लक्ष, वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा, शाळेतील नोकरी आणि ‘घरकुल’ हे सांभाळताना त्यांच्या मागे अनेक दुखणी लागली. या खडतर कालखंडात मोठय़ा मुलाचं, मिलिंदचं शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकणं आणि नंतर एम.टेक. होऊन अमेरिकेत जाणं या क्षणांनी जगणं सुसह्य़ केलं.

मतिमंद मुलं जेव्हा आपल्या घरात वाढतात तेव्हा त्यांची जागा एका कोपऱ्यात असते. पण ‘घरकुल’मध्ये मात्र त्यांचा सर्वत्र मोकळा संचार असतो. प्रेमाचा स्पर्श आणि नजरेतील आपलेपण यालाच ती भुकेली असतात. अशी माया देणारा सेवकवर्ग बाईंनी तयार केलाय. ६० वर्षांच्या ‘मुलांना’ आंघोळ घालणाऱ्या, त्यांची शी-शू काढणाऱ्या सेवकांना त्या स्वत:च्या मुलांप्रमाणे जपतात. आज ‘घरकुल’च्या ३० मुलांसाठी ११ सेवाव्रती सेवकांची टीम काम करते.

‘घरकुल’साठी जमीन घेतली तेव्हा तिथे गवताचं एक पातंही नव्हतं. आज बाईंनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने तिथे नंदनवन फुलवलंय. आंबा, जांभूळ, नारळ, चिकू, पेरू.. अशी शंभरावर फळझाडं तिथे डोलताहेत. या फळांच्या मोहाने पक्ष्यांची ये-जाही सुरू झालीय. बागेत फुलपाखरेही भिरभिरत असतात. गांडूळ प्रकल्पही सुरू केलाय. ‘घरकुल’मधील मुलांना बागेतील कामं जमत नाहीत, पण त्यांना झाडू मारायला आवडतं. त्यांना जे रुचतं ते त्यांच्या कलाने करून घेत त्यांना कसं रिझवावं हे बाईंकडून शिकावं.

ज्या खोणी गावात हे घरकुल उभे आहे, त्या गावाच्या प्रगतीकडेही बाईंचं लक्ष आहे. तिथल्या ग्रामपंचायतीच्या वाचनालयासाठी त्यांनी ५०० पुस्तकं व गावातील शाळेसाठी २०० पुस्तकं देऊन वाचनसंस्कृती रुजवायचा प्रयत्न केलाय. एवढंच नव्हे तर आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने या शाळेच्या मुलांसाठी त्यानी गेली दहा वर्षे दर एप्रिल महिन्यात ‘व्यक्तिमत्त्व विकास शिबीर’ घेतली आहेत.

‘घरकुल’चं प्रेरणास्थान असलेला बाईंचा कौस्तुभ २००८ मध्ये हे जग सोडून गेला. त्याच्या आठवणींवर बाईंनी लिहिलेल्या ‘तो दृष्टी देऊन गेला’ या पुस्तकाचे त्याच्या पहिल्या स्मृतिदिनाला ‘घरकुल’मध्येच प्रकाशन झालं.

‘घरकुल’साठी बाईंनी हाती धरलेली झोळी आजही सुटलेली नाही. ‘घरकुल’चं बस्तान बसेपर्यंत सरस्वती शाळेच्या नूतनीकरणाचे वारे वाहू लागले. २०१४ पासून सुरू केलेल्या बाईंच्या या कर्मयज्ञातून लाखो रुपये गोळा झालेत, पण काम अजूनही थांबलेलं नाही.

‘घरकुल’च्या कामासाठी बर्वे सर आणि बाईंना आजवर अनेक मोलाचे पुरस्कार मिळालेत. परंतु याचं श्रेय बाई संस्थेच्या असंख्य हितचिंतकांना व देणगीदारांना देतात. ‘घरकुल’मधील चोख व्यवस्था व विश्वस्तांचा पारदर्शी व्यवहार यामुळे संस्थेच्या फेब्रुवारीतील कृतज्ञता दिनाला देणगी देण्यासाठी आवाहन न करताही रांग लागते. गेली २५ वर्षे बर्वे सर आणि बाई दर शनिवार-रविवार ‘घरकुल’मध्ये जातात, पण तिथे जेवलेल्या जेवणाची पावती फाडल्याशिवाय एकही घास आजवर त्यांच्या घशाखाली उतरलेला नाही.

‘घरकुल’साठी पुढची समविचारी, निरपेक्ष विश्वस्तांची फळीही बाईंनी प्रयत्नपूर्वक मिळविली आहे. अनुराधा केळकर ही बाईंची डोंबिवलीत राहणारी विद्यार्थिनी आता विश्वस्तांच्या टीममध्ये सक्रिय आहे. तसेच मोक्षदा पाटील ही विद्यार्थिनी तर औरंगाबादची पोलीस आयुक्त आहे.

‘शिष्यात् इच्छेत पराजयम्’ हीच गुरूची खरी इच्छा असते. बाईंची ही आस वक्तृत्व, लेखन, सामाजिक क्षेत्रात चमकणाऱ्या त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी खरी ठरवली आहे.

संपर्क : ८३५५८५६२८४

waglesampada@gmail.com

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक,

इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:38 am

Web Title: loksatta durga award 2019 nandini barve slow children abn 97
Next Stories
1 लालकिल्ला : लोकांच्या प्रश्नांचे काय?
2 विश्वाचे वृत्तरंग : पोलिसांतील हैवान
3 समाजकार्याचा अखंडित यज्ञ
Just Now!
X