भक्ती बिसुरे
आज वयाच्या ३७ व्या वर्षी ७० आजी-आजोबांना आई होऊन सांभाळणाऱ्या डॉ. अपर्णा देशमुख यांच्यासारखी उदाहरणं फारच विरळा. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचं कु टुंब झालेल्या या आजी- आजोबांवर योग्य आणि हमखास उपचार व्हावेत म्हणून त्यांनी स्वत:चं रुग्णालय तर सुरू के लंच, पण लग्न न करण्याचा निर्णयही घेतला आहे. भाडय़ाच्या घरात असलेल्या या आजी- आजोबांच्या कु टुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत असली तरी त्याची त्याबद्दल तक्रार नाही, मात्र आपल्याच आई-वडिलांना मुलं रस्त्यावर कसं काय सोडून देऊ शकतात, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. या आजी-आजोबांना ‘आभाळमाया’ देणाऱ्या डॉ. अपर्णा आहेत आजच्या दुर्गा.
‘‘मागील १० वर्ष मी निराधार आजी-आजोबांसाठी काम करतेय, त्यांना निराधार म्हणणं खरं तर माझ्या जीवावर येतं, कारण मी त्यांना माझेच आजी-आजोबा मानलंय, पण त्यांना त्यांचीच मुलं रस्त्यावर कसं सोडून देऊ शकतात?’’ डॉ. अपर्णा देशमुख हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना आलेले अनुभव किती गंभीर असतील याची कल्पना येतेच.
डॉ. अपर्णा २०१० पासून निराधार आजी—आजोबांसाठी काम करीत आहेत. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं २७ वर्षांचं. बीएएमएस पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रिया या आपल्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं म्हणून त्या जळगांवहून पुण्यात आल्या. अभ्यासाच्या फीसाठी दोन वर्ष एका खासगी रुग्णालयात नोकरी केली. त्यानंतर एम. एस. (जनरल सर्जरी) साठी प्रवेश घेतला. एम. एस. करत असताना पुढील वर्षीच्या फीची तजवीज करायची म्हणून एका खासगी वृद्धाश्रमात त्यांनी नोकरीही केली. एके दिवशी काम संपवून घरी परतत असताना आलेल्या अनुभवानं अपर्णा यांना अस्वस्थ तर केलंच, पण त्या घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. रस्त्याच्या कडेला एक आजी पडून होत्या. दोन्ही पाय फ्रॅ क्चर झालेले. बेडसोर्समुळे आजींची अवस्था फारच वाईट झाली होती. त्यांनी त्या आजींना घरी आणायचं ठरवलं. एक फ्लॅट भाडय़ानं घेऊन त्या आजीसह तेथे राहू लागल्या. अपर्णाच त्या आजीची नात, मुलगी आणि आईसुद्धा झाल्या.
हळूहळू एकेक निराधार आजी-आजोबांची माहिती मिळत गेली आणि अपर्णा यांचं हे कुटुंब वाढत गेलं. आज पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ‘आभाळमाया’ या त्यांच्या आश्रमातील कुटुंबात ७० आजी-आजोबा आहेत. त्यातल्या काहींना त्यांच्या कुटुंबानं रस्त्यावर सोडून दिलं होतं, तर काहींनी वृद्धाश्रमाला पर्याय म्हणून आपल्या आईवडिलांना अपर्णाकडे सोपवलं. अपर्णा सांगतात, एवढय़ा मोठय़ा कुटुंबाला एकत्र ठेवायचं तर जागा हवी. वृद्ध आजी—आजोबांचे आजार वेगळे असतात. सोसायटीतील फ्लॅटमध्ये इतर कुटुंबांना त्यांचा आणि त्यांचा आजी—आजोबांना त्रास होणं शक्य असतं. म्हणून आम्ही एक इमारत भाडय़ानं घेतली. जे आजी—आजोबा पैसे भरून येतात त्यांचंही आम्ही स्वागत करतो, कारण आर्थिक जुळवाजुळव महत्त्वाची आहे. मात्र, जे संपूर्ण निराधार आहेत, त्यांनाही सामावून घेतलं जातं. कोणताही कौटुंबिक आधार नसलेल्या आजी—आजोबांचं जेवणखाण, कपडालत्ता, औषधं हे सगळं माझा डॉक्टर म्हणून मिळणारा पगार आणि पैसे भरून येणाऱ्या आजी—आजोबांकडून मिळणारं उत्पन्न यातून केलं जातं. त्यामुळे दिवसाला १८ ते २० तास शस्त्रक्रिया कराव्या लागल्या तरी मी तयार असते. मला कोणतंही सरकारी अनुदान नाही, मागच्या दोन—तीन वर्षांत हे काम माहिती झाल्यानंतर काही देणग्या किंवा मदत मिळू लागली, पण आजी—आजोबांचं आजारपण, शस्त्रक्रिया, महागडी औषधं पाहाता आजही ती कमीच पडते, याचं वाईट वाटतं.
डॉ. अपर्णा सांगतात, ‘‘अगदी सुरुवातीच्या काळात एक आजोबा आजारी पडले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. ६० हजार रुपये बिल झालं. आयत्यावेळी इतके रुपये उभे करणे शक्य नसतं. त्यावेळी माझी मैत्रीण डॉ. आरती गोलेचा हिच्यासह पुण्याच्या नऱ्हे भागात ‘सिल्व्हर हॉस्पिटल’ सुरू केलं. माझी अट एकच होती, माझ्या कुटुंबातल्या आजी-आजोबांसाठी पाच बेड राखीव असावेत. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत नाही, पण तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिओथेरपी यांचा खर्च पेलावा लागतोच.’’
मागील दहा वर्ष अपर्णा यांनी या कामात स्वत:ला वाहून घेतलंय. या काळातले सुखद अनुभव आहेत का, या प्रश्नाला त्यांच्याकडे दुर्दैवाने नाही हेच उत्तर आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा खर्च परवडणारी मुलंही, अपर्णा यांच्याकडे निराधारांसाठी मोफत सोय आहे हे समजल्यावर आईची ओळख मोलकरीण अशी करून देतात. पहिल्या महिन्यात पैसे भरून आई-वडिलांना दाखल करून गेलेली मुलं दूरध्वनी क्रमांक, पत्ता बदलून परागंदा झाल्याचेही अनुभव त्यांच्याकडे आहेत. ‘करोना’ साथीच्या काळात अपर्णा आणि त्यांच्या कु टुंबाने अनेक आव्हानांचा सामना केला. स्वत: डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय अडचणी सोडवणं त्यांना शक्य झालं. मात्र, अनेक एकटय़ा निराधार आजी-आजोबांना सामावून घेण्यासाठी त्यांना आलेले फोन फारच अस्वस्थ करणारे होते.
निराधार आजी—आजोबांसाठीच काम करायचं हे निश्चित झाल्यावर अपर्णा यांनी स्वत:चे आई बाबा आणि भावंडांना त्याबाबत कल्पना दिली. अनेक वर्षे समाजसेवेत असलेल्या त्यांच्या वडिलांनी, डॉ. अनिल देशमुख यांनी लेकीला संपूर्ण पाठिंबा दिला. अपर्णा सांगतात, ‘‘मी अविवाहित राहायचं ठरवलं, पण हे माझंच कु टुंब असल्यानं मी एकटी नाही. अर्थात, मी ‘ज्येष्ठांची’ पालक असल्यामुळे त्यांचा मृत्यू, त्यातून होणारा वियोगही मला वारंवार अनुभवावा लागतो. सुरुवातीला त्याचा खूप त्रास झाला, पण अशा प्रसंगांनी मी कणखर बनलेय! सध्या ६५ ची क्षमता असतानाही आम्ही ७० जणांचं कुटुंब आम्ही चालवत आहोत. धान्य, भाजीपाला अशी मदत आम्हाला खूप मिळते. पण माझा ‘आभाळमाया’ हा वृद्धाश्रम दोन लाख
४० हजार रुपयांच्या भाडय़ाच्या जागेत उभा आहे. भाडं भरण्यासाठी, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसेच लागतात. त्यामुळे शक्य त्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपातील मदतच करावी, अशी विनंती ती आवर्जून करते. शिवाय, समाजात नातेसंबंधांचे बदलणारे प्राधान्यक्रम बघता वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे, हे कटू सत्य ओळखून सरकारनंही अशा प्रयोगांना पाठबळ द्यावं अशी इच्छाही व्यक्त करते.’’
डॉक्टर होऊन मोठं हॉस्पिटल सुरू करावं, असं स्वप्न बघणारे अनेक जण आहेत. मात्र, निराधारांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेणारे डॉक्टरही महाराष्ट्राला नवे नाहीत. त्या अनेक डॉक्टरांच्या मांदियाळीत
डॉ. अपर्णा देशमुख हे नाव आता नव्यानं जोडलं जातंय.. म्हणूनच ‘नवदुर्गा’ म्हणून तिची दखल घेणं महत्त्वाचं वाटतं!
संस्थेचा पत्ता : आभाळमाया
स्वप्निल बिल्डिंग, नॅशनल पार्क सोसायटी,
माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे —४११०५२
ईमेल – dr22aparnad@gmail.com
दूरध्वनी – ७७५७०७१०९३
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
यश कार्स
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लि.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 23, 2020 12:15 am