27 November 2020

News Flash

इतिहासाचे संवर्धन आणि जतन : मधुरा जोशी-शेळके

कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके आहेत आजच्या दुर्गा.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

सोलापूरजवळील नीरा नरसिंगपूरच्या मंदिरातील तीनशे वर्ष जुन्या गरुडाचे जतन-संवर्धन असो, औंध कलादालनातील राजा रविवर्मा यांच्या १२८ वर्ष जुन्या तैलचित्रांचं संवर्धन,  भोपाळच्या जेहन्नुमा पॅलेसमधील शाही तलवारींचे जतन-संवर्धन किं वा हैदराबादच्या संग्रहालयातील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘ममी’चे जतन अशा नानाविध कामांचा अनुभव असणाऱ्या मधुरा जोशी शेळके  यांना इतिहास हा पुढच्या पिढीसाठीचा ठेवा असल्याने वारशाचं संवर्धन आणि जतन करणं हे कर्तव्य वाटतं. ‘एएमएस फाइन आर्ट कॉन्झर्वेशन’ या आपल्या संस्थेतर्फे त्या देशभरातील पुरातन वारशाची जपणूक करीत आहेत. कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके आहेत आजच्या दुर्गा.

सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन ही एरव्ही आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेली गोष्ट. डिजिटल युगातली नवविचारांची पिढी मात्र आपल्या सांस्कृतिक, सामाजिक मुळांशी जोडून घेत पुढे जाण्यावर भर देणारी आहे. एकविसाव्या शतकात आयआयटीसारख्या क्षेत्रातील गलेलठ्ठ पगार आपल्याला कलासंवर्धनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळणार नाही, याची पक्की खात्री असतानाही तरुण पिढी याकडे आकर्षित होते आहे, असे कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके  विश्वासाने सांगतात.

लहानपणीपासून चित्रकलेवर असलेले प्रेम आणि त्याचा ध्यास मधुरा यांच्यासाठी ‘आर्ट कॉन्झर्वेशन’ अर्थात कलासंवर्धनाचे नवे दालन खुले करता झाला. ज्यांच्या चित्रांचा अभ्यास करत करत आपण पुढे आलो, तीच चित्रं, शिल्पं पुढच्या पिढीपर्यंत आहेत त्या मूळ स्वरूपात पोहोचली नाहीत, तर पुढच्या पिढीला आपल्या समृद्ध कलेच्या वारशाची जाणीवच होणार नाही. त्यांचा अभ्यासही पुढे जाणार नाही, हा विचार मधुरा यांना अस्वस्थ करून गेला. म्हणूनच ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी’ या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन हस्तलिखितांपासून जुनी चित्रं, शिल्पं अशा विविध कलावस्तूंच्या जतन आणि संवर्धनात मधुरा आता रमलेल्या आहेत. डिजिटल युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटली जतन आणि संवर्धनाचे पर्याय निर्माण झाले आहेत, मात्र कलावस्तूंच्या बाबतीत तसे होत नाही. पुरातन शिल्पं, चित्रं, कलावस्तू आहे त्याच मूळ स्वरूपात जतन कराव्या लागतात. या वस्तू बिघडल्या, खराब झाल्या तर त्यांचे मूळ सौंदर्य अबाधित ठेवूनच त्यांचे पुन्हा निर्माण करावे लागते आणि हे काम हातानेच करावे लागते. त्यामुळे कलासंवर्धनाचे काम हे खूप जिकिरीचे आणि महत्त्वाचे आहे, असे मधुरा सांगतात. शाळेत असतानाच मधुरा यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये जायचा निश्चय केला आणि त्यानुसार ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स’ची पदवी घेतली. त्याचदरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयातील तत्कालीन क्युरेटर दिलीप रानडे यांनी सुचवल्यानुसार मधुरा यांनी लखनौमधील ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी’ या संस्थेतून कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर  हस्तलिखितांच्या संवर्धनासंदर्भात ‘ओडिशा कॉन्झर्वेशन सेंटर’मधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमही पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘इन्टॅक’मध्ये रुजू होऊन त्यांनी विशाखापट्टणम येथील संग्रहालय, ‘कोलकाता क्लब कलेक्शन’, मुंबईतील ‘के. आर. कामा ओरिएंटल लायब्ररी’ अशा विविध ठिकाणी तैलचित्रे, हस्तलिखिते, दुर्मीळ पुस्तकांच्या जतन-संवर्धनाचे काम केले. याच ‘इन्टॅक आर्ट कन्झर्वेशन सेंटर’चे सदस्य म्हणून मधुरा आणि त्यांचे पती अनंत यांच्याकडे ‘डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालया’तील कलावस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या संग्रहालयातील कामाचा अनुभव खूप मोठा आणि महत्त्वाचा होता, असे त्या सांगतात. याच संग्रहालयातील कामासाठी त्यांच्या टीमला ‘युनेस्को एशिया-पॅसिफिक हेरिटेज अ‍ॅवॉर्ड’ मिळाला.

२०१५ मध्ये मधुरा आणि अनंत यांनी ‘एएमएस फाइन आर्ट कॉन्झर्वेशन’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून कलादालने, संग्रहालये, कलासंग्राहक, कॉर्पोरेट आर्ट कलेक्टर्स यांच्या संपर्कात राहून पुरातन वस्तूंच्या जतन-संवर्धनाचे त्यांचे काम अव्याहत सुरू आहे. त्या सांगतात, ‘‘आम्ही जेव्हा कलासंवर्धक म्हणून सुरुवात केली होती तेव्हा जुन्या वस्तूंचे जतन-संवर्धन केले जाऊ शकते, याची फारशी जाणीवच लोकांमध्ये नव्हती. अनेकदा घरातील पिढीजात चालत आलेल्या वस्तू तुटल्या-फु टल्या की त्या टाकू न दिल्या जात. मात्र इंटरनेटमुळे आपला इतिहास, संस्कृती, कलावारसा याविषयी लोक अधिक जागरूक झाले आहेत. अनेकदा लोक स्वत:हून आमच्याकडे दुर्मीळ वस्तू घेऊन येतात, तेव्हा या वस्तूंचे पुनर्निर्माण करताना त्यातील मूळ तत्त्व हरवू नये, याच्या सूचनाही तेच आम्हाला देत असतात. यातूनच कलेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती बदलला आहे हे लक्षात येतं.’

संवर्धन आणि जतनाचे हे कार्य किती महत्त्वाचे आहे हे सांगताना त्यांनी टाळेबंदीच्या काळातला तंजावर चित्रशैलीतील पुरातन प्रतिमेच्या पुनर्निर्माणाचा अनुभव सांगितला, ‘‘लाकडावर केलेली तंजावर चित्रशैलीतील लक्ष्मीची एक मोठी जुनी प्रतिमा आमच्याकडे पुनर्निर्माणासाठी आली होती. घरात लागलेल्या आगीत लाकडी चौकटीवर असलेली ही प्रतिमा जळली होती. लक्ष्मीची ही प्रतिमा बनवण्यासाठी सोन्याचा वर्ख आणि मूल्यवान खडे यांचा वापर करण्यात आला होता. त्यांच्याकडे असलेले या प्रतिमेचे छोटे छायाचित्रही संदर्भासाठी त्यांनी दिले होते. ज्या लाकडी महिरपीवर ही प्रतिमा होती ती पूर्ण जळून गेली होती, पण ती टाकू न देणे शक्य नव्हते. उलट त्याच लाकडाला मजबुती देत हे काम कोळजीपर्वूक करावे लागले. तंजावर चित्रशैली समजून घेण्यापासून तशी प्रतिमा बनवणाऱ्यांकडून त्याच पद्धतीचा सोन्याचा वर्ख, खडे मागवून घेण्यापासून सगळी कामे आम्ही टाळेबंदीच्या काळात केली. पुन्हा तशीच प्रतिमा घडवण्याचा हा अनुभव अनोखा होता,’’ असे मधुरा सांगतात.

सोलापूरजवळील नीरा नरसिंगपूरच्या मंदिरातील तीनशे वर्ष जुन्या गरुडाचे जतन-संवर्धन, टीसीएसच्या देशभरातील सगळ्या कार्यालयांमधील चित्रांचे जतन, औंध कलादालनातील राजा रविवर्मा यांची १२८ वर्ष जुनी तैलचित्रे, युरोपीय तसेच भारतीय कलाकारांच्या चित्रांचे संवर्धन, भोपाळच्या जेहन्नुमा पॅलेसमधील तैलचित्रे आणि शाही तलवारींचे जतन-संवर्धन, हैदराबादच्या संग्रहालयातील तीन हजार वर्षांपूर्वीच्या ममीचे जतन अशा नानाविध कामांचा अनुभव आज मधुरा यांच्या गाठीशी आहे.

आपल्याकडच्या या कलापरंपरा इतकी वर्ष टिकल्या आहेत, म्हणजेच त्यांच्यात नक्की काही तरी आहे, त्यात दडलेली ही कला-वैशिष्टय़ं, संस्कृ ती आणि इतिहासाची बीजं पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचलीच पाहिजेत. हा ध्यास घेऊन कलेचा समृद्ध वारसा जतन-संवर्धन करणारे मधुरासारखे

कलासंवर्धक दुर्मीळच! पुरातन कलावस्तूंमध्ये नव्याने प्राण फुंकून त्यांना संजीवनी देणाऱ्या मधुरा यांच्या कार्यातून इतरांनाही इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळो हीच सदिच्छा.

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.

यश कार्स

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:25 am

Web Title: loksatta durga preservation and preservation of history madhura joshi shelke abn 97
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा : दानयज्ञास भरभरून प्रतिसाद
2 आभाळमाया : डॉ. अपर्णा देशमुख
3 ऊसतोड मजुरांच्या संपापलीकडचे प्रश्न
Just Now!
X