निसर्गभ्रमंती करताना पूर्वाचलातील दुर्गम भागांतील आरोग्यविषयक सुविधांची उणीव त्यांना अस्वस्थ करू लागली. तेथील  गोरगरीब लोकांसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो अमलातही आणला. त्या आजच्या नवदुर्गा आहेत अहमदाबादच्या नामवंत दंत शल्य चिकित्सक डॉ. प्रतिभा आठवले.
You can serve your nation through your own profession. वडिलांनी मनावर बिंबवलेली ही आध्यात्मिक शिकवण अर्थात भगवद्गीतेतील कर्मयोग त्यांच्याही रंध्रारंध्रांत रुजला आहे. त्या कर्मयोगी आहेत, दंतचिकित्सक वा डेंटिस्ट डॉ. प्रतिभा आठवले. गेली १३ वर्षे स्वत:चा व्यक्तिगत डॉक्टरी पेशा सांभाळत वर्षांतले २१ दिवस त्या पूर्वाचलातील लोकांसाठी, त्यांच्या दंतचिकित्सेसाठी राखून ठेवतात. आज त्यांनी तिथे पाच डेंटल क्लिनिक्स सुरू केली असून दोन ठिकाणी डेंटल लॅबॉरेटरीज काढण्यात सध्या त्या व्यग्र आहेत. तेथील लोकांना मोफत दंतसेवा पुरवण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे.
   मुंबईतून बी.डी.एस. झाल्यावर लग्नानंतर गेली ३३ वर्षे त्या अहमदाबाद येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करीत आहेत. ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती हा त्यांचा छंद. तो जोपासतानाच पूर्वाचलातील दुर्गम भागांतील आरोग्यविषयक सुविधांची उणीव त्यांना अस्वस्थ करू लागली. त्यात दातांचे दुखणे तर सहन करण्यास अत्यंत कठीण. त्या लोकांसाठी आपण काय करू शकतो, या विचारातून त्यांनी आसाम, नागालँड, अरुणाचल, मेघालय आणि काही वेळा मणिपूर या ठिकाणी जाऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला.
विवेकानंद केंद्र, विद्यार्थी परिषद, सेवाभारती यांच्या सहकार्याने त्यांच्या कल्पनेला मूर्तस्वरूप आले आणि त्या २००० सालापासून त्या दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत २१ दिवस पूर्वाचलला जाऊ लागल्या. आजही तेथे जाताना दंतचिकित्सेसाठी लागणारी सगळी साधनसामुग्री, औषधे, काही आवश्यक उपकरणे, अगदी १० किलो कडुनिंबाची पावडर असा सरंजाम घेऊन त्या जातात. क्लिनिकचा सेटअप स्वत: उभा करतात आणि मग रुग्णतपासणी, केसपेपर्स, औषधे, उपचार अशी सर्व कामे करतात. प्रत्येक ठिकाणी ३ ते ४ दिवस एक कॅम्प असतो. कॅम्प संपल्यावर सर्व सामग्री गाडीत ठेवून दुसऱ्या ठिकाणी मोर्चा वळवतात.
सुरुवातीच्या काळात डॉक्टर हे सारे एकटीनेच करायच्या. पहिल्यांदा त्यांनी डेंटल खुर्ची नेली ती तिचे चार भाग करून. तिथे पोहोचल्यावर स्वत: खटपट करून त्यांनी ती एकत्र केली. जेव्हा चार भागांतली ही खुर्ची नीट उभी केली तो क्षण त्यांच्यासाठी अतिआनंदाचा होता. त्या काळात त्यांच्याकडे अगदी साधी खुर्ची, दात साफ करायला, चांदी भरायला छोटी मायक्रोमोटर होती, त्यामुळे खूपच वेळ वाया जाई. नंतर कॉम्प्रेसर भेट मिळाल्यावर त्यांनी तो दिब्रुगढच्या विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात ठेवायला सुरुवात केली. कॅम्पला जाताना तो घ्यायचा व परत दिब्रुगढच्या कार्यालयात ठेवायचा अशी शिस्त. परंतु आता स्थानिक लोकांना त्यांनी इतके आपलेसे केले आहे की तिथली मुले-मुली आनंदाने सर्वतोपरी मदत करतात. शिवाय आता केंद्र, संघटनाही त्यांना मदत करीत आहेत. अनेक सेवाभावी संस्थांनीही महागडी उपकरणे, डेंटल खुर्ची तसेच औषधांसाठी आर्थिक मदत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हळूहळू बस्तान बसू लागले आहे. दरवर्षी एक एक करीत त्यांनी अल्ट्रासाऊंड स्केलर्स, लाइट क्युअर, एअर रोटर, तपासण्याची, फिलिंगची साधने घेतली त्यामुळे घरून हे सर्व नेण्याचा त्रास कमी झाला आहे.
२०१० मध्ये मेघालयातील बरकोना येथे त्यांनी कायमस्वरूपी क्लिनिक सुरू केलं. त्यामुळे महिन्यातून ८-१० दिवस इतर डॉक्टरांची मदत मिळू लागली. अर्थात हे करताना काही अडचणीही आल्या. एकदा फोल्डिंग खुर्चीसहित नवा डेंटल सेटअप तयारही झाला. तो गोहत्तीला पाठवायचा होता. पण दोन महिने झाले तरी सामान तिथे पोहोचले नव्हते. काही लोकांचा विरोध होता. तेव्हा बैठा सत्याग्रह करून त्यांनी प्रश्न सोडवला. आणि ‘दंतसेवा’ निर्धोक सुरू झाली.
२०१३ मध्ये आसाम, मणिपूर, मेघालय येथे दातांचे ५ कायमस्वरूपी दवाखाने काढले आहेत. या सर्वाची पूर्वतयारी अहमदाबाद येथूनच त्या करतात, तीही घरातील सर्व जबाबदारी पार पाडत. सध्या आसाम, मणिपूर येथे ‘डेंटल लॅबॉरेटरीज’ काढण्यात त्या व्यग्र आहेत. फर्नेस, कास्टिंग मशीन यांसारखी यंत्रसामग्री आताच भरपावसाळय़ात तेथे पोहोचलीसुद्धा. त्याचे सर्व स्वरूप त्यांनी स्वत: तर जाणून घेतलेच, पण त्यासाठी चार स्थानिक मुलींना त्यांनी अहमदाबादला आणले. त्यांना तो अभ्यासक्रम करायला लावला. त्यांच्या शिक्षणापासून राहण्यापर्यंतची सर्व जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली.
पूर्वाचलाला जाणे हे फक्त २१ दिवसांचे असले तरी त्याचा खर्च लाख रुपयांच्या वर जातो. कारण त्या अनेक गोष्टी घरूनच घेऊन जातात. अगदी आवश्यक ती औषधे, उपकरणे. त्यांच्या कामाची माहिती आता अहमदाबादमध्येही झाली असल्याने त्यांना मेडिकलच्या दुकानांतून कमी किमतीतही अनेक औषधे मिळतात. शिवायही इतर खर्च असतोच. त्यांचे  मॅनेजमेंट कन्सल्टंट असणारे पती जयंत आठवले आणि त्यांच्या दोन्ही मुली यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. २००० साली जेव्हा त्यांनी या कामाची सुरुवात केली तेव्हा त्यांची मोठी मुलगी १० वर्षांची व छोटी फक्त ५ वर्षांची होती, तरीही मुलींनी तू जाऊ नकोस म्हणून ना हट्ट धरला, ना त्यांची वाट अडवली. कारण घराची जबाबदारी त्यांच्या पतीने घेतली होती. ती अगदी आजतागायत. त्यांची धाकटी मुलगी सीबीएसई बोर्डात गुजरातमधून पहिली आली.
   पूर्वाचल हे त्यांचे जिव्हाळय़ाचे बेट झाले आहे. दंतचिकित्सेशिवाय इतरही गोष्टी त्या करतात. अतिशय दुर्गम भागांतील शाळांमध्ये जाऊन मुलांशी समरस होऊन खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना शिस्तीचे, स्वच्छतेचे, आरोग्याचे पाठ देतात. कित्येक मुलांना मायेचे कोणीच नसते, त्यांची त्या माऊली होतात. आज कित्येक मुले दिवाळीत त्यांच्या येण्याची वाट  बघत असतात.
भारताच्या पश्चिमेची एक स्त्री पूर्वाचलात जाऊन त्यांच्या सुख-दु:खात समरस होते, या त्यांच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या ‘पूर्वरंग हिमरंग’ पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा ‘केशवसृष्टी’ पुरस्कार ५ ऑक्टोबरला विकास आमटे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचे एक लाख रुपये व मानचिन्ह त्यांनी ‘सेवाभारती’ला देण्याचे आधीच जाहीर केले आहे. खरोखरच हा त्या पुरस्कारांचा सन्मान आहे.
– डॉ. प्रतिभा जयंत आठवले
संपर्क- ०९४२६३६७४७२
– सुलभा आरोसकर
संपर्क- ०९९६७१७९८७०

आपणही पाठवू शकता आपल्या आजूबाजूच्या दुर्गाविषयी, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अशा स्त्रियांचा माहितीवजा लेख ८०० शब्दांपर्यंत आम्हाला पाठवा. पाकिटावर वा ई-मेल पाठवल्यास सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहा. सोबत त्यांचा फोटो आणि संपर्क क्रमांकही पाठवावा. आमचा पत्ता- प्लॉट नं. ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. आमचा ई-मेल durga.loksatta @expressindia.com

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!