रस्त्यावर अर्थहीन भटकणाऱ्या मनोरुग्णाला तिने घरी आणले आणि तेच तिच्या आयुष्याचे ध्येय झाले. नवऱ्याचा पगार आणि शेतीचं उत्पन्न यांच्या जिवावर तिने आज अनेक मनोरुग्णांना आपल्या घरात आश्रय दिला; परंतु त्यांचा त्रास होणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिलाच वेडं ठरवायचा प्रयत्न केला. असंख्य अडचणींना मात देत, स्वत:चे आईपण सांभाळत या रुग्णांवर भरभरून माया करणारी आजची नवदुर्गा आहे, प्रज्ञा राऊत.
नात्यातील माणसांची दृष्टी बदलते, तिथे त्यांना सांभाळायला घेऊन येणे, हा विचारच किती धाडसाचा असेल. तेही एका नव्हे, अनेक मनोरुग्णांना सांभाळण्याचे काम; पण ते आव्हान पेलले प्रज्ञा राऊतने. तेव्हा ती अवघी पंचविशीची होती. आज दहा वर्षांनंतर अनेक अडचणींना तोंड देत तिने या मनोरुग्णांसाठी ‘श्रीकृष्ण शांतिनिकेतन’ आणि ‘नक्षत्रांचं अंगण’ स्थापन केले आहे,  मानसिक रुग्णांना सांभाळणे हे फार जिकिरीचे काम. एखादा माणूस मानसिक रुग्ण झाला किंवा असला, की त्याच्याकडे बघायची समाजाचीच काय, पण अनेकदा रक्ताच्या  तेही स्वखर्चाने.
 जन्मत:च मानसिकदृष्टय़ा अविकसित मुलांना ते लहान असेतोवर आईवडील सांभाळून घेतात; परंतु काही विशिष्ट वयानंतर त्या आईवडिलांनाही त्यांना सांभाळणे अनेकदा अशक्य होते. अशा वेळी त्यांना सांभाळणारे कोणी नसेल तर त्यांना थेट मनोरुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो किंवा मग रस्त्यावर सोडले जाते. मनोरुग्णांना काही दिवस नातेवाईक बघायला येतातही; पण नंतर नंतर तेही कमी होत जाते आणि नंतर तर ते येणे पूर्णपणे बंद होते. रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्यांना तर उपाशीतापाशी भटकण्याशिवाय पर्याय नसतो. अशा स्थितीत त्यांचे पुनर्वसन हे एक आव्हान ठरते.  
मदर तेरेसांना आदर्श मानणाऱ्या प्रज्ञाचा प्रवास असाच खडतर, खाचखळग्यांनी भरलेल्या वाटेवरून झाला. मुंबईत असताना तिला रस्त्यावर एक मनोरुग्ण दिसला आणि त्याला तिने घरी आणले. तेव्हा आजूबाजूच्यांनी तिच्यावर ताशेरे ओढायला सुरुवात केली. एकीकडे शेजारच्यांचा जाच आणि दुसरीकडे त्या मनोरुग्णाची मन:स्थिती सांभाळताना खूप मोठी कसरत तिला करावी लागली; पण तिने निर्णय घेतला होता. पती प्रमोद राऊत यांची सोबत असल्याने तर तिने तो निर्णय निर्धारात बदलला आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या, नातेवाईकांना जड झालेल्या मनोरुग्णांचा सांभाळ आपण करायचाच यासाठी तिचे प्रयत्न सुरू झाले.
  तरुणाईत खरं तर वारेमाप इच्छा-आकांक्षा मनात फेर धरत असतात. २००४ मध्ये नागपुरात आल्यानंतर मनातल्या त्या सर्व इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवत तिने या नव्या इच्छेला पाणी घालणे सुरू केले. नागपुरातीलच बेलतरोडी परिसरात त्यांची छोटीशी जागा होती. त्या जागेवर या मनोरुग्णांना आसरा देण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी तिने शहरातील मनोरुग्णालय, तिथले डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांची भेट घेण्यास सुरुवात केली. तिच्या मनातील कल्पना तिने त्यांना सांगितली, सल्ला घेतला. अर्थात सुरुवातीला तिच्या या विचारांची काही जणाकडून चेष्टाही झाली, कारण कायदा, नियम याला परवानगी देणे शक्य नव्हते; पण आता तिला कोणीही तिच्या निर्णयापासून मागे हटवणार नव्हते.
तिला भेटत गेलेल्या एक एक मनोरुग्णाच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांना समजावून आणि कुटुंबाची सहमती घेतल्यानंतर त्या त्या मनोरुग्णाला ती बेलतरोडीच्या तिच्या छोटय़ाशा झोपडय़ात घेऊन येत गेली. एक वेळ तर अशी आली की, तिचे हे वेड बघून तिलाच वेडय़ात काढण्याचा प्रयत्न सुरू झाला, मात्र निश्चय कायम असल्याने ती डगमगली नाही.  सुरुवातीला तर ठीक होते, पण जसजशी ही संख्या वाढत गेली तसतसा शेजारच्यांच्या तक्रारींचा भडिमार तिच्यावर सुरू झाला. बेलतरोडीला ज्या ठिकाणी तिचे छोटेसे घर होते, त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्या मनोरुग्णांविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. नंतर तिच्याविरोधात तक्रारींचा जोर वाढत गेला. इतका की, तिला तिच्या घरात राहणे असह्य़ होऊ लागले. तिचे ते स्वत:चे घर असतानासुद्धा त्या जागेवरून त्यांना निराश्रित करण्याचा प्रयत्न एक-दोनदा नव्हे, तर कैक वेळा झाले; परंतु ती ठाम होती. आता या मनोरुग्णांना सोडायचे नाही, हा तिचा निश्चयच तिला या विरोधापासून वाचवून होता.
 खरे तर तिने या कामाची सुरुवात केली तेव्हा तिचे स्वत:चे मूल या जगात येण्याच्या तयारीत होते आणि काम सुरू झाले तेव्हा ते या जगात आलेही. आपल्या छोटय़ाशा मुलीला सांभाळत ही सारी कसरत सुरूहोती, मात्र शेजारच्यांच्या धमक्यांना, रात्री घरावर दगडफेक करणे, वस्तू चोरीला नेणे आदी गोष्टींना बाजूला सारत प्रज्ञाने या मनोरुग्णांना स्वत:ची कामे स्वत: करण्याच्या सवयी लावण्याचा प्रयत्न करून पाहिला. हे फार सोपे नव्हते. बालमनोरुग्णाला सांभाळणे काहीसे सोपे, पण तिशी पार केलेल्या मनोरुग्णांना वळण लावणे हे फार मोठे दिव्य होते. शेजारच्यांच्या तक्रारींचा जोर वाढतच होता, मात्र या सर्वावर तिने तिच्या पद्धतीने मात केली. सुरुवातीला आपल्याच झोपडय़ात आसरा दिलेल्या या मनोरुग्णांसाठी तिने छोटे वेगळे झोपडे उभारले.
अनेक मनोरुग्णांचे नातेवाईक केवळ त्याला वा तिला सोडून निघून जात. त्यांच्या खाण्यापिण्यासाठी पैसे लागतात, ते द्यावे, हा विचारही त्यांनी कधी केला नाही. प्रज्ञा हे सारे आपल्याच पैशातून करीत होती. बघता बघता मनोरुग्णांची संख्या २५ वर पोहोचली. केवळ आणि केवळ प्रज्ञाने त्यांचा केलेला औषधोपचार, तब्येतीची घेतलेली काळजी आणि चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांचे फलित म्हणून तिच्या या छोटय़ाशा घरटय़ातील ही तिची मुले सुधारण्याच्या मार्गावर लागली.  त्यातील कित्येक रुग्ण पूर्णपणे बरे झालेही. तिच्या कणखर शिकवणुकीमुळे त्यातील काही जण तर मनानेही मोठी होऊ लागली होती.
अशा वेळी त्यांना घरी पाठवणे सहज शक्य होते आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न करून पाहिला, मात्र कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नव्हते. इतकेच कशाला, साधी ओळख दाखवायलाही तयार नसल्याचेही प्रकरण घडले आहे. तेव्हा मात्र तिने त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्याची आशा सोडली आणि बेलतरोडीतच त्यांच्यासाठी ‘श्रीकृष्ण शांतिनिकेतन’ उभारले.     नागपुरातच वाचनालयात कामाला असलेल्या नवऱ्याचा पगार आणि आर्वी इथं असलेली तिची शेती या बळावर प्रज्ञाने ‘श्रीकृष्ण शांतिनिकेतन’ची स्थापना केली. वर्धा जिल्ह्य़ातल्या आर्वी या त्यांच्या गावातही त्यांनी आता या मनोरुग्णांसाठी ‘नक्षत्रांचं अंगण’ सुरू केले आहे. या सर्वाना तिनं कागदाच्या थल्या बनवण्यापासून पॅकिंगची सर्व कामे शिकवण्यास सुरुवात केली आहे. प्रज्ञाची मुलगी आज मोठी झाली आहे; पण आईचा वारसा तिनंही घेतला आणि तीदेखील त्यांना तेवढय़ाच प्रेमानं सांभाळते आहे.
  जग काय म्हणेल याचा विचार न करता प्रज्ञाने सुरू केलेले अथक प्रयत्नच तिला आज कामाचे समाधान देत आहेत.
-प्रज्ञा राऊत
संपर्क- ०९९७०४२५९४५

आपणही पाठवू शकता आपल्या आजूबाजूच्या दुर्गाविषयी, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अशा स्त्रियांचा माहितीवजा लेख ८०० शब्दांपर्यंत आम्हाला पाठवा. पाकिटावर वा ई-मेल पाठवल्यास सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहा. सोबत त्यांचा फोटो आणि संपर्क क्रमांकही पाठवावा. आमचा पत्ता- प्लॉट नं. ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. आमचा ई-मेल durga.loksatta @expressindia.com