20 January 2018

News Flash

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी!

कला वक्तृत्वाची : शांता शेळके

शेखर जोशी | Updated: March 1, 2017 12:35 PM

कला वक्तृत्वाची : शांता शेळके

साहित्य सभा, बडोदे या संस्थेचे वार्षिक संमेलन ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या ‘आजची मराठी कविता- स्वरूप व समस्या’ या भाषणातील काही भाग..

कविता हा माझा सर्वाधिक आवडीचा, कुतूहलाचा व चिंतनाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे मी कविता फार प्रेमाने आणि पूर्वग्रहरहित वृत्तीने वाचत आले आहे. माझ्यासारख्या काव्यप्रेमी व्यक्तीला आजची मराठी कविता वाचताना काही गोष्टी तीव्रतेने जाणवतात. काही उणिवा तिच्यात दिसून येतात. काही अपप्रवृत्ती तिच्यामध्ये वाढीला लागत आहेत असे वाटते.

पूर्वीच्या काळी कविता लिहिताना वृत्त, जाती, छंद अशा अनेक रचनाप्रकारांवर किमान काही प्रभुत्व असावे लागे. आज मुक्तछंदात कविता लिहिली जात असल्यामुळे कवींना तेवढेही ज्ञान असण्याची गरज भासेनाशी झाली आहे. कविता नेमके कोणत्या रचनेला म्हणावे यासंबंधी अनेकांच्या मनात फार संदिग्ध व धूसर कल्पना असतात. त्यामुळे आज कालबाह्य़ ठरलेल्या वृत्तात व छंदात लिहिली जाणारी सांकेतिक कविता, मंगलाष्टके, बारशाची कविता, स्वागतगीते, मान्यवर मंत्र्यांच्या प्रशस्तीखातर लिहिली जाणारी पद्यात्मक रचना या साऱ्या ‘कविता’च असतात. यामुळे कवींची संख्या नको तितकी वाढत आहे.

जिला ‘कविता’ हे नाव प्रामाणिकपणे देता येईल अशी फार मोजकी रचना आपल्यासमोर येते. पण तीही पूर्णत: निर्दोष वा समाधानकारक नसते.

अशा कवितेचा विचार कताना प्रथम नजरेसमोर येते ती दलित कविता. ही कविता प्रथम लिहिली गेली ती प्रामुख्याने पांढरपेशा प्रस्थापित कवितेच्या विरोधात. हिंदू धर्मातील चातुर्वण्र्यव्यवस्था, जातीपातींची उतरंड, विषमता समाजाने निर्माण केली आहे तिच्याशी असलेला कट्टर विरोध व्यक्त करावा, तिच्यावर हल्ले चढवावेत ही दलित कवितेची मूळ भूमिका होती. ‘विद्रोह’ हा तिचा परवलीचा शब्द होता. डॉ. आंबेडकर यांनी दलित समाजाची अस्मिता जागृत केली. दलित साहित्याचा प्रथम जो उत्तम अविष्कार झाला तो मुख्यत्वे आत्मचरित्र आणि कविता या साहित्यातून. दलित कवितेने एक अगदी वेगळे अनुभवविश्व प्रथमच मराठी कवितेत आणले. दलित कवितेने एकूणच मराठी कवितेच्या कक्षा विस्तारल्या, इतकेच नव्हे तर तिने या कवितेला एक वेगळे परिमाणही दिले, परंतु आता दलित कवितेतली वाफ गेली आहे, असे वाटू लागते. मराठी कवितेतील सांकेतिकतेच्या विरोधात उभ्या असलेल्या दलित कवितेने आपलेही काही संकेत निर्माण केले आहेत की काय अशी शंका येऊ लागते. केवळ विध्वंसक, आरडाओरड करणारी, अपशब्द वापरणारी कविता फार काळ टिकून राहणे शक्य नव्हते. दलितांना, पीडितांना अंतर्मुख करून त्यांना विद्रोहाला प्रवृत्त करण्याची तिची शक्तीही आता लुप्त होत आहे.

जी गोष्ट दलित कवितेची तीच बाब ग्रामीण कवितेची. मराठीत प्रथम ग्रामीण किंवा तेव्हाचा शब्द वापरायचा झाला तर जानपद कविता लिहिली गेली ती रविकिरण मंडळांच्या कवींकडून. पण हे कवी पांढरपेशे होते आणि त्यांनी लिहिलेल्या या कवितांमध्ये अस्सल जीवनदर्शकापेक्षा भावुक स्वप्नरंजनाचा भाग अधिक होता. बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण, संस्कार, व्यासंग यातले काहीही लाभलेले नसता जन्मजात प्रतिभेच्या बळावर उत्तम ग्रामीण कविता त्या काळात लिहिली. इथे वास्तव चित्रणाला जीवनचिंतनाचीही जोड मिळाल्यामुळे या कवितांचा दर्जा खूपच उंचावला आहे.

आज ‘मंचीय कविता’ नावाचा एक नवा प्रकार मराठीत आला आहे. काही कवी रंगमंचावरून आपल्या कविता सादर करतात व त्यासाठी व्यासपीठावर सजावट, वाद्यमेळ, गेयता, जमल्यास नृत्य व नाटय़ या साऱ्याची जोड त्यांना देतात. कुठल्या कवीने आपली कविता कशा प्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवावी हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न असला तरी कवितेभोवती इतकी सारी सजावट करताना कवितेचे कवितापणच त्यात हरवून जात नाही ना, याची काळजी कवीने घेतली पाहिजे असे मला वाटते.

आजच्या कवींमध्ये मला आणखी एक प्रवृत्ती दिसून येते व ती भयावह आहे असे मला वाटते. हे कवी इंग्रजी कविता वाचतात, इतर प्रांतभाषांतल्या कविता वाचतात, पण मराठी कवितेची पूर्वपंरपरा ते जाणून घेत नाहीत. ही परंपरा म्हणताना मला एकीकडे संतपंडितांचे प्राचीन काव्य अभिप्रेत आहे तर दुसरीकडे ओव्या, स्त्री-गीते, लोकगीते, ग्रामीण गीते वगैरे मौखिक काव्य प्रकारांशी परिचय या दोन्ही गोष्टी कवींना आवश्यक आहेत, ते त्यांना उमगत नाही.

जी गोष्ट जुन्या काव्यपरंपरेची तीच गोष्ट भजन, कीर्तन, भारूड, कूटकाव्ये, विराण्या यांची. या पारंपरिक काव्यरूपांना आधुनिक वळण देऊन त्यातून नव्या कवींना आपली कविता अधिक सुंदर, समृद्ध करता येईल.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.

 

संकलन –  शेखर जोशी

(ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या शांता शेळके यांच्या ‘पत्रं पुष्पं’ या पुस्तकावरून साभार)

 

First Published on February 16, 2017 12:51 am

Web Title: loksatta oratory shanta shelke
  1. No Comments.