प्रसन्न, पारदर्शक पण प्रसंगानुरूप बोचऱ्या शैलीत ओघवते लेखन करणारे विख्यात साहित्यिक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पुत्र राहुल आणि कन्या माला आहेत. गुरुवारी संध्याकाळी दयानंदन मुक्तिधाम विद्युतदाहिनीत खुशवंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, जया जेटली तसेच अनेक पत्रकार, आप्त आणि मित्र उपस्थित होते.
आजारपणामुळे सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्तच झालेले सिंग यांना अत्यंत शांतपणे मृत्यू आला, असे त्यांचे पत्रकार पुत्र राहुल सिंग यांनी सांगितले. शेवटच्या दिवसांत त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, मात्र त्यांची स्मरणशक्ती तल्लखच होती, असेही सिंग म्हणाले.
राहुल यांनी सांगितले की, बुधवारी रात्री खुशवंत यांनी रोजच्या रिवाजाप्रमाणे एक पेग मद्य घेतले. नंतर एका पुस्तकाचे थोडा वेळ वाचन केले. सकाळी शब्दकोडी सोडवली. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांची प्राणज्योत मालवली. एकच दु:ख आहे की अवघ्या ११ महिन्यांत त्यांची शताब्दी आम्हाला साजरी करता येणार होती.
आता पाकिस्तानात असलेल्या हदली येथे १९१५ मध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण दिल्लीत तर महाविद्यालयीन व उच्च शिक्षण लाहोर आणि केम्ब्रिज विद्यापीठातील किंग्ज कॉलेजमध्ये पार पडले. वकिली, परराष्ट्र मंत्रालयातील नोकरी आणि नंतर पत्रकारिता अशा प्रवासामुळे तसेच जन्म आणि नंतर कारकिर्दीच्या निमित्ताने विविध देशांशी जुळलेल्या भावबंधामुळे त्यांचे विचारविश्व विस्तारले आणि अनुभवविश्व अधिक समृद्ध झाले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले. उर्दू आणि इंग्रजीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते आणि नास्तिक असूनही शीख पंथाचा त्यांचा अभ्यास इतका सखोल होत गेला की शीख इतिहासाचे दोन खंड लिहिण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले. फाळणीच्या अनुभवांवर लिहिलेली ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही त्यांची कादंबरी विश्वविख्यात ठरली. त्यानंतर त्यांच्या लेखणीने आपल्या लालित्य आणि वैविध्याचा प्रत्यय वारंवार दिला. राजकीय लेखन असो की उर्दू शायरीचा मागोवा असो, ओघवत्या इंग्रजी कादंबऱ्या असोत की आपल्याच शीख समाजावर केलेले प्रसन्न विनोद असोत, खुशवंत सिंगांची लेखणी तळपत राहिली. वयाच्या ९५व्या वर्षी लिहिलेली ‘द सनसेट क्लब’ ही त्यांची अखेरची कादंबरी ठरली. ‘ट्रथ, लव्ह अ‍ॅण्ड अ लिटिल मॅलिस’ हे त्यांचे आत्मचरित्र २००२मध्ये प्रसिद्ध झाले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप नेते नरेंद्र मोदी व अन्य राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खुशवंत सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुजान सिंग पार्क येथील निवासस्थानी खुशवंत सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले.
स्मृतिलेख!
अनेक वर्षांपूर्वी खुशवंत सिंग यांनी स्वत:च्याच मृत्युशिलेसाठी स्मृतिलेख लिहून ठेवला होता. ‘इथे असा एक चिरनिद्रा घेत आहे, ज्यानं माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं,’ अशीच त्याची सुरुवात आहे. २०१२च्या स्वातंत्र्य दिनी वयाची ९८ वर्षे पूर्ण केल्यावर खुशवंत सिंग यांनी लिहिले होते की, मी आता आणखी पुस्तके लिहू शकणार नाही, हे मला उमगलं आहे. खरे सांगायचे तर मला मृत्यूची इच्छा आहे. मी खूप जगलो आहे. लोकांच्या ओठांवर मी हसू फुलविले, हीच ओळख कायम राहावी, अशी माझी इच्छा आहे.
अल्पचरित्र
बहुरंगी अन् समृद्ध शब्दकळेचा आनंदयोगी..
कधी डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या तर कधी खळाळत्या हास्यानं मन प्रसन्न करून टाकणाऱ्या शब्दांचा उपासक असलेले खुशवंत सिंग हे भारतातील इंग्रजी साहित्यिकांच्या मांदियाळीतले अग्रणी होते. राजकारणावरील मर्मभेदी भाष्य, लैंगिक संबंधांचा मोकळेपणानंघेतलेला लेखाजोखा, आपल्याच शीख समाजावरील विनोदांची अखंड मालिका, कथा, कादंबऱ्या अशा अनेक अंगांनी त्यांची लेखणी नेहमीच बहरत राहिली. लेखक, पत्रकार आणि राजकीय भाष्यकार अशा तीनही भूमिका त्यांनी समर्थपणे आणि सहजतेने पार पाडल्या.
फाळणीपूर्व पंजाब प्रांतात हदली येथे २ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सर सोभा सिंग हे विख्यात वास्तुरचनाकार होते. ब्रिटिशांच्या राजवटीत नवी दिल्लीला आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. १९३९मध्ये त्यांचा कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. राहुल आणि मुलगी माला यांच्या जन्मानंतर कुटुंबाला पूर्णता आली. १९४८ ते १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून त्यांनी टोरोंटो, कॅनडा तसेच ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले. नंतर नियोजन आयोगाच्या ‘योजना’ या मासिकाची मुहूर्तमेढही त्यांनी रोवली आणि त्याच्या संपादनाची धुराही वाहिली. नॅशनल हेरॉल्ड, हिंदुस्तान टाइम्स आणि इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादक म्हणून पत्रकारितेत त्यांनी भरीव कामगिरी केली. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या वृत्तसाप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने देशव्यापी प्रसिद्धी लाभली. या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले. १९८० ते १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. १९७४मध्ये पद्म भूषण किताबाने त्यांना गौरविले गेले. मात्र सुवर्ण मंदिरात लष्कर घुसविल्याच्या निषेधात १९८४मध्ये त्यांनी हा किताब परत केला.
२००१मध्ये पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या लिखाणात अधिक अंतर्मुखता आली. २००७मध्ये सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविले. विविध संस्थांनीही त्यांचा गौरव केला होता तसेच अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली होती.
फाळणीपूर्व आणि फाळणीनंतरच्या भारतातील सर्व प्रमुख घटनांचे ते महत्त्वाचे साक्षीदार होते. या घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यकर्त्यांशीही त्यांचे निकटचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय लिखाणात वास्तवाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंब उमटत असे. कथा असोत, कादंबरी असो, वृत्तपत्रीय स्तंभलेखन असो, राजकीय भाष्य असो की आटोपशीर विनोद असोत प्रत्येक जातकुळीच्या लिखाणात त्यांच्या प्रवाही शैलीचा प्रत्यय येत असे.
पुरस्कार, मानसन्मान
*१९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
*१९७४ : पद्मभूषण
*२००० : ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर, सुलभ इंटरनॅशनल
*२००६ : पंजाब रत्न अ‍ॅवार्ड
*२००७ : पद्मविभूषण
*२०१० : साहित्य अकादमी ’फेलोशिप अ‍ॅवार्ड
*२०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अ‍ॅन्यअल फेलोशिप अ‍ॅवार्ड
*२०१३ : जीवनगौरव पुरस्कार, टाटा लिटरेचर लाइव्ह, मुंबई
‘शब्दां’जली
“खुशवंत सिंग निर्भय विचारवंत होते. घटनेच्या अंतरंगात खोलवर शिरणारी तल्लख बुद्धी, शब्दांना असलेली आगळी धार आणि विनोदाची उत्तम समज त्यांना लाभली होती.”
 राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ते जन्मजात साहित्यिक होते आणि राजकारणाचे सहृदय भाष्यकार तसेच माझे अत्यंत जिवलग मित्र होते. ते खऱ्या अर्थानं सर्जनशील आयुष्य जगले.”
पंतप्रधान मनमोहन सिंग</strong>

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta pay homage to khushwant singh
First published on: 21-03-2014 at 01:12 IST