05 April 2020

News Flash

प्र  ति  सा  द

लेखकाने सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा संदर्भ विद्यमान केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी अप्रत्यक्षपणे जोडला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘हिंदूत्व आणि हिंदूराष्ट्र’ हा अब्दुल कादर मुकादम यांचा लेख ‘रविवार विशेष’मध्ये (१५ मार्च) प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचा प्रतिवाद करणाऱ्या आणि समर्थनार्थही वाचक प्रतिक्रिया आल्या.

त्यातील काही निवडक प्रतिक्रिया..

इस्लामने धार्मिक सहअस्तित्वाचा स्वीकार करावा!

‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा अब्दुल कादर मुकादम यांचा लेख (‘रविवार विशेष’, १५ मार्च) वाचला. लेखातून हिंदुत्वाच्या संकल्पनेविषयी लेखकाची पूर्वग्रहदूषित भूमिका प्रतिबिंबित होते. लेख ‘Suppressio Veri Suggestio Falsi’  (सत्य दडपणे व असत्य सुचविणे) या प्रकारात मोडतो. मुळात सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावरून हिंदुत्ववादी विचार  प्रणालीची चर्चा गतिशील झाली नाही, तर २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले त्यावेळेपासूनच या विचारप्रणालीला माध्यमांत महत्त्वाचे स्थान मिळण्यास सुरुवात झाली.

सावरकरांचे समर्थक वा विरोधकांनी सावरकरांविषयी आदरभाव राखून त्यांच्या विचारांचे मूल्यमापन करावयास हवे होते, असे लेखक म्हणतात. सावरकरांच्या विरोधकांकडून ही अपेक्षाच नाही, कारण सावरकरांच्या वाटय़ास त्यांच्या विरोधकांकडून कायम द्वेष, दुस्वास व खोटय़ा आरोपांची मालिका हेच आले आहे. ज. द. जोगळेकर, शेषराव मोरे, डॉ. श्रीरंग गोडबोले, स. ह. देशपांडे हे सावरकरांचे समर्थक. त्यांनी सावरकरांच्या विचारांचे चिकित्सक मूल्यमापन केले आहे; परंतु लेखकाच्या वाचनात बहुधा ते आले नसावे.

सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ १९२३ साली लिहिला. ‘हिंदुत्व विचारसरणीचे तर्कशुद्ध पद्धतीत लिहिलेले पहिले पुस्तक’ असे त्याचे वर्णन करता येईल. परंतु सावरकरांनी हा ग्रंथ कोणत्या  परिस्थितीच्या संदर्भात लिहिला, हे आपण समजून घेतले पाहिजे.

१९१६ मध्ये झालेला लखनौ करार, १९१९-२४ मधील खिलाफत आंदोलनास काँग्रेसने दिलेला पाठिंबा, मोपल्यांचे बंड या पाश्र्वभूमीवर सावरकरांनी हा ग्रंथ लिहिला. या सर्व घटना पाहता, मुस्लीम विभक्ततेस खतपाणी घातले जात असून त्याची वाटचाल फाळणीच्या दिशेने होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सर्वसमावेशक राष्ट्रामध्ये मुस्लीम समाजाची ही मागणी अशास्त्रीय होती. या मागणीचे मूळ मुस्लिमांच्या धर्मनिष्ठेत होते. एकात्म राष्ट्राचा विचार करताना धार्मिक निष्ठा व राष्ट्रीय निष्ठा या एकरूप व्हाव्या लागतात. या परिस्थितीत ‘हिंदू’ कोणास म्हणावे, याची व्याख्या सावरकरांनी आपल्या ग्रंथात सविस्तरपणे केली आहे. यात नागरिकत्वाचा दुरान्वयाने संबंध नव्हता.

लेखकाने सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा संदर्भ विद्यमान केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी अप्रत्यक्षपणे जोडला आहे. केंद्र सरकारने वारंवार हे स्पष्ट केले आहे की, या कायद्यामुळे कोणाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. परंतु काही मंडळी मुसलमानांच्या मनात नागरिकत्व काढून घेण्यासंदर्भात भीती निर्माण करत आहेत की काय, अशी शंका उत्पन्न होते. १९३७ मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाल्यानंतरची सावरकरांची जी भाषणे आहेत, त्यात ते नागरिकत्वासंबंधी उल्लेख करतात. सावरकर म्हणतात, ‘हिंदुराष्ट्र ही संकल्पना अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) आहे. ती जेव्हा व्यावहारिक पातळीवर येते, तेव्हा त्याचे राज्य होते.’ ‘हिंदुराष्ट्र दर्शन’ या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व दिले पाहिजे, असे त्यांनी कधीही म्हटले नाही. उलट कर्णावती येथील भाषणात, म्हणजे फाळणीच्या दहा वष्रे अगोदर, सावरकर विशुद्ध लोकशाहीवर आधारलेली राज्यघटना सुचवितात आणि ते म्हणतात की, ‘स्वतंत्र हिंदी राज्यामध्ये मुसलमानांना जे हक्क असतील त्यापेक्षा एकही जास्त हक्क हिंदू समाज मागणार नाही, असे मी वचन देतो.’

हिंदुत्व, हिंदुराष्ट्र या संकल्पना संकुचित नाहीत, तर सर्वसमावेशक आहेत. हिंदू व इस्लाम या दोन धर्मसंकल्पनांत मूलत: फरक आहे. हिंदू माणूस अनेक देव मानतो. कोणत्याही प्रश्नासाठी जगात अनेक उत्तरे असू शकतात, असे तो मानतो. या विचारसरणीतच त्याची सहिष्णुता अध्याहृत आहे. याउलट इस्लाम धर्म हा धार्मिक आयडिओलॉजी आहे. या अर्थाने की, त्याचे उद्दिष्ट राजकीय आहे. इस्लाममध्ये संपूर्ण जगावर आपल्या धर्माचा अंमल असावा असे वाटत आले आहे आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात. हिंदू धर्म मात्र आयडिओलॉजी प्रेरित धर्म नाही, तर तो मोक्ष, मुक्ती आदी संकल्पनांचा पुरस्कार करतो. त्याला जगावर आपले एकटय़ाचे राज्य असावे असे केव्हाही वाटले नाही.

त्यामुळे मुळात प्रश्न आहे तो हिंदू व मुस्लिमांच्या धार्मिक प्रेरणांचा. हिंदूंच्या धार्मिक प्रेरणा या व्यक्तिगत आहेत व त्यांच्या परंपरेत सामूहिक व धार्मिक भावनेला कधीही स्थान नव्हते. याउलट इस्लामच्या धार्मिक प्रेरणा या नेहमी सामुदायिक राहिल्या आहेत.

लेखक हे अन्याय, शोषण, गुलामगिरी आदी संस्कृतीच्या व्यवच्छेदक लक्षणांविषयी बोलतात आणि त्याचा संबंध हिंदू धर्म व संस्कृतीशी जोडतात. मुळात हिंदू धर्माने गुलामगिरीस कधीच थारा दिला नाही व त्याचे समर्थनही केले नाही. उलट मुस्लीम आक्रमक जेथे-जेथे जात, तेथील एक तर हजारो निरपराधांना ते ठार करीत. उर्वरित स्त्री-पुरुष-बालकांना इस्लामची दीक्षा देत. त्यानंतर देशोदेशीच्या गुलामांच्या बाजारात त्यांची विक्री करत. तसे कागदोपत्री उल्लेख आहेत.

के. एस. लाल यांनी लिहिलेले ‘मुस्लीम स्लेव्ह सिस्टीम इन मेडिइव्हल इंडिया’ हे पुस्तक अवश्य वाचावे. डॉ. आंबेडकरांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात एक प्रकरण आहे- ‘सोशल स्टॅग्नेशन’. त्यात त्यांनी इस्लाममधील विषमता, गुलामी, जातिव्यवस्था यांबद्दल विस्ताराने लिहिले आहे. इस्लाममध्ये गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे, हे त्यांनी दाखवून देत मुस्लिमांमधील जातींचे भले मोठे कोष्टक पानभर दिले आहे.

जागतिक इतिहास असे सांगतो की, ज्यूदाईझम किंवा यहुदीवाद यातील अब्राहम, ख्रिस्ती धर्मातील मोझेस आणि इस्लाम धर्मातील जॅकब या जुन्या करारातील सर्व प्रेषितांकडे गुलाम होते. सेमिटिक किंवा अब्राहमी धर्मामध्ये गुलामगिरीला धर्मशास्त्रीय मान्यता होती. त्यामुळे सापत्नभावाच्या वैचारिकतेला आणि गुलामगिरीच्या धोरणाला स्थिरता मिळते. मात्र, त्यास हिंदू धर्मात कधीही मान्यता नव्हती व नाही. गुलामगिरी हा सेमिटिक किंवा अब्राहमी धर्माचा अविभाज्य भाग आहे, हे लेखक मान्य करतील का?

इस्लाम वा ख्रिस्ती धर्माप्रमाणे हिंदू धर्म हा सेमिटिक नाही. त्यामुळे इथे धर्माधिष्ठित राज्याची कल्पना नाही. हिंदुराष्ट्रवाद, हिंदुत्वाची भूमिका स्थितिशील नाही, तर ती कालसापेक्ष आहे. ती अपरिवर्तनीय आहे, असे कोणी हिंदुत्ववादी म्हणत नाही. आपल्या पूर्वजांनीही असा विचार आपल्या धर्माविषयी केला होता. त्याशिवाय येथे ‘स्मृति’ झाल्याच नसत्या. धर्माचा शाश्वत भाग कोणता आणि परिवर्तनीय कोणता, हा विचार करून योग्य परिवर्तने पूर्वी झाली आहेत.

आपल्या समाजाच्या इतिहासाचा कालखंड मोठा आहे. इथे समाजव्यवस्थेत सामाजिक दोष निर्माण झाले हेही खरे; परंतु या दोषांचे निराकरण करण्याचे प्रयत्न स्वामी विवेकानंदांपासून अनेक समाजसुधारकांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याच मालिकेतील आहेत. त्यांनी आपल्या ‘विज्ञाननिष्ठ निबंधां’तून हिंदू समाजातील अनिष्ट रूढी व परंपरांवर कठोर प्रहार केले आणि ते केवळ बोरुबहाद्दर नव्हते, तर ते कत्रे सुधारक होते. १९२४-३७ या कालावधीत हिंदू समाजाला त्यांनी सप्तबेडय़ांच्या शृंखलांतून मुक्त होण्याचे आवाहन केले. पतितपावन मंदिराची स्थापना करून सामाजिक समतेचा एक पथदर्शी प्रयोग करून दाखविला.

जाती-जातींत विभागलेला हिंदू समाज कधी एकात्म नव्हता, असे लेखक म्हणतात. परंतु प्राचीन काळापासून भारतातील सर्व जातींमध्ये सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया चालू आहे. भारतीय संस्कृतीत निरनिराळे प्रदेश, जमात, सांस्कृतिक वैशिष्टय़े असलेले विभाग असले, तरी त्यांच्यात मूलभूत परंपरेने चालत आलेली एकात्मता आहे. प्राचीन काळापासून इथे भरणारा कुंभमेळा, बद्रिकेदारच्या यात्रेस संपूर्ण देशातून येणारे लोक, देशातील अनेक देवालये व सांस्कृतिक चिन्हांबद्दल भारतीयांना वाटणारी आपुलकी ही त्याची वानगीदाखल उदाहरणे. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या साहित्यामधून हे सोदाहरण दाखवून दिले आहे.

लेखकाने संपूर्ण लेखात हिंदुत्व व हिंदुराष्ट्राची चर्चा करताना केवळ हिंदूंच्याच दोषांवर अर्धवट व सोयीस्कर पुराव्याच्या आधारे ताशेरे ओढले आहेत. परंतु ते करताना त्यांनी मुस्लीम मानसिकतेचेही विश्लेषण केले असते (उदा. नरहर कुरुंदकरांनी ‘शिवरात्र’ या पुस्तकात मुस्लीम समस्येचे केलेले विवेचन) तर न्यायोचित व समतोल ठरले असते.

हिंदू समाजात आजही दोष आहेत, हे कोणी नाकारत नाही. परंतु हिंदू समाजाने, त्यातील सुधारकांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीररीत्या हिंदू समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, अस्पृश्यता आदी दोषांचा निषेध करून त्याविरुद्ध जागरण करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे, तर न्या. रानडे यांनी मांडलेल्या ‘हिंदी राष्ट्रवादा’स अपेक्षित असलेल्या प्रागतिक मूल्यांचा हिंदू समाजाने केव्हाच स्वीकार केला आहे. मुद्दा आहे तो मुस्लीम समाजाचा व त्याच्या मानसिकतेचा. शरियतपेक्षा भारतीय राज्यघटना श्रेष्ठ हे मानून येथील मुस्लीम समाजाने कट्टर मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली न राहता, धार्मिक सहअस्तित्व स्वीकारले तर राष्ट्रीयत्व व नागरिकत्व याविषयीचे वादच उत्पन्न होणार नाहीत.

* रवींद्र माधव साठे, महासंचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

‘समाजसुधारक’ सावरकरांची दुसरी बाजू..

‘सावरकरांच्या चिकित्सेत दुर्लक्षित झालेल्या बाबी..’ अशा अर्थाचे वाचकपत्र (लोकमानस, १६ मार्च) वाचले. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, अब्दुल कादर मुकादम यांनी ‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा लेख फक्त सावरकरांचा हिंदुत्व विचार लक्षात घेत तेवढय़ाच परिप्रेक्ष्यात लिहिलेला आहे. तो लेख काही सावरकरांचे चरित्र नव्हते. त्यामुळे सावरकरांची पतितपावन चळवळ आणि त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे काम दुर्लक्षिले गेल्याचा पत्रलेखकाने केलेला आरोप तथ्यहीन ठरतो.

बरे, सावरकरांच्या पतितपावन चळवळ आणि अस्पृश्यता निवारण याबद्दलही विचार केला तर काय दिसते? तर, सावरकरांना सनातन्यांना जातिअंताचे महत्त्व न पटवता आल्यामुळे ते दलितांना सवर्णाच्या मंदिरात प्रवेश देऊ शकले नाहीत, म्हणून त्यांना दलितांसाठी वेगळे पतितपावन मंदिर उभे करावे लागले. त्या मंदिरात सवर्ण जात नव्हतेच, हेही सत्य आहे. एक नवीनच पतितपावन मंदिर उभे केले ही गोष्ट कौतुकास्पद नसते, हेच पुष्कळांना कळत नाही! सर्व जातीजमातींना मोकळे असणारे हे नवे मंदिर शेवटी फक्त अस्पृश्यांचे मंदिर उरते आणि पुढे तेही तिथे येणे सोडून देतात. कारण पतितपावन मंदिरात अस्पृश्यांनी यावे, पण सवर्णाच्या मंदिरात जायचा त्यांनी आग्रह धरू नये, अशी सावरकरांची ढोंगी भूमिका होती. त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे अस्पृश्यांना आपल्या जाळ्यात ओढून ब्राह्मणी हितसंबंधांसाठी लढवण्याच्या उद्देशाने होते. त्यात कोणताही उदात्त हेतू नव्हता. तो वरवरचा दिखावा होता, हेच यावरून सिद्ध होते. म्हणून सावरकरांनी हिंदूंची प्रतिष्ठित मंदिरे अस्पृश्यांसाठी मोकळी करण्याचे लढे दिले नाहीत. सावरकरांवरची सर्व बंधने १९३७ ते १९४७ या काळात संपलेली होती. या दशकात सार्वजनिक विहिरी, तळी तसेच मोठी मंदिरे अस्पृश्यांना मोकळी व्हावीत यासाठी लढण्यास त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही. असे का? त्यामुळे ‘सावरकरांचे समाजसुधारकाचे कार्य म्हणजे राजकीय कार्य करता येत नाही म्हणून फुरसतीचा उद्योग होता’ असे नरहर कुरुंदकर त्यांच्या ‘शिवरात्र’ या पुस्तकातील सावरकरांवरील लेखात म्हणतात, ते खरेच आहे. सावरकरांची ही बाजू त्यांच्या अनुयायांना कळेल काय, हा खरा प्रश्न आहे.

* जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

संस्कृतीविषयक विचारांचा विपर्यास 

अब्दुल कादर मुकादम यांचा ‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा लेख असत्य प्रतिपादन आणि विपर्यास या दोषांनी डागाळलेला आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू.

लेखाच्या प्रारंभिक भागात लेखक अशी भूमिका घेतात की, सावरकरांविषयीची चर्चा ही समर्थक व विरोधक यांच्याकडून केवळ भावनिक वर्तुळात फिरत राहिली. वास्तव आणि तर्कशुद्धता यांच्या आधारे त्यांचे मूल्यमापन झाले नाही. ही भूमिका वाचून अर्थातच वाचकांच्या लेखाविषयी अपेक्षा वाढतात. मात्र त्या पूर्ण करण्याची जबाबदारी लेखकाने घेतलेली नाही.

नंतर लेखक सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या संकल्पनेवर भाष्य करतात. ते लिहितात, ‘सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे उत्तरेस सिंधू नदीपासून दक्षिणेस सिंधू सागरापर्यंत हिंदुस्थानची भूमी ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे, तीच व्यक्ती हिंदुराष्ट्राची ‘नागरिक’ होऊ शकते.’ आता सावरकरांनी हिंदू कोणास म्हणावे याची व्याख्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात केली आहे हे अगदी खरे आहे; पण हिंदूंनाच काय ते नागरिकत्व मिळेल आणि अिहदूंना (मुस्लीम, ख्रिस्ती इ.) ते मिळणार नाही, असे सावरकर म्हणालेले नाहीत. लेखकाने इथे असत्य प्रतिपादन केले आहे. खरी गोष्ट अशी आहे की, नागरिकत्व कोणाला मिळावे, अल्पसंख्याकांना कोणते अधिकार असावेत आदी प्रश्नांची चर्चाच ‘हिंदुत्व’ या पुस्तकात नाही. ती आहे सावरकरांच्या ‘हिंदुराष्ट्र दर्शन’ या भाषण संग्रहात. त्यात सावरकर म्हणतात, ‘एकदा हिंदुमहासभेने ‘एका माणसास एक मत’ हे तत्त्व अंगीकारिले, इतकेच नव्हे तर पुरस्कारले आणि राज्ययंत्रातील सेवक केवळ गुणांनुसार नेमले गेले आणि मूलभूत अधिकार नि कर्तव्ये, धर्म नि जात यांचा भेदाभेद न करता सर्वाची कर्तव्ये सारखी मानली म्हणजे त्यानंतर अल्पसंख्याकांच्या अधिक काही अधिकारांचा उच्चार करणेही अनावश्यक. इतकेच नव्हे तर आत्मविरोधी. तरीही.. आमच्या अिहदू देशबांधवांच्या मनात संशयाचे भूतही उठू नये.. म्हणून आम्ही हेही स्पष्ट करण्यास सिद्ध आहोत की, धर्म, संस्कृती नि भाषा यासंबंधीच्या अल्पसंख्याकांचे न्याय्य अधिकाराविषयी उल्लेखपूर्वक निश्चितीची घोषणा करण्यात येईल.’ ते पुढे म्हणतात की, ‘..संयुक्त मतदारसंघावर राज्यघटना न आधारता ‘जातीय विभागणीचे’ तत्त्व मानले तरी ज्या अल्पसंख्यांना विभक्त मतदारसंघ नि राखीव प्रतिनिधिसंख्या पाहिजे असेल त्यांना ती मिळेल, मात्र केवळ त्यांच्या संख्येचे प्रमाणात.’’ (‘हिंदुराष्ट्र दर्शन’, पृ. १२२, आवृत्ती २०१२.) थोडक्यात, सावरकर मुस्लीम व इतर अल्पसंख्याकांना केवळ नागरिकत्वच नव्हे, तर राखीव जागासुद्धा द्यायला तयार आहेत.

लेखकाने लेखाच्या पुढच्या भागात सावरकरांच्या संस्कृतिविचारावर भाष्य केले आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे की, ‘सावरकरांनी कठोर व वस्तुदर्शी चिकित्सा केली नाही.’ खरे म्हणजे सावरकरांनी धर्म, संस्कृती व परंपरा यांची कठोर चिकित्सा करणारे लेखन केले आहे. ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘क्ष किरणे’, ‘जात्युच्छेदक निबंध’ ही पुस्तके त्याची काही उदाहरणे होत. सावरकरांनी या प्रकारचे सुमारे एक ते दीड हजार पृष्ठे भरतील इतके लेखन केले आहे. उदाहरणार्थ, ‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ या लेखात ते म्हणतात, ‘आमच्या संस्कृतीचे अत्यंत लाजिरवाणे भूषण म्हणून आम्ही जे ब्रीद मिरवतो ते हे की, वेदांत जे सांगितले आहे त्याच्या पुढे आम्ही गेल्या दहा-पाच हजार वर्षांत सामाजिक, राजकीय वा धार्मिक विधिनिषेधात वा कौशल्यात रतिभरही पुढे सरकलो नाही! ..आमचे पूर्वज त्रिकालज्ञानी होते ही आमची प्रतिज्ञा!.. वेदकाली ज्या बलगाडीत बसून आमची संस्कृती चालली होती त्याच बलगाडीत बसून या आगगाडीच्या युगातही ती र र र  करीत चालली आहे. ही आमची श्रुतीस्मृतीपुराणोक्त प्रवृत्ती आजचीच नाही, तर ती त्या श्रुतीस्मृतीपुराणांच्याही आधीपासून.. आजपर्यंत सारखी चालत आली आहे.’ (‘समग्र सावरकर वाङ्मय : खंड तीन’, पृ. ३५४, प्रथमावृत्ती १९६४)

भारतात जे महत्त्वाचे धर्मचिकित्सक होऊन गेले त्यात सावरकरांचे स्थान फार उच्च दर्जाचे आहे. लेखकाने सावरकरांविषयी खोटे सांगता सांगता कुरुंदकरांचा संदर्भ दिला आहे. त्यांना हे माहिती असणे आवश्यक आहे की, सावरकरांनी केलेली बहुतांश धर्मचिकित्सा कुरुंदकरांच्या जन्माच्या अगोदर केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुरुंदकरांनी सावरकरांचे महत्त्व पूर्णपणे जाणले होते. कुरुंदकरांनी ‘सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते’ असा निर्वाळा दिला आहे. (‘निवडक नरहर कुरुंदकर’, पृ. ६२)

अब्दुल कादर मुकादम यांचे लेख मी वाचत आलो आहे. त्यांनी इस्लामचा ‘उदार’ अर्थ लावला, पण कधी कठोर धर्मचिकित्सा करताना दिसले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर व आंबेडकर ही दोनच नावे प्रकर्षांने पुढे येतात, तर स्वातंत्र्योत्तर काळात अ. भि. शहा, हमीद दलवाई व नरहर कुरुंदकर अशी मोजकीच नावे दिसतात. मुस्लीम समाजात तर दलवाई यांच्यानंतर इस्लामचिकित्सा जवळपास बंदच पडली आहे. तेव्हा मुकादम यांना तिथे भरपूर संधी आहे. त्यांनी आपली ऊर्जा इस्लामची कठोरपणे चिकित्सा करण्यात खर्च करावी. मुस्लीम समाजाला त्याचा फायदा तरी होईल. ते नसेल जमत तर मग हिंदू धर्मपरंपरेची चिकित्सा करावी, त्याचा फायदा हिंदू समाजाला होईल. पण उगाच सावरकरांविषयी खोटेनाटे लिहू नये.

* प्रा. संतोष शेलार, पुणे

डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारणे हा ‘हिंदुत्व’ सिद्धांताचा पराभव

अब्दुल कादर मुकादम यांच्या ‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ या लेखाच्या (‘रविवार विशेष’, १५ मार्च) बाजूच्या पानावर शंभर वष्रे पूर्ण झालेल्या शाहू महाराज व आंबेडकर यांच्या माणगाव परिषदेवरील लेख यावा, हा एक प्रकारचा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. कारण सावरकरांच्या हयातीतच डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून ‘हिंदुत्व’ सिद्धांताचा पराभव केला होता. सावरकरांच्या पश्चिमेतून आयात केलेल्या ‘पितृभू’ व यहुदी-अरबी लोकांच्या ‘पुण्यभू’ या कालबाह्य़ भोंगळ कल्पनांचाच तो पराभव होता. आंबेडकरांची जन्मभूमी व कर्मभूमीदेखील हा देशच असताना, सावरकरांच्या हिंदू समाजाने त्यांना कधी आपल्यात सामावून घेतले नाही. त्यामुळे आंबेडकरांनी शेवटी हिंदू धर्माचा त्याग केला आणि एक प्रकारे इथल्या वर्ण-जातिव्यवस्थेने भरडल्या गेलेल्या जनसमूहांनी मध्ययुगात इस्लामचा स्वीकार का केला ते ऐतिहासिक तथ्य पुन्हा एकदा हिंदुत्व सिद्धांतापुढे उभे केले. परंतु त्यातून योग्य तो बोध हिंदू समाजाने घेतला नाही. ‘जातीचे समूळ उच्चाटन’ या न दिलेल्या (पण नंतर ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या नावाने इंग्रजीत पुस्तकरूपात आलेल्या) भाषणात आंबेडकरांनी शास्त्राधाराला नकार हाच मार्ग असल्याचे प्रतिपादन केले होते. त्याऐवजी ब्रिटिशांनी पोसलेला हिंदू-मुस्लीम संघर्ष हाच केंद्रिबदू धरून राजकारण व समाजकारण त्याभोवती फिरत राहिले. एका बाजूला गांधीप्रणीत हिंदू-मुस्लीम ऐक्य, तर दुसरीकडे जिना-सावरकर-रा. स्व. संघ यांचा हिंदू-मुस्लीम द्विराष्ट्रवाद अशी दरी निर्माण करण्यात ब्रिटिश कूटनीती यशस्वी झाली. त्यानंतरच्या काळात नेहरू व आंबेडकर यांनी आधुनिक, समतावादी, धर्मातीत व विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करण्याची आकांक्षा बाळगणारी घटना निर्माण केली. हे खरोखरीच विलक्षण म्हटले पाहिजे.

मुकादम यांच्या ‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ या लेखातील मुख्य उणीव ही की, त्यांना जाणवलेले संस्कृतीचे अंगभूत वैशिष्टय़ ते नेमकेपणे मांडू शकलेले नाहीत. संस्कृती ही प्रवाही असते; तीत मूल्यांची शाश्वतता निर्माण होते, ती कशामुळे? तर वेगवेगळ्या काळांत मूल्यांचे आविष्करण कालोचित रूपरंगात होत असल्याने. पण आज राजेशाही जाऊन लोकशाही आली, तेव्हा त्यात मूल्यांचे संक्रमण हे येणारच. राजा हा ईश्वराचा अंश आहे, ही कल्पना आज मागे पडणारच. जुन्या सणांच्या जोडीला आज नवे आहेत आणि साजरे करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. सर्व संस्कृतींचा प्रवास हा धर्म, वंश, जात व लिंग या भेदांना मागे टाकून मनुष्यमात्राची समता या मूल्याकडे होताना दिसतो. सावरकरांच्या स्थितीबद्ध संस्कृतीकल्पनेमुळे त्यांना आंबेडकरांसारखी ‘जातीचे समूळ उच्चाटन’ ही झेप घेता आली नाही आणि हीच ‘हिंदुत्व’ सिद्धांताची मुख्य मर्यादा ठरली.

* बापू बेलोसे, रावेत (जि. पुणे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 12:25 am

Web Title: loksatta readers react to the articles response and support abn 97
Next Stories
1 गुरूणां गुरु..
2 नाही तर आपण रस्ता चुकू!
3 तान्हाजीला छपाक
Just Now!
X