News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : सांस्कृतिक संचित

प्राज्ञपाठशाळा मंडळाने मौलिक ग्रंथ प्रकाशनासह विविध उपक्रमांतून ते सिद्ध केले आहे. हे सांस्कृतिक संचित जतन करण्याची गरज आहे..

सन १९१७ मध्ये लोकमान्य टिळक यांनी प्राज्ञपाठशाळेस भेट दिली  होती. लोकमान्यांना प्राज्ञपाठशाळेचे अध्यक्ष स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले.

 

महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्षीदार असलेल्या प्राज्ञपाठशाळेची शतकी वाटचाल सुरू आहे. वैदिक शिक्षणाबरोबरच पुरोगामित्वाचा वारसा तिने जपला. अनेक प्रज्ञावंतांचा परिस्पर्श लाभलेले प्राज्ञपाठशाळा मंडळ हे एक व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्रच ठरले. प्राज्ञपाठशाळा मंडळाने मौलिक ग्रंथ प्रकाशनासह विविध उपक्रमांतून ते सिद्ध केले आहे. हे सांस्कृतिक संचित जतन करण्याची गरज आहे..

भारताचा कारभार हाती घेतल्यानंतर येथील पारंपरिक शिक्षणव्यवस्था मोडीत काढून ब्रिटिशांनी इंग्रजी भाषेतून युरोपीय विद्या शिकविणारी शिक्षण पद्धती अमलात आणली. मात्र, वाईसारख्या परंपरासमृद्ध गावात तर जुन्या पद्धतीच्या पाच पाठशाळा त्या वेळी चालत होत्या. अनेक थोर विद्धान, शास्त्री येथे वास्तव्यास होते. नारायणशास्त्री मराठे हे तरुण सन १८९८ मध्ये तिथे आले आणि त्यांनी वेदान्त, न्याय, वेद, काव्य अशा अनेक शास्त्रांचे अध्ययन केले. स्वामी प्रज्ञानंद यांच्याकडे नारायणशास्त्रींनी उपनिषदांचा आणि गीतेचा अभ्यास सुरू केला. प्रज्ञानंद निवर्तल्यानंतर नारायणशास्त्री यांनी स्वत: प्रवचने देण्यास सुरुवात केली. नारायणशास्त्री यांची कीर्ती सर्वदूर पसरल्यानंतर अनेक तरुण विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येऊ लागले आणि ‘प्राज्ञमठ’ नावाची पारंपरिक शिक्षणाची संस्कृत पाठशाळा सुरू झाली. १९०५-०६ साली महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ जोर धरत होती आणि त्याच काळात तळेगावला समर्थ विद्यामंदिर या राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. तेथे सुमारे १५० विद्यार्थी व १५ शिक्षक आश्रम करून राहत होते. सन १९१० मध्ये इंग्रजांनी हुकूम काढून ही शाळा बंद केली, तेव्हा तेथील विद्यार्थी, शिक्षक वाईतील प्राज्ञमठात सहभागी झाले. या शिक्षकांपैकी महादेवशास्त्री दिवेकर आणि दिनकरशास्त्री कानडे या चळवळ्या शिक्षकांनी प्राज्ञमठाचे रूपांतर ‘प्राज्ञपाठशाळे’त करण्याचे निश्चित केले. नारायणशास्त्री मराठे यांच्या अध्यक्षतेखाली प्राज्ञमठ या खासगी पाठशाळेला ‘प्राज्ञपाठशाळा’ या सार्वजनिक संस्थेचे स्वरूप देण्यात आले. पारंपरिक पाठशाळा सुरू ठेवून नवा माध्यमिक अभ्यासक्रम सुरू करायचा आणि त्यातून राष्ट्रीय चळवळीला वाहिलेले आणि आधुनिक विद्येने पारंगत विद्यार्थी तयार करायचे हा त्यामागील हेतू होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वासुदेवशास्त्री कोनकर, पांडुरंगशास्त्री गोस्वामी असे विद्वान येथेच तयार झाले. ३१ जुलै १९२० रोजी प्राज्ञपाठशाळा ही संस्था सोसायटीच्या रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टप्रमाणे ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’ या नावाने नोंदविण्यात आली. या संस्थेने १०० वर्षे पूर्ण केली आहेत.

प्राज्ञपाठशाळेचे कार्य..

१९२० ते १९६० या चार दशकांत मंडळाने अनेक समाजसुधारणांचे निर्णय घेतले. तो काळ- विशेषत: १९२० ते १९४७ हा स्वातंत्र्य चळवळीसाठी सर्वार्थाने बलिदान करणाऱ्या तरुणांचा होता. १९१७ मध्ये प्राज्ञपाठशाळेस लोकमान्य टिळकांनी भेट दिली आणि लोकमान्यांना प्राज्ञपाठशाळेचे अध्यक्ष स्वामी के वलानंद सरस्वती यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. प्राज्ञपाठशाळेच्या इतिहासातील ते एक महत्त्वाचे वर्ष होते. याच वर्षांत स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याकडे शांकरभाष्य आणि अन्य वेद वाङ्मय शिकण्यासाठी विनोबा भावे प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले.

प्राज्ञपाठशाळा मंडळाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे, स्वामी केवलानंद सरस्वती यांनी सुरू केलेला ‘धर्मकोश’! या ‘धर्मकोशा’मध्ये धर्मसुधारणेतील अनेक घटनांचा उल्लेख आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, सामाजिक मानवशास्त्र, धार्मिक संकल्पनांची उत्क्रांती आदी ज्ञानविषयांचा एक मूलभूत साधनग्रंथ म्हणून ‘धर्मकोशा’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक ज्ञान आणि सामाजिक समता, तसेच समताधिष्ठित न्यायासाठी परंपरागत हिंदू धर्म आणि समाजात सुधारणा करण्याच्या उपक्रमात प्राज्ञपाठशाळा मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले. या उपक्रमाचे साधन म्हणून ‘धर्मकोशा’ची योजना करण्यात आली आहे. धर्मशास्त्राच्या परंपरेप्रमाणे हिंदू धर्म कधीच बंदिस्त आणि स्थितिशील नव्हता; तो नेहमीच मोकळा, गतिशील होता आणि काळाच्या ओघात, वैचारिक आणि नैतिक प्रगतीला अनुसरून सतत परिवर्तनशील होता, हे सिद्ध करणारा प्रमाण, व्यापक आणि निर्विवाद पुरावा संग्रहित करणे हे ‘धर्मकोशा’चे मुख्य प्रयोजन होते. अस्पृश्यता निवारणाला असलेल्या धर्मशास्त्रातील आधारासाठी महात्मा गांधी प्राज्ञपाठशाळेकडे वळाले; यावरूनच ‘धर्मकोशा’द्वारे होत असलेल्या सामाजिक कार्याचे महत्त्व स्पष्ट होते. प्राचीन भारतीय संस्कृतीबाबतचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणून ‘धर्मकोशा’ला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. ‘धर्मकोशा’च्या खंडांना अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांतून मागणी आहे.

‘धर्मकोश’ करण्यामागील एक मुख्य उद्देश हिंदुधर्मशास्त्रात वेळोवेळी कसे बदल होत गेले, हे निरनिराळ्या ग्रंथांतील उतारे कालक्रमाने एकाखाली एक ठेवून स्पष्ट करून दाखविण्याचा आहे. ‘धर्मकोशा’चे ११ कांड आहेत. प्रत्येक कांडात अनेक भाग आहेत. गेल्या ९० वर्षांत पाच कांडांतील २६ भाग प्रकाशित झालेले आहेत. पाचव्या कांडातील एक भाग आणि उरलेल्या सहा कांडांतील २० भाग मिळून २१ भाग तयार करून मंडळाला प्रकाशित करायचे आहेत.

प्राज्ञपाठशाळेचे दुसरे मोठे कार्य म्हणजे ‘नवभारत’ या मासिकाचे गेली ७३ वर्षे चालविलेले काम! १९४७ सालच्या ऑक्टोबरात शंकरराव देव यांनी हे मासिक सुरू केले. महाराष्ट्रात सर्व विचारांचे परिशीलन व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता. मराठीत विचारप्रधान साहित्य देणारे ‘नवभारत’ हे महत्त्वाचे मासिक आहे.

‘‘परंपरेने चालत आलेल्या विद्यांचे अध्ययन आणि अध्यापन प्राज्ञपाठशाळा करत असली, तरी तेथील अभ्यासक परंपरेचे परिष्करणही करीत असतात. त्यामुळेच हिंदू धर्म परिवर्तनशील आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या असून आताही होणे आवश्यक आहे. यातूनच पाठशाळेतील विद्वानांनी ‘धर्म निर्णय मंडळ’ ही संस्था स्थापन केली. निरनिराळ्या संस्कारांत सोपेपणा कसा आणता येईल, त्यासंबंधीचे नियम तयार केले. अनेक कालबाह्य़ रूढी आणि रिवाज बंद व्हावेत, यासाठी प्रसार केला,’’ असे प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सहसचिव अनिल जोशी सांगतात.

मौलिक ग्रंथसंपदा..

पाठशाळेचा आणखी एक उपक्रम म्हणजे उत्कृष्ट ग्रंथांचे प्रकाशन. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्राज्ञपाठशाळा मंडळाने प्रसिद्ध के ल्या. डॉ. सुमंत मुरंजन यांचा ‘पुरोहितवर्ग वर्चस्व आणि भारताचा सामाजिक इतिहास’ हा एक अजोड ग्रंथ आहे. प्रा. डॉ. प. ल. वैद्य लिखित ‘बौद्धधर्माचा अभ्युदय आणि प्रसार’, सदाशिव आठवले यांचे ‘चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान’ हे पुस्तक, प्रा. मे. पुं. रेगे लिखित ‘ईहवाद आणि सर्वधर्मसमभाव’.. ही पुस्तके मराठीतील वैचारिक लिखाणाचे मानदंड म्हणून शोभत आहेत. तशीच आणखी दोन पुस्तके  म्हणजे गंगाधर वामन लेले यांचे ‘प्रस्थानभेद’ आणि

डॉ. म. अ. मेहेंदळे यांचे ‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’! ‘अद्वैतसिद्धी’चे मराठी भाषांतर, ‘यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ’, ‘संशोधन साधना’, ‘आर्याच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’, ‘वागीश्वरी’, ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’, ‘गीताचिकित्सा’, ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ‘पाच पुस्तक परीक्षणे’, ‘भेदविलोपन : एक आकलन’, ‘कॉलिंगवुडची कलामीमांसा : एक भाष्य’, ‘धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार’, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : कार्य आणि विचार’, ‘विनोबांची संस्कृत साम्यसूत्रे’, ‘नागरी समाज, राज्यसंस्था आणि लोकतंत्र : भारतीय संदर्भात विवेचन’, ‘हिंदू धर्माची समीक्षा आणि सर्वधर्मसमीक्षा’, ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’, ‘साहित्याचे तर्कशास्त्र’, आदींचा यात समावेश आहे. या यादीवरून हे लक्षात येते, की पाठशाळेने भारतीय परंपरा, संस्कृती आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखा यांची चिकित्सा करणारे अनमोल, मौलिक ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत.

– अविनाश कवठेकर

सरस्वती उत्सव

दरवर्षी नवरात्रात ‘सरस्वती-उत्सव’ गेली १०० वर्षे साजरा करण्यात येतो. तेथे तीन दिवस नामांकित अभ्यासकांची व्याख्याने होतात. तसेच पाठशाळेतर्फे  दरवर्षी चर्चासत्र, अभ्यास शिबिरे आणि विशेष व्याख्याने आयोजित केली जातात.

प्रतिभावंतांचे योगदान

प्राज्ञपाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा मंडळा’त रूपांतर झाल्यानंतर अनेक ज्ञानसाधकांनी योगदान दिले आहे. त्यात स्वामी केवलानंद सरस्वती, पंडित अण्णाशास्त्री वारे, शंकरानंद भारती, पंडित अप्पाशास्त्री राशिवडेकर, विद्याभूषण पंडित रंगाचार्य बाळकृष्णाचार्य रेड्डी, पंडित रामशास्त्री गोडबोले, म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर, पंडित बाळाचार्य गजेंद्रगडकर, पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर, पंडित भाऊशास्त्री लेले, पंडित राजारामशास्त्री कार्लेकर, पंडित श्रीधरशास्त्री वारे, पंडित लक्ष्मणशास्त्री द्रविड, पंडित बाळसरस्वती रानडे, पंडित राजेश्वरशास्त्री द्रविड, श्रीब्रह्मानंद स्वामी, श्री प्रज्ञानंद सरस्वती, सेतूमाधवाचार्य धीरेंद्राचार्य गजेंद्रगडकर, पंडित तात्याशास्त्री पटवर्धन, पंडित सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, पंडित दिनकरशास्त्री कानडे, महादेव वासुदेव दिवेकर, मीमांसागौर पंडितप्रवर दत्तात्रेय कृष्णाशास्त्री तांबेगुरुजी, वेदान्तचुडामणि गोविंदशास्त्री केळकर, तर्कतीर्थ नारायणशास्त्री सहकारी, काव्यतीर्थ वासुदेवशास्त्री जोशी आदी ज्ञानसाधकांचा सहभाग होता.

संस्थेपर्यंत कसे जाल?

वाई (जि. सातारा) येथे मध्यवर्ती भागातील गंगापुरी परिसरात प्राज्ञपाठशाळेचे कार्यालय आहे. ‘विश्वकोश नि. मं.’च्या कार्यालयाजवळच ‘प्राज्ञपाठशाळा मंडळा’चे कार्यालय आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावरून सुरूर फाटा येथून वाईला जाता येते. पुणे-वाई एसटी सेवाही आहे.

प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई

PRAJNAPATHASHALA MANDAL

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

सन १९१७ मध्ये लोकमान्य टिळक यांनी प्राज्ञपाठशाळेस भेट दिली  होती. लोकमान्यांना प्राज्ञपाठशाळेचे अध्यक्ष स्वामी के वलानंद सरस्वती यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट

नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट

नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक : ०२४०- २३४६३०३/ २३४८३०३

नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०१२०- २०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:05 am

Web Title: loksatta sarv karyeshu sarvada article on pradnya pathshala wai abn 97
Next Stories
1 न्यायालयाचा मान..
2 साथीच्या वस्तीतली स्मरणचित्रे..
3 ‘बिमारू’ राज्यांसाठी हीच संधी!
Just Now!
X