एम. व्ही. व्यंकय्या नायडू

जीवनातील मूल्यांबाबत त्यांची असलेली वचनबद्धता व समर्थ भारताचे त्यांचे स्वप्न यात अजिबात गल्लत नव्हती, त्यामुळे त्यांना जनमानसाची नाडी पकडणे शक्य झाले. त्यांनी कधी तडजोडी केल्या नाहीत, पण देशहितासाठी जर मतैक्य आवश्यक असेल, अशा ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी बाणा ठेवून मोकळेपणाने बोलण्यात कसूर केली नाही..

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता

अखेर अटलजी गेले. एक लढाई संपली. अज्ञात अशा नव्या क्षितिजाकडे ते निघून गेले आहेत. मृत्यूशी या लढाईत अजून कुणीच जिंकलेले नाही. त्याला अटलजीही अपवाद नाहीत. पण जिवंत असताना त्यांनी मूल्ये व काही संकेतांसाठी ‘अटल’ म्हणजे निर्धाराने असा लढा दिला. त्यांच्या पिढीतील इतरांपेक्षा ते त्यामुळेच वेगळे होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते ‘अटल’ तर होतेच, पण ‘बिहारी’ म्हणजे स्वप्नाळूही होते. नवभारताची स्वप्ने पाहताना त्यांनी मूळ धारणांशी, चांगल्या मूल्यांशी नाते कधी तोडले नाही.

माझी व अटलजींची पहिली भेट मला चांगली आठवते. तो काळ १९६० मधला होता. मी नेल्लोर शहरात टांग्यातून फिरून त्यांच्या आगामी दौऱ्याची द्वाही फिरवत असे. तेव्हापासून माझी त्यांची ओळख होती. तो माझ्यासाठी एक दुर्मीळ सन्मान होता. अशा व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळणे हे माझे भाग्यच.

असे म्हणतात की, तुमचे अंत:करणच तुमच्या चेहऱ्यातून झळकत असते. अटलजी निर्मळ अंत:करणाचे होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यात प्रकट होत होते यात शंका नाही. त्यांचे विचार, सामर्थ्य व मूल्यसंकेत, देशाबाबतची दृष्टी यातील स्पष्टता फार वेगळी होती. त्यांच्या मनात कुठलीही संदिग्धता नव्हती. आपला देश कुठल्या मार्गाने गेला तर तो गौरवशाली होईल हे त्यांना कदाचित पूर्ण ठाऊक होते, म्हणूनच ते अविचल होते. त्यामुळेच ते त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या इतर समकालीन व्यक्तींकडे तटस्थपणे पाहू शकत होते. त्यांच्या मुखावर विलसणारे निर्व्याज हास्य हे माझ्या मते त्यांच्या आंतरिक शक्तीचे प्रतीक होते. त्यांच्या २००९ पर्यंतच्या सक्रिय राजकारणातील ६५ वर्षांच्या कारकीर्दीत ते किमान ५६ वर्षे विरोधी पक्षात तर नऊ वर्षे सत्तेत होते. ते दहा वेळा लोकसभेवर तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्रमंत्री होते व नंतर तीनदा ते देशाचे पंतप्रधान झाले. ते विरोधात असोत की सत्तेवर, त्यांनी नेहमीच स्वातंत्र्योत्तर भारताच्या उत्क्रांत अवस्थेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

‘वक्ता दशसहस्र्ोषु’ असेच त्यांचे वक्तृत्व. संसदपटू म्हणूनही त्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची वाहवा मिळवली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही त्यांचे कौतुक केले होते. कुठलीही जबाबदारी नसताना नुसती छान भाषणे देण्यात काय मोठेसे.. असा प्रश्न कुणीही करील, पण अटलजींनी परराष्ट्रमंत्री व नंतर पंतप्रधान असताना या सगळ्या शंका खोटय़ा ठरवल्या. त्यांची उक्ती व कृती- कथनी व करणी- यांत भेद नव्हता. अतिशय कमी कालावधीत त्यांनी शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी जो एक नवा आयाम परराष्ट्रनीतीला दिला, त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

पंतप्रधान म्हणून त्यांना देशाच्या प्रश्नांची खोलवर जाण होती व ते सोडवण्याची त्यांची हातोटीही विलक्षणच म्हणावी अशी होती. विरोधात असताना त्यांनी ओघवत्या वक्तृत्वाने सर्वाची मने जिंकली होतीच; पण त्यांचे यश तेवढेच मर्यादित नव्हते. देशाला प्रश्न सोडवण्याची आवश्यकता असताना त्यांनी निर्णायक नेता या नात्याने दिशा दाखवली. विरोधी पक्षाला साजेसे राजकारण करतानाच त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यापेक्षा जास्त ठसा उमटवला. नुसते बोलघेवडे असल्याचा समज त्यांनी खोटा ठरवला होता.

पंतप्रधान म्हणून वाजपेयी यांनी दूरसंचार, पायाभूत सुविधा, खासगी क्षेत्राचा सहभाग, निर्गुतवणूक या माध्यमातून नव्या युगात भारताला समर्पकतेने जोडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या माध्यमातून सर्व भागांच्या जोडणीचे त्यांचे काम खूप मोठे होते. राजकारण करतानाच सुधारक म्हणून कमालीची उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली.  त्यांच्या कामाची चांगली फळे आता आपल्याला मिळाली आहेत. लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेला त्यांनी ‘जय विज्ञान’ची जोड दिली, त्यातून त्यांनी समकालीन ज्ञानाची जोड किती महत्त्वाची आहे हेच दाखवून दिले. वाजपेयीजी हे जसे मृदू तसेच कणखर होते. त्यांच्यातील कणखरता ही ‘पोखरण-२’ च्या अणुचाचण्यांच्या वेळी दिसली. जेव्हा कारगिलचे आक्रमण झाले तेव्हाही त्यांनी आक्रमकांना याच कणखरपणाने पिटाळून लावण्यात यश मिळवले.

त्यांच्यातील मृदुता व कोमलता ते जेव्हा राजकीय क्षेत्रात समकालीन नेत्यांबरोबर वावरत होते त्या वेळी अनेकदा प्रत्ययास आली. त्यांनी अतिशय अवघड काळात ज्या कौशल्याने केंद्रातील आघाडी सरकार चालवले, तसे कुणालाही जमले नाही. त्यांनी आघाडी सरकारचा धर्म पाळतानाच देशहिताला कधी बाधा येऊ दिली नाही. वाजपेयी हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान होते. निर्मळ चारित्र्य व स्वच्छ वर्तन तसेच मोहक व्यक्तिमत्त्वाने त्यांनी देशवासीयांच्या मनात अढळ असे स्थान निर्माण केले. राजकीय वर्ग व सामान्य जनता या सर्वानाच हवाहवासा असणारा असा हा नेता होता. जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळेच स्वातंत्र्योत्तर भारतातील एक उत्तुंग नेते म्हणून ते मान्यता पावले.

समाजातील विविध गटांना साद घालतानाच त्यांनी आपले मनीचे गूज त्यांच्यापर्यंत पोहोचवले, त्यामुळे देशवासीयांसाठी त्यांचे वेगळे महत्त्व होते. लोकांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला होता. जीवनातील मूल्यांबाबत त्यांची असलेली वचनबद्धता व समर्थ भारताचे त्यांचे स्वप्न यात अजिबात गल्लत नव्हती, त्यामुळे त्यांना जनमानसाची नाडी पकडणे शक्य झाले. एका सच्चा भारतीयाने देशवासीयांना घातलेली साद नेहमीच लोकांना भावली. त्यांनी कधी तडजोडी केल्या नाहीत, पण देशहितासाठी जर मतैक्य आवश्यक असेल अशा ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी बाणा ठेवून मोकळेपणाने बोलण्यात कसूर केली नाही. समेटाचे राजकारण हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ होते. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी माझ्यासह लाखो लोकांना प्रेरित करून मोहिनी घातली. देशासाठी ते एक आदर्श तर होतेच, पण खरे अजातशत्रू नेते होते.

आमच्या जडणघडणीच्या काळात आम्ही अटलजींना तरुण हृदयसम्राट म्हणत असू. आजारी पडेपर्यंत आमच्यासाठी ते तरुणच होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे हास्य कधीच कोमेजले नाही. भारतरत्न वाजपेयी यांच्यात व्यक्तित्व, वक्तृत्व, मित्रत्व व कर्तृत्व हे सर्वच गुण ओतप्रोत भरलेले होते. प्रदीर्घ काळ ते लोकांच्या स्मृतिपटलावर राहतील यात शंका नाही. ‘तत्त्वज्ञ राजा’ म्हणून त्यांची घडण होत गेली. त्यातूनच त्यांनी सामान्य भारतीयांच्या मनावर शब्द व कृतींच्या अजोड गुंफणीतून राज्य केले. असा उमदा व द्रष्टा राजकारणी या पृथ्वीतलावर कधीतरीच अवतार घेतो. त्यांनी त्यांच्या जीवनातून आपल्यासाठी ठेवलेला वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक भारताचे उपराष्ट्रपती आहेत)

ट्विटर : @MVenkaiahNaidu