08 March 2021

News Flash

अंधश्रद्धा निर्मूलन ते विवेकवादी मानवता

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ध्येयाने सुरू झालेली ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ९ ऑगस्ट रोजी ३० वर्षे पूर्ण करीत आहे.

|| अविनाश पाटील

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ध्येयाने सुरू झालेली ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ९ ऑगस्ट रोजी ३० वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने समितीच्या तीन दशकी प्रवासाचा वेध घेणारा लेख..

‘अंधश्रद्धा निर्मूलन’ केवळ या दोन शब्दांसह ते उद्दिष्ट घेऊन सुरू झालेली चळवळ पुढे एवढी वाढेल आणि विस्तारेल, महाराष्ट्राच्या समाजकारणात ठळकपणे नोंद घेण्यासारखी होईल, इतक्या बहुपदरी आणि बहुआयामी कामाने आपला ठसा जनमानसात उमटवेल असे आम्हाला त्याची सुरुवात करणाऱ्यांनादेखील त्यावेळी वाटले नव्हते. पण आज मात्र ते प्रत्यक्षात घडले आहे. ९ ऑगस्ट १९८९ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने सुरुवात केलेली संघटना ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या नावाने आज देशभर मान्यता पावली आहे. ‘अंनिस’ या लघुनामानेही ती समाजात रुजली आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी संघटनेला ३० वर्षे पूर्ण होत आहेत.

तथाकथित दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या बुवाबाबांना विरोध व चमत्कारांना आव्हान इथून सुरू झालेला विचारांचा प्रवास अंधश्रद्धा निर्मूलन-वैज्ञानिक दृष्टिकोन-धर्मचिकित्सा- धर्मनिरपेक्षता- विवेकवाद ते मानवतावाद असा झालेला आहे. हा प्रवास केवळ वैचारिक नव्हे तर प्रत्यक्ष प्रश्ननिहाय विषय हाताळून कृतिशीलपणे लढवत घडविला आहे, हे अधिक महत्त्वाचे वाटते.

बुवाबाजीच्या भांडाफोडीपासून ‘जादूटोणाविरोधी कायदा’ संमत करण्यासाठी प्रदीर्घ काळ संघर्ष करून तो करण्यास शासनाला भाग पाडणे, जात पंचायतीला मूठमाती अभियान प्रभावीपणे राबवून ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ संमत करून घेणे आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना समर्थन, सहकार्य करीत असताना त्याच्या सुलभीकरणासाठी तयार होणाऱ्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात विधायक सहभाग नोंदवणे ही काही ठळक उदाहरणे सांगता येतील.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुशल आणि प्रगल्भ नेतृत्वाखाली दहा-बारा शाखा आणि पाचपन्नास कार्यकर्ते यांच्यासह हे संघटन सुरू झाले. त्याची पायाभरणी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण, कष्ट यांसह कार्यकर्तापण संस्कारित करणाऱ्या नेतृत्वामुळे झाली. त्यासोबतच डॉ. दाभोलकरांचे महाराष्ट्रभर झंझावाती दौरे, कामाप्रतिची तळमळ, प्रभावी संघटन कौशल्य आणि प्रवक्तेपण यांच्या बळावर हे संघटन उभे झाले. आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यंत ३५० पेक्षा जास्त शाखांमधून दहा हजार क्रियाशील कार्यकर्ते व काही लाख हितचिंतकांच्या सहभागाने ही चळवळ विस्तारली आहे. सोबतच महाराष्ट्राबाहेर किमान १५ राज्यांत संघटनेचा संपर्क आहेत. तेथील समविचारी संघटनांच्या कामात अंनिस मार्गदर्शक व सहकार्याची भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकरादी सुधारकांची परंपरा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. संत परंपरेने ‘ईश्वरकेंद्री’ धर्म ‘मानवकेंद्री’ करण्याचा प्रयत्न केला, जातिव्यवस्थेवर प्रहार केला आणि काही अंशी चमत्कार व कर्मकांडे यांना विरोध केला. दुसऱ्या बाजूला समाजसुधारकांनी कठोर धर्मचिकित्सा केलेली आहे. त्यातील कर्मकांड आणि शोषणांवर उघडपणे प्रहार केले आहेत. याच विचार परंपरेला, वारशाला महाराष्ट्र अंनिसने आपल्यापरीने संघटितपणे कृतिशील करण्याचा प्रयत्न केला. तसेच अशा विधायक वारशाला कालसुसंगतपणे, नियोजबद्ध व परिणामकारकतेने पुढे नेण्याचे सकारात्मक प्रयोग केले. हे अंनिस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सातत्यपूर्ण संघटित कार्याचे यश आहे म्हणता येईल.

या ३० वर्षांच्या कामाचे फलित काय, असे कोणी विचारले तर त्यांना नि:संदिग्धपणे सांगता येतील अशा ठळक बाबी नक्कीच आहेत. या कामाची तीन दशकांत विभागणी केली, तर त्या प्रत्येक दशकाच्या टप्प्यात काही नेमकी उपलब्धी मांडता येईल.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाला सुरुवात झाली, तेव्हा ते प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे काम आहे असे म्हटले जायचे. एका बाजूला धर्माच्या प्रस्थापित यंत्रणेच्या आधारे अंधश्रद्धेचा फायदा घेत शोषणाची मोठी यंत्रणा असलेल्यांकडून प्रखर विरोध आणि हे देवधर्म बुडवायला निघालेले आहेत, असा अपप्रचार झेलावा लागतो. तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्य स्वतंत्रपणे करायचे काम आहे का, यातून कसले समाज परिवर्तन होणार, अशी अवहेलना ऐकावी लागली आहे. अशा काळात ‘अंधश्रद्धेचा प्रश्न आहे आणि तो विकासातील मोठा अडसर आहे’ हे समाजमनात रुजविण्यात आम्ही पहिल्या दशकात यशस्वी झालो. शकुन, अपशकुन, मंत्रतंत्र, नवससायास, चमत्कार आणि कर्मकांडे यांबाबत प्रचंड मोठय़ा प्रमाणात संघटनेने प्रबोधन मोहीम चालविलेली आहे. त्यासोबतच फसवणाऱ्या शेकडो सर्वधर्मीय बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, मुल्ला-मौलवी, पादरी यांना जाहीर आव्हान दिले आहे, त्यांचा भांडाफोड केला. त्यांच्या चमत्कारामागील हातचलाखी व विज्ञान समजावून देण्याचे लाखो कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची एक सकारात्मक प्रतिमा तयार झाली. या कामात एक प्रकारचे ‘थ्रिल’ असल्याने तरुण मोठय़ा संख्येने यात जोडले जाऊ  लागले. स्थानिक ठिकाणी कामात सहभागी होऊ  लागले. चमत्काराचा दावा करणाऱ्या बुवा-बाबांना आव्हान देऊ  लागले. वरील सर्व अंधश्रद्धेच्या प्रश्नांबाबत प्रबोधन करू लागले. अशा प्रकारे या पहिल्या दशकाने संघटनेला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातील तज्ज्ञ आणि प्रवक्ता म्हणून स्वीकार करण्यास सुरुवात केली.

एका बाजूला हे सर्व घडत असताना कार्यकर्त्यांचे वैचारिक व संघटनात्मक भरणपोषण करण्यासाठी शिबिरे, परिषदा, चर्चासत्रे हेदेखील घडत होते. दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कार्यकर्ता शिकत होता, समृद्ध होत होता. अंधश्रद्धांच्या विविधांगी प्रश्नांना  कार्यकर्ते भिडत होते, त्यावर भाष्य करीत होते, अंधश्रद्धा रोखण्यासाठी आंदोलने करीत होते. प्रबोधन, संघर्ष करीत यशस्वीही होत होते. मग ती यात्रेतील पशुहत्या असो, डाकीण म्हणून महिलांचा छळ असो, एखादी नरबळीची घटना असो, बुवा- बाबांच्या दरबारात भूत काढण्यासाठीचे अघोरी प्रकार असोत, ज्योतिषांनी भविष्य सांगण्याच्या नावाने चालवलेला धंदा असो, डोळ्यातून खडे पाडणारी, घरावर दगड पाडणारी, आपोआप कपडे पेटवणारे भानामतीचे प्रकार असो वा अन्य कोणत्याही अंधश्रद्धा असोत; त्यात कार्यकर्ते यशस्वी हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे अंधश्रद्धांचे प्रकार व प्रश्न सोडवणारे तज्ज्ञ अशी कार्यकर्त्यांची प्रतिमा तयार झाली.

दुसऱ्या दशकात अंधश्रद्धेचा प्रश्न कसा सोडवायचा, याचे तज्ज्ञ व अधिकारी व्यक्ती म्हणून कार्यकर्त्यांना मान्यता प्राप्त झाली. याच काळात समितीचे कार्यकर्ते समाजाला प्रश्न विचारायला, चिकित्सा करायला आणि तर्कशुद्ध विचार करायला प्रवृत्त करीत होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिदशेतच विज्ञानाचा संस्कार व्हावा म्हणून सुरू केलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ प्रकल्पातून या दशकात महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना समितीने प्रशिक्षित केले आणि लाखो विद्यार्थ्यांपर्यंत व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कृतिशील विचार पोहोचवणे शक्य झाले. अंधश्रद्धेचा प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार, अंगीकार यासोबत समितीने विधायक धर्मचिकित्सेलादेखील या टप्प्यात व्यापक प्रमाणात सुरुवात केली. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम समितीचे कार्यकर्ते करू लागले. राज्यभर  लक्ष्यवेधी ठरलेला शनिशिंगणापूर सत्याग्रह याच काळात झाला. येथूनच संविधानाच्या मूल्य आशयाशी सुसंगत अशी मूल्ये रुजविणारे काही उपक्रम सुरू केले गेले. विसर्जित मूर्ती व निर्माल्य दान करा मोहीम, फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी, आंतरजातीय-आंतरधर्मीय-सत्यशोधकी-साधे, कर्मकांडविरहित विवाह यांसारखे विधायक उपक्रम राबविले गेले. विस्तारणाऱ्या कामाला न्याय देण्यासाठी संघटनांतर्गत रचनेत विविध विभागांची निर्मिती करण्यात आली. संघटनेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याची पायाभरणीदेखील या टप्प्यात झाली आणि याच टप्प्यात समविचारी संस्था संघटना, साहित्य, शिक्षण, राजकारण, सिनेमा व अन्य दृक्श्राव्य माध्यमे.. अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रचंड मान्यतादेखील मिळाली.

तिसरा टप्पा हा समितीवर अनेक अर्थाने दीर्घकाळ परिणाम करणारा ठरला आहे. हा काळ समितीचा प्रभाव निर्माण करणारा आणि समितीवरही प्रभाव टाकणारा असा आहे. धर्मचिकित्सेकडून विवेकवादाकडे समिती याच काळात वळली. जगातील अन्य विवेकवादी चळवळींपेक्षा अंनिसने आपले वैचारिक वेगळेपण जपले आहे. त्याला मी ‘भारतीय कसावर आधारित विवेकवाद’ असे म्हणतो. पाश्चिमात्य देशातील प्रबोधनाची चळवळ, त्यातून तयार झालेली विवेकाची मांडणी ही ईश्वर नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, नीतीने जगण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धर्माची आवश्यकता नाही आणि शासनव्यवस्था व धर्मव्यवस्था यात फारकत असली पाहिजे, या तीन प्रमुख सिद्धांतांवर आधारलेली आहे. अंनिसने मात्र ही मांडणी जशीच्या तशी न स्वीकारता तिला अधिक मानवी रूप दिले आहे. यात चमत्कार करणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या देव कल्पनेला विरोध करीत असतानाच व्यापक नीतीचा आधार असलेल्या सकारात्मक देव कल्पनेचा आदर करण्याची भूमिका आहे. त्याबाबतचे संविधानाने बहाल केलेले व्यक्तिस्वातंत्र्य मान्य केले आहे. शोषण व कर्मकांडे नाकारणाऱ्या आणि नीतितत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या धर्माच्या विधायक रूपाचे स्वागत केले आहे. सोबत चिकित्सेचा अधिकार अबाधित ठेवण्याचा आग्रहीदेखील आहे. ही भूमिका महाराष्ट्रातील संत आणि समाज-सुधारकांच्या वैचारिक मशागतीचा परिणाम आहे. ती जास्त योग्य व समर्पक आहे. कारण मनुष्य केवळ विचार- तर्कावर चालणारा प्राणी नसून त्याच्या मेंदूचा एकतृतीयांश भाग हा आजही लिम्बिक कॉर्टेक्सचा.. म्हणजे भावनांचा आहे. म्हणून केवळ तर्काच्या कसोटीने त्याला समजावून घेता येणार नाही, त्याच्या भावनादेखील समजून घ्याव्या लागतील. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे.’

म्हणून देव आणि धर्माबाबत तटस्थ राहत, चिकित्सेचा आग्रह धरीत समिती उभी आहे. हा आग्रह समाजाला विचार करायला शिकवतो. म्हणूनच चिकित्सा करणारा, प्रश्न विचारणारा समाज उद्या विरोधालाही उभा राहील या भीतीने नवे विरोधक या टप्प्यात तयार झाले. तांत्रिक दोषांच्या आधारे न्यायालयात खटले दाखल करणे, खोटे बेछूट आरोप करणे, हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, कार्यक्रम उधळून लावण्यासाठी प्रयत्न करणे एवढे सर्व करूनही समितीच्या वाढ, विस्तार आणि प्रभाव यात थोडाही फरक पडत नाही, म्हणून अत्यंत निराश, द्वेष आणि पराभूत मानसिकतेतून डॉ. दाभोलकरांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात विरोधकांनी निर्घृण खून केला. डॉक्टरांच्या खुनानंतर तशी एक मालिकाच तयार झाली. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले. एकाच पद्धतीने झालेल्या या खुनांच्या तपासाचा पाठपुरावा समितीने अत्यंत निष्ठेने केलेला आहे. सर्व खुनांमागे सनातनी विचारांचे हात आहेत, हा समितीचा पहिल्या दिवसापासूनचा आरोपही सत्य ठरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, खुनाचे हस्तक व सूत्रधार पकडण्यात अजूनही यंत्रणेला यश आले नाही, याची प्रचंड वेदना आहे.

याच टप्प्यात समिती उपक्रमाचा परिप्रेक्ष्य व्यापक करीत अधिक परिणामकारक आणि कालसुसंगत बनली आहे. संविधान बांधिलकी महोत्सव, मानसिक आरोग्य प्रकल्पांतर्गत मानस मित्र संकल्पना, जोडीदाराची विवेकी निवड, फसव्या विज्ञानाबाबत प्रबोधन आणि संघर्ष, जात पंचायतीला मूठमाती अभियान, सांस्कृतिक अभिव्यक्तीअंतर्गत सडक नाटय़- िरगण नाटय़- फिल्म-गाणी अशा विविध प्रकारच्या उपक्रमांनी समिती पुढील टप्प्यावर गेली आहे. समितीने आपले उपक्रम हे सतत कालसुसंगत आणि नावीन्यपूर्ण ठेवल्यामुळे ती समाजात व सर्व प्रकारच्या माध्यमांत सतत चर्चेत राहिली, कायम चैतन्यशील राहिली आहे.

समितीच्या दुसऱ्या दशक-टप्प्यातच ठरवून नेतृत्वबदल झाला आणि मी डॉ. दाभोलकरांनंतर संघटनेचा कार्याध्यक्ष झालो. त्यानंतरच्या काळात डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या घटनेने समिती देशभर व जगभर माहीत झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाकडे जग आणि प्रामुख्याने तरुणाई अधिक कुतूहलाने बघायला लागली, असा अनुभव आम्ही घेतला. महाराष्ट्राच्या समाजकारणात अंधश्रद्धा निर्मूलनाचे घटित कार्य केंद्रस्थानी आले. ‘गर्व से कहो..’ म्हणण्याच्या या काळात ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या!’ असे म्हणणारी तरुणाई संघटनेसोबत जोडली गेली आहे. या दशकाच्या काही उपलब्धी सांगता येतील.

(अ) उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बुवा-बाबा महाराष्ट्रातून थांबले.

(ब) प्रदीर्घ पाठपुराव्याने आणि डॉ. दाभोलकरांच्या बलिदानानंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित करून घेण्यात समिती यशस्वी झाली.

(क) सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा समितीने पदरात पाडून घेतला.

दोन्ही पथदर्शी कायदे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केवळ कायदे करून घेऊन समिती गप्प बसलेली नाही, तर ते कायदे यथाशक्ती स्वतंत्रपणे राज्यव्यापी यात्रा काढून लोकांपर्यंत पोहोचवले. हजारो बोलक्या लोकांची प्रशिक्षणे आयोजित केली. आजपर्यंत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ५०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गतही जवळपास ५० गुन्हे दाखल झाले आहेत. आजपर्यंत १६ समाजांच्या जातपंचायती जनरेटय़ाने बरखास्त झाल्या आहेत. याच काळात समितीचे उपक्रम शासनाच्या निर्णयात, शासकीय धोरणात प्रतिबिंबित होऊ  लागले आहेत, तसेच शिक्षणव्यवस्थेत राबवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे समितीच्या कामाची परिणामकारकता व मान्यताही वाढलेली आहे.

एखाद्या सामाजिक क्षेत्रातील संघटनेसाठी ३० वर्षांचा काळ हा काही फार मोठा टप्पा नाही. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे की, ‘ही दशकांची नव्हे, तर शतकांची लढाई आहे.’ पण या अल्प कालावधीत समितीने आपली उपयुक्तता आणि समाजाभिमुखता सिद्ध केली आहे. मात्र, याबरोबरच डॉ. दाभोलकरांचा निर्घृण खून आणि खुनाच्या तपासातील दिरंगाई याबाबतच्या तीव्र वेदनेची किनारदेखील आम्हा सर्वाच्या मनात खोलवर आहे.

या टप्प्यावर भविष्याचा विचार करताना काही आव्हाने तर स्पष्ट दिसत आहेत. केवळ भारतात नव्हे, तर जगभर वाढलेली हिंसा आणि धर्माधता, त्याकडे आकृष्ट होणारी तरुणाई, त्यातून आलेली उन्मादावस्था हे एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला भांडवली जागतिकीकरणाच्या प्रभावाने अधिकाधिक आत्मकेंद्री होणारा समाज आहे. अशा वास्तवात अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या कार्यासाठी समर्पित संघटना चळवळीत रूपांतरित करून विवेकाधिष्ठित, शोषणमुक्त, समताधिष्ठित आणि लोकशाही- प्रजासत्ताकावर आधारित संवैधानिक समाजनिर्मितीचे ध्येय उराशी बाळगून त्यासाठी कटिबद्ध होत आहे. ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ हे त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे विषयसूत्र आहे. तेव्हा विवेकवाद, मानवतावाद या शब्दांच्या तत्त्वसैद्धांतिक चर्चेत न अडकता अधिक सुंदर, समृद्ध मानवी संबंध जोपासणारा समाज निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण कृतिशील राहण्याचा संकल्प आम्हाला अभिप्रेत आहे.

‘अंधश्रद्धा या विकासविरोधीच असतात’ हे म्हणताना ‘विकासाला मानवी चेहरा असावा’ हेदेखील गृहीत आहे. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजेच शोषणमुक्ती आणि याचाच अर्थ शोषणाच्या प्रेरणा असलेल्या द्वेष, मत्सर, राग, भीती या नकारात्मक भावनांवर विजय मिळवत प्रेम, वात्सल्य, करुणा, दया, शांततामय सहजीवन, परस्परसहकार्य, सहवेदना, परस्परविश्वास असलेल्या निकोप समाजाचे स्वप्न आम्ही बाळगून आहोत. ही शतकांची लढाई आहे, त्यामुळे आपल्या कोणाच्याही आयुष्याच्या वाटचालीत कदाचित हे शक्य नाही; पण पिढय़ान्पिढय़ांच्या प्रयत्नांतून असा सुंदर समाज निर्मिण्यासाठी पुढचे पाऊल समिती टाकू इच्छिते.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)

avinashpatilmans@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:01 pm

Web Title: maharashtra andhashraddha nirmoolan samiti mpg 94
Next Stories
1 तिहेरी तलाकबंदीचे राजकारण
2 अजब न्याय वर्तुळाचा..
3 चला, पुढचं विधेयक आणा!
Just Now!
X