‘प्र त्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनले आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही. हा शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. शिवसेना हेच एक वादळ आहे, त्यामुळं आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही.’ शिवसेना पक्षाच्या ५४ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांप्रति समर्पक शब्दांत दाखविलेला विश्वास आम्हाला बळ देणारा आहे. करोना महामारीच्या भयंकर संकटातून महाराष्ट्राला सावरण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान देशपातळीवर निश्चितच नोंद घेण्याजोगे आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतर शिवसेनेला आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने पक्षबांधणी करून सलग सत्तेत राहण्याचे कसब उद्धव ठाकरे यांनी साध्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे यांनी एखाद्या मुरब्बी राजकारण्यांप्रमाणे पुन्हा शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याबरोबर मुख्यमंत्रिपदही पक्षाला मिळवून दिले आहे. समाजकारण करायचे तर सत्ता हवी हे धोरण शिवसेनेने यापूर्वी अंगीकारले नव्हते, तथापि सत्तेत आल्यानंतरही शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षस्थापनेपासून राबविलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समीकरण तसूभरही ढळू न देता शिवसेनेला महाराष्ट्रातील मोठा पक्ष अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करून चालणार नाही.

मुळात शिवसेना ही आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी चालविलेली समाजाभिमुख चळवळ आहे. याला तडा जाऊ न देता आपल्या खांद्यावर पक्षाची धुरा आल्यापासून उद्धवजींनी अधिक नेटाने शिवसेना मजबूत केली आहे. १९९५ साली पहिल्यांदा शिवसेनेने महाराष्ट्राच्या सत्तापटलावर आपले स्थान अधोरेखित केले. शिवसेनेच्या सत्ताकाळात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले गेले. त्याची आठवण आजही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. स्वस्त धान्य दुकानातील दर स्थिर ठेवणे, गोरगरीब-कष्टकऱ्यांसाठी झुणका-भाकर केंद्रांची स्थापना यांसारखे अनेक निर्णय तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नाची शिवसेनेला जाण असल्याचे स्पष्ट करतात. त्यानंतरच्या काळात सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठय़ा उलथापालथी झाल्या. त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात शिवसेनेलाही बसली. अशा काळातच शिवसेनेचा आधारवड हरपला आणि शिवसेना संपणार अशी भाकिते राजकारणाच्या पटलावर सुरू झाली. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतरही अजिबात तोल न ढळू देता सर्वसामान्य शिवसैनिकांना विश्वास देत पक्ष सावरण्याचे कौशल्य केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच करू शकतात, हे मान्य करायलाच हवे. भारतीय राजकारणाच्या इतिहासाने नोंद घ्यावी, असा हा पक्षाचा लौकिक अधिक वृद्धिंगत करण्याचे काम स्व. बाळासाहेबांनंतर उद्धवजींनी मोठय़ा हिमतीने केले आहे. देशात हिंदुत्ववादी विचारांचे अनेक नेते आहेत. शिवसेना देखील हिंदुत्ववादी विचारांचाच पक्ष आहे. असे असतानाही अन्य जातिधर्मातील नागरिकांकडून उद्धव साहेब यांना मिळणारे प्रेम देशात अन्य हिंदुत्ववादी नेत्याच्या वाटय़ाला आलेले नाही. सर्वसमावेशक आणि व्यापक हिंदुत्वामुळेच राज्यातील सर्वधर्मीयांना शिवसेना आपलीशी वाटते.

ठाकरे कुटुंबातील एकाही व्यक्तीने याआधी मंत्रिपद भूषविलेले नाही. केवळ सत्तेचा रिमोट आपल्या हाती ठेवत स्व. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत पक्ष सांभाळला. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पक्षाला सत्तेत सन्मानाने वाटा मिळवून देण्यासाठी झालेल्या घडामोडीनंतर थेट मुख्यमंत्रिपद भूषविणारे उद्धवजी हे  ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती होत. विशेष म्हणजे उद्धवजींच्या मंत्रिमंडळात युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही आपल्या खात्याअंतर्गत जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करीत राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरवले आहेत. नेहमीच सामान्यांचे हीत जपणाऱ्या शिवसेनेने या वेळेसही सत्तेत आल्यानंतर अवघ्या दहा रुपयांत जेवण देणाऱ्या शिवभोजन योजनेची घोषणा करून ती अमलातही आणली. शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या लोकांसह मोलमजुरी करणाऱ्यांसाठी ही योजना प्रभावी ठरली आहे. विशेषत: करोना संकटाच्या काळात तर या योजनेद्वारे अवघ्या पाच रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देत महाराष्ट्रातल्या लाखो गोरगरिबांना दिलासा दिला आहे.

शिवसेना सत्तेत आल्यानंतर राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे पहिले आव्हान सरकारसमोर होते. त्यातून सावरत असतानाच करोना या जागतिक महामारीचे संकट महाराष्ट्रावरही ओढवले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला याची सर्वाधिक झळ बसत असल्याने येथील सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते. हे ओळखून मुंबई आणि महाराष्ट्र करोनामुक्त करण्यासाठी मिशन मोडवर काम करत प्रभावी उपाययोजना ते राबवित आहेत. राज्यातील आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणेला वेळोवेळी योग्य ते निर्देश देऊन करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ते करताना दिसतात. दररोज विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामकाकाजाचा आढावा घेऊन करोनाबाधितांचा मृत्युदर शून्यावर आणण्याबरोबर संसर्ग रोखण्यासाठीही आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला देत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने पक्ष, राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र हे कुटुंब मानून एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे राज्यातील सर्व घटकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळवून महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल यात शंका नाही.

मुख्यमंत्रिपदी उद्धव साहेब विराजमान झाल्यानंतर त्यांना प्रशासकीय अनुभव अजिबात नाही म्हणून त्यांना हे पद पेलवणार नाही अशी चर्चा केली जात होती. करोना काळात त्यांनी केलेले काम पाहून नियतीने योग्य व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी विराजमान केले असल्याचा विश्वास आता राज्यातील प्रत्येकाला वाटत आहे. नव्हे तर संकट येणार होते म्हणूनच मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे धावत गेले असावे. करोना संकटाच्या काळात त्यांनी केलेल्या प्रेमळ आणि आत्मीय आवाहनामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या संकटकाळात खंबीरपणे उभे राहण्याचे धैर्य आले.  राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिल्यास संपादक, लेखक, छायाचित्रकार, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या गडकोट  किल्लय़ांविषयी आस्था असलेले अशा अनेक छटा उद्धवजींमध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील गडकोट किल्लय़ांचे संवर्धन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाला जिवंत ठेवण्यासाठी किल्ले रायगडचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेणारे उद्धवजी म्हणजे ‘बोले तैसा चाले’ असे व्यक्तिमत्त्व म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकतेच किल्ले विजयदुर्गच्या पडझडीचे छायाचित्र एका दुर्गप्रेमीने समाजमाध्यमातून प्रसारित केले होते. स्वत: छायाचित्रणाची आवड असलेल्या उद्धवजींनी या छायाचित्राची दखल घेत तत्काळ पुरातत्त्व खात्याला दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. यातून उद्धवजींचे दुर्गप्रेम दिसून येते. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने सोडविण्यासाठी ते सातत्याने आग्रही असतात. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तळमळीने बोलतात. लौकिकार्थाने राजकीय नेतृत्वाच्या केवळ  प्रतिमा मोठय़ा होण्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाचा आलेख सातत्यपूर्ण कामातून निर्माण करणारे खूप कमी नेते आहेत. त्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचे काम ठळकपणे समोर येते. मुंबई पालिका ते उस्मानाबादसारख्या छोटय़ा जिल्ह्य़ातील नगरपालिका प्रत्येक ठिकाणी ते आपुलकीने विचारणा करतात. अडीअडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात.

उस्मानाबाद नगर पालिकेचा अध्यक्ष या नात्याने अनेक महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारसमोर मांडल्या आहेत. दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगून सादर केलेल्या अनेक प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे त्याकडे आवर्जून लक्ष असते. त्यामुळे शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळणारच आहे.

नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्व असा तिहेरी संगम आदरणीय उद्धवजींच्या व्यक्तिरेखेत आहे. लोकसेवेच्या भावनेतून त्यांनी राज्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबादवासीयांच्या वतीने मी त्यांचे अभीष्टचिंतन करतो आणि साहेबांना निरामय दीर्घायुष्य लाभो, अशी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो.

जय महाराष्ट्र!

– मकरंद राजेनिंबाळकर

अध्यक्ष, नगर परिषद, उस्मानाबाद (धाराशिव)