‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. हिंदुहृदयसम्राट आदरणीय शिवसेनाप्रमुखांची तीच परंपरा आपल्या सर्वाना ती अधिक ताकदीने पुढे घेऊन जायची आहे. सोबत असलेल्यांवर केवळ विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नव्हे तर संस्कृती आहे. त्यातूनच आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. तो दूषित हेतूने केलेला प्रयत्न आपण मोडून काढल्यामुळेच राज्याचे नेतृत्व आज शिवसेनेच्या हाती आले आहे. भविष्यात देशाच्या पंतप्रधानपदीदेखील शिवसैनिक विराजमान व्हायला हवा. हा निर्धार ठेवून जनहितासाठी आपण अधिक जागरूकपणे काम करायला हवे.’

अंगावर रोमांच उभे करणारे हे शब्द आहेत, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना दूरचित्रसंवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून साहेबांनी संबोधित केले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारी भावना दिलासा देणारी होती. आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ देणारी होती. आपल्या पाठीवर हात ठेवून कुटुंबातील कर्ता पुरुष ज्या पद्धतीने विश्वास, धीर आणि प्रेरणा देण्याचे काम करतो, अगदी त्याच भूमिकेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यभरातील आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना मोठय़ा तळमळीने जनसेवा करण्याचे आवाहन करत होते. साडेपाच दशकांचा टप्पा गाठत आलेल्या शिवसेनेला उद्धवसाहेबांच्या रूपाने सक्षम असे कुटुंबवत्सल नेतृत्व लाभले आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर राज्यातील तमाम नागरिक आपल्या कुटुंबाचा भाग आहेत, या प्रांजळ भावनेतून उद्धवसाहेब स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत.

जगभरात थैमान घातलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आपल्या दारापर्यंत पोहोचला आहे. अशा संकटाच्या काळात संकटाला न घाबरता, न डगमगता कुटुंबकर्त्यांप्रमाणे प्रत्येकाची विचारपूस करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच राज्यातील जनतेने अनुभवला आहे. प्रत्येक संकटात शिवसैनिक नागरिकांच्या मदतीला धावून गेला आहे. चक्रीवादळ असो अथवा करोनाचे संकट. शिवसैनिक कधीच घाबरला नाही. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला आहे.

मी स्वत: मागील साडेतीन दशकांपासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. आदरणीय बाळासाहेब, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे या तिन्ही नेतृत्वांचा सहवास लाभला. हे खरे तर भाग्याचे आहे. मराठवाडय़ातील सगळ्यात शेवटचा जिल्हा असलेल्या धाराशिवमधील आपल्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या पाठीवर थाप देऊन काम करण्याची प्रेरणा देणारे मुख्यमंत्री सक्षम संघटक आहेत. सेनाप्रमुखांच्या नंतर त्यांनी संघटनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास हीच त्यांच्या उत्तम संघटन कौशल्याला मिळालेली पावती आहे.

‘आय.ए.एन.ए.एस.’ आणि ‘सी व्होटर्स’या संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आता सर्वाच्या समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के इतकी असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. देशातील विविध

राज्यांतील आणि राष्ट्र स्तरावरील नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या अंतिम अहवालानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. स्वत:ला झोकून देऊन पक्ष आणि राज्यासाठी उद्धवसाहेबांनी घेतलेल्या अपार मेहनतीचे हे फळ आहे. मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ांत दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने पाठ फिरवल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती. नापिकीच्या जाचक संकटात अडकलेला मराठवाडय़ातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असताना त्याला मदतीचा हात देऊन कर्जमुक्त करण्याचे काम उद्धवजींनी केले आहे. धाराशिव जिल्हा बँकेतून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांच्या दारासमोर बॅण्ड वाजवणार असल्याचा इशारा तुघलकी कारभार करणाऱ्या जिल्हा बँकेने दिला. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि जिल्हा बँकेमुळे ओढावलेली नामुष्की यामुळे हवालदिल झालेल्या जिल्ह्य़ातील हजारो शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. ‘लोकसत्ता’ने थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून दिली जाणारी अमानवी वागणूक चव्हाटय़ावर मांडली. पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी हे वृत्त वाचून आपल्याशी थेट संपर्क केला आणि शेतकऱ्यांच्या दारात बॅण्ड वाजवणाऱ्या जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्याचे आदेश दिले. शेतक ऱ्यांचे दु:ख ज्या बँक व्यवस्थापनाच्या कानापर्यंत पोहोचत नाही, त्यांचे कान शिवसेनेच्या ढोल आंदोलनामुळे फुटले पाहिजेत, अशा शब्दांत संताप व्यक्त करून त्यांनी जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले. तेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री नव्हते. पक्षप्रमुख म्हणून केवळ वृत्तपत्रातून वाचलेल्या एका बातमीमुळे जिल्ह्य़ातील हजारो शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला पेच त्यांनी क्षणात सोडवला आणि जिल्हा बँकेवर बॅण्ड वाजविण्याची मोहीम मागे घेण्याची नामुष्की ओढावली. अशा कितीतरी आठवणी आणि प्रसंग सांगता येतील.

राज्यातील अन्य जिल्ह्य़ांच्या तुलनेत अभावग्रस्त असलेल्या धाराशिव जिल्ह्य़ावर आदरणीय उद्धवसाहेबांचे विशेष लक्ष असते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच शिवसेनेच्या जनसेवेची प्रत्येक मोहीम सुरू केली जाते. त्यामुळे धाराशिव जिल्हा आणि शिवसेनेचे आत्मिक ऋणानुबंध आहेत. मराठवाडय़ात शिवसेनेचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पहिल्यांदा धाराशिवकरांनी पोहचवला. धाराशिव जिल्ह्य़ात १९८९ च्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्वाना धनुष्यबाण माहीत झाले. त्यापूर्वी सात वर्षे काही तरुणांनी एकत्रित येऊन शहरातील विजय चौकात पहिली शाखा सुरू केली. त्या वेळी इयत्ता पाचवीत असलेला मी सर्वात लहान वयाचा शिवसैनिक होतो. बाळासाहेबांचे रेडिओवरील भाषण ऐकून शिवसैनिक झालेली तेव्हाची पिढी मोठय़ा उमेदीने कामाला लागली. तेव्हापासून शिवसेनेवर धाराशिवकरांनी मनापासून प्रेम केले. चार वेळा या जिल्ह्य़ातून लोकसभेत शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचे काम बहाद्दर शिवसैनिकांनी केले आहे. त्या सर्वाच्या पाठीशी आदरणीय बाळासाहेबांच्यानंतर उद्धवसाहेब नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळेच लाभाच्या पदाची अपेक्षा न करता जिल्ह्य़ातील लाखो शिवसैनिक त्यांच्या एका शब्दावर पुढे झेपावतात.

साहेब स्वत: उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. एरियल फोटोग्राफीत त्यांचा हातखंडा आहे. जमिनीवरून आभाळाकडे पाहणाऱ्या नेत्यांची संख्या खूप असेल, परंतु आभाळातून जमिनीकडे लक्ष ठेवणारे क्वचित असतात. आपल्याकडे एक म्हण सर्वश्रुत आहे, ‘घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’. उद्धवसाहेबांच्या व्यक्तिरेखेला तंतोतंत लागू पडणारे हे शब्द आहेत. आकाशातून अत्यंत कौशल्याने गडकोट किल्ले, सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा आणि महाराष्ट्रातील भौगोलिक वारसा टिपण्याचे काम त्यांनी केले आहे. ज्या नजरेतून हा समृद्ध वारसा टिपला आहे, त्याच नजरेने त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन कार्यक्रमदेखील ते स्वत: अमलात आणत आहेत. स्वत:ची दृष्टी आणि स्वत:चा दृष्टिकोन राज्याला अधिक उन्नत करण्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असाच आहे.

धाराशिवला उद्धव ठाकरे नळदुर्ग आणि परंडा येथील किल्ल्यांचे छायाचित्रण करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत चित्रपट अभिनेते मिलिंद गुणाजीही होते. दरवाजा नसलेल्या हेलिकॉप्टरमधून स्वत:चा तोल सांभाळून, बेफामपणे घोंघावणाऱ्या वाऱ्याचा सामना करीत अत्यंत एकाग्रतेने त्यांनी आभाळातून आपला ऐतिहासिक वारसा टिपला आहे. केवळ टिपून थांबले नाहीत तर अगदी तो जपण्यासाठीदेखील धडपडत आहेत.

शिवसैनिक म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिक म्हणून सतत आपल्या मनात एक विचार येऊन जातो. राज्यात जनतेच्या भल्याचे ठरेल असे काही सध्या घडू पाहात आहे. निर्माण झालेल्या संकटात उद्धवसाहेब यांच्याकडे नेतृत्व येणे ही जणू काळाचीच मागणी असावी. करोनामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीतही उद्धवसाहेबांचे नेतृत्व अधिक तावून सुलाखून बाहेर निघेल यात शंका नाही. संपन्न महाराष्ट्र निर्मितीसाठी उद्धवसाहेबांचे सकारात्मक प्रयत्न बावनकशी सोन्यासारखे आहेत, अशी प्रतिक्रिया राज्यातील सामान्य नागरिकसुद्धा देऊ लागला आहे. मुळात साहेब स्वत: कुटुंबवत्सल आहेत. त्यामुळेच सुख-दु:खात कुटुंबप्रमुखाची नेमकी जबाबदारी त्यांना ठाऊक आहे. मागील सहा महिन्यांत प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी आपले सहकारी आणि राज्यातील जनता यांच्यासोबत ते खंबीरपणे उभे राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील मायबाप जनतेसमोर माथा झुकवून त्यांनी केवळ लोकसेवेसाठीच नम्रपणे हे पद आपण खांद्यावर घेतले असल्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रत्येक कृतीतून हा संदेश आज खरा ठरत आहे. साहेबांना उदंड दीर्घायुष्य लाभो, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

-अनिल खोचरे

सहसंपर्क प्रमुख,धाराशिव लोकसभा मतदारसंघ