विस्थापित, आदिवासी, दलित अशा नाही रे वर्गाचा आवाज आपल्या साहित्यातून प्रखरतेने मांडणाऱ्या लेखिका आणि शोषितांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यां महाश्वेता देवी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या एका ज्येष्ठ सुहृदाने जागवलेल्या या आठवणी..

गेल्या दोन वर्षांत गुजरातीमधील महत्त्वाचे लेखक नारायण देसाई, कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती, प्रसिद्ध चित्रकार के. जी. सुब्रमणीयन यांसारख्या मान्यवरांचे निधन झाले. आधीच कमकुवत होत चाललेल्या आपल्या सार्वजनिक सदसद्विवेकाला पडलेले हे मोठे खिंडार महाश्वेता देवींच्या जाण्याने अधिकच प्रचंड झाले आहे. ज्याला इंग्रजीत ‘कॉन्शन्स कीपर’ म्हणतात, त्या प्रकारची भूमिका महाश्वेता देवींनी गेली साठ वर्षे अव्याहतपणे केली. वेठमजूर असोत की आदिवासी, भटके विमुक्त असोत की वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या तरुणी, किंवा सिंगूर वा नंदीग्राममधले विस्थापित, या साऱ्यांची बाजू घेऊन त्यांच्या हक्कांसाठी अथक लढणाऱ्या महाश्वेता देवी भारतीय साहित्यातील खरोखरच तेजस्वी तारा होत्या. वयाच्या २६ व्या वर्षी लिहिलेली ‘झाशीची राणी’ ही कादंबरी आणि ८६ व्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातल्या कोरकू आदिवासींवर लिहिलेली ‘म्हादू ’ही कथा या सुदीर्घ साहित्यनिर्मिती काळात महाश्वेता देवींनी अनेक रूपके, मिथके आणि कथानके अत्यंत कल्पकतेने निर्माण केली होती. ‘रुदाली’, ‘हजार चुराशीर माँ’ या अत्यंत नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी बनवलेल्या चित्रपटांची कथानके महाश्वेता देवींच्या कथांवरून घेतली आहेत. महाभारताच्या कुंती आणि द्रौपदी यांसारख्या व्यक्तिरेखांना महाश्वेता देवींनी आजच्या काळाचे संदर्भ पुरवलेच, पण त्याचबरोबर त्यांना स्त्रीवादी लढय़ाची प्रमुख व्यक्तिरेखाही बनवले.

मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचे वय होते ७२ आणि माझे वय होते ४८. बडोद्यामध्ये वेडियर एल्विन व्याख्यानमालिकेमध्ये भाषण देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित केले होते. या वेळेपर्यंत त्यांना ज्ञानपीठ, मॅगसेसे, पद्मश्री हे पुरस्कार मिळालेले होते. त्यामुळे एका प्रचंड दरारा वाटावा अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत असे चित्र माझ्या मनात होते. रात्री ११ वाजता त्या बडोद्याच्या माझ्या घरी पोहोचल्या. त्यांच्या स्वागतासाठी मी पुढे गेलो तेव्हा मला वाटले की एखाद्या शेजारच्या कुटुंबातील अत्यंत साधी, कौटुंबिक पद्धतीची स्त्रीच चुकून आली आहे. इतक्या साध्या. इतक्या सरळ. कुठच्याही प्रकारचे अवडंबर नसलेल्या. फक्त जरुरी असेल इतक्याच वस्तू जवळ बाळगणाऱ्या. या बाईंच्या स्वतच्या मालकीचे घर वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत नव्हते. पायात कधी असल्या तर साध्या स्लीपर्स असायच्या. जवळ जेमतेम दोनतीन साडय़ा असायच्या. पर्स वगैरे असली तर असली, नाही तर नाही. हातात एक साधी पिशवी असायची. गांधींनंतर इतक्या साधेपणाने राहणारी इतकी महान अशी व्यक्ती माझ्या पाहण्यात तरी पहिलीच होती. नारायण देसाई हेही असेच होते. या दोघांत आणखी साम्य म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि कधीच कुणाची खोटी स्तुती न करणे. संपूर्णत: निर्भय आणि सर्वत्र निर्भीड. महाश्वेता देवींबरोबर मी अनेकदा देशाचे वेगवेगळे पंतप्रधान, प्रमुख न्यायाधीश, प्रख्यात कलाकार वगैरे मान्यवरांना भेटलो. प्रत्येक वेळेला त्यांना पाहून समोरची व्यक्ती कितीही मोठी असू दे, पण ती स्वत: स्वागताला उभी राहायची. असा त्यांच्याविषयी सर्वत्र एक नैतिक दरारा होता.

फ्रँकफर्टला आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारताला जेव्हा प्रमुख स्थान देण्यात आले होते तेव्हा त्या मेळाव्याचे उद्घाटन महाश्वेता देवींनी केले होते. मी त्या प्रसंगी तिथे उपस्थित होतो. तिथे इटली, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडन येथील त्यांचे बरेच चाहते आपल्या भाषांमधल्या महाश्वेता देवींच्या पुस्तकांच्या भाषांतराच्या प्रती स्वाक्षरीसाठी घेऊन आले होते. मला वाटते, रवींद्रनाथ टागोर आणि प्रेमचंद या दोघांनंतर जगातल्या इतक्या भाषांमध्ये ज्यांचे साहित्य पोहोचले आहे अशा नंतरच्या काळातील महाश्वेता देवी या एकमेव साहित्यिक होत्या.

१९९८ ते २०१२ या काळात महाश्वेता देवींनी बडोद्यातील माझे घर स्वत:चे मानले होते. दर महिन्यातील जवळपास आठ ते दहा दिवस त्या कोलकात्याहून बडोद्याला येत. आमच्याकडे राहात. त्या, माझी पत्नी आणि मी, असे आम्ही भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी आणि भटके विमुक्त यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरायचो. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जवळजवळ तीनेक लाख किलोमीटरचा प्रवास आम्ही मिळून केला आहे. शेकडो, हजारो वेळा त्यांना आदिवासींशी आणि आदिवासींनी त्यांच्याशी संवाद साधताना मी अनुभवले आहे. देशाच्या कोणत्याही भागात जा, तेथील प्रत्येक आदिवासी त्यांना उत्स्फूर्तपणे माँ म्हणायचा. आपल्या देशातील सर्व आदिवासींसाठी त्या आई कधी झाल्या ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. जवळजवळ ३५ वर्षे त्या आदिवासींच्या कथा बंगाली वर्तमानपत्रातून लिहीत राहिल्या. अनेक वेळा त्यांनी जाहीरपणे हेही बोलून दाखवले की मृत्यूनंतरची चिरशांती त्यांना तेजगढसारख्या गावात आदिवासींच्या पवित्र वृक्षाखाली मिळेल.

महाश्वेता देवी गेल्या. अजूनही सतत काम करत राहण्याची इच्छा असताना गेल्या. आपल्या सध्याच्या सार्वजनिक जीवनात ‘कॉन्शन्स कीपर’ची कधी नव्हे इतकी गरज असताना त्या गेल्या. आई जाते ते दु:ख काय असते त्याचा अनुभव देशातील आदिवासी सध्या घेत आहेत.

 

– डॉ. गणेश देवी

– शब्दांकन – वैशाली चिटणीस