19 February 2019

News Flash

महात्मा गांधींचा इतका द्वेष का?

वास्तविक गांधीजींच्या भूमिका व्यापक देशहिताच्या होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

महात्मा गांधी

विचार
प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव – response.lokprabha@expressindia.com

हिंदुत्ववादी शक्ती नेहमी मुस्लिमांचा अनुनय केला म्हणून, पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा दिला म्हणून गांधीजींचा द्वेष करताना दिसतात. वास्तविक गांधीजींच्या भूमिका व्यापक देशहिताच्या होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपल्याकडे राजकीय सामाजिक पातळीवर अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती दिसतात.  उदाहरणार्थ, एकाच वेळी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानले जाते आणि दुसरीकडे त्यांची हत्या करणाऱ्याची मंदिरं उभी केली जातात. हत्या करणारा देशभक्त आणि ज्याची हत्या झाली तो राष्ट्रपिता? या प्रवृत्तीकडे सामान्यांनी कसे पहावे?

धार्मिक उन्माद वाढविण्यात यश मिळाल्याने भाजपा केंद्रात सत्तेवर आली, या निष्कर्षांत काही प्रमाणात तथ्य असले तरी ते पूर्ण सत्य नाही. देशभरात भाजपाच्या उमेदवारांना मिळणारी मते पाहिली तर सर्वच मतदार धार्मिक आधारावर मतदान करतात, असे म्हणावे लागेल. पण हे वास्तव नाही. उलट या निवडणुकीत भाजपने जाणीवपूर्वक युपीए सरकारकडून झालेल्या चुकांचे भांडवल करून भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवून देत ‘सुशासनाचा’ नारा देत विकासाच्या मुद्दय़ावर भर दिला होता. काँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेल्या मतदारांनी त्यांना पर्याय म्हणून जवळ केले.

लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. असे असताना काँग्रेसला झालंय तरी काय? खरे तर धर्मनिरपेक्षता आणि विविधता ही खरे तर काँग्रेसची मूलतत्त्वे. पण निवडणुकीतील पराभवामुळे अप्रत्यक्षपणे का होईना, त्यांच्यापासून दूर जाण्याचा नुसता विचार सुरू असेल तरी ते पराभवापेक्षा पक्षासाठी आणि संपूर्ण देशाच्या व्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. काँग्रेसच्या सध्याच्या पराभवाची मालिका हे पक्षावरील मोठे गंभीर संकट आहे यात शंका नाही. पण शंभरी उलटलेल्या काँग्रेसला विजय आणि पराभव या नव्या गोष्टी नाहीत. खरे तर यंदाच्या निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव हा फक्त काँग्रेस पक्षाचा पराभव नाही तर देशातील एकूणच धर्मनिरपेक्ष राजकारणाचा पराभव आहे. आणि त्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची नोंद इतिहासात होईल. ज्यांची काँग्रेसने धर्माध म्हणून संभावना केली, त्या भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा मुकाबला काँग्रेस करू शकली नाही. त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचे पालन केले, ही चूक आहे की मूल्यांपासून काँग्रेस दूर गेल्याचे चित्र निर्माण झाले ही चूक आहे, याचे मार्गदर्शन जाणत्या काँग्रेसजनांनी नव्या नेतृवाला केले पाहिजे. अल्पसंख्याकांना कुरवाळणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे हे समजून घेऊन धर्मनिरपेक्षतेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली असती, डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले ‘हिंदू कोड बिल’ लागू करून समान नागरी कायदा अमलात आणला असता तर भाजपला कार्यक्रमच शिल्लक राहिला नसता. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनी केली असली तरी त्यांच्या विचारांना बगल देऊन काँग्रेसनेच गांधी विचारांची हत्या केली. परिणामी गोडसे प्रवृत्ती आज देशभक्त ठरते आहे.

महात्मा गांधी सर्वधर्मसमभाव म्हणजेच सर्व धर्म सारखेच आहेत असे मानीत, तर इतर परंपरावादी मात्र ‘प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा’ असे म्हणत. प्रत्येकाने आपापल्या परंपरागत धर्माप्रमाणे वागावे असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ प्रत्येक धर्माचा परंपरागत आचार त्या अनुयायांसाठी रास्त आहे, असा असतो. कितीही गोड असली तरी ही परंपरा जतन करू इच्छिणाऱ्या स्थितिवाद्यांची कल्पना आहे. सर्वधर्मसमभावाची कल्पना याहून निराळी आहे. ‘सर्वधर्मसमभाव मानला म्हणजे नवा धर्म काढता येत नाही, धर्मातर करता येत नाही’ ही गांधीजींची भूमिका किती धर्मद्रोही आहे हे मांडताना नरहर कुरुंदकर म्हणतात, सर्व जग इस्लाममध्ये आणण्याची इच्छा करणाऱ्या तबलीगवाल्यांना गांधीजींची कल्पना पटणे कधीच शक्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने ही भूमिका म्हणजे धर्मावर कुठीराघात आहे. आपला धर्म सर्वात जुना, सर्वश्रेष्ठ आणि सर्वात पवित्र आहे अशी हिंदूंचीही कल्पना होती. गांधीजींच्या सर्वधर्मसमभावाच्या कल्पनेला सनातनी हिंदूंचा मनातून यासाठी विरोध होता की हिंदू धर्माची निरपवाद पूज्यता गांधीजी धोक्यात आणीत होते.

‘सर्व धर्म सारखेच खरे आहेत’ या गांधीजींच्या वाक्याचा अर्थ सांगताना कुरुंदकर पुढे म्हणतात, सगळेच धर्म खरे असल्यामुळे सगळ्या धर्मात एकच शिकवण आहे म्हणून कुणीही माणूस आपल्या स्वत:च्या परंपराप्राप्त धर्माप्रमाणे खरोखरी वागण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यामुळे आपल्या धर्माचा खरा अनुयायी होणारा माणूस आपोआप जगातील सर्व धर्माचा अनुयायी होऊन जातो. गांधीजी  असे समजत की, खरे हिंदू होण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असल्यामुळे ते खरे शीख, खरे लिंगायत तर होतच आहेत, पण खरे मुस्लिमही होत आहेत. ही कल्पना मुस्लिमांना आणि हिंदूंना पटत नसे. सर्व सनातनी हिंदू गांधींना धर्मनाशक समजत.

गांधीजींची सर्वधर्मसमभावाची कल्पना ही सर्व धर्मातील परंपरावादी हे शत्रू मानते. व्यावहारिक पातळीवर गांधीजींच्या घोषणेचा अर्थ सर्वच धर्म खोटे आहेत असा होतो. कुरुंदकर म्हणतात, ‘गांधीजींसारखे लोक पवित्र असतात. संत असतात. पण खऱ्या अर्थाने धार्मिक कधीच नसतात. प्रथमदर्शनी पाहताना हा माणूस सर्व धर्माचा पूजक दिसतो. पण बारकाईने पाहताना हा माणूस सर्व धर्माचा पूजक नसून तोच सगळ्यात मोठा शत्रू असतो असे दिसू लागते. हा मुद्दा विक्षिप्त आणि विसंगत वाटू लागतो पण ते एक फार महत्त्वाचे सत्य आहे.’

अशा प्रकारे गांधीजींना अधार्मिक आणि आधुनिक ठरवून शेवटी कुरुंदकर अभिप्राय नोंदवितात की या खंडप्राय देशात एक धर्मातीत शासन उभे करावे आणि ते उभे करणे शक्य व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे वातावरण सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला नव्हता. तो गांधीजींनी केला. त्यामुळे आपण जातीधर्मातीत शासन या देशात चालवू शकलो आहोत. हा गांधीजींचा नवभारताला मिळालेला फार मोठा वारसा आहे.

भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आली याचा अर्थ बहुसंख्याक हिंदूूू नथुराम प्रवृत्तीच्या मागे आहेत, असा होत नाही. तसेच काँग्रेस अल्पसंख्याकांचा अनुनय करते म्हणजे ती बहुसंख्याक हिंदू विरोधी आहे असाही होत नाही. म्हणून आपल्या राजकारणात हिंदू जनता विरुद्ध हिंदुत्ववाद हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुस्लीम समाज गांधीजींच्या मागे कधीच नव्हता. गांधीजींचे नेतृत्व हे हिंदू समाजाचे नेतृत्व होते. या देशात ८५ टक्के लोक हिंदू होते. हिंदू हिंदुत्ववाद्यांच्या मागे गेले असते तर गांधीजींची राजकीय किंमत शून्य झाली असती. कारण हिंदूचा पाठिंबा हेच गांधींचे सामथ्र्य होते. हिंदुस्थानातील हिंदू लोक हिंदू धर्मावर निष्ठा ठेवणारे होते आणि आहेत. हिंदू धर्माची धर्मनिष्ठ माणसे हिंदुत्ववाद्यांच्या मागे न जाता गांधीसारख्याच्या मागे काय म्हणून गेली? हिंदुस्थानातील हिंदू हिंदुत्ववाद्यांच्या मागे का जात नाहीत हा या चर्चेतील मूलभूत प्रश्न आहे. गांधींची चेष्टा करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एकही सशस्त्र उठाव केला नाही. केळकरांसारख्या टिळकानुयायांनी तर कोणताच लढा दिला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त संघटनाच बांधत बसला!  हे सगळेच हिंदुत्ववादी इ. स. १९२० नंतर फक्त प्रतिसहकारवादी झाले. इंग्रजांच्या विरुद्ध एकही हिंदुत्ववादी लढय़ात कधी उतरला नाही. निदान हैदराबादचा लढा हा तर मुस्लीमविरोधी होता. भारताची एकात्मता  निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढय़ात तरी भाग घेतला का? ताकद कमी असणे हा गुन्हा नसतो. स्वातंत्र्यलढा चालू असताना ताकद न वापरणे हा मात्र गुन्हा असतो. निझामावर बॉम्ब फेकणारा पुन्हा गांधींचा जयघोष करणाराच असतो. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रिझवी दिसला नाही. निझाम आणि जिना दिसले नाहीत. या पिस्तुलातील गोळी इ. स. १९२० नंतर इंग्रजांच्या विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी फक्त गांधीसाठी होती.

हिंदुत्ववाद्यांनी नेहमीच गांधीजींचा द्वेष केला. मुस्लीम वेगळा देश मागत होते. िहदुत्ववाद्यांना त्यांचा फारसा द्वेष वाटला नाही. त्यांचा सगळा तिरस्कार अखंड भारत टिकविण्यासाठी सतत मुस्लिमांना सांभाळून घेणाऱ्या गांधीच्या विरुद्ध उफाळून आला. अखंड भारतात बंगाल, पंजाब, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत हे चार प्रांत मुस्लीम बहुसंख्येचे होते. काश्मीरही मुस्लीम बहुसंख्येचे होते. या भागात अखंड भारतवादी शक्तींनी निवडणूक जिंकल्याशिवाय अखंड भारत निर्माण होणे शक्य नव्हते. शनिवार वाडय़ासमोर ‘हिंदुस्थान हिंदुओं का’ अशी घोषणा करून सिंध, पंजाबच्या निवडणुका कशा जिंकता आल्या असत्या? आज काश्मीर विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अकरा अधिक दहा असे एकवीस हजार कोटींची केंद्राची मदत असूनही काश्मीर खोऱ्यात एकही जागा भाजपला निवडून आणता आलेली नाही हे वास्तव आहे. पण हिंदू हे एक स्वयंभू राष्ट्र असून मुस्लीम हे आपल्यापेक्षा पृथक राष्ट्र आहे, हेच तर हिंदुत्ववाद्यांचे कायमचे तुणतुणे होते. मुस्लीम हे वेगळे राष्ट्र असतील तर त्यांची बहुसंख्या असणारा प्रदेश हिंदुस्थानच्या बाहेर जाणारच, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती. फाळणी टाळण्यात गांधींना अपयश आले हे कुणीही नाकारणार नाही. पण ते का आले, याचा तटस्थपणे अभ्यास केला पाहिजे. ते मुस्लिमांशी करारामागून करार करत टिळक – गोखल्यांच्या वाटेने निघाले असते तर भारत अखंड राहिला असता. पण ४० कोटी हिंदूंचे (भारतीयांचे) जीवन सांस्कृतिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाले असते आणि भारताचे भविष्य राजकीयदृष्टय़ा अंधारलेले असते. हिंदूंचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ देण्यास गांधीजी तयार नव्हते, म्हणून फाळणी टळू शकली नाही. मुस्लीम समाजाला वेगळे राष्ट्र मिळत असताना त्यांना अल्पसंख्य म्हणून राहण्यात रस कसा असणार? शिवाय त्यांच्या मदतीला इंग्रजांची फुटीर नीती होतीच म्हणून त्यांना जबरदस्तीने भारतात ठेवणे शक्य नव्हते आणि ते लोकशाही, अहिंसा तसंच मूल्यविरोधी होते. म्हणून गांधीजी अखंड भारत टिकवण्यात अयशस्वी झाले. गांधीजींचे हे अपयश मान्य केले तरी अखंड भारत टिकविण्याची लढाई ते सर्व सामर्थ्यांनिशी खेळले होते. पण ज्यांनी लढाच दिला नाही, अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लीम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला त्यांचे वर्णन कसे करावे? अखंड भारताचा तोंडाने जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद मान्य केला आणि अखंड भारत टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला. नरहर कुरुंदकरांनी ‘जागर’, ‘शिवरात्र’ या ग्रंथात ही मांडणी केली आहे. तर ‘काँग्रेसने आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला?’ या प्रश्नाचे अधिक अभ्यासपूर्ण चिंतन प्रा. शेषेराव मोरेंनी मांडले. जिज्ञासूंनी ही पुस्तके वाचावीत.
सौजन्य – लोकप्रभा

First Published on August 20, 2018 12:42 pm

Web Title: mahatma gandhi lokprabha article