‘सर्वात बलवान आणि सामथ्र्यवान पंतप्रधान’ म्हणून आज नरेंद्र मोदी ओळखले जातात. परंतु आपल्या सामर्थ्यांचा ते फारच क्वचित वापर करतात. ५६ इंच छाती असल्याचे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींवर हुकूमशहा असण्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो. परंतु अलीकडेच गाईंच्या नावावर फोफावत चाललेल्या ‘मॉब लिंचिंग’ म्हणजेच घोळक्याने ठेचून हत्या करणाऱ्या प्रवृत्तींवर भाष्य करताना मात्र गांधीवादाचा आसरा घेऊनच करतात.

नरेंद्र मोदी हे गुजरातेतून येत असले तरी त्यांना कोणीही गांधीवादी म्हणणार नाही. पण मोदी असंख्य वेळा गांधीजप करताना दिसतात. खादी पेहराव असो, चरखा चालवितानाच्या छबीसाठी पोज देणे असो, गांधींचा भाषणात चित्रपटात शोभेल असा उल्लेख करणे असो किंवा आपले गुजरात कनेक्शन सांगताना असो, मोदी अनेक वेळा गांधीसापेक्ष गोष्टी करताना आढळतात.

असे असले तरीही मोदींना त्यांचे खंदे समर्थकसुद्धा गांधीवादी म्हणणार नाहीत. त्यापेक्षा त्यांना वाजपेयींइतकेच कट्टर स्वयंसेवक म्हणता येईल. फरक एवढाच की वाजपेयी मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यथित होताना दिसायचे, परंतु लगेचच नंतर पक्षाच्या व्यासपीठावरून आपण ‘प्रथम स्वयंसेवक आणि नंतर पंतप्रधान’ अशी सावरासावरही करायचे. मोदी मात्र मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांवर काहीच भाष्य करताना दिसत नाहीत. तसे ते त्यांना राजकीयदृष्टय़ा सोयीस्कर ठरत असावे. ‘आपण सारे हिंदू आणि ते मुस्लीम’ असा बनाव केला की धार्मिक ध्रुवीकरण होते आणि परिणामी येणारे राजकीय यश भाजपला पाहिजे असते. गुजरात मुस्लीम संहारावर बोलताना ‘गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं की वाईट वाटतं’ ही त्यांची विवादित प्रतिक्रिया त्याचेच द्योतक. पण मुस्लिमांच्या जागी दलितांवर हल्ले होत असतील तर मोदी एकतर शांत बसणे पसंत करतात (जसे सहारणपूर दलित अत्याचार वगैरे) किंवा नाटकीयरीत्या भावुक होताना दिसतात (जसे रोहित वेमुला प्रकरण).

पण बऱ्याच वेळा नरेंद्र मोदी गोरक्षक दलातर्फे होत असलेल्या ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणावर गांधीवादी भूमिका घेताना दिसतात. २९ जून रोजी साबरमती आश्रमात बोलताना मोदी यांनी गाईंच्या नावाखाली होत असलेल्या हत्या अस्वीकारार्ह असल्याचे प्रतिपादन केले. गाईंवर प्रेम करणाऱ्या खुद्द गांधी आणि विनोभा भावे यांनी अशा हिंसेचा विरोध केला असता असे सांगताना कोणीही कायदा हातात घेऊ  नये असा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर ‘वैष्णव जणतो तेणे कहिये जे’च्या ऐवजी ‘जनप्रतिनिधी जणतो तेणे कहिये जे’ असे करायला हवे याची आठवण करून दिली. मोदी स्वत: नरसी मेहताचे हे भजन कितपत पाळतात हे तूर्तास बाजूला ठेवू, पण गांधीजींची आपली भक्ती दाखविण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ  शकतो याची आठवणही करून दिली.

मोदी हे साबरमतीत बोलताना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतात. असे म्हणणे हे गुन्हा झाल्याचे कबूल करणे होय. परंतु उत्तर प्रदेशच्या अखलाकची हत्या असो, गुजरातेतील ऊना येथे दलितास फटकारणे असो वा राजस्थानच्या पेहलू खानची हत्या असो अशा बहुतांश ठिकाणी गाईंविरुद्ध गुन्हा घडलेलाच नसतो. गाईंची कत्तल करण्यासंबंधीचा कोणताच गुन्हा घडलेला नसताना कायदा हाती घेऊ  नका म्हणणे म्हणजे मयत लोक गुन्हेगार होते, त्यांना कायद्याने शिक्षा होईल तुम्ही हत्या करू नका असे म्हणण्यासारखे ठरत नाही काय?

रोखण्याची मोकळीक..

रा. स्व. संघाचे राकेश सिन्हा यांनी एका कार्यक्रमात मोदी यांचे साबरमतीतील भाषण जबरदस्त आणि कणखर असल्याचे सांगत ‘मॉब लिंचिंग’विरोधी केले जाणारे प्रदर्शन हे केवळ संघविरोधी असल्याचा वास येत असल्याचा दावा केला होता. तसेच मोदी यांनी राज्य सरकारांना अशा हत्या रोखण्यासाठी मोकळीक दिली आहेच, त्यामुळे या संघटनांशी आपला काहीही संबंध नाही असे मोदी यांनी दाखवून दिल्याचे मत प्रकट केले होते.

परंतु गोरक्षकांच्या हिंसेविरोधातील मोदींचे हे वक्तव्य खरेच प्रभावी आणि कणखर आहे काय? त्यांच्या या भाषणाने अशा हत्या थांबतील? कोणत्या कणखरपणाबद्दल सिन्हा बोलत आहेत? खरे पाहता मोदींनी आपल्या भाषणात राज्य सरकारांना थेट कोणतेही आदेश दिलेले नाहीत. तसेच मागील वर्षी दिलेल्या ‘गोरक्षकांची यादी’ तयार करण्याबद्दल अजून त्यांनी कोणताच पाठपुरावा केलेला नाही.

सत्तेत आल्यापासून मोदींचे हे गोरक्षकांबद्दलचे हे केवळ दुसरेच वक्तव्य होते. मागच्या ऑगस्ट महिन्यात हैदराबादेत बोलताना गुजरातेतील ऊना येथील दलित अत्याचाराबद्दल बोलताना भावूक होऊन माझ्या दलित बांधवांना मारायचे असेल तर आधी मला मारा, माझ्या दलित बांधवांवर गोळ्या झाडायच्या असतील तर माझ्यावर झाडा असा फिल्मी कांगावा त्यांनी केला होता. त्यानंतरही दलित अत्याचार आणि गोरक्षकांची हिंसा थांबली नव्हती.

एवढे नक्की आहे की मोदींचे साबरमतीमधील वक्तव्य सडेतोड बिलकूल नाही. याचे कारण म्हणजे ते ‘मॉब लिंचिंग’ करणाऱ्यांना किंवा गोरक्षक यांच्या शिक्षेच्या गंभीर परिणामांबद्दल न बोलता, त्यांचा सदसद्विवेकबुद्धीला साकडे घालताना दिसतात. इतरत्र सडेतोड बोलणारे मोदी दलित आणि मुस्लीमविरोधी हल्ल्यांबाबत बोलताना मात्र, हिंसा हा मार्ग नव्हे असे मोघम बोलत भावुकपणे विवेकाच्या गोष्टी करतात. याचाच अर्थ मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच. रोहित वेमुलाच्या आईबद्दल अश्रू ढाळणाऱ्या मोदींनी काही महिन्यांतच रोहितच्या आत्महत्येस काही अंशी कारणीभूत असणाऱ्या अप्पा राव या हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंचा सन्मान केला होता.

विवेकाला हाक देणे..

मग मोदींच्या अचानक गांधीवादी बनण्याचे कारण काय? तर हिंसेविरुद्ध ठोस कारवाई करण्यापेक्षा हिंसा करणाऱ्याच्या  विवेकाला हाक देणे म्हणजे एक सोयीस्कर युक्ती आहे असे त्यांना वाटले असेल. महात्मा गांधींनीसुद्धा अस्पृश्यता किंवा हिंदू-मुस्लीम वादावर बोलताना, अत्याचार करणाऱ्यांच्या विवेकाला अशीच हाक देणे पसंत केले होते. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात मान्य नव्हते.

१९४६ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले?’ या आपल्या पुस्तकात बाबासाहेब लिहितात ‘गांधींच्या मते उच्चवर्णीय लोकांना हजारो वर्षे अस्पृश्यता पाळल्याने आपल्या पापाचे प्रायश्चित्त करावे लागेल. त्यांना अस्पृश्यासाठी सामाजिक काम करावे लागेल आणि हीच त्यांची स्वत:साठी शिक्षा असेल.’

या युक्तिवादाला उत्तर देताना बाबासाहेब लिहितात, ‘‘गांधीजी अत्याचार करणाऱ्या उच्चवर्णीय हिंदूंना कायद्याची शिक्षा  ठोठावयाला सांगून, अस्पृश्यांचे हक्क का अबाधित राखू शकत नाहीत? म्हणजेच गांधींना उच्चवर्णीय हिंदूंना न दुखावता अस्पृश्यता निवारण करायचे आहे. अशा व्यक्तीने अस्पृश्यांबद्दल बोलणे कितपत योग्य आहे? गांधी हे उच्चवर्णीय हिंदूंना खूश करण्यासाठी उतावळे आहेत. यासाठीच ते उच्चवर्णीय हिंदूंविरुद्ध दलितांच्या सत्याग्रहास विरोध करतात, अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करतात. गांधीजी उच्चवर्णीय हिंदूंना खूश करण्यासाठी इतके उतावळे आहेत की त्यांना अस्पृश्यांसाठी ते बिनकामाचे ठरले तरी काही फरक पडणार नाही. म्हणूनच गांधींचा संपूर्ण अस्पृश्यता निवारण कार्यक्रम हा फक्त बोलाचीच कढी असून त्यामागे काहीही कार्यक्रम नाही.’’

गांधीजींची अस्पृश्यता निवारणाबाबतची भूमिका आणि मोदींची ‘मॉब लिंचिंग’विरोधी भूमिका यात बरेच साम्य आहे. मोदी उच्चवर्णीय हिंदूंना खूश करण्यासाठी इतके उतावळे आहेत की दलित आणि मुस्लीम जनतेसाठी ते बिनकामाचे ठरले तरी त्यांना काही फरक पडणार नाही.

अहिंसक कार्यक्रम नाही?

मोदीची राजकीय कारकीर्द हिंदूंच्या मुस्लीम द्वेषावर आधारलेली आहे. आधी राम मंदिर बाबरी मशीद आणि आता समाजमाध्यमांवरील विखारी आणि बऱ्याच खोटय़ा व्हिडीओ आणि पोस्टद्वारे मुस्लीमविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप आपली शक्ती पणाला लावत असते. फोफावत चाललेला मुस्लीम द्वेष कमी करणे म्हणजे आपले राजकीय अस्तित्व पणाला लावण्यासारखे आहे. म्हणूनच ‘अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करेन’ असे बोलण्यापेक्षा ‘गांधीजींना आवडले नसते’ असे सोपे आणि सोयीस्कर बोलणे मोदी पसंत करतात.

लोकसभेत बहुमत असणाऱ्या पंतप्रधानाने विवेकावर बोलण्यापेक्षा संविधान आणि कायद्याचा धाक दाखवू नये काय? मुख्यमंत्र्यांना कुठल्याही परिस्थितीत गोरक्षेच्या नावाखालील हिंसा थांबवा, संशयितांना ताब्यात घ्या अशी तंबी देताना ते का दिसत नाहीत? योग दिवस असो किंवा स्वच्छ भारत अभियान, सरसकट सगळे जण आदेश मानून कामाला लागत असताना मग हिंसेबाबतीतच मोदी पक्षातील लोकांना कोणताच  कार्यक्रम का देत नाहीत?

मग अशा परिस्थितीत गांधीवाद मार्ग हा उत्तम उपाय ठरतो. फक्त भावनिक बोल हे संविधान आणि कायद्याला अनुसरून उद्घोष आणि कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपे आणि सुलभ ठरते. मोदींना गांधीजींचा जयघोष करणे म्हणूनच सोयीस्कर वाटत असावे.

रविकिरण शिंदे

Shinderr@gmail.com