वांद्रय़ाच्या शासकीय वसाहतीतील ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ ही त्या विभागातील मराठी माध्यमाची एक जुनी-जाणती शाळा. १९६० साली सुरू झालेली आणि आजही आपल्या मराठीपणाचा आब टिकवून असलेली! कालौघात मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद पडत असताना या शाळेच्या वैशिष्टय़ांमध्ये मात्र सातत्याने वाढ होत असल्याने इंग्रजी माध्यमातील काही मुलेही माध्यम बदलून या शाळेकडे आकृष्ट झाली आहेत.
मराठी शाळा टिकण्यासाठी त्यांचा दर्जा वाढला पाहिजे, हे लक्षात घेत शाळेत विद्यार्थ्यांसाठी एकाहून एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. किंबहुना, अभ्यासाला पूरक ठरणारे अत्यंत कल्पक उपक्रम हे शाळेचे बलस्थान ठरले आहे. सुरुवातीला २० वर्गानी सुरू झालेल्या या शाळेतील वर्गाची संख्या आजपावेतो ५१ झाली आहे. संस्थेने २००८ सालापासून सकाळी सात ते सायंकाळी सात असे १२ तास सुरू राहणारे सेमी इंग्रजी असे ‘स्वामी विवेकानंद गुरुकुल’ही सुरू केले आहे.
क्रमिक अभ्यासाला नावीन्यपूर्णतेचा साज
क्रमिक अभ्यास नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याकडे या शाळेतील शिक्षक भर देतात. ‘घोका-ओका’ या कुचकामी पद्धतीला पूर्णपणे फाटा देत अध्यापनात मुलांना सहभागी करून घेत, त्यांच्या विचारांना चालना देण्याकडे शिक्षकांचा कल असतो. अलीकडेच शाळेत माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या राजकीय व्यवस्थेचे व निवडणूक प्रक्रियेचे भान यावे, याकरिता ‘विद्यार्थी संसद’ उपक्रम राबवला गेला. याअंतर्गत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निवडणूक घेतली गेली. विद्यार्थ्यांनी पक्ष स्थापन केले, काही जण अपक्ष म्हणून लढले. निवडणुकांचा प्रचार, पक्षाचा जाहीरनामा, निवडणुकीचे निशाण, मतपत्रिका, मतदान आणि मतमोजणी या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वत: केल्या. नागरिकशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातील पाठ त्यांना यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आला. निवडून आलेल्या सदस्यांचे अधिवेशन शाळेत घेतले गेले. त्यात नवनियुक्त सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या शाळेसमोर मांडल्या.
प्रदर्शने, चर्चा, भित्तिपत्रके
खेळातून गणित शिकवण्यासाठी, संकल्पना स्पष्ट होण्यासाठी गणिताचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. मुलांना गणित शिकण्यास उपयुक्त ठरणारे १०० पेक्षा जास्त खेळ व शैक्षणिक साहित्य मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून बनवले आहेत. शाळेत ‘इंग्लिश दिना’च्या दिवशी विद्यार्थी इंग्रजीमधील स्वरचित कविता, संवाद वर्गावर्गात सादर करतात. यंदा ‘सेव्ह द टायगर’ या विषयावर विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रके बनवली होती. स्वातंत्र्यदिनी अथवा प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास झेंडय़ाच्या निर्मितीपासून राष्ट्रासमोरील विविध विषयांवर चर्चा केली जाते. शाळेत इंग्रजी तसेच संस्कृत संभाषण वर्ग सुरू आहेत.
समूह अध्यापन
शाळेत विषयवार कक्ष असून विद्यार्थी त्या त्या तासिकेला त्या त्या कक्षामध्ये जातात. तासिका संपली की विद्यार्थी कक्ष बदलतात. समूह अध्यापनाचे (ग्रुप लर्निग) प्रयोग शाळेत केले जातात. भूगोलातील पिके, हवामान या संकल्पना तसेच विज्ञानातील इंद्रियसंस्था यासारखी प्रकरणे केवळ प्रश्नोत्तरांतून न शिकता त्यावर विद्यार्थी व्यक्तिगतरीत्या अथवा गटागटाने प्रकल्प तयार करतात. इतिहास हा गोष्टींतून शिकवला जातो. त्यावर नाटुकली बसवली जाते. विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हे विषय परस्परांशी कसे जवळून संबंधित आहेत, हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिक्षकवर्गाचा प्रयत्न असतो. गणित व भूगोलाची तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा गेल्या किती तरी वर्षांपासून या शाळेत घेतली जाते. आता विद्यार्थ्यांना कौशल्याधारित तंत्र अभ्यासक्रम शिकून लवकर पायावर उभे राहता यावे, याकरिता ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन’चा (एनएसडीसी) अभ्यासक्रम सुरू करण्याचाही शाळेचा मानस आहे.
आजमितीस १२५ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू शाळेने तयार केले आहेत. शारीरिक शिक्षण हा विषय शिकवणारे नरेंद्र कुंदर हे शिक्षक भारतीय खो खो संघाचे प्रशिक्षक आहेत, तर सुहास जोशी हे शिक्षक महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे प्रशिक्षक आहेत. शाळेच्या भव्य मैदानात खो खो, कबड्डी, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस आदी खेळांचे प्रशिक्षण मुलांना घेता येते. क्रीडासंबंधित विशेष प्रशिक्षण घेतलेले शिक्षक, अद्ययावत व्यायामशाळा याचा फायदा मुलांना होतो. शाळेच्या, महत्त्वाच्या क्रीडा सामन्यांचे व्हिडीयो काढून त्यासंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चाविनिमय केला जातो. कला अकादमी सुरू करण्याचा शाळेचा मानस आहे.
अभिव्यक्तीला चालना
पालकांचे कामाचे वाढलेले तास आणि समाजातील असुरक्षित वातावरण लक्षात घेत संस्थेने स्वतंत्रपणे सुरू केलेल्या स्वामी विवेकानंद गुरुकुलात विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला चालना मिळावी, याकरिता अभ्यासेतर अनेक विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांला स्वत:ची ओळख व्हावी, आवड व गती ओळखता यावी, यासाठी शाळा प्रयत्नशील असते. या शाळेत नृत्य, संगणक, वाद्यवादन, मातीकाम, पाककला, ओरिगामी, अभिनय, सुलेखन हे उपक्रम अभ्यासक्रमाचाच एक भाग आहेत. मराठी माध्यमातून मुलांना दर्जेदार आणि अद्ययावत पद्धतीने शिक्षण कसे प्राप्त होईल याकरिता शिक्षकवर्ग आणि संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. शाळेच्या शिक्षकवर्गाला नवनव्या अध्यापन पद्धतींचा परिचय व्हावा, अध्यापनाचा दर्जा राखला जावा, याकरिता वेळोवेळी शिक्षकांसाठी कार्यशाळांचे व चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.
मुलांना शाळेत आनंदाने यावेसे वाटायला हवे आणि मराठी माध्यम म्हणून होणारी मुलांची गळती थांबायला हवी, हे दोन उद्देश नजरेसमोर ठेवून शाळा वाटचाल करीत आहे. शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमशीलतेचे यश म्हणूनच गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. शाळेतील ८० टक्के विद्यार्थी आजूबाजूच्या वस्त्यांतील असून मुंबईतील लालबाग ते गोरेगाव परिसरातील काही पालकांनीही आपल्या पाल्यांसाठी वांद्रय़ातील ही शाळा निवडली आहे. मुंबईतील काही नामवंत शाळांमधील इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या १७-१८ मुलांनी आपली शाळा सोडून गेल्या तीन-चार वर्षांत शाळेत प्रवेश घेतला आहे.
एकूणच मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत असताना मराठी शाळांनी कालानुरूप आवश्यक ते बदल केले आणि प्रामुख्याने शिक्षकांनीही हे नवे बदल आत्मसात करून आपली अध्यापनाची पद्धत अद्ययावत केली तर शाळा केवळ टिकतेच असे नाही तर अधिकाधिक बहरते याचे ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ मूर्तिमंत उदाहरण ठरावे

संवादकौशल्य तासिका
मुलांना विचार सुस्पष्टरीत्या व्यक्त करता यावेत, याकरिता संवादकौशल्याची रीतसर तासिका विद्यालयात असते. शाब्दिक खेळ, गटचर्चा, वादसंवाद उपक्रमही वेळोवेळी आखले जातात. सद्य घडामोडींबाबत सजगता आणि सामाजिक घडामोडींबाबत स्वतंत्र विचार रुजविण्याकरिता चालू घडामोडींची चर्चा सातत्याने विद्यार्थ्यांसोबत केली जाते. उदा. अलीकडेच पाडला गेलेला हँकॉक ब्रिज! तो का पाडला, त्याचे परिणाम, पाडण्यासाठी कशाकशाचं प्लानिंग करण्यात आलं असेल, ही योजना राबविण्यासाठी कुठल्या यंत्रणा सहभागी झाल्या असतील, अशा एक ना अनेक बाजूंचे चिंतन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या साहाय्याने केले. यामुळे निरीक्षण कौशल्याबरोबरच वर्तमानपत्र व अवांतर वाचनाकडे मुले वळतात.

जीवनानुभव देण्याचा प्रयत्न
आम्ही गुरुकुलातून पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यम काढून टाकले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे इंग्रजी उत्तम व्हावे, याकरिता वेळापत्रकातील इंग्रजीचे तास वाढवले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत राम उरला नाही, हा तथाकथित आक्षेप पुरता पुसून टाकण्याचा प्रयत्न आमची शाळा नेटाने करीत आहे. वैविध्यपूर्ण कार्यपत्रिका तयार करणे, मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टीने नवनव्या उपक्रमांचे आयोजन करणे या गोष्टी शिक्षकवर्ग सातत्याने करतो. विद्यार्थ्यांना जीवनानुभव देतानाच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्यासाठी शाळा सतत नवनवे प्रयत्न करीत असते. शिक्षणव्यवस्थेत होऊ घातलेले बदल ओळखून त्यानुसार अध्यापन प्रक्रिया तयार करायला शाळेचे शिक्षक तत्पर असतात.
– मिलिंद वि. चिंदरकर,
संस्थेचे सचिव

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia. com

सुचिता देशपांडे
suchita.deshpande@expressindia.com